राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील पाचव्या अंकातील पाचव्या प्रवेशात संभाजी महाराजांबद्दल काही घृणास्पद आणि अवमानकारक मजकूर लिहून गडकऱ्यांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून शासनाने ‘संपूर्ण गडकरी खंड १’ मधून ‘राजसंन्यास’ हे नाटक वगळण्याचा निर्णय राज्य साहित्य व संस्कृती मंडळामार्फत घेतला आहे, असे वृत्त ‘लोकसत्ता’मधून (दि. २३ ऑगस्ट २०२५) प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात काही ऊहापोह करण्याआधी ‘राजसंन्यास’ या नाटकाविषयी थोडेसे.

गडकऱ्यांचे हे नाटक अपूर्ण आहे. पुढे गडकरीभक्त आचार्य अत्र्यांनी ‘गडकरी-सर्वस्व’ हा ग्रंथ सिद्ध केला. त्यात त्यांनी या नाटकाविषयी विस्तृत रीतीने लिहिले आहे. ते लिहितात, ‘‘या नाटकाच्या जन्माची हकिकत त्यामध्ये योजावयाची पात्रे, त्याचे कथानक आणि त्याची भव्यता याबद्दल गडकऱ्यांनीच मला वेळोवेळी सांगितले आहे… या नाटकातील काही अपूर्ण भागातील काही मुख्य प्रवेशाची साधारण कल्पना मी माझ्या आठवणींवरून तयार केलेली आहे.’’ या नाटकाच्या पाचव्या अंकातील पाचव्या प्रवेशात साबाजी आणि संभाजीराजे यांच्यात झालेला पुढील संवाद आणि प्रसंग आलेला आहे. ‘‘राजा, तुझं नाव नीट ऐक. गोब्राह्मणप्रतिपादक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज!’’ त्यावर पश्चातापदग्ध संभाजीराजे म्हणतात- ‘‘नाही साबाजी, ही माझी किताबत नाही… ’’ इथून पुढचा मजकूर घृणास्पद आणि अवमानकारक ठरवण्यात आलेला आहे. आचार्य अत्रे या मजकुराबद्दल लिहितात, ‘‘लाव्हारसात लेखणी बुडवून हे सारे ज्वलंत संवाद गडकऱ्यांनी लिहिले असावेत असे वाटते. ‘राजसंन्यास’ हा गडकऱ्यांचा एक महान वाग्यज्ञ आहे. मराठी इतिहासाची, मराठी संस्कृतीची, मराठी भाषेची, मराठी शौर्याची आणि मराठी इमानाची ही एक अमर गाथा आहे. शिवकालातल्या एखाद्या किल्ल्याचे उद्ध्वस्त स्वरूप पाहून आपल्या मनाची जी स्थिती होते तीच स्थिती गडकऱ्यांचे ‘राजसंन्यास’ हे नाटक वाचून होते. त्याच्या अपूर्ण स्वरूपातच त्याची भव्यता आणि सौंदर्य यांचा खरा साक्षात्कार होतो.

गडकऱ्यांनी संभाजीच्या मुखातून वदवलेल्या या उद्गारांवरून आणि अत्रे यांनी यावर केलेल्या टिप्पण्यांमधून त्यांचा संभाजीराजांचा अवमान करण्याचा उद्देश अजिबात दिसून येत नाही तर संभाजींच्या चरित्राची आणि चारित्र्याची लोकमानसात असलेली छबी डोळ्यांसमोर ठेवूनच हे उद्गार लिहिलेले असावेत. हे नाटक जो संपूर्ण वाचेल त्याला त्यात संभाजीराजांचे भरपूर उदात्तीकरण झालेले आढळेल.

संभाजींच्या जीवनातीलच एका प्रसंगावर विदर्भातील जुन्या पिढीतील एक श्रेष्ठ कवी ‘बी’ ऊर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांनी ‘कमळा’ हे कथाकाव्य रचले. संभाजीराजांची थोरात नामक मराठी सरदाराच्या कमळा नावाच्या कन्येवर नजर जाते, तिला तिच्या इच्छेविरुद्ध शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात येते आणि मानी कमळेला परपुरुषाच्या स्पर्शाने डागाळलेला देह घेऊन जगणे असह्य वाटल्याने, ती शिवनेरीच्या तटावरून खालच्या दरीत उडी घेऊन आत्महत्या करते, अशी ती कथा. यासारखी आणखीही उदाहरणे देता येतील. या उदाहरणांमागे एखाद्या प्रसिद्ध इतिहासपुरुषाच्या जीवनातील काही खऱ्या वा कल्पित घटनांआधारे आपली प्रतिभापूरित साहित्यनिर्मिती करण्याचा साहित्यकारांचा उद्देश असतो. परंतु त्या वेळी संभाजीराजांबद्दल जनमानसात काय प्रतिमा होती हे खुद्द सावरकरांच्या आणि गोळवलकरांच्या पुढील उद्गारांवरून दिसून येते.

‘हिंदुपदपादशाही’ या आपल्या ग्रंथामध्ये सावरकरांनी संभाजीराजांना ‘नाकर्ता’ म्हटले आहे. (पृ. १२). ‘‘संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही’’ (पृ. १४) असेही ते लिहितात. सावरकर लिहितात, ‘‘एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारीपण गेल्यामुळे त्या वेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते. ’’ (पृ. १३).

गोळवलकर गुरुजी आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ ऊर्फ विचारधन या ग्रंथात लिहितात- ‘‘सिंहासनारूढ होताच संभाजी महाराजांनी काही पूर्वग्रहांमुळे खंडोजीच्या वडिलांना हत्तीच्या पायी दिले. खंडोजींचे वडील शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी एक होते. खंडो बल्लाळ त्या वेळी स्वाभिमानी, तडफदार, शूर तरुण होता. परंतु इतके असूनही संभाजी महाराजांनी केलेला अपमान त्यांनी शांतपणे गिळून टाकला. पुढे संभाजीची पापी नजर खंडोजींच्या बहिणीकडे वळली. खंडो बल्लाळांनी बहिणीच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी तिला आत्महत्या करण्याची अनुमती दिली; परंतु संभाजीविषयीची राजनिष्ठा सोडली नाही. कारण संभाजीच्या अंगी व्यक्तिश: कितीही दुर्गुण असले, तरी उगवत्या हिंदू स्वराज्याच्या एकतेचे ते प्रतीक होते.’’ (‘विचारधन’, पृ. ३९६).

आता येथे प्रश्न असा उपस्थित होतो की, ‘राजसंन्यास’मध्ये संभाजीराजांबद्दल अवमानकारक मजकूर आल्यामुळे ते नाटक वगळण्याचा निर्णय झाला, तोच न्याय वर दिलेली अवतरणे ज्या पुस्तकांमधून आली आहेत, त्या पुस्तकांना लागू होईल का? ‘राजसंन्यास’चे उदाहरण हे सरळसरळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचे उदाहरण आहे. साहित्यिक हे शब्दप्रभू असतात. त्यांना जे म्हणायचे असते ते स्पष्टपणे न म्हणतादेखील वक्रोक्ती, उपहास, श्लेषादी अलंकार इत्यादींच्या साहाय्याने ते आपला आशय जनतेच्या मनावर बिंबवू शकतात. साहित्यिकांच्या अभिव्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची ही गळचेपी करण्याचे धोरण हे विद्यामान साहित्यिक यांच्यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसत नाही तर जे साहित्यिक दिवंगत झाले आहेत अशांचीही गळचेपी त्यांच्या मरणोपरांत होताना दिसत आहे. ‘राजसंन्यास’ हे त्याचेच उदाहरण आहे.

जॉर्ज ऑर्वेल याने आपल्या ‘शूटिंग अ एलिफंट’ या निबंधसंग्रहात त्याच्या नेहमीच्या मार्मिक पद्धतीने यावर प्रकाश टाकला आहे. तो म्हणतो, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या ‘धर्ममता’ला स्वत:ला बांधून घेणे, विशिष्ट अशा राजकीय मतप्रणालीचा बिनतक्रार स्वीकार करणे, एखाद्या ‘वादा’च्या संपूर्णपणे आहारी जाणे म्हणजे एकप्रकारच्या सर्वंकषवृत्तीच्या अमलाखाली जाणेच होय. हे वातावरण बुद्धिप्रामाण्याला म्हणजेच उत्तम प्रकारच्या गद्या साहित्याच्या निर्मितीला तितकेसे परिपोषक ठरत नाही. कोणत्याही प्रकारच्या विचारप्रणालीची बंधने ही प्रतिभेला, नवनवोन्मेषशाली प्रज्ञेला सहन होणेच शक्य नाही. अशी व्यक्ती कोणत्याच प्रकारच्या थोर साहित्याला जन्म देऊ शकत नाही.’’

दुसऱ्या शब्दांत हेच सांगावयाचे झाल्यास स्वत:ला ज्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करावयाचे आहे त्या प्रकारच्या राष्ट्रनिर्मितीत ज्या व्यक्ती, ज्या व्यक्तींच्या चरित्रातील घटना अथवा इतिहास अडचणीच्या ठरतील त्या सर्व घटना अथवा इतिहास पुसून टाकण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचे चित्र दिसत आहे. संभाजीचे चरित्र लिहावयाचे झाल्यास वर दिलेला मजकूर अजिबात न येता, तो आपल्या धर्माचा विलक्षण अभिमानी होता, त्याने आपला धर्म विकण्याचे नाकारले आणि धर्मरक्षणार्थच आपल्या प्राणाची आहुती देऊन हिंदुजातीला अक्षय उज्ज्वलता आणून दिली, अशाच प्रकारचा मजकूर येईल.

पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी इतिहासाची मोडतोड करणे, आपल्याला अननुकूल गोष्टी गाळणे आणि हव्या असलेल्या तेवढ्याच गोष्टी ठेवून इतिहासाचे पुनर्लेखन करणे ही जनतेची फसवणूक असते. आजवरच्या हुकूमशहांनी त्यांना हव्या असलेल्या राष्ट्रनिर्मितीसाठी आपल्या गतकाळाचे वैभव आठवून देणारा तेवढाच इतिहास लोकांसमोर ठेवला आणि त्यांच्या भावना चेतावल्या. असे करताना ते आपल्या विरोधकांची प्रतिमा खलनायकासारखी रंगवतात, विरोधकांना कमी लेखतात, त्यांची अवहेलना करतात आणि ते राष्ट्रविरोधी आहेत, कर्तृत्वहीन आहेत असा प्रचार करतात. अशा रीतीने विरोधकांबद्दल जनतेच्या मनात विष पेरून, जनता आपल्या मागे यावी यासाठी ते इतिहासाचा एक हत्यार म्हणून उपयोग करतात.

पण बोलूनचालून ते एक हत्यार असते. ते फार काळ चालू शकत नाही.

आता शेवटचा मुद्दा. ‘राजसंन्यास’च्या बाबतीत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने आपला ‘कणा’ न दाखवता शासनाच्या मनसुब्याला पाठिंबा दिला, याबद्दल ‘मंडळा’वर काही जण नाराजी व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. आज कोणती महत्त्वाची संस्था आपले स्वायत्तपण टिकवून आहे? आणि कोणती संस्था शासननिर्णयाच्या विरोधात जात आहे? निवडणूक आयोगासारख्या एवढ्या बलाढ्य संस्थेची ही स्थिती आहे, तर ‘मंडळा’ची स्थिती याहून वेगळी असेल अशी अपेक्षा बाळगणे कितपत सयुक्तिक आहे? आणि एवढेही करून ‘मंडळा’च्या उच्चपदस्थांनी बाणेदारपणा दाखवून आपल्या पदाचा राजीनामा दिला तर काय होईल? त्या ठिकाणी दुसरा येईल. तो अधिक ‘कडवा’ राहू शकतो आणि शासनाचे धोरण-निर्णय अधिक एकनिष्ठेने राबवू शकतो. तेव्हा याबाबतीत ‘मंडळा’कडून फार अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. ‘अर्थस्य पुरुषो दास:’ हे महाभारतातील वचन ते व्यवस्थितपणे आचरणात आणत आहेत.

या सर्वांवरून हाच निष्कर्ष काढावासा वाटतो की, ‘कालायै तस्मै नम:’ असे म्हणत हा अतिरेक कुठल्या थराला जातो, हे निमूटपणे पाहणे, यातच शहाणपण आहे.