scorecardresearch

माणसांच्या करुणेपर्यंत जाणे ही मोठी गोष्ट!

महाराष्ट्रातील दातृत्वाची संस्कृती वृध्दिंगत करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाची सांगता शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली.

माणसांच्या करुणेपर्यंत जाणे ही मोठी गोष्ट!

गिरीश कुलकर्णी

महाराष्ट्रातील दातृत्वाची संस्कृती वृध्दिंगत करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाची सांगता शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवादरम्यान ओळख करून देणाऱ्या लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाची यंदा तपपूर्ती. यंदाही वाचक-देणगीदारांनी या सर्व संस्थांच्या कार्याला पाठबळ दिले. कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने दिलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. संस्थांच्या प्रतिनिधींकडे दात्यांनी दिलेले धनादेश सांगता सोहळय़ात सुपूर्द करण्यात आले.

व्यक्ती आणि समाज याचे नाते काय असते, ते कसे असावे, ते काळानुसार कसे बदलत जाते याचा धांडोळा घेत राहण्याचा छंद मोठय़ा माणसांनी कुणीतरी लावला. कुणाचे तरी ऐकून, कुणाच्यातरी पायाशी बसून धाडसाने प्रश्न विचारायला लोकांनी शिकवले. आताच कलापिनीताई म्हणाल्या की कला माणसांच्या जगण्याच्या प्राधान्यक्रमात सगळय़ात शेवटी येते. पण मला असे वाटते की कला प्रथमच आहे. तुम्ही सर्व माणसे कलंदर कलाकार आहात. ज्याच्या हृदयी मोठी करुणा प्रकाशिते आणि त्यासाठी जे कलाकारपण लागते ते प्रत्येक माणूस जन्माला घेऊन येतो. ते कुठेतरी लपून असते. त्याला उजाळा देण्याची गरज असते. काही प्रसंग तुम्हाला तुमची जागा दाखवतात. त्यातून आपल्या जाणिवांना उजाळा मिळत जातो.

नट वगैरे धंदा असल्यामुळे अनेक कार्यक्रमांसाठी बोलावले जाते पण त्यावेळी मी स्वत:ला विचारतो, आपली योग्यता आहे का? दरवेळी असा प्रश्न विचारला की काही प्रसंगांतून ती योग्यता अनुभवता येते. अनेक प्रसंगातून माणूस म्हणून नक्की मला काय व्हायचे आहे याची स्वप्ने पडली. त्याच स्वप्नांचा मागोवा घेत प्रवास सुरू आहे. हा सगळा प्रवास अनेक माणसांच्या साक्षीने आणि सोबतीने झाला. त्यामुळे जेथे माणसे आहेत तेथे जायला मला आवडते. महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून विविध बोली घेऊन या कार्यक्रमासाठी माणसे येणार आहेत हे ऐकल्यावर मी हा प्रसंग चुकवणार नव्हतोच.

नकळतपणे कला, समाजकार्य या सगळय़ाशी एक नाते जोडत गेलो. इथे सगळय़ांनी ज्या एक एक समस्या मांडल्या, हाताळल्या त्या समस्यांतून मी गेलो आहे. म्हणजे प्रत्यक्ष मी त्यातील काही गोष्टी अनुभवल्या आहेत. प्रत्येक खडतर प्रसंगी असे वाटायचे की साथ देणारे, हात देणारे कोणीतरी सोबतीने असावे. काय हरकत आहे एखाद्याकडे जास्त पैसे असतील तर त्यांनी मला जरा विचारले, जास्त काही नाही संध्याकाळचे जेवण दिले तर काय हरकत आहे असा विचार करायचो. अर्थात हे घडायचे, नाही असे नाही पण अभावाने घडायचे. त्यावेळी असे वाटायचे की मी सक्षम झाल्यावर असा वागणार नाही. ही जगण्यातून मिळालेली शिकवण होती. अशा वेळी कुणा कलाकाराच्या गाण्याने भूक भागली आहे, कुणाचे चित्र पाहण्यात, वेरुळसारखी शिल्पं पाहण्यामध्ये वेळ गेला आहे. निराशाजनक परिस्थिती दिसली की वाटते कलेचे काम फार मोठे आहे.

माणसे आणि समाज पशुवत जगत आहे. माध्यमे अनेकदा समाजाचा हिंस्र चेहरा समोर आणून समाजाची भीती वाटावी अशी परिस्थिती तयार करतात. आणि समाजही खरंच भीती घालतो. माध्यमातून घालतो, रस्त्यावर घालतो, राजकीय व्यवस्थेतून घालतो. आता त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. तंत्रज्ञान तुम्हाला एकटे पाडते आणि त्याच एकटेपणातून समाजाची भीती वाटते. तुम्ही व्यक्त होता आणि कुठूनतरी एक जमाव तुमच्यावर चालून येऊ शकतो. तुम्ही भाषणात एखादा शब्द चुकीचा बोललात तर काहीतरी विपरीत घडू शकते. मग तुम्ही राजकीय नेते, कार्यकर्ते नसलात तरीही. माणसाला एकटय़ाला गाठून झुंडीने त्याच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढत असताना एखादे सकारात्मक काम तुमच्यासमोर येणे हे दिलासा देणारे ठरते. माध्यमांनी काय करावे याचे लोकसत्ताने वारंवार, वर्षांनुवर्षे उदाहरण समोर ठेवले आहे. नेतृत्व करावे तर कसे करावे, समाजाला द्यावे तर काय द्यावे, याचे भान काळानुरूप बदलत ठेवून त्याचा परंपरेने यथानुरूप मागोवा घेत असतानाच नव्या काळाचे वाचन करत नवे आयाम समाजापुढे ठेवणे हे मला जागरुकतेचे लक्षण वाटते. लोकसत्ताचा वाचक असल्यामुळे साहाजिकच सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाबद्दल मी सजग होतोच. पण अचानक याच कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले या इतका बहुमान दुसरा नाही.

याप्रसंगी मला सत्यदेव दुबे यांची आठवण झाली. अशा प्रसंगी काही वेळा बोलता येत नाही. आणि मग दुबेजी चांगल्या शब्दात पाहुणचार करत अरे नट आहेस ना, मग बोल, जे वाटत असेल ते बोल, मोकळेपणाने बोल, प्रामाणिकपणे बोल. आज व्यासपीठावर बोलणाऱ्या सर्वाच्या बोलण्यात तळमळ होती. तळमळ असले तर भाषा ही अडचण ठरत नाही. अलीकडे आपण खूप प्रतिक्रियावादी झालो आहोत. नवी माध्यमे आम्हाला कुठल्यातरी झुंडीत परिवर्तित करत आहेत. स्वत: विचार न करणारी सगळी टाळकी झाली पाहिजेत अशा पद्धतीने माध्यमे काम करताना दिसतात. व्यक्ती म्हणून माझ्या जन्माचा, अस्तित्वाचा काय अर्थ आहे अशा अनेक प्रश्नांबद्दल चिंतन करायचे झाले तर ते काम करणाऱ्यांच्या समूहात येऊन ते करावे. त्यांचे अनुभव ऐकत करावे असे मनापासून वाटते. प्रत्येक संस्थेचा एक एक प्रश्न ऐकला की अंगावर सर्रकन काटा येतो. कचरा वेचक मुलांबद्दल कोण विचार करते? तमाशातल्या मंडळींच्या मुलांचा कैवार घ्यावा असे वाटणे हेच मुळी माउली होण्याचे लक्षण आहे.

पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने मी महाराष्ट्रात फिरलो तेव्हा असे लक्षात आले की, महिलाच जणू काही देश चालवत आहेत. जणू काही माउलीनेच सर्व काही कैवार घ्यायचा असतो. पुरुषांचे कतृत्व हे फार मर्यादित वाटू लागते. मग याचे परिवर्तन आम्हाला राजकीय क्षेत्रात दिसते. पैशाने पासरीभर पक्ष आहेत त्यांचे अत्यंत भरताड बोलणारे नेते आहेत. वकूब असलेला एकही माणूस नाही. ज्याच्यामागे जाऊन समाजाने उभे राहावे, ज्याने दिशा द्यावी, काळाची आव्हाने ओळखावी. याबद्दल विचार करणारा एकही माणूस नाही. असे असताना ही माणसे पालखी खांद्यावर घेऊन, स्वत:च्या पावलापुरता प्रकाश दाखवणारी पणती हातात घेऊन वाट चालत आहेत तर याच माणसांकडे पाहावे लागेल. यांच्या मधूनच नेतृत्व, आशा ही उभी राहील असे मला वाटते. कारण माणसाला एकटे पाडण्यामागे जसे तंत्रज्ञान आहे तसेच पर्यावरण हेही आव्हान मोठे आहे. ज्यामुळे माणसे अजून वेगळय़ा पद्धतीने पीडित, वंचित, विस्थापित पडणार आहेत. आताच त्या तरुणाने सांगितले, प्राण्यांना वाचवण्यासाठी बरेच फोन येतात, पण एक माणूस किती प्राण्यांकडे बघणार तशी अवस्था येत्या काळात माणसाची होईल.

आताच करोनाकाळात पुण्यात प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स अशी एक चांगली चळवळ उभी राहिली. सुधीर मेहता यांनी ती चळवळ उभी केली. पुण्यात सुदैवाने त्यामुळे प्राणवायू न मिळाल्यामुळे फारसे मृत्यू झाले नाहीत. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार थांबवले गेले. देणारी माणसे आहेत पण काही माणसे ही स्वमग्न आहेत आणि माध्यमे त्यांना अजून गुरफटवून ठेवत आहेत. तुम्ही टाळक्यात परिवर्तित झालात किंवा तुम्ही कुंठीत झालात तर मला हवे ते उत्पादन तुम्हाला विकता येईल. राजकीय विचार असेल किंवा एखादी ध्रुवीकरणाची अटकळ असेल. आम्ही फक्त ग्राहक झालो आहोत. त्यापलीकडे जाऊन त्या माणसालाही मन असते, त्या माणसालाही संस्कारांची गरज असते, प्रत्येकाचे चांगल्या माणसात परिवर्तन घडू शकते याचा विश्वास देणारे काम तुमच्या माध्यमातून होत आहे असे माझे मत आहे. त्यामुळे इथे येऊन मीच खूप समृद्ध झालो. कधीही मला हक्काने बोलवा. मी तुमच्या सगळय़ांच्या कामाच्या ठिकाणी येऊ इच्छितो, काम पाहू इच्छितो. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसत्ताने १० वर्षांत १२२ संस्था आणि त्यानिमित्ताने माणसांना जोडले आहे. त्यामुळे आपला गट फार कमकुवत नाही हे लक्षात घ्यायला हवे. कितीही रान उठू दे, भांडण असू दे अथवा टोळी युद्ध होऊ दे पण तरीही आपण काम करत राहू. अनेक लोकांकडे वेळ आहे, पैसा आहे परंतु त्याचे काय करायचे याची बुद्धी आणि त्याची जाणीव त्यांना नाही आहे. आपण कोणत्या काळात राहतो, कोणत्या गावात, शहरात राहतो याचेही भान लोकांना राहिलेले नाही. लोकांचे गावाशी एक वेगळे नाते असते. त्या गावातील जागेशी तुमचे काही ऋणानुबंध असतात. त्यातून आपले अस्तित्व सिद्ध होत असते याचा मागमूस लोकांना राहिलेला नाही. मी कोणाचे गाणे ऐकतो. मी कोणाचे चित्र पाहतो, मी कोणासह वावरतो, मी कुठली भाषा बोलतो, कुठले साहित्य वाचतो अशा अनेक गोष्टींमधून माणूसपणाकडे प्रवास होतो. प्रत्येकालाच ते साधता येते असे नाही. पण प्रयत्न करत राहण्यातही मजा आहे. अशा स्थितीत सगळय़ांसमोरील आव्हाने खरेच बिकट आहेत. समाजात राहताना त्याची नीती, रीत, परंपरा या कधी कधी अडचणीच्या ठरतात. पण त्यापलीकडे जाऊन काम करणारी आणि वाट दाखवणारी तुम्ही माणसे आहात. त्यामुळे तुम्ही दाखवलेली ही वाट माझ्या माध्यामतून जितक्या लोकांपर्यंत नेता येईल तितके मी घेऊन जाईन. कारण मी माध्यमकर्मी आहे. मला प्रत्येकामध्ये एक गोष्ट दिसत होती. समाज जसा एकटा पडत जात आहे तशी त्याला कोणाची गोष्ट ऐकायची नाही आणि त्याच्याकडे सांगायला गोष्ट उरलेली नाही. माणसाचा मृत्यू कशामुळे होतो तर त्याच्याकडे सांगायला गोष्ट उरत नाही म्हणून. त्यामुळे मला सांगायला गोष्ट तयार करायची असेल तर ती तुमची गोष्ट असेल. माणसांच्या करुणेपर्यंत जाणे हीच मोठी गोष्ट आहे.

कामाची सुरुवात स्वत:पासून करावी..

मला आणि उमेश कुलकर्णीला वेगवेगळय़ा सामाजिक कामांमध्ये जोडून घ्यायला आवडते. आम्ही चित्रपट निर्मितीत आलो ते एवढय़ासाठीच की काही क्षेत्रांमध्ये चांगले काम होत नव्हते. मग ते आपल्यालाच करावे लागेल, असा विचार होता. आम्ही चित्रपट निर्मितीत आलो तेव्हा व्यवसाय किंवा ती पोटापाण्याची सोय असावी असा विचार डोक्यात नव्हता. कोणी मदतीला नसताना कर्ज काढून पुढे गेलो. त्यामुळे संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेले अनुभव मला वेगळय़ा संदर्भात जाणवत होते. एखादी संस्था आदिवासींसाठी मूलगामी काम करते तर त्यांच्यावर चित्रपट करावा. पाणी फाऊंडेशनसारखी संस्था उभी राहते. त्यात अनेक माणसे एकत्र येतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करायचे. अशा वेळी मग चित्रीकरण वगैरे बघायचे नाही. त्यातून खूप शिकायला मिळते. तुम्ही मांडले ते प्रश्न मी याची देही याची डोळा पाहिले आहेत, अनुभवले आहेत. प्रत्येकाने कामाची सुरुवात स्वत:पासून करावी. कोण, कसे येईल याचा विचार न करता स्वत:ला प्रश्न विचारत, त्याची करुणा माझ्या मनात जागेल, याची आस ठेवत सुरुवात करायला हवी.

अशा विविध संस्थांच्या माध्यमातून मानवता जपणारे अनेकजण काम करीत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. अनेक वर्षे आम्ही ‘लोकसत्ता’ला या उपक्रमासाठी सहकार्य करत आहोत. यापुढेही आम्ही नेहमीच ‘लोकसत्ता’सोबत असू.

– राजेश बजाज, दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

आम्ही कर्करोगाच्या रुग्णांसाठी २००६ पासून काम करत आहोत. ज्या दिवशी कर्करोगाचे निदान होते, त्या दिवसापासून आमची ‘स्नेहांचल’ ही संस्था रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना साथ देत असते. आम्ही नि:शुल्क उपचार करतो. सगळय़ाच गोष्टी सरकारने कराव्यात अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. समाज म्हणून गरजू लोकांसाठी काम करणे आपली जबाबदारी आहे. ‘लोकसत्ता’ने आमचे काम प्रकाशात आणले आणि आम्हाला खूप मोठा आधार मिळाला.

-सपना काळे, स्नेहांचल संस्था (नागपूर )

बालकामगारांचे, स्त्रियांचे आजही मोठय़ा प्रमाणात शोषण होते. बालकामगारांना मुक्त करण्याचे काम आमची संस्था करते. आम्ही गेली २७ वर्षे हे काम करत आहोत. अमिताभ बच्चन यांच्या मदतीने आम्ही बालविवाह थांबवण्यासाठीही प्रयत्न करीत आहोत. आर्थिक साहाय्याबरोबरच नैतिक बळ मिळणे आवश्यक असते. ते ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे मिळालेच, शिवाय आमचे काम लोकांपर्यंत पोहोचले.

– अनुराधा भोसले, अवनी संस्था (कोल्हापूर )

‘प्रतीक सेवा मंडळ’ ही संस्था २ जुलै १९९० साली सुरू झाली. त्या वेळी पालघरमध्ये कर्णबधिरांसाठी एकही शाळा नव्हती. जव्हारच्या प्रमिला कोकण आणि सुरेश भट यांनी ती सुरू केली. पालघरमधील ही अपंगांची एकमेव शाळा आहे. आम्ही मुलांना दहावीपर्यंतचे नि:शुल्क शिक्षण देतो. या शाळेचा खर्च संस्थाचालक उचलतात. आम्ही या शाळेत मुलांना शिवणकाम, कार्यानुभव याचेही शिक्षण देतो, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या पायावर उभे राहावेत.

– प्रशांत भट, प्रतीक सेवा मंडळ ( पालघर )

‘लोकसत्ता’ने आवर्जून ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’ या संस्थेची निवड केली, त्याबद्दल आभार. २०२३ हे वर्ष पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माळव्यातल्या देवास या ठिकाणी, कुमारजींच्या कर्मस्थळी कुमार गंधर्व प्रतिष्ठान ही संस्था कलेसाठी पोषक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करते. काही काळ कलाक्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर पंडित कुमार गंधर्व यांनी पुन्हा संगीत क्षेत्रात पदार्पण केले आणि माळव्यातील लोकांसाठी स्वत:ला वाहून घेतले. ते नेहमी म्हणायचे की मी इथे आहे तर या भूमीला मी काय देऊ? एक कलाकार काय देऊ शकतो तर दुसऱ्या कलाकारांची कला आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यांना सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध करू शकतो. ही संस्था कोणाकडूनही अगदी विद्यार्थ्यांकडूनही एक पैसा घेत नाही. मात्र अजूनही त्या महान संगीतकाराच्या स्वरांना मानवंदना द्यायला रसिक दुरून येतात. त्यामुळेच ‘लोकसत्ता’च्या  ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून पंडित कुमार गंधर्व यांच्या नावाने संग्रहालय उभे करणार आहोत.

– कलापिनी कोमकली, कुमार गंधर्व प्रतिष्ठान, देवास

२०१० साली, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बिहार येथून एम. ए. हुसेन आले. ते बॉलपेनची विक्री करायचे. त्यासाठी ते वेगवेगळी शासकीय रुग्णालये, शाळांमध्ये फिरले. रुग्णांच्या अनेक समस्या त्यांना समजल्या. निराधार रुग्णांसाठी काम करण्यासाठी त्यांनी ‘रिअल लाइफ, रिअल पीपल’ ही संस्था स्थापन केली. निराधार रुग्णांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले. ‘लोकसत्ता’ने आमच्या संस्थेवर विश्वास ठेवून जी मदत केली आहे, ती नक्कीच व्यर्थ जाणार नाही.

– महादेव बोत्रे, रिअल लाइफ, रिअल पीपल, (पिंपरी- चिंचवड)

मुंबईत भटक्या प्राण्यांसाठी एकमेव रुग्णालय आहे. ते परळ येथे आहे. या कामासाठी साधनस्रेत मर्यादित आहेत. एखाद्या आजारी वा अपघातग्रस्त प्राण्यावर उपचार करण्यासाठी आम्ही स्वत:च्या वाहनांनी जायचो. पण कधी कधी वेळेवर उपचार न मिळून त्या प्राण्याचा जीव जायचा. ‘लोकसत्ता’ने दिलेल्या या निधीमधून आम्ही प्राण्यांसाठी रुग्णवाहिका घेणार आहोत. या निधीमधून प्राण्यांना घेऊन खासगी पशुवैद्यांकडे जाण्याऐवजी आमच्या निवारागृहातच एक क्रिटिकल केअर सेंटर सुरू करू शकतो. आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.

– सुशांक  तोमर, सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन, (ठाणे)

कचरावेचक मुलांसाठी काम करणारी ‘सुधर्मा’ ही आमची संस्था शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देते. कोणत्याही राजकीय व्यक्तींकडून मदत न घेता मित्रांकडून स्वखुशीने मिळणाऱ्या दानावर ही संस्था चालते. कचरा गोळा करणाऱ्या निरागस मुलांना पाहून त्यांच्यासाठी काम करायचे ठरवले आणि मग एका झाडाला फळा लटकवून बिनिभतीची शाळा सुरू झाली. आज ‘सुधर्मा’ची दोन मुले पोलीस आहेत आणि एक अभियंता आहे. कचरावेचक मुलांना संगणक साक्षरतेकडे नेण्याचे आमचे ध्येय आहे. ‘सर्वकार्येषु’मधून मिळालेल्या मदतीचा सदुपयोग आम्ही संस्थावाढीसाठी करू. 

– हेमंत बेलसरे, सुधर्मा, जळगाव

स्वस्तिक फाउंडेशन ही संस्था २०१६ मध्ये मुंबईत स्थापन झाली. वृद्धांच्या प्रश्नांसाठी काम करताना कोकणातील समस्या कळल्या. त्यांचा आढावा घेतला तेव्हा सिंधुदुर्गमध्ये अनेक निराधार वृद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी एका छताखाली समकालीन लोकांसह पुढील आयुष्य घालवावे, त्यांना कोणाची तरी साथ लाभावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपली मुले आपल्याला आपल्या वृद्धापकाळात सांभाळतील की नाही असा प्रश्न सगळय़ांनाच भेडसावत असतो. म्हणून आमच्या दिवीजा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही निराधार वृद्धांसाठी काम करत आहोत.

– दीपिका रांबडे, दिविजा वृद्धाश्रम स्वस्तिक फाउंडेशन (कणकवली)

तमाशा कलावंतांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाचे भीषण वास्तव मांडणारा लेख २०१७ साली ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्यानंतर हा विषय पुढे आला. तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी कोणतीही सरकारी यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे या मुलांसाठी २०१८ साली ‘निर्मिती प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ‘सेवाश्रम’ नावाचा प्रकल्प सुरू केला. आम्ही त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था औरंगाबाद येथे केली आहे. तमाशा कलावंतांच्या मुलींवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मिळालेल्या निधीमधून आम्ही औरंगाबाद येथे पुनर्वसन प्रकल्प सुरू करणार आहोत.

– सुरेश राजहंस, निर्मिती प्रतिष्ठान (येळंब, बीड)

‘लोकसत्ता’ने ‘विज्ञानाचे पंख करू’ हा लेख प्रसिद्ध केला, त्याने आमच्या पंखात बळ आले. विज्ञान हे सत्य आहे. आम्हाला विज्ञानवादी पिढी घडवायची आहे. ती पिढी जाणकार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ ठरेल. विज्ञान या सत्यामुळे आपण जगत आहोत. 

– डॉ. संजय पुजारी, कल्पना चावला विज्ञान केंद्र ( कराड)

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या