पद्माकर कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतमी पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चर्चेत असलेलं नाव आहे. तिचे नृत्याचे कार्यक्रम, त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद, ग्रामीण भागात तिच्याविषयी असलेली ‘क्रेझ’, नृत्याच्या कार्यक्रमातील तिची ‘अदाकारी’, विशेषतः तिचे हावभाव- यांवरून होणारे तात्कालिक वाद, समाजमाध्यमांतून तिची मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारी ध्वनिचित्रमुद्रणं, तिच्या कार्यक्रमाच्या आयोजनाने निर्माण होणारा ‘कायदा सुव्यवस्थे’चा प्रश्न, एका कार्यक्रमासाठी ती घेत असलेलं मानधन, हे सगळं पाहता… गौतमी पाटीलच्या तीन तासांच्या कार्यक्रमाने ग्रामीण भागांत पारंपरिक लोककला असलेल्या ‘लोकनाट्य-तमाशा’ची चौकट केव्हाच मोडली आहे…! आज आपल्या समाजात कलावंताचं नेमकं स्थान काय आहे, कलावंतांशी आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी समाजाला काही देणंघेणं राहिलं आहे की नाही, यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

अल्पावधीतच गौतमी पाटीलचा झालेला ‘उत्कर्ष’ हा या लेखाचा विषय नाही. चर्चेचा विषय वेगळा आहे…

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एके ठिकाणी, बैलांच्या शर्यतीतील मानाच्या ठरलेल्या ‘बावऱ्या’ नावाच्या बैलासमोर गौतमी पाटील एकही प्रेक्षक नसताना तब्बल तास-दोन तास नाचली आणि पुन्हा एकदा गौतमी पाटील हे नाव चर्चेत आलं! आजपर्यंत तिच्या समाजमाध्यमांतून प्रसारित झालेल्या मुलाखती पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, गौतमी पाटीलच्या बोलण्यातून तर ती एक साधी- सरळ मुलगी वाटते. कदाचित तिच्या भोवताली, तिच्या संदर्भात घडणाऱ्या गोष्टींचं तिला ‘भान’ असेलही! पण प्रत्येक गोष्टीवर ‘व्यक्त’ (रीॲक्ट) होणं तिला जमत नसावं.

आणखी वाचा- नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या नावाखाली शिक्षणाचे व्यापारीकरण…

कुणी तरी ‘मानधन’ दिलं म्हणून, गौतमी पाटीलला बैलासमोर नाचायला भाग पाडणं किंवा गौतमी पाटीलने बैलासमोर नाचणं, हे कलेच्या क्षेत्रातलं शोषणच नाही का ठरत? कलाकार आणि रसिक यांचं नातं तोडून कला सादर करण्यासाठी भाग पाडणं, अशी सक्ती नाही का इथे?

खरं तर, बैलाचाच काय पण कुठल्याही इतर जनावराचा मेंदू निसर्गाने मानवाइतपत विकसित केलेला नाही. रंजन-मनोरंजन हे मुक्या जनावरांना कसं कळणार? निसर्गतः मानवाने स्वरयंत्राचा कल्पकतेनं वापर करत भाषेचा शोध लावला आणि आपसूकच संदेशवहनाच्या सुलभतेने मानवाचा मेंदू विकसित होत गेला. त्यातून रंजन-मनोरंजनाचे प्रकार मानवाने शोधले आणि ते ‘कला प्रकार’ ठरले. कुणी म्हणेल पक्षीही गातात की! मोरसुद्धा नाचतात! पण मोठा फरक असा की, इतर प्राणी-पक्षी हे आवाजाचा किंवा शारीरिक क्षमतांचा वापर फक्त जोडीदार मिळवण्यापुरताच करतात. मानव मात्र आपल्या बुद्धीने त्याला कला प्रकारांचं रूप देऊ शकला. एवढंच कशाला, इतर सजीवांसारखा माणूस फक्त प्रजोत्पादनासाठी कामक्रीडा करत नाही, तर त्यातसुद्धा तो ‘रंजन’ शोधत असतो!

मुद्दा हा की, बैलापुढे तास-दोन तास नाचून गौतमी पाटील हिने नेमकं काय मिळवलं? काही दिवस प्रसारमाध्यमं- समाजमाध्यमांतून चर्चेत राहण्याचं सुख! यापलीकडे काय? असल्यास ते तिला लखलाभ, पण यातून कलावंत म्हणून आपण स्वत:ची अवहेलनाच करून घेतो आहोत का, अशी शंकासुद्धा तिला नाही आली? ती यायला हवी होती, पण आली नाही, याचं कारण काय असावं?

आणखी वाचा- मोदींच्या सत्यकथनाची अंमलबजावणी का नाही?

एकट्या ‘गौतमी पाटील’चाच नव्हे, कुणाही कलाकाराचा, ‘सेलेब्रिटी’चा पैशाच्या जोरावर, आपण हवा तसा आणि हवा त्या वेळी वापर करून घेऊ शकतो ही ‘धारणा’ समाजात तयार होऊ लागली आहे… एक व्यक्ती म्हणून आपण तिच्याकडे पाहणार आहोत की नाही? धनिक/ सत्ताधारी यांना ‘नाही’ असं बजावून सांगण्याचं स्वातंत्र्य- तो अधिकार गौतमी पाटील किंवा अन्य कुणाही कलाकाराला आज कितपत आहे?

समाजाचं काय, काही दिवसांनंतर त्यांच्यापुढे दुसरी ‘गौतमी’ येईल… ते दुसऱ्या कुणाला तरी उभं करतील. एकीकडे, बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्रींच्या ‘तथाकथित’ प्रतिष्ठेच्या जोरावर दारू, गुटखा यांच्या जाहिराती करतात तेही व्यावसायिकतेच्या नावाखाली खपवून घेतलं जातं. ही कसली व्यावसायिकता? बहुजन समाजातली गौतमी पाटील ज्या बैलासमोर नाचली, त्याच्या नाकात ‘वेसण’ होती. तोसुद्धा त्याच्या मालकाच्या ‘हुकमाचा ताबेदार’ होता!

अप्रत्यक्षपणे गौतमीच्या नाकातही ‘वेसण’ आहे! तीसुद्धा तिच्या ‘आवडी-निवडी’शिवाय कुणाच्या तरी ‘हुकमाची ताबेदार’ आहे. ‘श्रम’ दोघांचेही आहेत. मात्र बैलाच्या ‘श्रमा’स आजही ग्रामीण भागात ‘प्रतिष्ठा’ आहे (वेळोवेळी सण-समारंभातून ती व्यक्तही होते). पण गौतमी पाटील ज्या व्यवसायात आहे, त्या व्यवसायातील स्त्रियांची प्रतिष्ठा समाजाकडून मान्य केली जाते का?

ज्या कोणी बैलासमोर त्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, त्यांनीच मंचावर मागे ‘लक्ष्य २०२४’ असा बॅनर लावला होता! यातच सारं काही आलं! दुसरीकडे ‘नैतिकतेची वेसण बाईच्याच नाकात’, असं गृहीत धरून चालणारा समाज मात्र गौतमी पाटीलच्या बाबतीत सोयीची भूमिका घेतो. कुणालाही गौतमी पाटीलला पैशाच्या जोरावर, एका चार पायांच्या जनावरासमोर नाचवणं खटकत नाही. सवंग प्रसिद्धी आणि ‘टीआरपी’च्या मागे लागलेल्या प्रसारमाध्यमांनासुद्धा यात चुकीचं काही वाटत नाही. सत्ता, पैसा, प्रसिद्धीतंत्रं यांच्या भल्यामोठ्या बैलासमोर आजचा समाजही नाचतोच आहे!

(हा मजकूर लिहिण्यापूर्वी गौतमी पाटील यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला होता. फोनद्वारे त्यांच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला होता. त्यांना विषयाची पूर्वकल्पना देणं जाणीवपूर्वक टाळून केवळ स्वत:ची ओळख सांगत, ‘बोलायचं आहे…’ एवढंच सांगितलं, त्यावर व्यवस्थापकांनी सुरुवातीला होकार दिला. नंतर मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not only gautami patil society is also dancing in front of the bull mrj
First published on: 02-05-2023 at 15:02 IST