– उज्ज्वला देशपांडे
“एखाद्या तरुणाला भ्रष्ट करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे त्याला वेगवेगळे विचार करणाऱ्यांपेक्षा एकसारखे विचार करणाऱ्यांचा अधिक आदर करायला शिकवणे.” — फ्रेडरिक नित्शे
‘सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबईने ‘स्टॅन स्वामी स्मृतिव्याख्यान’ रद्द केले, अभाविपच्या आंदोलनानंतर निर्णय’ ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी वाचनात आली. ज्यांनी वाचली नसेल त्यांच्याकरिता थोडक्यात:
मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये शनिवारी (९ ऑगस्ट) वार्षिक ‘स्टॅन स्वामी स्मृतिव्याख्यान’ आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या आंदोलनानंतर ती रद्द करण्यात आली. कॉलेजच्या इंटर-रिलिजियस स्टडीज विभागाने (डीआयआरएस) आयोजित केलेले हे व्याख्यान रोम येथील पोंटिफिकल ग्रेगोरियन विद्यापीठातील थिऑलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक फादर प्रेम झाल्को यांच्याकडून ऑनलाईन घेण्यात येणार होते. यावर्षीचा विषय होता – ‘उपजीविकेसाठी स्थलांतर: दुःखातही आशेची किरणे’.
अभाविपने कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र देऊन, भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व युएपीए अंतर्गत दोषारोपित असलेल्या जेसुइट पाद्री फादर स्टॅन स्वामी यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यास विरोध दर्शवला आणि तो रद्द करण्याची मागणी केली. आदिवासी हक्क कार्यकर्ते असलेल्या स्वामींना २०२० मध्ये अटक झाली होती आणि जुलै २०२१ मध्ये न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचे निधन झाले.
अभाविपने आरोप केला की फादर स्वामी यांचे बंदी घालण्यात आलेल्या संघटनांशी संबंध होते आणि त्यांचा गौरव अकादमिक व्यासपीठावरून करणे म्हणजे “राष्ट्रविरोधी क्रियांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीला मोठेपण देणे” असे होईल. अभाविप मुंबईचे सचिव प्रशांत माळी म्हणाले, “सेंट झेविअर्ससारख्या प्रतिष्ठित संस्थांनी अशा विचारसरणीला प्रोत्साहन देणे दुर्दैवी आहे. आम्हाला शैक्षणिक स्वातंत्र्याचा पूर्ण आदर आहे, पण जेव्हा अशा कार्यक्रमांमधून देशविरोधी कार्यात आरोपी असलेल्या व्यक्तीचं प्रतिमाशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते मान्य करता येत नाही.”
माळी यांनी पुढे सांगितले की त्यांचा व्याख्यानाच्या विषयाला हरकत नाही, पण ते फादर स्वामींच्या नावाने जोडल्यास चुकीचा संदेश विद्यार्थ्यांना मिळतो. “स्थलांतर किंवा उपजीविकेच्या आव्हानांवर चर्चा करण्यास आम्ही विरोध करत नाही. पण हे चर्चासत्र एखाद्या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांना मदत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या नावाशी जोडल्यास चुकीचा संदेश जातो. शैक्षणिक संस्थांनी तटस्थ राहावे आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही विचारसरणीचे व्यासपीठ बनू नये,” असे ते म्हणाले.
विद्यार्थी संघटनेच्या इशाऱ्यानंतर कॉलेज प्रशासनाने व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला. टीकेला उत्तर देताना, कॉलेजचे रेक्टर फादर कीथ डिसोझा म्हणाले की डीआयआरएस हे महाविद्यालयातील एक सहशैक्षणिक युनिट असून, वर्षभर विविध व्याख्याने व कार्यक्रम आयोजित करते. “डीआयआरएसचा मुख्य उद्देश म्हणजे संवाद आणि परस्पर सन्मान वाढवणे. ‘इतरांचा सन्मान करणे’ ही मूलभूत भारतीय संस्कृतीची भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.
फादर डिसोझा यांनी हेही नमूद केले की फादर स्टॅन स्वामी यांच्यावर आरोप होते, परंतु त्यांना दोषी ठरवले गेले नव्हते. “भारतीय फौजदारी न्यायव्यवस्थेनुसार, गुन्हा सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असते. आम्ही इतरांचे दृष्टिकोन व चिंता आदराने मान्य करतो, तसेच आमच्या भूमिकेकडेही परस्पर सन्मानाने पाहिले जावे अशी अपेक्षा करतो,” असे ते म्हणाले.
‘उपजीविकेसाठी स्थलांतर’ हा विषय आजच्या तरुणांच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. नोकरीच्या शोधात, करिअरच्या संधींसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थलांतर अपरिहार्य ठरत असताना, अशा चर्चा रद्दच करणे हे केवळ अव्यवहार्यच नाही तर विद्यार्थ्यांच्या हितालाही बाधक आहे. विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय प्रशासनाने वादाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, ज्यामुळे शैक्षणिक वातावरण विधायक चर्चांनी समृद्ध होईल. कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थी संघटना प्रत्यक्ष भेटून चर्चा का करू शकत नाहीत?
शैक्षणिक संस्थांनी तटस्थ राहू नये, तर विद्यार्थ्यांना विविध विचारसरणींची ओळख करून द्यावी. हे एक व्यासपीठ असेल ज्यामुळे ह्या विचारसरणी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचा मार्गदर्शक ठरवायला मदत करेल. हा मार्ग भविष्यात बदलू शकतो किंवा कदाचित तसाच राहू शकतो.
‘उपजीविकेसाठी स्थलांतर’ हा विषय कॉलेजच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा एक महत्वपूर्ण केंद्रबिंदू आहे. एखाद्या संघटनेकडून विरोध का होत आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार काही बदल करणे शक्य आहे का हे बघणे महत्वाचे. कॉलेज प्रशासनाने व्याख्यानच रद्द करून विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी नोकरी, करिअर आणि उपजीविकेच्या शोधातच असतात. अशा वेळी हा विषय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जगात, विशेषतः ट्रम्पसारख्या धोरणांमुळे, स्थलांतर अधिक कठीण होत असताना, अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.
अभाविप विद्यार्थी संघटना आहे, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कामे करते, तर असा महत्त्वाचा विषय चर्चिला जाण्यापासून ती कसे काय रोखू शकते? संघटनेतील सदस्यांपैकी अनेकांच्या पालकांनी उपजीविकेसाठी स्थलांतर केलेले असेल. कदाचित सदस्यांपैकीही काहींना ते करावे लागेल. या विषयाचे महत्त्व त्यांना जाणवत असेल तर ‘स्मरणार्थ’ व्यक्तिला असलेला विरोध दर्शवून ‘व्याख्यान रद्द होणार नाही’ ही काळजी घ्यायला हवी होती. कॉलेज प्रशासनाशी संवाद साधायला हवा होता. पर्याय सुचवायला हवा होता आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कॉलेजला मदत करायला हवी होती. त्यांच्या विद्येचा, कामाचा समाजासाठी फायदा होणार नसेल तर त्याचा काय उपयोग? ‘एका राजकीय पक्षाचे विद्यार्थी स्वरूप’ इतकीच ओळख अभाविपला पुरेशी आहे का?
ujjwala.de@gmail.com