एमसीएम (मास कम्युनिकेशन अॅण्ड मार्केटिंग) ही भारतातील खऱ्या अर्थाने एक संपूर्ण एजन्सी होती. तिचा पाया होता, सर्जनशीलता आणि ही एजन्सी उभी केली होती एका २९ वर्षांच्या तरुणाने, जो मुळात एक कवी होता. त्याचे नाव होते केर्सी कात्रक. त्याने ही एजन्सी १९६५ साली सुरू केली, उत्तमरीत्या चालवली आणि कदाचित संपवलीसुद्धा! त्या एजन्सीमध्ये केर्सीने अजित बालकृष्णन, सुदर्शन धीर, वीरू हिरेमठ, रवी गुप्ता, पन्ना जैन, अरुण काळे, अनिल कपूर, मोहम्मद खान, अरुण कोलटकर, अरुण नंदा आणि किरण नगरकर अशी एकाहून एक असामान्य माणसे आणली होती. एमसीएमचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांची मर्यादेपेक्षा जास्त संख्या, त्यात काही अगदी लहान तर काही अगदी मोठे! तसेच त्यांचे बजेटही लहानमोठे असे. मात्र एजन्सीमध्ये काम करणारे सगळे दिग्गज होते. अशा वेळी लहान आणि मोठ्या ग्राहकांवर सारखाच वेळ, संसाधने खर्च होत असे. या कारणामुळे तसेच इतरही काही चुकीच्या हाताळणीमुळे १९७० च्या सुमारास एमसीएम कोसळली.

एमसीएम कोसळल्यावर केर्सी कात्रक तडक हिमालयात निघून गेला. एजन्सीमधील कर्मचारी इतरत्र पसरले. त्या कर्मचाऱ्यांमधील अरुण नंदा आणि अजित बालकृष्णन यांची मैत्री आयआयएम कोलकात्यापासूनची होती. दोघांनी मिळून स्वत:ची एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि १९७३ साली त्यांनी ‘रिडिफ्युजन’ची स्थापना केली. वरळीतील एका इमारतीमधील एका खोलीतून त्यांनी या एजन्सीची सुरुवात केली. तीही रेडिओवरील जाहिरातींपासून.

अरुण नंदा यांचा जन्म १९४३ सालचा. ते श्रीमंत घरचे होते आणि राजघराण्यांशी संबंधित होते. त्यांचे शिक्षण डेहराडूनच्या प्रसिद्ध डून स्कूलमधून झाले. त्यांच्या वर्गात राजीव गांधी, अरुण सिंग, अरुण नेहरू असे काही बड्या घराण्यांमधील विद्यार्थी होते. पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या या शाळा सोबत्यांनी देशाच्या राजकारणात मोठा हातभार लावला. काँग्रेस पक्षाच्या प्रसिद्धीचे आणि निवडणुकांच्या प्रचाराचे काम अरुण नंदा यांच्या ‘रिडिफ्युजन’कडे असे. चित्रपट लेखक म्हणून नावारूपाला आलेले कमलेश पांडे (त्यांनी पुढे ‘तेजाब’ हा सिनेमा लिहिला.) रेडिओ, टीव्ही, थिएटरसाठी काँग्रेस पक्षाचे कॉपीरायटिंग करत; तसेच माहितीपट बनवत. नुसता काँग्रेस पक्षच नव्हे तर थरमॅक्स, कोलगेट पामोलिव्ह, युनियन कार्बाइड (रेड एवरेडी), गार्डन वरेली वुमन, टाटा, एअरटेल, लॅक्मे, जेम्सन अॅण्ड निकलसन पेंट, मारुती सुझुकी, रेड अॅण्ड व्हाइट एव्हरेडी असे मोठमोठाले ग्राहक ‘रिडिफ्युजन’कडे होते.

‘रिडिफ्युजन’ने जे ब्रॅण्ड हाताळले ते त्याकाळी अस्तित्वात असलेल्या मोठ्या ब्रॅण्ड्सच्या तुलनेत निश्चितपणे वेगळे दिसत. परदेशी कल्पना किंवा ब्रॅण्ड हाताळण्याच्या पद्धतीपेक्षा ‘रिडिफ्युजन’ची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. उदा. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची जाहिरात, ही जाहिरात पिंक अॅड म्हणून हाताळली जाते. वर्षानुवर्षांचा हा नियम आहे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची जाहिरात म्हणजे गुलाबीच असे. ही जाहिरात ‘रिडिफ्युजन’कडे आली असती तर बहुधा त्यांनी ती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती आणि ही वेगळी पद्धत मान्य झाली नसती तर तो ब्रॅण्ड नाकारला असता. कारण अशा कंडिशनल जाहिरातीमध्ये एजन्सीचे योगदान असे फारसे नसतेच. एकदा झापडे लावायची सवय झाली, की ती सवय एजन्सीत सगळीकडे पसरते. कारण झापडे लावणे सोयीचे असते, मेंदू बंद करता येतो. अरुण नंदा यांनी अशी झापडे कधीच लावून घेतली नाही आणि कोणाला लावूही दिली नाही. कमलेश पांडे यांनी लिहिलेल्या कॉपीज अत्यंत वेगळ्या असत. खास करून त्यांनी केलेली थरमॅक्स कंपनीच्या जाहिरातीची कॉपी. ही जाहिरात कॉपी इतकी वेगळी होती की ही जाहिरातीची कॉपी आहे यावर लोकांचा विश्वास बसेना. एका इंजिनीअरिंग कंपनीच्या जाहिरातीची कॉपी अशा वेगळ्या थाटाने लिहिली जाते आणि स्वीकारली जाते, हे सगळेच आश्चर्यकारक होते आणि हे फक्त ‘रिडिफ्युजन’च करू शकत होते. तीच गोष्ट गार्डन वरेलीची. सिंथेटिक सिल्कची साडी ‘रिडिफ्युजन’ने प्युअर सिल्क साडीच्या पंक्तीला नेऊन बसवली. कारण गार्डन साडीचे ब्रँड पोजिशनिंग, मॉडेल्स, फोटोग्राफी, कॉपी, आर्ट डिरेक्शन या सगळ्यांची मदत घेऊन ‘रिडिफ्युजन’ने गार्डन साडीला प्रीमिअम पोझिशनवर नेऊन बसवले. तीच गोष्ट रेड एवरेडी, कोलगेट, टाटा या ब्रॅण्डची. नवता (इनोव्हेशन) म्हणजे तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे करणे (डुईंग द सेम थिंग विथ डिफरंट स्टाइल) हे ‘रिडिफ्युजन’ला पुरेपूर उमगले होते आणि त्यांनी ते तसे आचरणात आणले. एमसीएमचा अनुभव ध्यानात घेऊन सुरुवातीलाच त्यांनी ग्राहकांचे जाहिरातींचे वार्षिक बजेट दोन कोटींहून अधिक असेल तरच त्याला स्वीकारायचे हे धोरण ठेवले होते. एकूण धंद्याची आर्थिक व्यवस्था (क्रेडिट पॉलिसी) अरुण नंदा स्वत: बघत.

जाहिरातीसारख्या आभासी आणि ग्लॅमरस धंद्यात राहूनसुद्धा अरुण नंदा कमालीचे धार्मिक होते. पुण्याच्या हरी कृष्ण मंदिर येथे दादाजी आणि मां या गुरू तसेच गुरू भगिनींच्या आध्यात्मिक सहवासात ते वारंवार असत. दादाजी हे सुभाषचंद्र बोस यांचे एकेकाळचे सहकारी होते. १९५० मध्ये ते पुण्याला स्थायिक झाले. अरुण नंदा यांच्या पत्नी शैला नंदा या व्यवसायाने डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ होत्या. पण एमएनडी (मोटार न्यूरॉन डिसिज) या दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले. जगभर फिरूनही रोगाचा काहीही इलाज झाला नाही. अखेर त्यांचे निधन झाले. या आजारात शरीराचा एकेक भाग निकामी होत जातो. लागण झाल्यापासून ३०-३५ महिन्यांतच माणूस मृत्यू पावतो. या आजारावर औषध-उपचार उपलब्ध नाही. आज अरुण नंदा यांचा मुलगा या रोगावर भारतात भरीव काम करत आहे.

डब्ल्यूपीपी (वायर अॅण्ड प्लास्टिक प्रॉडक्ट्स) या मार्टिन सोरेल यांच्या जगातल्या एकामागून एक महाकाय अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज गिळणाऱ्या माणसाला ‘रिडिफ्युजन’, ‘डेनसु यंग अॅण्ड रुबीकॅम’ ही भारतातील नामवंत एजन्सी गिळायची इच्छा होती. डब्ल्यूपीपीला सामील व्हा, कंपनी विका अन्यथा कोलगेट पामोलिव्हसारखे मोठे आंतरराष्ट्रीय क्लायंट्स तुम्हाला सोडून जातील अशी धमकी मार्टिन सोरेल याने दिली. पण धीर न गमावता अरुण नंदा आणि अजित बालकृष्णन यांनी सोरेल यांच्या आव्हानाला तोंड दिले आणि स्वत:ची कंपनी वाचवली.

‘रिडिफ्युजन’च्या यशामुळे इतर अनेक व्यवस्थापन पदवीधारकांना स्वत:ची एजन्सी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. ‘रिडिफ्युजन’च्या माजी अधिकाऱ्यांमध्ये अशोक कुरियन (अॅम्बियन्स), राजीव अग्रवाल (नेक्सस), रघुनाथ (इक्विटी), प्रसाद सुब्रमण्यम (कॅपिटल), संदीप कुमार (माइलस्टोन्स) अशी जाहिरात व्यवसायात मोठी झालेली काही नावे आहेत.

अरुण नंदा यांचे चमकते डोळे, खळाळून हसणे, नम्रतापूर्ण शालीन वर्तन, उत्तम कपडे वापरणे तसेच सहकाऱ्यांविषयी प्रेमभाव या गोष्टी नेहमी लक्षात राहतील. त्यांचा ध्यास हा नेहमी उत्कृष्ट काम, चर्चा-संवादात हिरिरीने भाग घेणे आणि ते ग्राहकांना सर्जनशीलतेने सादर करणे असा होता. अरुण नंदा हे नेहमी हसतमुख असत. नबाबी लोकांना असतो तो घोड्यांचा छंद, त्यांची जोपासणी, शर्यती, पोलोचा खेळ यात ते रस घेत.

अरुण नंदांची ‘रिडिफ्’ ही त्याकाळची हॅपनिंग एजन्सी होती. अनेक सिनेनट-नट्या, मॉडेल्स, फोटोग्राफर्स, पेंटर्स, लेखक, दिग्दर्शक ‘रिडिफ्युजन’मधून पुढे आले, मोठे झाले. जागेच्या अभावी त्यांची नावे प्रस्तुत मृत्युलेखात मावणार नाहीत आणि ती देणे प्रस्तुतही होणार नाही.

अरुण नंदा यांची काम करण्याची पद्धत अत्यंत आखीवरेखीव असे. सहकाऱ्यांना कॅम्पेन दाखवताना कोणी कॅम्पेनच्या आधी ब्रीफ बघण्याची इच्छा व्यक्त केली तर ते सांगत वाचक, प्रेक्षक म्हणून कॅम्पेन बघ, सामान्य माणूस म्हणून कॅम्पेन बघ आणि मत दे. जाहिरात एजन्सीत काम करणारी व्यक्ती म्हणून प्रतिक्रिया देऊ नकोस. अशी अनेक पथ्ये ते आपल्या कामात पाळत असत. जाहिरात व्यवसायात काम करताना काही वेळा नटनट्या, कलाकार, संपादक, निर्माते अशा लोकांचे बरेवाईट अनुभव जाणता-अजाणता पदरी येत असतात. अशा प्रसंगी अरुण नंदा यांनी नेहमीच त्यांना सांभाळून घेतले आणि अनुभवासारखा शिक्षक नाही अशी भूमिका घेतली. ग्राहकाने सादर केले तसेच ब्रीफ स्वीकारले आणि एजन्सीने प्रेझेंटेशनला न्याय देऊन ब्रीफमध्ये ढवळाढवळ केली नाही तर ठीक, पण तसे न होता ग्राहकाला जर असे वाटले की त्याच्या ब्रीफनुसार काम झालेले नाही, तर ‘रिडिफ्युजन’ केलेले काम पूर्णपणे नष्ट करून पुन्हा नव्याने प्रेझेंटेशनची तयारी करत असे. हे अरुण नंदा यांचे धोरण होते. त्यामुळे कॅम्पेनमधली नवता आणि ताजेपणा कायम राहत असे.

जाहिरात व्यवसायासारख्या विविधरंगी दुनियेत राहून आणि आभासी रूपांत उत्पादने आणि सेवा यांच्या विक्रीला हातभार लावणे, त्यांचा ब्रँड प्रसारमाध्यमांतून ग्लॅमरसली प्रमोट करणे, सिनेजगतातील प्रसिद्ध नटनट्या, मॉडेल्स, प्रसारमाध्यमे यांच्या सहवासात राहूनही कामाची शिस्त, मूल्ये सांभाळणे कठीण होते. अशा परिस्थितीत खरे काय आणि खोटे काय हे कळेनासे होते. या वातावरणातही अरुण नंदा यांनी आपले अस्तित्व, ओळख आणि तत्त्वे कसोशीने जपून ठेवली.

एके काळी सूर्यास्तानंतर एका हाती व्हिस्कीचा ग्लास तर दुसऱ्या हाती धुरांची वलये सोडणारी सिगरेट, कधी मिठ्या तर कधी कमरेभोवती हात आणि तोंडी ‘यस मॅन’, ‘नो मॅन’ अशा धाटणीचे इंग्रजी बोलणारी माणसे ही जाहिरात व्यवसायात शिरकाव करण्याची शिडी होती. ही पद्धत चालेनाशी झाल्यावर जाहिरात कंपन्यांनी तडक आयआयएममधून एमबीए केलेल्या आणि तल्लख बुद्धीच्या हुशार लोकांची भरपूर पगार देऊन भरती सुरू केली. या एमबीएजनी जाहिरात व्यवसाय पूर्णत: बदलून टाकला. त्याला गणिताची जोड दिली. अरुण नंदा हे या पहिल्या लाटेतील जाहिरात व्यावसायिक होते. पुढे त्यांनी अजित बालकृष्णनबरोबर ‘रिडिफ्युजन’ ही जाहिरात एजन्सी चालू केली. ही एजन्सी इतर एजन्सीजप्रमाणे कोणत्याही परदेशी एजन्सीचे पिल्लू नसून पूर्णपणे भारतीय होती आणि हेच त्यांच्या यशाचे ध्येय आणि गमक होते. अरुण नंदा गेले तरी त्यांनी रुजवलेला विचार हा भारताच्या जाहिरात धंद्याचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. तो गेमचेंजर ठरला आहे, त्याचे श्रेय अरुण नंदांचे.

अरुण नंदा यांना शांती लाभो!

लेखक, प्रकाशक