शोषितांचे सातत्याने होणारे खच्चीकरण, विस्तारत चाललेली वर्चस्ववादी वृत्ती आणि खोलवर रुजणारी जुलूम-जबरदस्तीची नानाविध रूपे दिसत असताना माणसे गपगुमान राहात नाहीत. परिस्थितीला अनेकजण आपापल्या परीने भिडतात. त्यातूनच प्रतिरोधाचे – ‘रेझिस्टन्स’चे- नवनवे अवकाश तयार होतात. सामूहिक तसेच व्यक्तिगत स्तरावरचा प्रतिरोध एकाच साच्यातला नसतो. छापील- दृकश्राव्य- इलेक्ट्रॉनिक- महाजाल अशा विविध माध्यमांतून, आपापल्या कुवतीप्रमाणे आणि तत्त्वधारणेनुसार, सशक्त समाज आणि समृद्ध मने तयार करण्याच्या स्वप्नांना उराशी बाळगून, प्रतिरोध व्यक्त होत असतो! यातून काही वेळा सत्ता उलथवून टाकल्या जातात, व्यवस्थेची पुनर्मांडणी होते. बऱ्याचदा हा प्रतिरोध समाजाला जिवंत ठेवण्यासाठी कामी येतो; तर कधी-कधी, हिंसा आणि सत्ताकारणाची नवी रूपे आकाराला येतात. कलेच्या माध्यमातून न्याय्य आणि सुसंस्कृत समाज उभा करण्यासाठी धडपणारे कलाकार आणि चळवळी जगभरात आहेत, यातूनही प्रतिरोधाची संस्कृती जन्म घेते. इयारा ली या ब्राझीलियन दिग्दर्शकाचा ‘कल्चर ऑफ रेझिस्टन्स’ हा माहितीपट प्रतिरोधाच्या संस्कृतीविषयी अत्यंत प्रभावी असे कथन मांडतो. त्रिशूरमध्ये पार पडलेल्या १५ व्या ‘इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरला’मागची प्रेरणा हा माहितीपट होता.

गेली चौदा वर्षे सातत्याने आयोजित होत असलेला हा महोत्सव आर्थिक संकटे आणि वायनाडमधल्या नैसर्गिक आपत्तीचे कारण देत पुढे ढकलण्याचा विचार केरळ संगीत नाटक अकादमी करत होती. त्यामुळे यंदा महोत्सव होणार की नाही अशीही शंका होती. पण नागरिक आणि कलाकारांच्या रेट्यामुळे महोत्सव घ्यावा लागला आणि ‘प्रतिरोधाची संस्कृती’ या विषयाला समोर ठेऊन गुंफलेला महोत्सव पार पडला.

जगभरातले नाटक फक्त घोषणाबाजी आणि आकांडतांडव करण्यातून प्रतिरोध मांडत नाही. तरलतेने विरोधाचा सूर लावणारे नाटकही तेवढेच महत्त्वाचे असते. मानवी नात्यांमधील बारकावे, मांडणीतील सौंदर्यतत्त्व आणि प्रयोगमूल्य शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत रंगमंचीय अवकाशात प्रतिरोधाचा खेळ मांडणारी बरीच नाटके त्रिशूरमधल्या महोत्सवात होती. व्यवस्थेला नाकारणे किंवा ती उलथवून टाकणे यापलीकडे जात सुसंस्कृत समाज उभे करण्यासाठी प्रतिरोध या व्यापक सूत्राला धरून या महोत्सवातील नाटकांची गुंफण केली होती. संपूर्ण महोत्सवात जी पंधरा नाटके सादर केली गेली त्यापैकी एखाद दुसरे नाटक वगळता नाटकांची मांडणी, नेपथ्य आणि प्रकाश योजना अजिबात खर्चिक आणि गुंतागुंतीची नव्हती. तरुण रंगकर्मींच्या प्रयोगांत चकचकीतपणाऐवजी अस्वस्थ करणाऱ्या, उमेद देणाऱ्या गोष्टी सांगायची आस दिसत होती. एवढे काय होते या प्रयोगांमध्ये?

कठपुतळी- खेळातून प्रतिरोध!

दिल्लीची अनुरूपा रॉय ही कठपुतळ्यांना घेऊन प्रयोग करणारी प्रयोगशील कलाकार. ‘अबाउट राम’ हे तिचे गाजलेले कठपुतळी- नाट्य. फेस्टिवलमध्ये द नाईट्स हा कठपुतळ्यांचा खेळ घेऊन अनुरूपा आली होती. ‘अरेबियन नाइट्स’ मधल्या काही गोष्टींचे नील चौधरी या सशक्त लेखकाने तरलतेने केलेले हे पुनर्कथन म्हणजे हे नाटक. सर्वसाधारणपणे, कठपुतळी-नाट्य म्हणजे एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात करमणूक करण्यासाठी बाहुल्या सादर करणे असा समज आहे. पण, अनुरूपा या प्रयोग परंपरेकडे अत्यंत गांभीर्याने पाहते. एखाद्यावर ताबा मिळवणे म्हणजे काय? किंवा, मोजक्या लोकांच्या हातात सत्ता जाते आणि ते आपल्या सर्व यंत्रणा नियंत्रणासाठी राबवू लागतात तेव्हा त्या समाजाचे आणि व्यक्तीचे काय होते? बंडखोरी कशी व्यक्त होते ? अशा काही मुद्द्याना समोर ठेऊन अनुरूपा आपल्या बाहुल्या खेळवते. पुढे जाऊन, बाहुल्या आणि बाहुल्या खेळवणारे यांच्यामधले द्वंद्व अनुरूप मांडते तेही ऐकण्यासारखे असते. म्हणजे, त्या दोहोंमधला कथनकार कोण? खेळणारा की खेळवणारा? कोण कोणावर शिरजोरी करतो? असे प्रश्न खोलवर विचार करायला लावतात.

अशाच द्वंद्वाचा मुद्दा, मन आणि शरीरातील भेदाला धरून, नीलम मानसिंग चौधरी दिग्दर्शित ‘हयवदन’ या गिरीश कार्नाडालिखित नाटकाच्या ट्रक-रंगमंचावरल्या प्रयोगाने मांडला. चौधरींची आधीची नाटके ज्यांनी पाहिली होती त्यांना या उद्घाटनाच्या प्रयोगात नवे काही सापडले नाही. शिवाय, प्रयोगाच्या वेळेला सबटायटल्स काम करत नव्हती त्यामुळे हिंदी न जाणणारे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात होते त्यांची निराशा झाली. पण, भाषेची उणीव दीपन शिवरामन याने केलेल्या ट्रकवरच्या आकर्षक नेपथ्य आणि दृश्यमांडणीने भरून काढली. या नाटकाची एक खास बाब म्हणजे अजित सिंग पालावत आणि इप्सिता चक्रवर्ती सिंग या आजच्या गुणी नटांचा आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि ट्रकवर बसलेले गायक आणि वादक. त्यातल्या त्यात, नाटकात वाजणारा सॅक्सोफोन.

इराक, हंगेरी, श्रीलंका, इजिप्त…

दृश्यमांडणीसाठी लक्षात राहिला तो इराकमधून आलेल्या अमाल या अरबी भाषेतील डॉ जावेद अल असादी यांनी लिहिलेल्या आणि बसवलेल्या नाटकाचा प्रयोग. ७६ वर्षाचे असादी इराकी रंगभूमीवरचे महत्त्वाचे कलाकार. ते महोत्सवाला येऊ शकले नाहीत. दोन पात्रांच्या या नाटकाने त्यांनी युद्धग्रस्त समाजात माणसांची कशी वाताहत याबद्दल जे रंगमंचीय आविष्करण केले ते पाहून प्रेक्षालयातील जवळजवळ हजार लोक अवाक झाले. युद्धाच्या दुःखात आणि प्रचंड मानसिक तणावात एक जोडपे घरात अडकलेले आहे. या परिस्थितीत, गरोदर पत्नीला आपल्या बाळाला जन्म द्यायची इच्छा नाही. यातून उभे राहणारे चांगलं-वाईट, नीती-अनीती, न्याय-अन्याय याविषयीचे गहन प्रश्न नाटकात मांडले जातात. रंगमंचाच्या उंचीचा पुरेपूर वापर करत निखळत चाललेल्या घराचे नेपथ्य, घरभर पसरलेले पाणी आणि त्यात पडणारी पुस्तके, परस्परांना छेद देणारे प्रकाश झोत आणि अंधाऱ्या छायेत राहणारे जोडपे अशी रचना असलेले नाटक दीर्घकाळ लक्षात राहील. इराकबरोबर, हंगेरी, श्रीलंका, इजिप्त आणि रशिया अशा पाच देशांतील नाटके सहभागी झाली होती. रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग स्टेट थिएटर या कंपनीचा ‘पुअर लिझा’ या नाटकाचा निकोलाय करमझीन या रशियन लेखकाच्या लघुकादंबरीवर बेतलेला प्रयोग म्हणजे दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आलेल्या प्रेमिकांची गोष्ट. विशेष आकर्षक नसलेल्या मांडणीचा हा प्रयोग कोमल, हळवी असणारी लिझा हे पात्र आपले म्हणणे कर्कशपणा न करता ठामपणे मांडते त्यामुळे लक्षात राहातो. श्रीलंकेच्या रूवांथी दी चिके हिने सात दृश्यांच्या ‘डिअर चिल्ड्रेन सिन्सिअरली: सेव्हन डीकेड्स ऑफ श्रीलंका’ या नाटकातून श्रीलंकेचा इतिहास मांडला. कालक्रमानुसार आणि एकरेषीय मांडणीत इतिहास सादर करताना कथन, नृत्य आणि संगीतातून श्रीलंकेतील समाज आणि राजकारण याचे बहुस्तरीय आकलन मांडले. विविध ऐतिहासिक दस्तऐवज आणि लिखित माध्यमातून आलेला इतिहास अभ्यासण्याबरोबर वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा अंतर्भाव त्या आपल्या नाटकात केला आहे. अस्मितांचे राजकारण, अतिरेकी संघटना, तामिळ-सिंहली वाद, अर्थव्यवस्था आणि क्रिकेट अशा विविध मुद्द्यांना समोर मांडत राष्ट्रनिर्मिती आणि समाज आणि व्यक्ती यामधील व्यामिश्र संबंध हे नाटक मांडते.

… आणि ‘तमाशा थिएटर’!

पंधरा नाटकांच्या या महोत्सवातील आठ नाटके स्त्रियांनी दिग्दर्शित केलेली होती. नीलम मानसिग चौधरी सोडता हे दिग्दर्शक नव्या पिढीतील. सपन सरन (मुंबई), शरण्या रामप्रकाश (बेंगळूरु), रीमा कलिंगल (थिरुवनंतपुरम), अर्पिता धगत (अहमदाबाद), सोफिया बर्कझी (हंगेरी), रूवांथी दी चिके (श्रीलंका) अशा या सर्व जणींनी मुख्य धारेतील रंगभूमीवर आणि करमणुकींच्या माध्यमांतून मांडले न जाणारे विषय मांडले, सहसा न दिसणारी, संशोधनावर आधारित रंगमंचीय अविष्करणे सादर केली. मुंबईतील ‘तमाशा थिएटर’ ची सह-संस्थापक आणि नाटककार-दिग्दर्शक असलेल्या सपन सरनने दिग्दर्शित केलेल्या ‘बी-लव्ह्ड’ या नाटकाने महोत्सव गाजवला तो मांडलेल्या एलजीबीटी समाजाचा विषय आणि त्यातील वेगळी मांडणी यामुळे. विचारांचे नाटक उभ्या करणाऱ्या सपनने परिघावरच्या या समुदायाबद्दल गळे काढण्यापेक्षा चिकित्सक नजरेतून, करमणूक करत माणसाचा आणि लिंगभेदांवर आधारित नात्यांबद्दलचा सशक्त नाट्यात्म रूपात विचार मांडला. वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून प्रेक्षकांना अस्वस्थ करत, विनोद आणि उपहासातून टोकदार प्रतिरोध मांडत प्रेक्षकांना विचार करण्यास या नाटकाने मजबूर केले. तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यावर ‘बी-लव्ह्ड’ लोकांच्या मागणीस्तव चौथा प्रयोग आयोजित करावा लागला. दोन दिवसात चार प्रयोग होऊनही अनेक जणांना परत जावे लागले.

‘अक्षयाम्बरा’ आणि ‘नवा’ सारखी वेगळ्या धाटणीची नाटके रंगमंचावर आणणाऱ्या बेंगलुरूच्या शरण्या रामप्रकाशने, प्रोजेक्ट डार्लिंग या आपल्या नाटकातून शरण्या ‘खानावळी चेन्नी’ या कन्नड रंगभूमीवर दुहेरी अर्थाच्या संवादासाठी आणि ‘अश्लील’ नाटकांसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा घेतलेला शोध मांडला आहे. स्वतःच्या लैंगिकतेचा खुलेआम इजहार करण्याचे धाडस करणाऱ्या खानावळी चेन्नीला शोधायला निघालेल्या या नाटकातील कलाकारांच्या हाती काय लागते? तर, चेन्नीचे नाव इतिहासातून गायब होणे. ‘सुसंकृत’ समाजात चेन्नी जे बोलू नये ते बोलली आणि ‘नको ते’ काम करत राहिली हा चेन्नीच्या बंडखोरीचा इतिहास. तिच्या अभिनयातला इरसाल विनोद, तिच्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या लादली गेलेली सेन्सॉरशिप हे नाटक मांडते. पण नाटक फक्त चेन्नीचे राहत नाही तर चेन्नीसारख्या तमाम स्त्रियांचे होते ज्यांची ओळख इथल्या ‘सुसंस्कृत’ समाजाने पुसून टाकली आहे. पुरुषप्रधान भारतीय समाजात “अश्लील काय आहे हे ठरवते कोण?” असा प्रश्न विचारणारे ‘प्रोजेक्ट डार्लिंग’ हे नाटक त्यातील कलाकारांसाठी आपला प्रतिरोध व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या हक्काची जागा परत मिळविण्याचा अवकाश होता.

स्त्री दिग्दर्शकांची – कलाकारांची नाटके फक्त लिंगाधारित व्यवस्थेबद्दल किंवा शोषणाबद्दल नव्हती. विविध दृष्टिकोन, बदलता समाज, गुंतागुंतीचे राजकारण यातून बहुस्तरीय सत्ताकारणाचे नाट्यात्म दर्शन घडवताना हे कलाकार नाविन्यपूर्ण मांडणी करत होते. नाटककार आणि दिग्दर्शकांप्रमाणे नाट्यावकाशाचे सशक्त भान असणाऱ्या कृती पंत, मातंगी प्रसन, सुरभी वसिष्ट, रीमा कलिंगल, आयुषा ठाकूर, कल्याणी मुळे, प्रेरणा, इप्सिता चक्रवर्ती सिंग या नट-कलाकारांनी प्रतिरोधाची वेगवेगळी रूपे आपल्या अभिनयातून सादर केली. याशिवाय, एकूण महोत्सवात बॅकस्टेज करणाऱ्या, पडद्यामागची सूत्रे हलवणाऱ्या, संघटन ते सूत्रसंचालन करणाऱ्या, माध्यमांशी बोलणाऱ्या, दररोजची वृत्तपत्रिका तयार करून त्याचे वितरण करणाऱ्या, महोत्सवाचं लॉजिस्टिक्स बघणाऱ्या स्त्रियाच होत्या.

रंगभूमीवरून आपला प्रवास सुरू केलेल्या नास्सर या दक्षिणेकडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले. दिग्दर्शक म्हणून नास्सर यांनी केलेला ‘अवथारम’ हा पहिला चित्रपट थेरूकूठू या दाक्षिणात्य पथनाट्य परंपरेतील नटाच्या आयुष्यावरचा होता. पण, या महोत्सवात नाटक आणि समाजात प्रतिरोधाची महत्त्वाची अभिव्यक्ती असणारे पथनाट्य सादर झाले नाही किंवा त्याबद्दलची चर्चाही घडून आली नाही. इप्टाची नाटके, सफदर हाश्मी, उत्पल दत्त, बादल सरकार यांची नाटके, दलित चळवळीतील नाटके, संभाजी भगत, आणि अलीकडे सुनील शानबाग यांनी केलेली रामू रामनाथन यांचीही नाटके नव्हती. प्रतिरोधाचे स्वरूप बदलले, चळवळी क्षीण होत गेल्या, नवी आंदोलने उभी राहिली आणि ढेपाळली, सामाजिक चळवळीतील नाटकांचे एन जी ओ करण होत गेले याबद्दलच्या चर्चा घडायला हव्या होत्या. प्रतिरोधाची संस्कृती एखाद्या-दुसऱ्या नाट्यप्रयोगापुरती नसते तर नाटक आणि विचारांचे झिरपणे यातून ती अवतरते. या अनुषंगाने, अतुल पेठेंच्या गावोगावी पसरत गेलेल्या रिंगण-नाट्य आणि अशा प्रकारच्या भारतातील इतर प्रयोगांविषयीच्या चर्चेने महोत्सव उजळून गेला असता.

पण राजकीय नाटक किंवा सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती अशा विषयांवरील परिसंवाद किंवा चर्चेला महोत्सवात जागा मिळाली नाही. कारण, महोत्सवाची गुंफण करताना जो सखोल विचार करायला हवा होता किंवा संशोधन करायला हवे होते ते नव्हते. या महोत्सवाला, दरवर्षी असतो तसा, गुंफणकार- क्युरेटर नव्हता. तरीही अशा संकल्पनात्मक आणि तांत्रिक उणीवांवर मात करणारी बाब म्हणजे इथला जबाबदार प्रेक्षक. आनंदाने, गांभीर्याने आणि रसिक वृत्तीने नाटकांचा आस्वाद घेणारा प्रेक्षक या महोत्सवात भेटला. प्रचंड उष्णता, उकाडा, बंद पडलेले एसी किंवा मोबाइल यांपैकी काहीही इथल्या प्रेक्षकांना नाटकापासून विचलित करू शकले नाही. कारण, केरळ रसिक प्रेक्षकांची भूमी आहे. दिवसेंदिवस नाट्य-महोत्सव कमी होत आहेत. कडवट-संकुचित विचारांच्या प्रभावाने अभिव्यक्तींवर मर्यादा येतायत. अशा परिस्थितीत, केरळातला प्रतिरोधाविषयीचा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव दिलासा देणारा होता. – आशुतोष पोतदार potdar.ashutosh@gmail.com