पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी २७ भारतीय हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली व साऱ्या देशात पाकिस्तान व पाक-पुरस्कृत इस्लामी दहशतवादाविरुद्ध संतापाची लाट उसळली. २८ वा बळी काश्मिरी मुस्लीम घोडेवाल्याचा होता व पर्यटकांना मारू नका अशी विनवणी तो दहशतवाद्यांना करत होता. तसेच शेवटचा उपाय म्हणून त्याने एका दहशतवाद्याची बंदूक खेचून घेण्याचाही धाडसी प्रयत्न केला व आपला प्राण गमावला असे सांगितले जाते. पहलगाम हत्याकांडानंतर पाकिस्तानवर सर्जिकल म्हणजे लक्ष्यवेधी हल्ला करून त्या देशाला सणसणीत धडा शिकवावा अशीच सगळ्या भारतीयांची तीव्र प्रतिक्रिया होती.

भीतीमुळे वा सहानुभूतीमुळे दहशतवाद्यांना आजपर्यंत मदत करणाऱ्या सर्वसामान्य काश्मिरी जनतेच्या रोजी-रोटीलाही या हल्ल्याचा फटका बसणार असल्याने तेही कमालीचे नाराज व संतप्त झाले. काश्मीरच्या फुटीरतेला खतपाणी घालणारे विवादास्पद कलम ३७० रद्द करून, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडून नवनिर्वाचित ओमर अब्दुल्ला सरकार स्थापन करून काश्मीरमध्ये शांततामय विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या मोदी सरकारला पहलगामचा हल्ला हा मोठाच धक्का होता. एकीकडे शांतिमार्गातला हा बाका प्रसंग व दुसरीकडे पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धची तीव्र लोकभावना यामुळे लवकरात लवकर पाकिस्तानविरुद्ध धाडसी लष्करी कारवाई करणे आता मोदी सरकारला क्रमप्राप्त आहे.

पंतप्रधान मोदींच्या कारकीर्दीत पाकिस्तानच्या हिंसक कृत्यांना प्रत्युत्तर म्हणून दोन वेळा असे लक्ष्यवेधी हल्ले केले गेले. त्यापैकी एक होता २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने पाकच्या दहशतवादी तळावर केलेला हल्ला. दुसरा होता २५ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर भारतीय हवाई दलाच्या१२ मिराज विमानांनी केलेला हवाई हल्ला.

आता पहलगाम हत्याकांडाचे उत्तर म्हणून पाकिस्तानला सणसणीत धडा शिकवायचा तर उघड व नेत्रदीपक हल्ले करावे लागतील व त्यांचे लक्ष्यही मोठे व पाकिस्तानच्या दृष्टीने अस्मितादर्शक असावे लागेल. असा हल्ला आक्रमक, बॉम्बर ड्रोन्स किंवा पृथ्वी, निर्भयसारखी ताकदवान क्षेपणास्त्रे डागून यशस्वी करता येईलही. आपण आजपर्यंतच्या कोणत्याच युद्धात वा लष्करी कारवायांत ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रांचा वापर केलेला नाही. अगदी पहलगाम हल्ल्याच्या प्रसंगीही गोळीबार करून पलायन करणाऱ्या व जंगलात दडी मारून बसलेल्या दहशतवाद्यांना टिपून ठार मारण्यासाठी ड्रोन्सची मदत घेतल्याचा उल्लेख आलेला नाही. आजमितीस पाकिस्तानची आर्थिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय मंचावरची दयनीय परिस्थिती बघता भारताशी युद्ध छेडण्याची हिंमत पाक करणार नाही असे मानायला हरकत नाही.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकला सणसणीत धडा शिकवायचा तर लक्ष्यवेधी हल्ला करणे ही काळाची गरज आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानसारख्या धर्मांध, कुटिल, भारतद्वेषी शत्रूचा तिळपापड होईल, पाक लष्कराची गुर्मी धुळीला मिळेल व पहलगाम हल्ला घडवून आणल्याचा त्याला पश्चात्ताप होईल अशी आशा करूया.

(लेखक युद्धइतिहासाचे विश्लेषक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kiigokhale@gmail.com