डॉ. भूषणा करंदीकर
डॉ. उमा लेले यांच्या निधनाला आज (२८ ऑगस्ट) एक महिना झाला आणि आज त्या असत्या, तर यंदाच्या २८ ऑगस्टला त्यांनी ८५ व्या वर्षात प्रवेश केला असता. त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अर्थतज्ज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ होत्या. निधनानंतरच्या आठवड्यात जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. डॉ. हदाद (‘ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रूव्ह्ड न्यूट्रिशन’ या संस्थेचे प्रमुख), डॉ. विल मास्टर्स (यांनी प्रथम ‘सोफी’ (स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी) रिपोर्ट काढला, आपल्याकडे तो वेगळ्या कारणाकरिता कुप्रसिद्ध आहे, पण डॉ. विल मास्टर्स यांचे नाव शेती आणि पोषण या क्षेत्रात अग्रगण्य आहे.! )अशा दिग्गजांपासून ते अगदी नवीन डॉक्टरेट मिळालेल्या फेलोंनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. सर्व खंडांतून, सर्व वयाच्या शेती अभ्यासकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पण उमाताईंच्या आवडत्या पुण्यात आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रात त्यांच्या दु:खद निधनाची बातमी दिसली नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला त्यांचा अल्पसा सहवास मिळाला. वॉशिंग्टनमधल्या काही संध्याकाळी मी त्यांच्या घरी, वॉटरगेट बिल्डिंगमध्ये (बरोबर, तीच ही- निक्सनने कुप्रसिद्ध केलेली इमारत!) किंवा केनेडी सेन्टरमध्ये त्यांना भेटायला जात असे. त्यांचे चित्रसंपन्न देखणे घर, तिथून दिसणारी डौलदार पोटॉमॅक नदी आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आता माझ्यासाठी सुंदर आठवणी बनून राहिल्या आहेत. त्यांचे स्मरण आहेच, पण त्यांचे काम महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी हा लेखप्रपंच.
सातारा जिल्ह्यात १९४१ साली जन्मलेल्या उमा गोडबोले यांनी, १९६० च्या दशकात फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.पूर्ण केले. त्यांचे मोठे भाऊ म्हणजे माधव गोडबोले, त्यांनी सनदी सेवेत प्रवेश केला. त्या काळी पदवी मिळवणाऱ्या, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुली खूपच कमी. आणि परदेशात जाणाऱ्या तर विरळाच. उमाताईंनी शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्रात ‘एमएस’साठी प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे गाइड होते डॉ. थिओडोर शुल्ट्झ. हेच ते थिओडोर शुल्ट्झ ज्यांना अर्थशास्त्राचे ‘नोबेल पारितोषिक’ (१९७९) तर मिळालेच, ‘ट्रान्स्फॉर्मिंग ट्रॅडिशनल अॅग्रिकल्चर’ ही त्यांची संकल्पना ६० च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. पण उमाताईंनी वर्षभरातच त्यांच्या विवाहामुळे शिकागो युनिव्हर्सिटीमधून, कॉर्नेल या विख्यात युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन आधी ‘एमएस’ आणि मग तिथेच १९६५ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. तीसुद्धा कोणत्या विषयात तर शेतीमालाचे मार्केटिंग. या अभ्यासाचे १९७१ मध्ये पुस्तक प्रकाशित झाले, ते आजही सर्वजण वाखाणतात, संदर्भ म्हणून वापरतात. फूडग्रेन मार्केटिंग इन इंडिया : प्रायव्हेट परफॉर्मन्स अॅण्ड पब्लिक पॉलिसी ( Food Grain Marketing in India: Private Performance and Public Policy) हे या पुस्तकाचे नाव. जाता जाता एक आठवण म्हणून – सध्या महाराष्ट्रात जागतिक बँकेचा बाळासाहेब ठाकरे प्रकल्प चालू आहे. तो शेतमाल बाजार या कल्पनेला केंद्रीभूत मानून आखला गेला आहे. त्याची बांधणी चालू असताना, २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या जागतिक बँकेच्या प्रमुख ऑफिसरनी याच पुस्तकाची मागणी केली होती आणि आम्ही ते त्यांना भेट म्हणून दिले होते.
कॉर्नेल विद्यापीठाने डॉक्टरेट दिलेल्या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या आणि शेतीमालाच्या बाजारपेठा हा अभ्यास विषय तर अगदी आजही पुरुषांची मक्तेदारी! बाजारात व्यवहार बघणारे सगळे पुरुषच आणि बाईमाणसाला कशाला हवी अशी माहिती असा एकंदर खाक्या! अशा परिस्थितीत, साठ वर्षांपूर्वी उमाताई त्यांच्या पीएच.डी. संशोधनासाठी किती हिंडल्या असतील, किती प्रवास केला असेल, ‘डेटा’ मिळवायला त्यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील त्याची कल्पनाच आता करता येत नाही. पण त्याबद्दल बोलले तर म्हणाल्या होत्या अगं अभ्यास करायला मिळायचा आणि फील्ड वर्कच्या निमित्ताने, लेकाला घेऊन भारतात यायला मिळायचे! म्हणजे खरोखर एक आशियाई स्त्री म्हणून आणि विषयाची निवड या दोन्ही बाबतींत त्यांनी खरोखर ‘ग्लास सीलिंग’ तोडले होते. पण त्याबद्दल त्यांना कणमात्र गर्व नव्हता.
त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाने जणू त्यांच्या पुढील करिअरचा ढाचा ठरविला. या कामामुळे त्यांना जागतिक बँकेत काम करायची संधी मिळाली. पण, त्यांना वाटले तसे शेती बाजारपेठेतले संशोधनात्मक काम नाही मिळाले. काम होते आफ्रिकेतील जागतिक बँकेतील प्रकल्पांवरचे. त्यासाठी परत प्रचंड प्रवास, मुलाखती, वेगवेगळे डेटा सेट्स, असंख्य डॉक्युमेण्ट्स बघणे आले. तेही संगणक अभावानेच असताना, १९७० च्या दशकात! त्या दशकात एक भारतीय महिला आफ्रिकेत प्रवास करून, या वरिष्ठ पातळीवर काम करते हे असामान्यच होते. पण त्यांनी हे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. या सर्व अनुभवांचे एकत्रित संकलन करून त्यांनी लिहिलेले दुसरे पुस्तक म्हणजे ‘द डिझाइन ऑफ रुरल डेव्हलपमेंट : लेसन्स फ्रॉम आफ्रिका (जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेस- १९७५). आज, पन्नास वर्षांनी हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून तर वापरले जातेच पण त्याचे सार आजही मार्गदर्शक ठरते : नुसते फंड, पैसे देऊन विकास कार्यक्रमांची रचना करता येत नाही. त्याकरिता संस्थांची बांधणी , सुशासन गरजेचे असते. ग्रामीण विकास हा सहभागितेवर आधारलेला (पार्टिसिपेटरी) असतो, गव्हर्नन्सचा यात मोठा वाटा असतो.
या अभ्यासाने फक्त पुस्तकी पठडीत न राहता, सणसणीत पुराव्यानिशी विकासाची प्रक्रिया जटिल, गुंतागुंतीची असते पण तरीही ती समजावून घेऊन, सुशासनाने तसेच समर्थ संस्था-उभारणीतून विकास साधता येतो हे दाखवून दिले. ‘पुराव्याचे पाठबळ असलेली धोरणे’ या आता सर्वश्रुत असलेल्या कल्पनेची मुहूर्तमेढ होता हा अभ्यास!
उमाताईंनी इतरही खूप पुस्तके, पुस्तकाचे चॅप्टर्स लिहिले आहेत, म्हणजे तसे पहिले तर शेती अर्थशास्त्र विषयातील प्रत्येक पैलूवर त्यांनी लिहिले आहे. शेती, नैसर्गिक संसाधने, स्त्रिया आणि शेती, शेतीतील बौद्धिक संपदा, जंगले आणि शेती, पाणी, शेतीतील संशोधन आणि विकास, पोषण, शेती आणि तंत्रज्ञान… असे अगणित विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या पद्धतीने या विषयांची एक वेगळीच मांडणी, त्यातले आकृतिबंध त्यांनी समोर आणले.हे सर्व जागतिक स्तरावर! आफ्रिका, आशिया, विकसित /अविकसित जगातल्या प्रत्येक भागावर त्यांचे लिखाण तुम्हाला आढळेल. त्यांचे काम अगदी ठाम, मुद्द्यावर आधारित आणि विवाद्या असले तरी कर्कश नसे. त्यांनी कायम पुरावे हातात ठेवूनच धोरण- बदलाची मागणी केली.
मागील दोन दशकांत त्यांनी शेती अर्थशास्त्र, आमविकासाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरणे, सुशासन, समाजशास्त्र या सर्वांचा समावेश व समन्वय करून, महा-मूल्यमापनाची (मेटा इव्हॅल्युएशन) कामे केली. एखाद्या प्रकल्पाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन हेसुद्धा अतिशय कौशल्याचे काम असते. त्यात प्रकल्पाची पार्श्वभूमी, त्यातील खाचाखोचा, कंगोरे समजावून घेऊन या प्रकल्पाने काय परिणाम झाला, त्यातील प्रक्रिया कशा होत्या यांचे मापन केले जाते. याकरिता गाढ अभ्यास तर लागतोच पण एक संवेदनशीलताही लागते. उमाताईंनी हे मूल्यमापन केले तेसुद्धा महासंस्थांचे. ‘सीजीआयएआर’ (कन्सल्टेटिव्ह ग्रूप ऑफ इंटरनॅशनल अॅग्रिकल्चरल रिसर्च) ही संस्था म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची गंगोत्री. यांचे अक्षरश: हजारो कार्यक्रम प्रकल्प झाले असतील, त्यांचा आढावा घेऊन त्यांचे महामूल्यमापन करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले होते. असेच काम त्यांनी जागतिक बँकेच्या वन धोरणाबाबत केले आहे. विकास, दारिद्र्य निर्मूलन आणि वनसंवर्धनाची सांगड घालायच्या त्यांच्या शिफारशीमुळे जागतिक बँकेची वन प्रकल्पांची दिशा बदलली.
‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट्स (आयएएई)’च्या अध्यक्ष पदावर २०१८ मध्ये उमाताईंची निवड झाली. या संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका स्त्रीची – तीसुद्धा भारतीय स्त्रीची- निवड झाली होती. अशी अनेक पहिली पदे, पारितोषिके सन्मान त्यांना मिळाले होते. शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या.
एका मराठी स्त्रीची ही कर्तृत्वाची झेप स्तिमित करणारी आहे. मागच्या वर्षी त्या मला म्हणाल्या होत्या की, त्या आत्मचरित्र लिहणार आहेत. आजही मला आशा आहे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्याचाही ‘ड्राफ्ट’ करून ठेवला असेल… कदाचित आपल्याला ते वाचायलाही मिळेल!
– डॉ. भूषणा करंदीकर
kbhushana@gmail.com