scorecardresearch

Premium

राजस्थानात मोदी, योगी आणि बाबा..

दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर अलवर जिल्ह्यामधील तिजारा विधानसभा मतदारसंघ.

Polling in Rajasthan The results of assembly elections of five states will be announced
राजस्थानात मोदी, योगी आणि बाबा..

महेश सरलष्कर
राजस्थानातील मतदान शनिवारी संपले असून ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानचा हा रिपोर्ताज..

दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर अलवर जिल्ह्यामधील तिजारा विधानसभा मतदारसंघ. इथल्या भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांना राजस्थानचा मुख्यमंत्री आपणच निवडतो असे वाटत होते. त्यांना काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत वा माजी मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्या वसुंधराराजे यांच्यासारखे सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेते नको होते. राजस्थानमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखा संन्यासी मुख्यमंत्री झाला पाहिजे, ‘राजस्थानात योगी, देशात मोदी’ असेल तरच देशाचा विकास होईल, असे हे कार्यकर्ते सांगत होते. ‘कुटुंबवत्सल गेहलोत वा वसुंधरांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, मोदींवर वा योगींवर झाले का,’ असा एकाचा प्रश्न. आपली अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था आहे. इतकी प्रगती कोणामुळे केली? मोदी!.. हा सवाल-जबाब एकतर्फी सुरू होता.

Chief Minister Eknath Shindes visit to Fort Pratapgad
सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट
lok sabha constituency review
ठाकरे – शिंदे गटातील लढतीत कोण बाजी मारणार ?
Voter List Election
नाशिकमध्ये वर्षभरात एक लाखहून अधिक मतदार बाद का झाले?
Male work-depression
राज्यात पुण्यातील पुरुष सर्वाधिक तणावग्रस्त! जाणून घ्या यामागील कारणे…

राजस्थानातील काही मतदारसंघांमध्ये मुस्लीम मते निर्णायक ठरतात, तिथे ध्रुवीकरणाचा प्रयत्न झालेला दिसतो. तिजारा मतदारसंघ मुस्लीमबहुल असून तिथे भाजपने बाबा बालकनाथ या योगी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. हरियाणातील रोहतकमधील नाथपंथीय मठाचे बाबा मठाधिपती आहेत. बाबा प्रचारासाठी गावागावांत फिरत होते. लोकांना बाबा आपल्या गावी आल्याचे अप्रूप होते. ‘मठात गेलो तर तीन-तीन दिवस योगींचे दर्शन होत नाही. पण निवडणुकीच्या निमित्ताने बाबा आमच्या घरात येत आहेत, स्वत:हून दर्शन देत आहेत. आम्ही भाग्यवान आहोत,’ असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. लोकांना योगी-बाबा आणि मोदी यांचे अजूनही आकर्षण असल्याचे दिसते. तिजारामध्ये मुस्लीम-दलितांनी एकत्रित मते दिली तर बाबांचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हिंदूंना जाती विसरून एकत्र येण्याचे आवाहन करत होते. ‘भाजपचे दिल्लीतील मोठे नेते मुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतील, हे आम्ही सांगू शकत नाही, पण इथून बाबांना निवडून पाठवायचे असे आम्ही ठरवलेले आहे,’ असा हिंदूंच्या एकत्रीकरणामागील विचार बाबांच्या प्रचंड निवडणूक कार्यालयात मांडला गेला.

हेही वाचा >>>संविधानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतला फरक कुठे नेणार?

आणखी एक मुस्लीमबहुल मतदारसंघ म्हणजे डिडवाना. शेखावटी प्रदेशातील या मतदारसंघाकडे युनूस खान यांच्यामुळे लक्ष वेधले गेले. राजस्थानातील एकमेव मुस्लीम नेत्याला भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे युनूस खान अपक्ष निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्ये भैरवसिंह शेखावत यांनी युनूस खान यांच्यातील नेतृत्वगुण हेरले आणि त्यांना भाजपमध्ये आणले. शेखावत यांच्यानंतर राज्यातील आणि भाजपमधील सत्ता वसुंधराराजेंकडे गेली. युनूस खान हे राजस्थानमधील क्रमांक दोनचे नेते झाले होते. पण भाजपने उच्चवर्णीय मुस्लिमांना दूर करून ओबीसी मुस्लिमांना आपलेसे करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशात येतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ओबीसी मुस्लीम उमेदवार उभे केले होते. भाजपने युनूस खान यांना गेल्या वेळी टोंकमध्ये सचिन पायलट यांच्याविरोधात उभे केले होते, तिथे त्यांचा पराभव झाला. या वेळी वसुंधराराजेंप्रमाणे युनूस खान यांनाही पक्षाने बाजूला केले. डिडवानामध्ये युनूस खान अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांनी उभारलेल्या जनसेवा केंद्रामध्ये तुडुंब गर्दी होती. या केंद्रासमोरील प्रांगणात कुठून कुठून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडय़ांचा ताफा होता. युनूस खान प्रचारासाठी गेले होते, पण त्यांच्या कार्यालयात लोकांचा राबता होता. तिथे हिंदू-मुस्लीम भेदभाव नव्हता. जोधा आडनावाचा सत्तरीतील राजपूत बसून होता. डिडवानातील गावांतील काँक्रीटचे रस्ते, ३०० खाटांचे रुग्णालय, शाळा-महाविद्यालय युनूस खान यांनी बांधले असून लोकांसाठी काम करणारा नेता असल्याचा दावा राजपूत जोधा करत होते. जनसेवा केंद्रात जेवणावळी होत होत्या. मोठय़ा सभागृहात तरुण मुले क्रिकेटचा सामना बघण्यात गुंग होती. तिथेच व्यवस्थापकांचे कार्यालय होते, दोन्ही ठिकाणचे व्यवस्थापन हिंदू होते. युनूस खान फक्त मुस्लीम मतांवर निवडून येत नाहीत, असे जनसेवा केंद्रातील लोकांचे म्हणणे होते. युनूस खान यांची लढाई भाजपच्या जितेंद्रसिंह जोधा या राजपूत उमेदवाराशी आहे. राजस्थानातील भाजपच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे हे दोन प्रातिनिधिक मतदारसंघ आहेत.

हेही वाचा >>>विद्यार्थी कोटातील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात, कारण…

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करत होते. राजस्थानमध्ये भाजपकडे सत्ता नाही, शिवाय पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही दिलेला नाही. खरे तर भाजपने खासदारांना विधानसभा निवडणूक लढवायला लावून एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण केली. राजभवनासमोरील मोठय़ा बंगल्यामध्ये भाजपने माध्यम केंद्र उभे केले होते. भाजपच्या एका प्रवक्त्यानुसार, दियाकुमारी वा अर्जुन मेघवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले जाऊ शकते. दियाकुमारी यांना राजा मानसिंह यांच्या राजघराण्याचा राजपूत वारसा आहे. शेखावत व वसंधुराराजेही राजपूत, कदाचित हीच परंपरा भाजप कायम ठेवू पाहात असावा. अर्जुन मेघवाल बिकानेरमधील दलित नेते असून केंद्रात विधिमंत्री आहेत. राजस्थानसारख्या जातींचा दुराभिमान बाळगणाऱ्या समाजात दलित मुख्यमंत्री करणे भाजपसाठी खूप मोठे सामाजिक पाऊल असेल! जयपूरमध्ये प्रामुख्याने दोन राजपूत नेत्यांची नावे घेतली जातात. ‘भ्रष्टाचार न करणारा, लोकांना सोबत घेऊन जाणारा नेता पाहिजे, दियाकुमारींकडे गडजंग संपत्ती आहे, त्या भ्रष्टाचार करणार नाहीत आणि राजपूत असल्यामुळे सर्वाना सोबत घेऊन राज्य करण्याची क्षमताही आहे,’ असा युक्तिवाद विद्याधरनगरमधील मतदार करतात. पैसेवाले नेते लाचखोरी करत नाहीत आणि राजपुतांकडे नेतृत्वगुण असल्यामुळे श्रीमंत-राजपूत व्यक्ती राज्य सांभाळू शकते, हा निकष अजब असला तरी, राजस्थानमध्ये हिंदूंच्या ध्रुवीकरणासोबत जातींची गणिते किती महत्त्वाची आहेत, हे स्पष्ट होते.

विद्याधरनगरच्या शेजारील झोटवाडा मतदारसंघात राज्यवर्धन राठोड हे केंद्रातील माजी मंत्री व विद्यमान खासदार उभे राहिले आहेत. राठोड हे दियाकुमारींइतके श्रीमंत नसावेत, पण राजपूत आहेत. पण त्यांच्या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत असून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राठोड यांना आधी जिंकावे लागेल! मुख्यमंत्रीपदासाठी वेगवेगळय़ा नेत्यांची नावे घेणाऱ्यांमधील समान धागा म्हणजे वसुंधराराजेंना विरोध. वसुंधराराजे राजपूत असल्या तरी त्यांचा काळ संपुष्टात आला असून नव्या नेत्यांकडे राजस्थानची सूत्रे दिली पाहिजेत, असे जयपूरमधील भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. वसुंधराराजेंच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला होता. आता त्यांना संधी दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास मोदींबद्दल आदर असणाऱ्या भाजपच्या पाठीराख्यांना वाटतो. दियाकुमारी यांच्या मतदारसंघातील भाजपच्या मंडल कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपला १२०-१५० जागा मिळाल्या तर दियाकुमारी वा अन्य कोणीही मुख्यमंत्री होईल, नाही तर मोदींना वसुंधराराजेंना मुख्यमंत्री करावे लागेल! टोंकमधील एका पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, जिंकण्याचा विश्वास फक्त अशोक गेहलोत आणि वसुंधराराजे या दोघांनाच आहे. दोन्ही पक्षांचे इतर नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये अडकले आहेत. ज्यांना स्वत:च्या जिंकण्याची खात्री नाही ते मुख्यमंत्री कसे होणार? काँग्रेसची सत्ता आली तर गेहलोत आणि भाजपला सत्ता मिळाली तर वसुंधराराजे यांना पर्याय नाही! गेल्या वेळी भाजपचे सरकार होते. लोकांनी ‘वसुंधरा तेरी खैर नहीं, मोदी तुझसे बैर नहीं’, अशी घोषणा केली होती. या वेळी अशी घोषणा करण्याची गरज नव्हती. शिवाय, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नसल्यामुळे भाजपसाठी मोदी हेच निवडणुकीचा चेहरा होते, असे म्हणता येईल.

बाबा बालकनाथ यांचा तिजारा वगैरे एखादा मतदारसंघ वगळला तर भाजपचे समर्थक मोदींकडे बघून मतदान करत असल्याचे जाणवते. मोठे रेस्तराँ उघडण्याची स्वप्ने बघणारा कारचालक सुनील खैंची याच्या कुटुंबातील सदस्य भाजपशी जोडलेले आहेत. त्यामुळे सुनीलसाठी मोदी हे दैवत आहेत. ‘अदानी-अंबानींवरून मोदींवर लोक विनाकारण टीका करत आहेत. अदानींनी कोणताही गफला केलेला नाही. मोदींना त्रास देण्यासाठी काँग्रेसवाले त्यांच्यावर आरोप करत आहेत,’ अशी सुनीलने मोदींची बाजू भक्कमपणे उचलून धरली होती. टोंकपासून काही अंतरावर १३ टीएमसी क्षमतेच्या बिसलपूर धरणाशेजारी असलेले संपूर्ण गाव भाजप समर्थक होते. चहाच्या टपरीवर जमलेल्या आठ-दहा जणांचे टोळके भाजपचे मतदार होते. त्यातील प्रत्येकाने मोदींकडे बघून भाजपला मते देत असल्याचे सांगितले. इथे पुन्हा मोदी-योगींचा उल्लेख झाला. चर्चा सुरू असताना भाजपचा पन्नाप्रमुख आला, त्याने देशाचा विकास २०१४ पासून सुरू झाला असून फक्त मोदीच देशाचे भले करू शकतात, असा दावा केला. या टोळक्यामध्ये दमणला काम करणारा तरुण मात्र पन्नाप्रमुखाला नडत होता. त्यामुळे पन्नाप्रमुखाने चर्चा हिंदू-मुस्लीम मुद्दय़ाकडे वळवली. ‘मुस्लिमांवर वर्चस्व गाजवायचे असेल तर केंद्रात मोदी आणि राज्यात ‘योगी’ असला पाहिजे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणाला मुख्यमंत्री करते हे मला माहीत नाही, पण इथे बाबा बालकनाथच मुख्यमंत्री झाले पाहिजेत,’ असे पन्नाप्रमुखाचे ठाम मत होते. भाजपला विरोध असणारे मोदींकडे कदाचित वेगळय़ा भूमिकेतून पाहात असतील, पण भाजप समर्थकांसाठी मोदी हाच चेहरा असल्याचे दिसते. राजस्थानात भाजपच्या मतदारांसाठी तरी मोदी, योगी आणि बाबा हेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे बघून मतदारांनी कौल दिला असण्याची शक्यता असू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Polling in rajasthan the results of assembly elections of five states will be announced amy

First published on: 26-11-2023 at 03:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×