डॉ. राजेंद्र बगाटे
१८ जुलै… हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या महत्त्वाच्या नावाने कोरला गेला आहे.. या दिवशी अण्णा भाऊंनी आपला देह ठेवला असला, तरी त्यांची विचारसंपदा आणि संघर्षशील लेखणी काळाच्या सीमा ओलांडून आजही जिवंत आहे. शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त, दलित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज बनून अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे ही सामाजिक कृतज्ञतेची खरी अभिव्यक्ती आहे.
अण्णा भाऊ साठे, यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, ते केवळ एक साहित्यिक नव्हते; ते एक क्रांतिकारी विचारवंत, लोककलावंत, समाजसुधारक आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे झुंजार नेते होते. त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून त्यांनी समाजातील वंचितांना, उपेक्षितांना आणि शोषितांना एक नवी वाचा दिली. त्यांचे जीवन हे गरिबी, संघर्ष आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे समाजाला आजही दिशा देणारे प्रेरणादायी उदाहरण आहे.
अण्णा भाऊंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे एका मातंग कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांनी गरिबी, उपेक्षा आणि जातीय विषमतेचा सामना केला. अत्यंत दारिद्र्यात आणि विषमतेच्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. जातीव्यवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शाळेतील भेदभावामुळे त्यांनी केवळ दीड दिवसांतच शाळा सोडली. मात्र, त्यांच्यातील ज्ञानाची भूक आणि तीव्र निरीक्षणशक्ती यामुळे त्यांनी औपचारिक शिक्षणाशिवायच प्रचंड ज्ञान संपादन केले. त्यांनी अनुभवातून ज्ञान मिळवले. स्वप्रयत्नाने वाचनाची प्रचंड आवड जोपासली. त्यांच्या जीवनातील खडतर अनुभवांनी त्यांना समाजातील अन्याय आणि विषमतेची तीव्र जाणीव करून दिली.
मुंबईत आल्यानंतर त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. या काळात त्यांनी कामगारांचे शोषण, त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष जवळून पाहिला व अनुभवला. स्वतः कष्टकरी असल्याने त्यांना कामगारांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींची खोलवर जाणीव होती. याच अनुभवांतून त्यांच्यातील कलावंत जागा झाला. त्यांनी पोवाडे, लावण्या, कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहायला सुरुवात केली. त्यांच्या साहित्यातून त्यांनी कामगार, दलित आणि ग्रामीण भागातील उपेक्षित लोकांचे जीवन, त्यांच्या आशा-आकांक्षा आणि त्यांचे दुःख प्रभावीपणे मांडले. त्यांनी आपली लेखणी समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन बनवले.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची खरी ताकद होती ती त्यांच्या ज्वलंत आणि वास्तववादी चित्रणामध्ये. त्यांच्या लेखणीला क्रांतीची धार होती. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या, वगनाट्ये आणि लोकनाट्यांची निर्मिती केली. ‘फकिरा’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी एका दलित युवकाच्या सामाजिक विद्रोहाची कथा असून, ती त्यांच्या तळागाळातील जीवनाच्या प्रगल्भ निरीक्षणाची साक्ष देते. ही कादंबरी केवळ एका पात्राची कथा नाही, तर एका वर्गाच्या आत्मभानाची आणि अन्यायाविरोधातील संघर्षाची कहाणी आहे. ‘फकिरा’मधून त्यांनी मातंग समाजातील ब्रिटिशांविरुद्धच्या एका नायकाच्या, फकिराच्या संघर्षाचे प्रभावी चित्रण केले आहे. फकिराचे शौर्य, त्याचा अन्यायाविरुद्धचा लढा आणि त्याच्या समाजाचे दुःख यातून स्पष्टपणे समोर येते. अण्णा भाऊंचे लेखन ‘मी’ च्या स्वरुपात कधीच आत्मकेंद्रित नव्हते. ते ‘आम्ही’ या व्यापक रूपात प्रकट होत होते. त्यांनी लेखनात माणसाच्या जगण्याची लढाई मांडली. त्यांच्या कथांतून आणि कादंबऱ्यांतून भूक, जातिभेद, अन्याय, कामगारांचे शोषण आणि व्यवस्थेचा दुजाभाव हे सामाजिक वास्तव पुढे आले. पण त्याच वेळी त्यांच्या साहित्याने संघर्षाची प्रेरणा दिली आणि लढण्याची उमेद दिली.
अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर एक कुशल लोककलावंतही होते. त्यांनी पोवाडा, लावणी, तमाशा, वगनाट्य या माध्यमांचा प्रभावी वापर करून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या लावण्यांमध्ये आणि पोवाड्यांमध्ये केवळ शब्दांची गोडी नव्हती, तर सामाजिक सत्याची धार होती. त्यांनी अनेक पोवाडे आणि लावण्या लिहिल्या, ज्यातून त्यांनी समाजप्रबोधन केले. त्यांच्या पोवाड्यांनी आणि लावण्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक नवा अध्याय लिहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून लोकांमध्ये चेतना जागवली. ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही त्यांची छक्कड-लावणी प्रचंड लोकप्रिय झाली. ती मुंबईतील गिरणी कामगारांच्या विरहाचे आणि त्यांच्या गावाकडच्या ओढीचे हृदयद्रावक वर्णन करते. ही लावणी म्हणजे केवळ एक गीत नव्हते, तर ते कामगारांच्या जीवनातील एका मोठ्या वास्तवाचे प्रतीक होते. त्यांच्या वगनाट्यांतून त्यांनी जातीय विषमता, शिक्षणाचा अभाव, महिला शोषण आणि कामगार हक्क असे ज्वलंत मुद्दे मांडले. त्यांनी लोककलेला सामाजिक भाष्याचा आणि परिवर्तनाचा प्रभावी मंच बनवले. ही त्यांची दूरदृष्टी आजही लोककला कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे. ‘अकलेची गोष्ट’, ‘शेटजींचे राज्य’, ‘बेकायदेशीर’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी सामाजिक विषमतेवर आणि शोषणावर कठोर प्रहार केले. त्यांच्या लोकनाट्यामध्ये विनोद, व्यंग्य आणि प्रबोधन यांचा सुंदर मिलाफ होता. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथांवर आधारित ‘फकिरा’, ‘वैजयंता’ यांसारखे चित्रपटही बनले, ज्यामुळे त्यांच्या साहित्याने मराठी चित्रपटसृष्टीलाही एक नवी दिशा दिली.
अण्णा भाऊंचे साहित्य केवळ मनोरंजन नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे,’ हे त्यांचे प्रसिद्ध विधान त्यांच्या क्रांतीकारक विचारांचे प्रतीक आहे. हे विधान त्यांनी कष्टकऱ्यांच्या श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केले होते. त्यांनी मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव स्वीकारला आणि ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. त्यांनी श्रमिकांच्या एकजुटीवर आणि त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्यावर भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन अण्णा भाऊ साठे यांनी दलित चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
‘जग बदल घालूनी घाव ।
सांगुनी गेले मज भीमराव ।।’
या गीताच्या माध्यमातून त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांसाठी लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्यांनी दलित समाजाच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उचलला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान अनमोल होते. त्यांनी आपल्या शाहिरीतून आणि प्रखर भाषणांतून जनतेला एकत्रित केले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लोकांना प्रोत्साहित केले.
१८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही आपल्यात जिवंत आहेत. त्यांचे साहित्य आजही समाजातील अन्याय आणि विषमतेवर बोट ठेवते. जागतिकीकरणानंतर वाढलेली आर्थिक विषमता, रोजगाराचा प्रश्न, ग्रामीण भागातील दारिद्र्य, शेतकरी आत्महत्या यांसारख्या समस्या आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा परिस्थितीत अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची प्रासंगिकता अधिकच वाढते. त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते की, आपण आपल्या हक्कांसाठी लढायला हवे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि समतावादी समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजही समाजात जातीभेद, आर्थिक विषमता, शिक्षणाची दरी, महिलांवरील अन्याय, भटके-विमुक्त समाजाचे दुःख कायम आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास आजही त्यातली सामाजिक जाणीव आपल्याला अंतर्मुख करते. त्यांच्या लेखनातून मिळणारी ऊर्जा आणि आशा नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. साहित्य हे केवळ सौंदर्य नसून सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे, हे त्यांच्या आयुष्याने सिद्ध केलं.
अण्णा भाऊ साठे हे केवळ एका जातीचे किंवा वर्गाचे प्रतिनिधी नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक होते. त्यांनी जीवनात प्रचंड दुःख आणि संघर्ष अनुभवला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट, याच संघर्षाला त्यांनी आपल्या साहित्याचे आणि कार्याचे प्रेरणास्रोत बनवले. त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक कृतीत समाजातील उपेक्षितांसाठीचा कळवळा आणि त्यांच्या न्यायासाठीचा आक्रोश स्पष्टपणे दिसत होता. आजही आपण समाजात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी पाहतो, जातीय भेदभावाचे प्रकार पाहतो, तेव्हा अण्णा भाऊंच्या विचारांची किती गरज आहे हे लक्षात येते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना आपण केवळ त्यांचे कार्य आठवत नाही, तर त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेतो. त्यांनी लावलेला समतेचा आणि न्यायाचा दिवा आजही तेवत आहे आणि भविष्यातही तो समाजाला दिशा देत राहील.
लेखक समाजशास्त्र आणि मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.
bagate.rajendra4@gmail.com