“रामायणात मंथरेनेच कैकयीच्या मनात सत्तेची अभिलाषा निर्माण केली. विनेश फोगाट माझ्या आयुष्यातली मंथरा आहे. सुरुवातीला हजारो कुस्तीपटू माझ्याविरोधात उभे होते. आज केवळ सहा जण शिल्लक आहेत…” बृजभूषण सिंग यांचं हे वक्तव्य. ते केलं, तेव्हा सिंग सत्ताधारी भाजपचे खासदार होते. देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडू त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत होत्या. पण या बाहुबली म्हणून ओळख असलेल्या खासदाराविरोधात साधा एफआयआर नोंदवण्यासठीही खेळाडूंना झगडावं लागलं. पंतप्रधानांनी आपलं म्हणणं ऐकावं, एवढी साधी अपेक्षा होती या मुलींची. न्यायासाठी त्या जिथे ठाण मांडून बसल्या ते जंतरमंतर मोदींच्या स्वप्नातल्या नव्या संसद भवनापासून अवघ्या काही किलोमीटरवर होतं. या मुली सुमारे चाळीस दिवस तिथेच थंडी-वाऱ्यात बसून होत्या. पण बेटी बचाओची घोषणा देणाऱ्या पंतप्रधानांच्या कानांपर्यंत त्यांचा आक्रोश शेवटपर्यंत पोहोचलाच नाही. जसा मणिपूरमधील महिलांचा पोहोचला नव्हता, तसाच. काल तिच विनेश जगातल्या अत्यंत मानाच्या स्पर्धेत सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर उभी होती आणि तिच्याबरोबर जंतरमंतरवर कित्येक रात्री काढलेली साक्षी मलिक हिंदीत त्या समान्याचं समालोचन करत होती. हा केवळ क्रीडाप्रेमींसाठीच नव्हे, तर मानवाच्या दुर्दम्य ध्येय्यासक्तीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाच्याच स्मृतिपटलावर कायम कोरलेला राहील असा हा क्षण आहे. खेलरत्न, मेजर ध्यानचंद पुरस्कार, अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या या खेळाडूच्या नावापुढे मंथरा, कैकयी, फुसकं काडतूस, कारकीर्द संपलेली खेळाडू अशा कितीतरी उपाध्या लावल्या जात होत्या. देशातल्या करदात्यांच्या पैशांतून यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, निषेधच नोंदवायचाच असेल, तर ते पैसे परत द्या. क्रीडा कोट्यातून मिळवलेल्या नोकऱ्या परत द्या, असली आव्हानं, सत्ताधारी आणि त्यांचे भाट खेळाडूंना देत होते. त्यांच्या आत्मसन्मानावर रोज नव्याने प्रहार केले जात होते, का? तर ज्याच्या नावावर आधीच अनेक गुन्ह्यांची नोंद आहे अशा भाजपच्या एका खासदाराविरोधात आवाज उठवला म्हणून. हे ही वाचा. सामाजिक भेद मिटवणे हे मूळ उद्दिष्ट, मग आरक्षण ही ‘गरिबी हटाव’ योजना कशी असू शकते? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी या मुली तिथे मोदींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. पण त्यांना अक्षरशः फरपटत बाहेर काढण्यात आलं. ती दृश्य काल संपूर्ण दिवसभर समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत होत राहिली. मोदींनी त्यांना तत्कालीन क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. ठाकूर भेटलेदेखील, पण तोडगा निघाला नाही. आपली पदकं गंगेला अर्पण करण्यासाठी हे खेळाडू हरिद्वारला गेले होते. पण शेतकरी आंदोलनाचे नेते नरेश टिकैत आले आणि सरकारशी चर्चा करू असं सांगत त्यांना पदकं विसर्जित करण्यापासून रोखलं. भारतातले जगप्रसिद्ध खेळाडू लैंगिक शोषणाविरोधात न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर बसून अश्रू ढाळत आहेत, पोलीस त्यांना फरपटत नेत आहेत, ही दृश्यं जगाने पाहिली. देशाची ओळख असलेल्या खेळाडूंना अशी वागणूक देऊन आपणं विश्वगुरू, महासत्ता कसे बनणार आहोत, हे मोदीच सांगू शकतात. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. कुस्तीपटूंना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं. बृजभूषण सिंग यांनी खासदारकी गमावली आणि भारतीय कुस्ती संघटनेचं अध्यक्षपदही! त्यांच्या कैसरगंज मतदारसंघाच्या गादीवर आता त्यांचा मुलगा करणभूषण सिंग विराजमान झाला आहे. कुस्ती फेडरेशनच्या गादीवरही बृजभूषण यांचेच समर्थक संजय सिंग जाऊन बसले आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आले आहेत, पण चारसो पारची स्वप्न धुळीला मिळून आघाडी सरकार स्थापन करावं लागलं आहे. कुस्तीपटूंचा कायदेशीर लढा अद्याप सुरूच आहे. मनु भाकरने जेव्हा कांस्य पदक जिंकलं तेव्हा तिला पंतप्रधानांचा कॉल आला होता. तो व्हायरल करण्याची जबाबदारीही अनेकांनी इनामेइतबारे पार पाडली. त्यापाठोपाठ क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी तिच्या प्रशिक्षणावर सरकारने किती खर्च केला, तिला परदेशात कुठे कुठे पाठवलं इत्यादीची आठवण करून दिली. प्रथमच संसदेत पदार्पण केलेल्या भाजपच्या खासदार कंगना रानौत यांनी काल एक्स वर म्हटलं की “विनेशने मोदी तेरी कब्र खुदेगी अशा घोषणा दिल्या होत्या. तरीही तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली. उत्तम प्रशिक्षण दिलं गेलं. हेच लोकशाहीचं सौंदर्य आणि एका महान नेत्याचं लक्षण आहे.” विनेशला किती ‘संधी’ दिली, देशात कितपत लोकशाही शिल्लक ठेवण्यात आली आहे आणि विनेशचा लढा हे कशाचं ‘लक्षण’ आहे, हे भारतीय नीटच जाणून आहेत. असो, यशाचे अनेक दावेदार असतात. हे ही वाचा. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी नीडर बलोच स्त्रिया करताहेत पाकिस्तानशी दोन हात… पण या साऱ्यात उल्लेखनीय ठरला, तो विनेशचा दुर्दम्य ध्येय्यवाद. आशियाई आणि कॉमनवेल्थ स्पर्धांत सुवर्ण पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू असलेल्या विनेशला सातत्याने लढा देत राहावा लागला तो दुखापतींशी. २०१६च्या ऑलिम्पिक्समध्ये सामन्यादरम्यान तिच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. कोणत्याही खेळाडूसाठी दुखापत म्हणजे मोठा हादरा असतो. विनेशला लिगामेंट टीअरची शस्त्रक्रिया करावी लागली. २०२१मध्ये हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली. पुढे डाव्या गुडघ्यावरही लिगामेंट टीअरमुळेच शस्त्रक्रिया करावी लागली. विनेश आता २९ वर्षांची आहे. त्यामुळेच “यांची कारकिर्द संपत आली आहे, म्हणून हे सारे राजकारणात उतरू पाहत आहेत,” अशी टीकाही या खेळाडूंवर झाली होती. थोडक्यात तिशी हा कुस्तीपटूसाठी काही फार उमेदीचा काळ मानला जात नाही, पण अथक मेहनत आणि कोणत्याही संकटापुढे नतमस्तक न होता लढा देत राहण्याची वृत्ती विनेशला इथवर घेऊन आली आहे. भारतीय खेळाडूंना मैदानात आणि मैदानाबाहेरही अनेक स्तरांवर लढा द्यावा लागतो. क्रिकेटसारखा ग्लॅमर आणि पैसा असलेला खेळ वगळता अन्य बहुतेक खेळाडूंना आर्थिक विवंचना, फेडरेशनमधली आणि संघातलीही राजकारण, शारीरिक दुखापती, मानसिक खच्चिकरण करणारे क्षण वाढतं वय, खेळाची बदलती तंत्र, तंदुरुस्ती, जागतिक स्तरावर उत्तम दर्जाचं प्रशिक्षण घेऊन येणारे नवनवे खेळाडू अशी अनेक आव्हानं समोर असतात. फेडरेशनच्या विरोधात उघडपणे उभं ठाकणं हे कारकीर्द संपवणारं ठरू शकतं. हे ठाऊक असूनही विनेश, साक्षी बजरंग पुनिया सत्तेविरोधात उभे ठाकले. सहन करणं योग्य नाही. आज आवाज उठवला नाही, तर पुढच्या पिढ्यांनाही असंच मुकाट सारं काही सहन करावं लागेल, हा विचार त्यामागे होता. साचलेली चीड होती. आंदोलनाने ही खदखद वर आणली. अशाच स्वरूपाची मुस्कटदाबी सहन करणाऱ्या अन्य खेळाडूंसाठीच नव्हे, तर प्रत्येक महिलेसाठी व्यक्तीसाठी कुस्तीपटूंचं आंदोलन एक प्रेरणा आहे आणि शोषण करणाऱ्यांसाठी धडाही. विनेश एक कसलेली कुस्तीपटू आहेच. अन्यथा अजिंक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ वर्षांत ८२ सामन्यांपैकी एकही समाना न हरलेल्या, ४ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये प्रतिस्पर्ध्यांना एक बाउट काय एक पॉइंट सुद्धा न दिलेल्या जपानी कुस्तीपटूला हरवणं कसं शक्य होतं? तिने ते करून दाखवलं. कालचा दिवस विनेशचा होता. शेवटी खेळात हरणं जिंकणं सुरूच राहतं. महत्त्वाचं असतं आल्या क्षणात आपल्यातलं सर्वोत्तम सादर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहणं. लढत राहणं. विनेशने ते केलं. मोदींनी विनेशला कॉल केला किंवा नाही केला तरी, कोणीही तिच्या यशावर दावे केले तरीही, ती आजही आणि यापुढेही मॅटवर असताना या साऱ्या क्षुद्रतेच्या पलीकडे असेल. दशांगुळं वरच असेल, हे निश्चित. vijaya.jangle@expressindia.com