उर्विश कोठारी
एआयला पढवणे आणि तरीही ‘एआय मॉडेल’ने बरळणे किंवा सपाटीकरण करणे, उत्तरांची विश्वसनीयता, स्वामित्व हे प्रश्न दिल्लीतल्या ‘सरदार पटेल एआय अवतारा’ला कसकसे भेडसावतील, याचा हा वेध…
दिल्लीत ‘नेहरू मेमोरियल’ म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या तीन मूर्ती भवनाचे रूपांतर तीन वर्षांपूर्वी ‘पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालया’त करण्यात आले आणि गेल्या सुमारे महिन्याभरापासून तेथे ‘नवे आकर्षण’ म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई ‘एआय’रूपाने अवतरले आहेत… ते प्रेक्षकांशी बोलतात, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतात ! सरदार पटेलांची ही पूर्ण उंचीची उभी प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साह्याने एका कपाटवजा ‘होलोबॉक्स’मध्ये आहे. ती त्रिमित प्रतिमेसारखीच दिसते आणि मुख्य म्हणजे, प्रेक्षकांचा प्रश्न ऐकून त्या प्रश्नाचे उत्तर या प्रतिमेकडून मिळते. ही किमया अर्थातच ‘एआय’ची. सरदार पटेलांसारखाच आवाज ‘एआय’ मुळे ऐकू येतो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ‘सरदार पटेलांकडून प्रेक्षकांना मिळणारे’ उत्तर काय असेल, याचा तपशीलही अर्थातच ‘एआय’कडून ठरवला जातो. पर्यटनासाठी, सहलीसाठी इथे आलेल्यांना क्षणभर विस्मय वाटेल अशीच ही तांत्रिक किमया आहे खरी; पण त्यामुळे इतिहासाचा अभ्यास गांभीर्याने करणाऱ्या प्रत्येकाला चिंता वाटायला हवी… ती का, हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.
संग्रहालयांमध्ये अशा प्रकारचे ‘एआय अवतार’ अन्यत्रही दिसू लागले आहेत, ‘होलोबॉक्स’मधले- तुमच्याशी जणू समोरासमोर बोलणारे- ‘एआय अवतार’ काही बड्या निवासी हॉटेलांच्या लॉबीतही आहेत. पण त्यांना विचारले जाणारे प्रश्न हे बहुतेकदा त्या स्थळाची आणि अवतीभोवतीची माहिती मिळवणारे असतात. त्यात वादग्रस्त असे काहीच बहुतेकदा नसते. पण ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ अशा हिंदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालया’तला एआय अवतार हा सरदार पटेल यांचा आहे… त्यामुळे त्या अवताराला प्रेक्षक अर्थातच, सरदारांच्या वादळी आयुष्याबद्दल आणि कारकीर्दीबद्दलचे प्रश्न विचारणार हे गृहीतच धरावे लागते. अशा काही प्रश्नांची जी उत्तरे या एआय अवताराने दिली, त्यावर आधारित बातमीदेखील २३ सप्टेंबरच्या ‘दि इंडियन एक्स्प्रेस’मध्ये छापून आली होती, ती प्रश्नोत्तरे तर इतिहास-अभ्यासकांच्या चिंतेत भरच घालणारी ठरतात.
एक लक्षात ठेवले पाहिजे की, इथे ‘सरदार पटेल’ यांच्या प्रतिमेआडून ‘एआय’चा खेळ सुरू आहे. या ‘एआय’ला कोणी माहिती पुरवली, ती किती प्रमाणात पुरवली गेली, याबद्दल काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे सरदार पटेलांची ही प्रतिमा कोणासाठी उत्तरे देते आहे, याबद्दलही शंका उरणारच. कोणाही दिवंगत नेत्यांची कारकीर्द, त्यांचे अनेक निर्णय हे समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास आवश्यकच असतो, तो विशेषत: सरदार पटेल यांच्याबाबत तर अधिकच आवश्यक आहे. असे असताना याच प्रतिमेची निवड ‘एआय अवतार’ म्हणून केल्याने संभ्रम वाढतो.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा निर्णय सरदार पटेल यांनी घेतला, याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर २३ सप्टेंबर रोजीच्या बातमीत नमूद आहे (आणि आजतागायत कोणत्याही यंत्रणेने त्याचा इन्कार केलेला नाही) ते शब्दश: असे – “गांधीजींच्या हत्येनंतर सत्याचा शोध घेण्याच्या स्पष्ट हेतूने मी आरएसएसवर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. सखोल चौकशीनंतर, मी असा निष्कर्ष काढला की महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात संघाचा कोणताही सहभाग नव्हता… बंदी घालल्यानंतर, मी ‘गुरुजी’ एम.एस. गोळवलकर यांच्यासह आरएसएस नेतृत्वाशी चर्चा केली आणि संघटना संविधानाच्या चौकटीत काम करेल याची हमी मागितली” – या उत्तरातून संघाची सरळसरळ तरफदारीच होते, असे चरित्रकार म्हणून प्रस्तुत लेखकाचे मत आहे. या प्रकारचे, या शब्दांतले उत्तर खुद्द पटेल यांनी कधीही दिलेले आढळत नाही, शिवाय संघाच्या तत्कालीन प्रमुखांचा ‘गुरुजी’ असा उल्लेख सरदार पटेल यांनी एकदाही केल्याचा पुरावा नाही. तरीदेखील इथे एआय अवतारातून तसा उल्लेख केला जातो, हे कोणाच्या प्रतिमेस बाधक आणि कोणाच्या प्रतिमेला साधक म्हणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. तो प्रस्तुत लेखाचा प्रश्न नव्हे.
या लेखाचा उद्देश आहे तो अभ्यासक म्हणून, ऐतिहासिक व्यक्तींचा वापर ‘एआय आधारित संभाषणा’साठी करण्यात कोणते धोके असू शकतात, हे सांगणे. मग सरकार कोणाचेही- कोणत्याही पक्षाचे असो. खाली नमूद केलेले धोके उरणारच आहेत.
यापैकी पहिला धोका म्हणजे ‘पढवण्या’चा प्रश्न. ‘एआय’ला पढवावेच लागते- त्या संगणकीय उपयोजनाला प्राथमिक पातळीवर तरी माणसानेच प्रशिक्षित करावे लागते. हे प्रशिक्षण कोण देते आणि कसे, यातून ‘एआय’ची उत्तरे ठरणार, हे उघड असते. त्यामुळे सरदार पटेल यांनी गोळवलकरांचा उल्लेख कधीही ‘गुरुजी’ असा केला नव्हता, यासारखे तपशील माहीत नसल्यास इतिहासाच्या आकलनावरही परिणाम होतो. तो अनिष्ट परिणामच पुढे लोकांपर्यंत जात राहातो.
हे फक्त एखाद्या तपशिलापुरते मर्यादित असू शकत नाही, एकंदरच सरदार पटेल यांच्याविषयीच्या कोणत्या आकलनातून संबंधित ‘एआय मॉडेल’चे प्रशिक्षण झालेले आहे, हा व्यापक मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. याच्या परिणामी, अभ्यासकांना माहीत असलेल्या सरदार पटेलांच्या ऐवजी निराळेच (संबंधितांच्या आकलनातले) सरदार पटेल लोकांपर्यंत जातात.
‘एआय’ने स्वत:हूनच चुकीचे संदर्भ जोडणे आणि ‘बरळणे’ हा दुसरा धोका. यातील ‘बरळण्या’चा इंग्रजी प्रतिशब्द ‘हॅल्युसिनेशन’ अर्थात दिवास्वप्नखोरी असा आहे. ‘एआय’ची वाढ आणि प्रगती अद्याप होतेच आहे आणि त्यातूनच, योग्य माहितीमध्ये अयोग्य संदर्भ जोडून भलतीच आणखी माहिती देण्याचे प्रकार ‘एआय’कडून वारंवार होत असल्याच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. इथे सरदार पटेल यांच्या एआय अवताराने तशी काही आगळीक केली असेलच असे नाही, पण हा धोका तंत्रज्ञानाचा आहे आणि तो उद्भवू शकतो. त्यातून ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड हाेऊ शकते.
तिसरा धोका ‘सपाटीकरणा’चा. सरदार पटेलांच्या ‘एआय अवतारा’विषयी याबद्दल प्रसिद्ध झालेले उदाहरण म्हणून ‘गांधीजींशी तुमचे नाते कसे होते?’ या प्रश्नाच्या उत्तराचा उल्लेख करता येईल. ते उत्तर चुकीचे होते असे नाही. पण ‘गांधीजींमुळेच सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य-चळवळीत प्रवेश केला’ हा अगदी कळीचा तपशील ‘एआय अवतारा’कडून सांगितलाच जात नाही. एकंदरीत व्यामिश्र तपशिलांतून नेमके सत्त्व शोधणे आणि त्याद्वारे लोकांची समज वाढवणे, हे ‘एआय’ला जमणारे नसून माहिती देण्याइतकाच त्याचा आवाका आहे. ही माहिती एकारलेली असण्याचा धोका निराळाचा.
यातून चौथा धोका उघड होतो तो माहितीच्या विश्वसनीयतेविषयीचा. ‘एआय अवतार’ हा भले हुबेहूब असेल- उदाहरणार्थ उद्या महात्मा गांधी यांचा ‘एआय अवतार’ कुणी कार्यरत केला तर त्या अवताराचा गांधीजींसारखा पोशाख, त्यांच्यासारखाच आवाज आणि बसण्याची किंवा बोलताना त्यांच्यासारखेच हातवारे करण्याची लकब हे सारे अगदी सहीसही असू शकेल. पण अमुक प्रश्नाला काय उत्तर द्यावे, ते कोणत्या सुरात आणि किती गांभीर्याने द्यावे, हे हा ‘एआय अवतार’ ठरवू शकणार आहे का? असे समजा की, गांधीजींचा हा ‘एआय अवतार’ फक्त ‘आत्मकथा’ वाचून दाखवतो किंवा सांगतो आहे… त्यातील पश्चात्तापाच्या किंवा संयम शिकण्याच्या प्रसंगांचे नेमके गांभाीर्य ‘एआय अवतार’ ओळखू शकेलच असे नाही.
याहून मोठा धोका म्हणजे , अशा अवतारांना ‘अमुक झाले तर काय होईल?’ असे भविष्यविवेकी प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवणे जवळपास अशक्यच ठरेल… तरीही ‘एआय अवतारां’नी अशी उत्तरे दिली तर ती विश्वसनीय कशी काय म्हणता येतील?
स्वामित्वाचा प्रश्न हा एकंदर अशा व्यक्तिमत्त्वांच्या ‘एआय अवतारां’विषयीचा सर्बांत महत्त्वाचा प्रश्न ठरतो. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विशेषत: ‘राष्ट्रपुरुष’ ठरणाऱ्या, सार्वजनिक व्यक्तिमत्वांचे असे आभासी प्रतिनिधित्व करण्याचा हक्क कुणाकडे असावा? तो केवळ एखाद्या सरकारी खात्याकडे असावा काय, हा या प्रश्नाचा एक भाग झाला. दुसरा भाग हा ‘एआय अवतार’ जी माहिती देईल किंवा ज्या माहितीआधारे त्यास पढवले जाईल, त्या माहितीच्या स्वामित्वहक्कांचा. ही माहिती जशी त्या व्यक्तीच्या कागदपत्रांतील असू शकते, तशीच ती कुणा अभ्यासकाने संशोधन करून मिळवलेलीसुद्धा असू शकते. निव्वळ ती माहिती कुठेतरी उपलब्ध आहे म्हणून ‘एआय’ने ती गिळंकृत करून स्वत:चीच असल्यासारखी वापरावी काय, हा प्रश्न आहे. त्यावर अद्याप आपल्या कायद्यांकडेही उत्तर नाही.
सरदार पटेल यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाबद्दल लोकांमधील समज वाढायला हवीच, पण ती कोणत्या प्रकारे वाढावी आणि ‘एआय अवतार’ हा मार्ग त्यासाठी आज पुरेसा सशक्त ठरतो का, याची चर्चा पुढे जाण्यासाठी वरील मुद्दे उपयुक्त ठरले तर आनंदच आहे.
उर्विश कोठारी हे इतिहासाचे अभ्यासक असून ‘अ प्लेन ब्लंट मॅन- द इसेन्शिअल सरदार वल्लभभाई पटेल’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.