-वैशाली चिटणीस
एनसीपीसीआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स या आस्थापनेने नुकतीच सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्राहक व्यवहार विभागांना नोटीस पाठवून बोर्नव्हिटासह तत्सम कोणतीही पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. एनसीपीसीआरचे प्रमुख प्रियांक कानुनगो यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला इ कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या साइट्सवरून कोणतीही सामान्य पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकू नयेत, यासाठी मार्गदर्श तत्त्वे निश्चित करायला सांगितली आहेत.

जंक फूड आणि भरपूर शर्करायुक्त पेये यांचे मोठ्या प्रमाणवर सेवन करत असल्यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलपणा वेगाने वाढत असल्याबद्दल जगभर सगळीकडेच सतत चिंता व्यक्त होत असते. या पदार्थांच्या आकर्षक जाहिराती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ घालत असतात. सध्या, या पेयांसाठी भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या उद्योगाची उलाढाल ११ हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जाते. हॉर्लिक्स, बूस्ट, बोर्नविटा, कॉम्प्लॅन ही आणि इतर काही माल्ट आधारित पेये सर्वाधिक खरेदी केली जातात. ती आरोग्यदायी पेये म्हणून विकली जातात, तशीच त्यांची जाहिरात केली जाते, असा त्यांच्यावरचा आरोप आहे. याशिवाय शीतपेयांची बाजारपेठ वेगळीच.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

आणखी वाचा-युद्ध कुणाचं, लढणार कोण आणि मरणार कोण…

एनसीपीसीआरने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या नोटिशीमुळे ही पेये खरोखरच आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, का यावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. जी पेये आरोग्यास हितकारक असतात ती आरोग्यदायी पेये ही साधीसोपी व्याख्या मान्य केली तर वरील पेयांना काय म्हणायचे हा प्रश्न उपस्थित होतो. तो आज निर्माण झालेला नाही, तर वर्षभरापूर्वीच रेवंत हिम्मतसिंग्का नावाच्या यूट्यूबरने उपस्थित केला होता. त्याने त्याच्या एका व्हिडिओमधून लहान मुलांचे आरोग्यदायी पेय म्हणून विकल्या जाणाऱ्या बोर्नव्हिटामध्ये साखरेचे प्रमाण कसे खूप असते आणि त्यामुळे ते लहान मुलांना देण्यासाठी कसे अयोग्य आहे, असा मुद्दा मांडला होता. त्यामुळे तेव्हा समाज माध्यमांमध्ये एकच गदारोळ झाला. जवळपास सव्वा कोटी लोकांनी तो व्हिडिओ बघितला. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या कंपनीने रेवंतला नोटीस पाठवली. कायदेशीरतेच्या मुद्द्यावर त्याला त्याचा व्हिडिओ मागे घ्यावा लागला. पण तोपर्यंत त्याचे म्हणणे संबंधित सामान्य लोक तसेच निर्णयप्रकियेतील लोकांपर्यंत पोहोचले होते.

त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स म्हणजेच एनसीपीसीआरने बोर्नव्हिटाचं उत्पादन करणाऱ्या माँडेलीझ या कंपनीला नोटीस पाठवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या त्यांच्या जाहिराती, पॅकेजिंग, लेबल मागे घ्यायला सांगितलं. आपल्या या नोटीसीत, एनसीपीसीआरने म्हटले होते की त्यांनी बोर्नव्हिटाबद्दलच्या तक्रारीची दखल घेऊन उत्पादनात साखरेचे प्रमाण जास्त आहे आणि ते मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, हे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले आहे. माँडेलेझला नोटीस मिळाल्यावर सात दिवसांच्या आत तपशीलवार स्पष्टीकरण/ अहवाल पाठवण्यास सांगितले गेले. आपल्या निवेदनात, माँडेलेझने सांगितले की बोर्नविटाची रचना वैज्ञानिकदृष्ट्या पोषणतज्ञ आणि अन्न शास्त्रज्ञांनी तयार केली आहे आणि त्यांचे सगळे दावे सत्य आणि पारदर्शक आहेत तसेच सर्व घटकांना नियामक मान्यता आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बॉर्नव्हिटाच्या प्रत्येक २० ग्रॅममध्ये ७.५ ग्रॅम साखर असते, आणि ती लहान मुलांसाठी दररोज शिफारस केलेल्या साखरेच्या सेवन मर्यादेपेक्षा खूपच कमी असते.

आणखी वाचा-‘सब का विकास’ची यांना एवढी भीती का वाटतेय?

रेवंत हिम्मतसिंग्काच्या व्हिडिओनंतर माल्ट-आधारित पेयांच्या आरोग्य फायद्यांवर जोरदार वादविवाद सुरू झाला. त्यातला एक मुद्दा असा होता आणि आहे की अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ मध्ये आरोग्यदायी पेय असा काही उल्लेखच नाही. त्यामुळे कोणत्याही पेयामध्ये साखर, स्निग्धांश किती प्रमाणात असावेत यासाठी कोणतेही अधिकृत मानक नाही. तर वैद्यकीय व्यावसायिकांच्या मते कोणत्याही लहान मुलाने एका दिवसात २४ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. आरोग्यदायी म्हणून विकली जाणारी पेये मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्या विकासात मदत करतात असा दावा ती विकताना केला जातो. पण बालरोगतज्ज्ञांच्या मते या पेयांमधून ज्या गोष्टी मिळतात असे सांगितले जाते, त्या सगळ्या फायद्यांपेक्षा या पेयांमधली साखरेची पातळी जास्त आहे आणि तेच जास्त धोकादायक आहे. उदाहरणार्थ, १०० ग्रॅम बोर्नव्हिटामध्ये ३७ ग्रॅम साखर असते, तर कॉम्प्लॅनमध्ये हे प्रमाण २१.८, बूस्टमध्ये ९.५ तर हॉर्लिक्समध्ये १३.५ ग्रॅम असते. यावर बोर्नव्हिटाचे म्हणणे होते की त्यांच्या उत्पादनातील साखरेचे प्रमाण मुलांसाठी शिफारस केलेल्या साखरेच्या सेवन मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. शिवाय बोर्नव्हिटामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, बी ट्वेल्व्ह, लोह, जस्त, तांबे आणि सेलेनियम ही पोषक तत्वे असतात. ती रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात. हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या माल्ट-आधारित पेयांसाठी आघाडीवर असलेल्या कंपनीनेही सांगितले की ते तांत्रिक गरजा आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार साखरेचा वापर जबाबदारीने करतात. हॉर्लिक्स शालेय मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यास मदत करते हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे, तर बूस्टमध्ये १७ आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. आणि त्यात फक्त १.९ ग्रॅम साखर असते, असेही हिंदुस्तान युनिलिव्हरने सांगितले.

बालरोगतज्ज्ञांनी मात्र या कंपन्यांचे दावे खोडून काढले होते. त्यांच्या मते आरोग्यदायी पेये म्हणून मुलांना दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये असलेली साखर मुलांच्या रोजच्या हालचालींसाठी अतिरिक्त ठरते. या साखरेचे सेवन केल्याने मुलांमध्ये तृष्णा, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टी वाढू शकतात. आरोग्यदायी पेय म्हणवल्या जाणाऱ्या पेयांमुळे प्रत्यक्षात मुलाचे आरोग्य सुधारत नाही. ही पेये फक्त दुधाची चव वाढवतात. मुलांच्या आहारात अनेक जीवनसत्त्त्वांची कमतरता असली तरी ती या पेयांमधून भरून निघत नाही.

आणखी वाचा-‘सीएए’मुळे शेजारी देशांतील हिंदू, शिखांचेही भले होणार नाहीच…

मागील वर्षीच्या या प्रकरणातून एकूण स्पष्ट झाले की यासंदर्भातील नियम संदिग्ध आहेत. आरोग्यादायी पेय म्हणजे काय, त्यात साखरेचे प्रमाण किती असायला हवे यासंदर्भातले नियम स्पष्ट नाहीत. त्यांची जाहिरात करताना केल्या जाणाऱ्या दाव्यांवरही पुरेसे निर्बंध नाहीत. दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत कोणती आणि काय कारवाई केली जावी यातही स्पष्टता नाही. यासंदर्भात काहीच होत नाही असे नाही. पण जे केले जात आहे, ते अपुरे आहे. अन्न नियामक अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) जंक फूडचा वापर कमी करण्यासाठी लेबलिंग मार्गदर्शक तत्त्वांबाबत काम सुरू आहे. त्यांनी २०२२ मध्ये त्यासंबंधी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. त्यात म्हटले आहे की साखर, सोडियम आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थांच्या वेष्टनावर ते ठळकपणे नमूद करणे आवश्यक आहे.

आता एसीपीसीआरचे प्रमुख प्रियांक कानुनगो यांनी सर्व ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या साइटवरून आरोग्यदायी पेयांच्या श्रेणीतून पेये आणि शीतपेये काढून टाकण्याचे निर्देश पाळले गेले आहेत का, यासंबंधीच्या कारवाईचा २३ मार्चपर्यंत अहवाल मागवला आहे. दरम्यानच्या काळात बोर्नविटाने मागील वर्षी झालेल्या टीकाप्रकरणानंतर बोर्नव्हिटाधील साखरेचे प्रमाण १०० ग्रॅम मागे १४.४ टक्क्यांनी कमी केले आहे, असे त्यांच्या वेष्टनावरून दिसून येते.

ही खरेतर समाजमाध्यमांची ताकद आहे. एक यूट्यूबर एक व्हिडिओ करतो काय, त्याची चर्चा सुरू होते काय आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीला झुकावे लागते काय… या सगळ्यातून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा मानके निश्चित करण्याचा. एका माणसाने लेबल वाचले आणि सगळ्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला, तशी सगळ्यांनीच बारकाईने वेष्टने वाचायला सुरुवात केली तर आणखीही बऱ्याच गोष्टी घडतील यात शंका नाही. आरोग्यदायी नसलेली गोष्ट आरोग्यदायी म्हणून विकण्याचे ‘धाडस’ तरी निदान केले जाणार नाही.

vaishali.chitnis@expressindia.com