scorecardresearch

भाषांतरविचार..

भाषांतर म्हणजे या भाषेमधली माहिती त्या भाषेत नेण्याची तांत्रिक प्रक्रिया नसते, तर ते ‘या हृदयीचे त्या हृदयी’ नेऊन पोहोचवणे असते.

भाषांतरविचार..

डॉ. सुनंदा विद्यासागर महाजन

भाषांतर म्हणजे या भाषेमधली माहिती त्या भाषेत नेण्याची तांत्रिक प्रक्रिया नसते, तर ते ‘या हृदयीचे त्या हृदयी’ नेऊन पोहोचवणे असते. ‘केल्याने भाषांतर’ हे त्रमासिक हे काम गेली २५ वर्षे अखंड करत आहे. या त्रमासिकाच्या पंचविशीनिमित्त भाषांतराच्या प्रक्रियेविषयीचे चिंतन..

भाषांतर ही दोन भाषांमध्ये घडणारी, दोन समाजांतील दोन संस्कृतींमधील लोकांना जोडणारी कृती आहे, ती एक आंतरसांस्कृतिक कृती आहे. एखाद्या लेखकाने किंवा लेखिकेने आपल्या साहित्यकृतीत मांडलेले एक वेगळे, आपल्याला अपरिचित असे जग भाषांतरातून लक्ष्य भाषेत संक्रमित होत असते. ते जग लेखक आपल्या नजरेने न्याहाळून एका साहित्यकृतीच्या रूपात मांडत असतो; आणि ते जग वाचक म्हणून आपल्याला आपल्या भाषेतून जाणून घ्यायचे असते. भाषांतराची प्रक्रिया गुंतागुंतीची, अनेक पातळय़ांवर घडणारी, नवनिर्मितीच्या शक्यता अंगी बाळगणारी असते. लेखकाने एका भाषेत मांडलेला आशय भाषांतरकार दुसऱ्या भाषेत, लक्ष्य भाषेच्या सांस्कृतिक, सामाजिक अवकाशात, काळाच्या एका विशिष्ट चौकटीत नेत असतो. दोन्ही भाषांवर त्याचे प्रभुत्व तर असावे लागतेच, शिवाय त्या भाषांमधील साहित्याची, त्याच्या वाङ्मयीन परंपरांची चांगली जाण त्याला असणे गरजेचे असते. त्या भाषा बोलणाऱ्या समाजाचा राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक इतिहास, तेथील प्रांताची भौगोलिक वैशिष्टय़े, त्या समाजाच्या चालीरीती, तेथील सणवार, खाद्यसंस्कृती असा खूपच व्यापक आवाका असलेला त्याचा अभ्यास प्रत्यक्ष भाषांतराला लागण्याआधीच झालेला असायला लागतो.
पाश्चात्त्य जगात भाषांतराच्या क्षेत्रात हा फेथफुल किंवा / आणि ब्युटिफुल, हा वाद चांगलाच रंगला होता. श्लायरमाखर (१७६८-१८३४) हे एक जर्मन तत्त्ववेत्ते आणि विचारवंत होते. भाषांतर या प्रक्रियेविषयी बोलतानाचे त्यांचे एक प्रसिद्ध झालेले वाक्य होते: ‘भाषांतरकाराने एक तर लेखकाला त्याच्या जागेवरच सोडावे आणि (लक्ष्य भाषेतील) वाचकाला जास्तीत जास्त मूळ लेखकाच्या जवळ घेऊन जावे, किंवा वाचकाला त्याच्या जागीच बसून द्यावे आणि (मूळ) लेखकाला त्याच्या जवळ घेऊन जावे.’ याचा अर्थ असा की लक्ष्य संहितेत स्रोत संहितेतील आशय आणि रूप यांचे सगळे बारकावे यावेत, ती मूळ संहितेच्या संस्कृतीच्या खुणा घेऊन सिद्ध व्हावी. दुसऱ्या प्रकारात लक्ष्य संहिता इतकी लक्ष्य संस्कृतीतील संहिताच वाटावी की ते भाषांतर आहे असे वाटूच नये. सैद्धांतिक मांडणीत अशा या दोन मुख्य भूमिका दिसतात. श्लायरमाखर यांनी स्वत: पहिल्या भूमिकेचा पुरस्कार केला, लक्ष्य भाषेतील वाचकाने भाषांतरित संहिता स्रोत भाषेतील, तेथील संस्कृतीत तयार झालेली आहे हे भाषांतरातून तिच्या वेगळय़ा खुणांनी ओळखावे, ती परकी म्हणूनच वाचकाने समजून घ्यावी असे भाषांतर हे जास्त योग्य असे त्यांना वाटले. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्ल्यायरमाखर यांनी हे विचार मांडले तेव्हा जर्मनीमध्ये शेक्सपिअर व इतर अन्य युरोपीय साहित्य मोठय़ा प्रमाणात भाषांतर होऊन येत होते.

युजीन नायडा (१९१४ – २०११) या अमेरिकन भाषावैज्ञानिकाने भाषांतराविषयी काही विचार मांडले, ते बऱ्याच लोकांच्या वाचनात आले असतील. कोणत्याही दोन भाषा या हुबेहूब सारख्या नसतात, त्यामुळे भाषांतर करताना हुबेहूब समांतर शब्द अथवा रचना शक्य होत नाहीत, त्यामुळे भाषांतर करताना मूळ संहितेच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. फॉर्मल इक्विव्हॅलन्स आणि डायनॅमिक इक्विव्हॅलन्स अशा दोन प्रकारांत भाषांतराच्या पद्धतींचे वर्गीकरण नायडा करतात. मूळ संहितेचा आशय आणि रचना, रूप यांची भाषांतराद्वारे पुनर्निर्मिती करणे, त्याची वाङ्मयीन वैशिष्टय़े आणि लेखकाचे म्हणणे हे जास्तीत जास्त मुळाबरहुकूम हे पहिल्या प्रकारे भाषांतर करणाऱ्याचे उद्दिष्ट असावे असे त्यांचे म्हणणे होते. तर दुसऱ्या प्रकारे भाषांतर करणाऱ्याने लक्ष्य संहिता ही जास्तीत जास्त लक्ष्य संस्कृतीच्या जवळ जाणारी, जणू ती त्याच भाषेतील वाटावी अशा प्रकारे सिद्ध करावी, मूळ लेखक आणि त्याच्या भाषेतील त्याचे वाचक यांचे जे नाते असते, तशाच प्रकारचे नाते भाषांतरकार आणि लक्ष्य भाषेतील वाचक यांच्यात निर्माण व्हावे, असे त्यांचे म्हणणे. सुरुवातीला त्यांच्या मते भाषांतरकाराने भाषांतर करताना साहित्यकृतीचा आशय आणि तिचा मूळ गाभा यावर लक्ष दिले पाहिजे. परंतु नंतर बदलत गेलेल्या त्याच्या सैद्धांतिक मांडणीत त्यांनी साहित्यकृतीच्या रूपाचाही विचार भाषांतरात झाला पाहिजे अशी जोड दिली.

भाषांतर प्रक्रिया
भाषांतरामुळे आपल्याच भाषेतील काही एरवी वापरात नसलेले शब्द (अळंब्या, सािळदर) भाषांतरात एकदम वाचायला मिळतात, किंवा काही नव्याने जुळवून तयार करावे लागतात. भाषांतरकाराला शब्द शोधून काढावे लागतात, वाचकाला त्यांचे वेगळय़ा दृष्टीने आकलन करून घ्यावे लागते. तसेच वाक्यरचनाही निराळय़ा होऊ शकतात. एरवी लांबलचक वाक्यांची फारशी सवय नसलेली मराठी भाषा पाश्चात्त्य भाषांमधील मुख्य वाक्याच्या बरोबरीने येणाऱ्या उपवाक्यांमुळे कोलांटय़ा उडय़ा मारू लागते. कधी त्या तिला झेपतात, तर कधी त्यांच्यातून म्हणजे भाषांतरित झालेल्या लांबलचक, इंग्रजी तोंडवळय़ाच्या वाक्यांमधून काहीही अर्थबोध होत नाही. भाषांतराच्या या कृतीमुळे लक्ष्य भाषेवर अर्थातच काही संस्कार घडत असतात, तिची एकप्रकारे मोडतोडच होते. तिच्या वाक्यांना त्यामुळे वेगळे वळण लागायची शक्यता असते. त्यामुळे भाषेच्या निरनिराळय़ा अंगांमध्ये बदल घडत असतात, त्यातील काही बदल अल्पजीवी असतात, काही दीर्घकाळ वापरात येतात, तर काही कायमस्वरूपी होऊन बसतात. हे झाले मराठी भाषेचे. इंग्रजी भाषेने तर अनेक परभाषेतील शब्द आपल्यात सामावून घेतले आहेत. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात कोणत्या परभाषक शब्दांची नोंद नव्याने झाली आहे याविषयीच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. जर्मन व रशियन समाजात १८ व्या शतकात राजघराण्यातील लोक किंवा अमीर-उमराव लोक फ्रेंच भाषेत बोलणे प्रतिष्ठेचे समजत असत. त्यामुळे त्या काळात या दोन्ही भाषांमध्ये बरेच फ्रेंच शब्द घुसले आणि ते चांगलेच रुळले. मराठी भाषेत सध्या इंग्रजी भाषेच्या किंवा हिंदूी भाषेच्या प्रभावाची अनेक उदाहरणे सापडतील. हे बदल अथवा भाषेच्या शब्दसंख्येत होणारी वाढ ही काही फक्त साहित्याच्या भाषांतरांमधून होत नसते. साहित्याच्या भाषांतराखेरीज इतरही प्रकारच्या भाषांतरांमधून किंवा इतरही कारणांमुळे भाषेत नवीन शब्द येतात, व्याकरणाच्या नवीन रचना तयार होतात, उच्चारात, बोली रूपात फरक पडत जातात, बदल होतात. हे भाषेच्या प्रवाहीपणाचे लक्षण आहे. मग भाषेच्या वापरातील शुद्धपणाचा आग्रह धरणाऱ्यांना हे बदल स्वागतार्ह वाटोत अथवा न वाटोत, असे बदल घडत राहतात आणि त्यांचे आयुष्य किती असते ते काळच ठरवू शकतो. भाषेच्या प्रवाहाच्या प्रवाहीपणात साहित्याच्या भाषांतराचा सहभाग खूप मोठा आहे, हे नक्की.

भाषांतरातून आपल्याला आपल्याच भाषेतील शब्दांमधून परक्या देशातील आशय व्यक्त होण्याच्या शक्यता अनुभवता येतात. तसेच आपल्या भाषेच्या शब्दांना निकटपणे जोडलेले अर्थ काढून त्या जागी नवीन अर्थ आकळून घेण्याचाही निराळा अनुभव येतो. फक्त भाषांतरकारालाच नाही तर वाचकालाही परक्या लोकांच्या बोलण्या-वागण्याच्या पद्धती, जगण्याच्या रीतीभाती, त्या प्रांतातील चालीरीती यांचा अनुभव भाषांतराद्वारा नेहमीच्याच परिचित भाषेतून होत असतो. परिचित भाषेतील नेहमीचे शब्द, नेहमीचीच वाक्ये भाषांतरित संहितेत असतात, पण ती थोडय़ा वेगळय़ा अर्थाकडे किंवा निराळय़ा अर्थछटेकडे त्यातून निर्देश करतात, आपल्या भाषेची विविध अर्थ व्यक्त करायची छुपी ताकदच भाषांतरामुळे आपल्याला कळून येते. किंवा आपण आपल्या भाषेतील काही शब्द कधी वापरत नसतो, ते आपल्याला परके असतात, पण त्यांचा आशय समजायला कधी कधी भाषांतरित संहिता आपल्याला मदत करते.

गेल्या काही वर्षांत भाषांतरित पुस्तके- ललित आणि ललितेतर दोन्ही प्रकारांची- मोठय़ा प्रमाणात आपल्याकडे प्रकाशित होताना दिसतात. ‘केल्याने भाषांतर’चा भर जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी इ. परकीय भाषांमधून थेट मराठीत भाषांतरांवर आहे. थेट भाषांतराचे हे काम त्रमासिकापुरते सीमित न राहता अधिक व्यापक आणि मोठे व्हायला हवे.

आपल्याकडे भाष्याची मोठी परंपरा..
मराठीच्या जडणघडणीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर भाष्यकृतींनी भाषेत व साहित्यात मोलाची भर घातली. या परंपरेत संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, किंवा संत एकनाथांचे भावार्थ रामायण येते. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ रामायण म्हणजे भाषांतर या संज्ञेच्या रूढ व्याख्येत बसणारी भाषांतरे नसली तरी ती एका भाषेतील कृतींवर दुसऱ्या भाषेत केलेली भाष्ये आहेतच. त्यातील अनेक सौंदर्यस्थळे हेच दाखवतात की एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत सांगताना मूळच्या आशयात तर भर पडत गेलीच, शिवाय अभिव्यक्तीच्या, रूपाच्या निराळय़ा परिमाणांतून आशय व्यक्त होत गेला. म्हणजेच भाषांतर हे इंग्रजी जमान्यात, किंवा त्याआधी मिशनरींच्या जमान्यात आपल्याकडे येऊन रुळायच्या आधी भारतीय भाषांमधील साहित्यात भाष्यपरंपरा रुजली होती.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 04:22 IST