हृतिक घुगे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने ७५ वर्षांपूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले. जवाहरलाल नेहरूंनी सामाजिक परिवर्तानाच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले. विज्ञानाच्या वाटेवरील या प्रवासात आज आपण लक्षणीय प्रगती केली आहे.

काही वर्षांपूर्वी, संजीव धुरंधर आणि बी. सत्यप्रकाश यांनी पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स’मध्ये विकसित केलेल्या गणिती तंत्रामुळे गुरुत्वीय-लहरी (जीडब्ल्यू १५०९१४) शोधणे शक्य झाले. या लहरी अमेरिकेतील ‘लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल- वेव्ह ऑब्झर्व्हेटरी’च्या (LIGO) दोन डिटेक्टर्समध्ये १४ सप्टेंबर २०१५ रोजी आढळल्या. फेब्रुवारी २०१६ मध्ये याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली. लिगो हे निर्विवादपणे आतापर्यंतचे सर्वांत संवेदनशील वैज्ञानिक उपकरण आहे. पृथ्वीपासून एक अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेत कृष्णविवरांची टक्कर होऊन ती परस्परांत विलीन झाली. या आपत्तीतून जीडब्ल्यू १५०९१४ गुरुत्वीय-लहरी (ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह्ज) निर्माण झाल्या.

गुरुत्वाकर्षण-लहरी सिग्नल जीडब्ल्यू १५०९१४ शोधून शास्त्रज्ञांनी आइन्स्टाईनचा सापेक्षतेचा सामान्य सिद्धांत सिद्ध केला (भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स बॉर्न यांनी याचे वर्णन ‘निसर्गाबद्दलच्या मानवी आकलनाचा सर्वांत मोठा पराक्रम’ असे केले.) आइन्स्टाईनने शतकापूर्वी भाकीत केले होते की, अंतराळात उलथापलथ घडवू शकेल, अशा कोणत्याही वैश्विक घटनेमुळे पुरेशा शक्तीचे गुरुत्वीय तरंग निर्माण होतात आणि ते विश्वात पसरतात. कृष्णविवरांच्या विलिनीकरणाच्या अंतिम क्षणांमध्ये उत्सर्जित झालेल्या सर्वाधिक क्षमतेच्या गुरुत्वाकर्षण-लहरींची शक्ती विश्वातील सर्व तारे आणि आकाशगंगाच्या एकत्रित प्रकाश शक्तीपेक्षा दहापट जास्त होती, असा लिगोचा अंदाज आहे.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

सामान्य माणसासाठी हे सारे कल्पनातीत आहे. या उल्लेखनीय शोधाच्या आगामी परिणामांबद्दल कोणताही अंदाज बांधणे कठीण आहे. गुरुत्वीय लहरींद्वारे मानवाने विश्वाचे एक संपूर्णपणे नवे दालन उघडले आहे. त्यामुळे आता पुन्हा खगोलशास्त्राच्या एका रोमांचक नवीन युगाची सुरुवात केली आहे.

अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या वतीने लिगोचे एक डिटेक्टर भारताला हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रकल्प २०१६मध्ये मंजुरी आणि निधीसाठी सादर करण्यात आला होता. सध्या, अमेरिकेतील हॅनफोर्ड आणि लिव्हिंगस्टन येथे दोन लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) सुविधा कार्यरत आहेत. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी, लिगोच्या साहाय्याने गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यात आल्याची ऐतिहासिक घोषणा झाली. त्यानंतर आठवड्याच्या आत, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘लिगो-इंडिया मेगा सायन्स’ प्रस्तावाला ‘तत्त्वतः’ मान्यता दिल्याची घोषणा केली. ‘लिगो-इंडिया’, किंवा ‘इंडिगो’ हा भारतात गुरुत्वाकर्षण-लहरी शोधक तयार करण्यासाठी लिगो प्रयोगशाळा आणि ‘इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेशन्स’ (इंडिगो) यांच्यातील नियोजित सहयोगी प्रकल्प आहे.

महाराष्ट्रात… मराठवाड्यात?

‘यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशन’ ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातील प्रगत लिगो भागीदारांच्या सहकार्याने लिगो प्रयोगशाळा, तीन नियोजित प्रगत डिटेक्टर्सपैकी एकासाठी सर्व डिझाईन आणि हार्डवेअर प्रदान करण्यास सज्ज आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राजवळ असलेल्या दुधाळा गावात अंदाजे एक हजार २०० कोटी रुपये खर्च करून ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. कदाचित, मराठवाड्यातील रहिवाशांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकेल. त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे कारण पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि इतर सर्व कामगिरी निर्देशकांच्या बाबतीत हा प्रदेश उर्वरित महाराष्ट्रापेक्षा खूप मागे आहे. शिवाय, मराठवाड्याचा मनुष्यबळ विकास निर्देशांक उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या या निर्देशांकात तळाशी असलेल्या राज्यांपेक्षाही कमी आहे.

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

महाराष्ट्र सरकारने या संधीचे सोने करणे अपेक्षित आहे. यानिमित्ताने होणाऱ्या सर्व तांत्रिक घडामोडींचा परिघीय क्षेत्रात उद्योग विकसित करण्यास हातभार लागू शकतो. उद्योग आणि तांत्रिक स्पिन-ऑफ तंत्रे यांच्यातील दुवा मजबूत होऊन त्यामुळे केवळ अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर समाजालाही खूप मदत होऊ शकेल. या सुविधेमुळे या प्रदेशाच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावता येईल. मराठवाड्याला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर ही सुविधा एक सुवर्ण संधी ठरेल.

‘युरोपियन फिजिकल सोसायटीने (ईपीएस) प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योग युरोपातील एकूण उलाढालीच्या १६ टक्क्यांपेक्षा जास्त आणि एकूण रोजगाराच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देतात. या प्रमाणाचा विचार करता हे क्षेत्र आर्थिक सेवा आणि किरकोळ क्षेत्रातील योगदानात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होते.’ नोबेल पारितोषिक विजेते बर्ट्रांड रसेल यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आधुनिक जगाला पूर्वीच्या शतकांपासून वेगळे करणाऱ्या जवळपास प्रत्येक गोष्टीचे श्रेय विज्ञानातील प्रगतीला आहे.’ म्हणून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यास तीन उद्दिष्टे निश्चित पूर्ण होतील, ती म्हणजे- मराठवाड्याचा प्रादेशिक विकास साधता येईल. परदेशी संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येऊन काम करण्यास प्रोत्साहन देता येईल आणि हे २०२४-२५ पर्यंत भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्दिष्ट साध्य करण्यात योगदान देता येईल.

नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी आपापल्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील धोरणांतून जगात भारताचा एक खास ठसा उमटवला आहे. स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारत हा कदाचित विकसनशील जगातील एकमेव असा देश आहे, ज्याने ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून स्वतंत्र होण्यापूर्वीच राष्ट्रीय विज्ञान समुदाय संघटित आणि स्थापित केला. लिगोसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय प्रकल्पातील भारताचा सहभाग ही देशातील वैज्ञानिक समुदायासाठी जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करण्यासाठीची महत्त्वपूर्ण संधी आहे. लिगो- शास्त्रज्ञ आणि अभियंते यांना जागतिक नेतृत्वाची अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. लिगोच्या स्थापनेमुळे आपण भविष्यात गुरुत्वाकर्षण लहरींसंदर्भात संशोधन करणाऱ्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळविणार आहोत.

लेखक माजी LAMP (लेजिस्लेटिव्ह असिस्टंट टु मेम्बर ऑफ पार्लमेण्ट) फेलो असून ‘द ‘ब्रह्मपुत्रा रिव्हर- फ्लोइंग थ्रू कॉन्फ्लिक्ट’चे लेखक आहेत.

hritikghuge@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study of gravitational waves will be from hingoli asj
First published on: 11-10-2022 at 11:01 IST