बांगलादेशच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांचा पाय भारतातून इतक्यात काही निघत नाही, कारण जाईन तर लंडनलाच असे त्यांनी ठरवले आहे आणि ब्रिटन काही त्यांना दाद देत नाही. पण मुद्दा तो नाही. बांगलादेश हा ‘तिसऱ्या जगातला देश’ म्हणून तिथे दंगली, जाळपोळ, लुटालूट हे सारे होऊ शकते; तर खुद्द ब्रिटनमध्ये, विशेषत: इंग्लंडमधल्या अनेक शहरांत तरी सध्या काय चालले आहे? बांगलादेशातला हिंसाचार सत्ताधाऱ्यांविरुद्ध आणि त्यांना साथ देणाऱ्यांविरुद्ध होता. हसीना यांनी १५ वर्षे लोकशाहीच्या नावाखाली जी एकाधिकारशाही चालवली, तिला लोक विटले होते. पण ब्रिटनमध्ये असा सरकारविरोधी असंतोष असण्याचे काही कारण आहे का? तसे असणे अशक्यच, कारण किएर स्टार्मर हे आत्ता कुठे खुर्चीत स्थिरावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या खंडाने ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची सत्ता गेल्याच महिन्यात तर आली. सत्ताधाऱ्यांविरोधातला राग रस्त्यावर काढण्याचे कोणतेही कारण ब्रिटिशांना नाही. तरीही सन्दरलँड, लिव्हरपूल, रॉदरहॅम, हल, हार्टलपूल अशा लहानमोठ्या शहरांत दंगलखोरीचे प्रकार घडले. आणखी वाचा-मोदीजी, विनेश उपांत्य फेरी जिंकली, पण श्रेय लाटण्याची वेळ आता निघून गेली या ठिकठिकाणच्या दंगलखोरांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. आधी सभा घ्यायची. मग मोर्चासदृश मिरवणूक काढायची आणि ‘इच्छित स्थळ’ आले रे आले की हिंसाचार सुरू करायचा. अशा प्रकारच्या सभा आणि मोर्चे गेले सात दिवस - म्हणजे ३० जुलैपासून कुठे ना कुठे सुरूच आहेत. ‘सात ऑगस्ट रोजी ३० ठिकाणी असे मोर्चे निघणार असल्यामुळे सहा हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांना जादा बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले’ वगैरे बातम्या आजदेखील येत आहेत. दंगलग्रस्त ठिकाणांपैकी रॉदरहॅम वगळता सर्व शहरे कुठल्या ना कुठल्या किनाऱ्यावरची आहेत. हल इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या नदीकाठी, हार्टलपूल आणि सन्डरलँड ईशान्येकडील किनाऱ्यावर, तर लिव्हरपूलही हलसारखे नदीकाठीच पण पश्चिम किनाऱ्यावर आहे. रॉदरहॅम हे हलपासून फारतर ७५ कि.मी.वर- या दोन्ही गावांत, स्थलांतरितांच्या आश्रयासाठीची हॉटेले पेटवून देण्यात आली. तिथे राहणाऱ्या स्थलांतरितांना मारहाण करण्यात आली. स्थलांतरितांच्या सोयीसाठी उभारलेले नागरी सल्ला केंद्र सन्दरलँडमध्ये जाळून टाकण्यात आले, तर लिव्हरपूलमध्ये एक वाचनालय उद्ध्वस्त करण्यात आले. हार्टलपूलसह अन्य काही शहरांमध्ये मशिदी हेच दंगलखोरांचे लक्ष्य होते… थोडक्यात, मुस्लीम स्थलांतरित आपल्या देशात नकोत, म्हणून दंगलखोरांनी उच्छाद मांडला आहे. दंगलखोरांनी हिंसक घोषणाबाजीसोबत मुस्लिम आणि पोलिसांना शिवीगाळ करणे आता नित्याचेच झालेले आहे. पण इतका भडका आताच का उडाला? त्यामागे राजकारण आहे का? लिव्हरपूलपासून सुमारे २५ किलोमीटरवरच्या साउथपोर्ट या गावात ३० जुलै रोजी घडलेला भीषण हिंसाचार, हे म्हणे या दंगलींचे मूळ! साउथपोर्टमध्ये एका बालवाडीवर हल्ला करणाऱ्या १७ वर्षांचा तरुणाने, तीन-चार वर्षांच्या तिघा बालकांचे प्राण घेतले आणि इतरांना जखमी केले. त्यानंतर अफवा पसरल्या की, हा हल्लेखोर मुस्लीम होता- तो अलीकडेच बेकायदा होडीतून आपल्या मुस्लीम आईवडिलांसह आला होता. प्रत्यक्षात हा हल्लेखोर गौरवर्णीय नव्हता हे खरे; पण त्याचा जन्म इंग्लंडमधलाच. त्याचे आईवडील हे आफ्रिकेतल्या रवांडा देशात २० वर्षांपूर्वी जेव्हा हिंसाचार उफाळला होता, तेव्हापासूनच इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आहेत. तरीदेखील तो मुस्लीम असल्याची अफवा पसरवून गावोगावच्या गटांना भडकवण्यात आले, यामागे कुणाचा हात असेल? आणखी वाचा-बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी नीडर बलोच स्त्रिया करताहेत पाकिस्तानशी दोन हात… याविषयी काहीही अधिकृतपणे सांगण्यात आले नसले तरी, या इंग्लिश दंगलमालिकेच्या सुरुवातीला सगळा हिंसाचार मजूर पक्षाला मिळालेल्या मतदारसंघांमध्येच झालेला आहे. निवडणुकीच्या निकालांना अवघा एक महिना होत असताना हे प्रकार घडले. पण एखाद्या भागात बहुसंख्याकांचा आणि त्यांच्याच पक्षाचा जोर वाढला की अल्पसंख्याकांना धडा शिकवण्याचे प्रकार होतात, तसला हा प्रकार नाही. उलट मजूर पक्ष हा स्थलांतरित आणि अल्पसंख्याकांच्या बाजूने उभा राहातो, मानवतावादी भूमिका घेताे, म्हणून तर अनेकांचा राग आहे. पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी हिंसाचाराची गंभीर दखल घेतली. धरपकड सुरू झाली एकंदर सुमारे ४०० दंगलखोरांना आतापर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. मात्र त्यानंतर दंगलींचा रोख बदलून आता, जिथे मजूर पक्ष जिंकलेला नाही, तिथेही हिंसाचार सुरू झालेला आहे. ‘हे अतिउजव्यांचे कारस्थान’ असा आरोप ब्रिटिश पंतप्रधानांनी केला. त्यांचा रोख ब्रिटनला ‘ब्रेग्झिट’च्या खाईत ढकलणारे कडवे उजवे राजकारणी नायजेल फराज यांच्यावर होता. फराज यांचा ‘रिफॉर्म यूके’ हा पक्ष २०२४ च्या निवडणुकीत बऱ्याच जागा मिळवणार असल्याच्या वावड्या दोन महिन्यांपूर्वी उठल्या होत्या, त्या हवेत विरून गेल्यानंतर या दंगली घडत आहेत. ‘ब्रिटनला दंगली नव्या नाहीत. २०११ मध्ये याहून भीषण दंगल घडली. पण गेल्या काही वर्षांत बरे चालले होते. आता मात्र भावना इतक्या भडकलेल्या दिसतात की, बाहेर पडायलाही भीती वाटते’ अशा अनेक प्रतिक्रिया ब्रिटिश वृत्तपत्रांनी तसेच ‘बीबीसी’ने गेल्या काही दिवसांत नोंदवल्या आहेत. पण त्याचा काही उपयोग नाही. २०११ च्या दंगलीच्या वेळी किएर स्टार्मर हे दंगलग्रस्तांच्या बाजूने ठामपणे उभे राहाणारे वकील होते. पोलिसांनीही दणका देऊन ती दंगल आटोक्यात ठेवली होती. पण ‘ब्रिटिश पोलिसांवर आमचा विश्वास आहे असे म्हणणारे आता ५० टक्क्यांहून कमी आहेत, ते २०११ मध्ये ६३ टक्क्यांहून अधिक होते’ हा अगदी अलीकडे ‘द इकॉनॉमिस्ट’ या वृत्तसाप्ताहिकाने दिलेला तपशील पाहिल्यास चिंता वाढते. शेख हसीना यांच्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी निर्णय घ्यावा, अशा खटपटीत सध्या ब्रिटन आहे- म्हणजे हसीनांना सरळ आश्रय देण्याची ब्रिटनच्या सरकारची इच्छा नाही. पण हसीनांच्या देशात जे हसीनांमुळे घडले तेच प्रकार ब्रिटनमध्ये सध्या अगदी वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेत!