लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : क्वांटम तंत्रज्ञानातील संशोधन विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्वांटम मिशन जाहीर केले आहे. त्यासासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर पुणे) सुरू करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

आयसर पुणे ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त शिक्षण आणि संशोधन संस्था आहे. २००६मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने विज्ञान संशोधन क्षेत्रात देशात ख्याती प्राप्त केली आहे. या संस्थेमार्फत उच्च दर्जाच्या संशोधनाला चालना देणारे पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रम राबवले जातात. नॅशनल क्वांटम मिशनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय चौधरी, मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा अभय करंदीकर, आयसर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत यांच्या उपस्थितीत क्वांटम तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. या अभ्यासक्रमात सुरुवातीला २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

आणखी वाचा-बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?

क्वांटम तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्य निर्माण करण्यासाठी दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यासक्रमात थेट उद्योग क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट आहे. या अभ्यासक्रमात उद्योजकतेसह विविध घटकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी दोन नव्या क्वांटम प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येत आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळांद्वारे क्वांटम तंत्रज्ञानातील प्रगत प्रशिक्षण आणि तंत्रे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती आयसर पुणेतील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुदर्शन अनंत यांनी दिली. .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्वांटम तंत्रज्ञानातील ‘इनोव्हेशन हब’

क्वांटम तंत्रज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आयसर पुणे ही संस्था आदर्श आहे. कारण या संस्थेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे क्वांटम तंत्रज्ञानातील ‘इनोव्हेशन हब’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भौतिक शास्त्र विभागातील १२ प्राध्यापक क्वांटम तंत्रज्ञानाच्या उपक्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, असेही प्रा. अनंत यांनी सांगितले.