महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांतील पर्यटकही पहलगाममध्ये अडकले होते. त्या राज्यांतील नेते माध्यम प्रतिनिधींना घेऊन तिथे गेले का, त्यांनी आर्थिक मदत जाहीर करून जाहिरातबाजी केली का, असे प्रश्न उपस्थित करून, ‘करा हिमालय लक्ष खडे!’ या पहिली बाजूला (लोकसत्ता- २९ एप्रिल) प्रत्युत्तर देणारा लेख…
एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर दौऱ्याबाबत समाजमाध्यमांवर ‘दुःखद घटना घडत असताना हे श्रेयवादासाठी राजकारण करतात आणि माध्यमांचे कॅमेरे घेऊन फिरतात,’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या, याची माहिती शिंदे यांच्या स्तुतीसाठी बोरू झिजवणाऱ्यांना नसावी. दहशतवादी हल्ल्यानंतर देश हळहळ व्यक्त करत असताना, आम्हीच आधी मदत केली म्हणून श्रेय लाटण्याचा, वाहिन्यांचे कॅमेरे नाचवत चमकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण खरोखरच असंवेदनशील झालो आहोत.
ज्या पत्रकाराला एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर या हवाई सफरीला नेले त्याने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करताना, ‘ये हसीं वादियाँ ये खुला आसमा’ हे गाणे पार्श्वसंगीत म्हणून ठेवले होते. सगळाच खुळा कारभार. जनतेच्या पैशांवर सत्तेचा गैरवापर आणि दुःखद घटनेतही चमकण्याची हौस अपार! त्यावरही एकनाथ शिंदेंचे खुशमस्करे त्यांच्या कौतुकाचे भारूड गाऊन स्वत:चे हसे करून घेतात.
पहलगाम येथील हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत केली. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सीमा अधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि भरपाईची रक्कम सुपूर्द केली. भेटीदरम्यान स्थानिक आमदार सय्यद रफिक शाहदेखील उपस्थित होते. शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबाशी संवाद साधला, सांत्वन केले आणि आश्वासन दिले. सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरून फिरवून उदरनिर्वाह करत असे. वृत्तानुसार, जेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हा त्याने एका दहशतवाद्याचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न करून पर्यटकाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्याने गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर, महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या भागात अडकले होते.
महाराष्ट्र सरकारने पर्यटकांना परत आणण्यासाठी अनेक विमानांची व्यवस्था केली. एकनाथ शिंदे यांच्या जागी कोणत्याही राज्याचा प्रमुख असता तर त्याने हेच केले असते, पण शिंदे आता राज्याचे प्रमुख नाहीत ते उपप्रमुख आहेत तेही क्रमांक दोनचे, मग त्यांना हा अधिकार कोणी दिला? त्यांनी राज्याच्या तिजोरीतून मदत जाहीर करताना मुख्यमंत्र्यांना विचारले होते का? की त्यांना अजूनही आपणच मुख्यमंत्री असल्याचा भास होतो? त्यांनी हवाई सफरीत ज्या पत्रकारांना नेले त्यांना नेण्याची परवानगी शासनाकडून घेतली होती का? जर घेतली असेल, तर ‘ठरावीक’ पत्रकारच सोबत का घेतले? या पत्रकारांच्या हवाई सफरीचा खर्च शासनाने का केला?
देशावर दहशतवादी हल्ला झाला की देशाची तिन्ही सैन्यदले आपली जबाबदारी ओळखून कारवाई सुरू करतात, चोख कामगिरी बजावतात. दहशतवादी हल्ला झाल्यावर कोणीच त्याचे राजकारण करत नाही. सत्ताधारी- विरोधक एकत्र येतात आणि देशाच्या नेतृत्वाला एकमुखाने पाठिंबा देतात. हीच भारताची ओळख आहे. असे असताना हे प्रसिद्धीलोलुप राजकारणी यंत्रणाच्या अडचणी वाढवणारेच ठरतात. महाराष्ट्रातील पर्यटकांप्रमाणेच इतर राज्यांतील पर्यटकही तिथे अडकले होते. त्या राज्यांतील नेते माध्यम प्रतिनिधींना घेऊन तिथे गेले का? त्यांनी सय्यद आदिल हुसेन शाहला मदत जाहीर करून पाच लाख रुपये दिले, अशी स्वतःची जाहिरातबाजी केली का? महाराष्ट्रातील महायुती सरकारचे गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे हे दोन विभिन्न पक्षांतील नेते तिथे का गेले? भारतीय सैन्याने त्यांना मज्जाव का केला नाही? दहशतवादाचा सामना करण्याचा एवढा प्रदीर्घ अनुभव असलेले अजित डोवाल यांना या हल्ल्याची पुसटशीही कल्पना आली नाही, हे केवढे मोठे अपयश, पण त्याबाबतही चर्चा करण्याची ही वेळ नाही. एवढे सामंजस्य विरोधी पक्ष दाखवत असताना हे महाराष्ट्राचे नेते अशा प्रसंगी चमकण्याचा प्रयत्न करतात.
देशात रेल्वे अपघात झाला म्हणून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री देशाने अनुभवले आहेत. मुंबई हल्ल्यानंतर ताजमहाल हॉटेल येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या नट चिरंजीवाला आणि त्याच्या एका दिग्दर्शक मित्राला सोबत नेऊन पाहणी केल्याचे माध्यमांनी दाखविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. पुढे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याच मुंबई हल्ल्यावर,“बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी घटनाए होती रहती है” अशी टिप्पणी केली म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रातील या दोन्ही घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. विरोधक म्हणून काहूर माजवणारे आणि राजीनामा मिळेपर्यंत निषेध करणारे आम्हीच होतो. आता मात्र विरोधक म्हणून कितीही आरडाओरडा केला तरी बहुमताच्या सत्तेला कोणीच काही करू शकत नाही म्हणून सगळेच मूग गिळून गप्प बसतात. काही अपवाद वागळता माध्यमेही आपापली जबाबदारी विसरतात.
सामान्य माणसाला आता अपेक्षा आहे ती फक्त आणि फक्त आपल्या सैन्याकडून. भारताकडे निमलष्करी दल धरून तब्बल २५ लाख सैनिक आहेत. भारताकडे चार हजार ६१४ रणगाडे आहेत. अर्जुन मुख्य युद्ध टँक टी-९०, भीम टँक, पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर्स, ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, हॉवित्झर आणि इतर आधुनिक तोफखाना आहे. भारताचं हवाई दल जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे. भारताकडे दोन हजार २२९ विमाने आहेत. ज्यात ६०० लढाऊ विमाने, ८९९ लष्करी हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय भारताकडे राफेल, मिरज, सुखोई अशी शत्रूंना घाम फोडणारी लढाऊ विमानेदेखील आहेत. तसेच ब्रह्मोस, अस्त्र, निर्भय, आकाश अशी हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत.
भारताकडे एक लाख ४२ हजार नौदल मनुष्यबळ आहे. १५० युद्धनौका, १८ पाणबुड्या आणि दोन विमानवाहू जहाजे आहेत. ज्यात आयएनएस विक्रांतसारख्या मोठ्या जहाजाचाही समावेश आहे. भारताकडे अणुबॉम्ब आहे. भारत सहज पाकिस्तानला पराजित करू शकतो. मग सरकार वाट कसली पाहात आहे? लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, कारवाईसाठी आता बिहार विधानसभा निवडणुकीची वाट पाहणे योग्य नाही. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे राजकारण आता जनतेला कळून चुकले आहे. ते कधीच महागाई कमी करणार नाहीत. डॉलर रुपयाच्या सोबतीला आणणार नाहीत. ते केवळ राजकारण करणार, हिंदू हिंदू करणार आणि हिंदूंवरच हल्ले होत राहणार. एकनाथ शिंदेंसारखे राजकारणी चमकण्याची हौस भागवत राहणार आणि त्यांचे खुशमस्करे त्यांचे गुणगान गात राहणार! विंदा कारंदीकरांनी म्हटले आहेच…
गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामध्ये
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टके!
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टके!
खरे तर या हल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणे अपेक्षित होते. देशाचे संरक्षणप्रमुख अजित डोवाल यांनी राजीनामा पंतप्रधानांकडे द्यायला हवा होता. परराष्ट्रमंत्र्यांनीही राजीनामा देऊन आम्ही चुकलो म्हणायला हवे होते, पण प्रत्यक्षात- ज्यांना हातपाय बांधून कोणतेही अधिकार न देता जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी निवडून आणले ते ओमर अब्दुल्ला देशाची माफी मागत आहेत. ज्यांनी दहशतवाद्यांना शरण देण्यात धन्यता मानली त्या मेहबूबा मुफ्ती देशाची माफी मागत आहेत. पंतप्रधान या दुःखद प्रसंगातही बिहारमध्ये प्रचार सभा घेत आहेत. देशातील जनतेला सामोरे जाऊन पत्रकार परिषदेतून सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी ‘मन की बात’ करत स्वकौतुकाचे ढोल वाजवत आहेत आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आपणच मुख्यमंत्री असल्याच्या आविर्भावात सरकारी निधी वाटून चमकण्याचा प्रयत्न करत आहेत, पत्रकारांना हवाई सफर घडवत आहेत. ज्यांच्यावर या साऱ्याची जबाबदारी होती, ते कोणीच राजीनामा देत नाहीत आणि हिंदू माणसे मात्र हिंदूंच्याच राज्यात मारली जात आहेत. काही जात्यात आहेत तर काही सुपात! हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांच्या राजकीय जात्यात सगळेच बळी जात आहेत!
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष