डॉ. राजेंद्र डोळके

लेखाच्या शीर्षकावरूनच लेखात कशाची चर्चा केली असेल हे स्पष्ट होत असल्यामुळे ‘प्रास्ताविक’ अजिबात न करता सरळ मुद्याला हात घालतो. ‘हिंदुत्व’ या शब्दामध्ये हिंदु त्व असे दोन अवयव आहेत. ‘त्व’ हा त्या त्या वस्तूचे वैशिष्ट्य अथवा सार सांगणारा संस्कृत भाषेतील प्रत्यय आहे. मराठीत ‘पण’ अथवा ‘पणा’ हे शब्द मूळ शब्दाला लावले तर त्या मूळ शब्दाचे वैशिष्ट्य अथवा सार स्पष्ट होते. उदा. ‘लहानपण’, ‘मोठेपण’ इत्यादी. साहजिकच हिंदु त्व म्हणजे सारभूत हिंदू म्हणजेच हिंदूपणा.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

हिंदू संस्कृती फार प्राचीन आहे असे जे सांगितले जाते व वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ या संस्कृतीने जे आपले मानले आहेत, त्या ग्रंथामध्ये ‘हिंदू’ हा शब्द नाही. मुळात हिंदू हा शब्द धार्मिक अथवा सांस्कृतिक अर्थाने नव्हे तर ‘भौगोलिक’ अर्थाने निर्माण झाला. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे ते ‘सिंधू’ अशा अर्थाने तो परदेशीयांनी वापरला. प्रथमत: तो इराणींनी वापरला असे मानण्यात येते. त्यांच्या जुन्या फारसी भाषेत ‘स’ हा उच्चार नसल्याने ते तो ‘ह’ असा करत. त्यामुळे ‘सिंधू’चे ‘हिंदू’ झाले. पुढे मध्ययुगात हा हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला.

या हिंदू धर्माचे, हिंदूंचे अथवा हिंदुत्वाचे नेमकेपण सांगण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेले आपल्याला दिसतात. यामागे इंग्रजांची भारतावरील सत्ता व त्यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत ‘फोडा व झोडा’ ही नीती, हे कारण आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढय़ात सर्वच शक्तींनी व सर्वच धर्मीयांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याकरिता एकजूटतेने भाग घेतला होता. त्यामुळे या स्वातंत्र्यलढय़ापासून लोकांना जास्तीत जास्त दूर राखण्याकरिता धर्माच्या नावावर त्यांच्यातच फूट पाडून त्यांना आपापसात लढवावे अशी नीती ब्रिटिशांनी अवलंबिली. त्यातून प्रत्येकाची धार्मिक अस्मिता जागृत होऊन ती एकमेकांविरुद्ध तीव्र होत गेली. हिंदूंनाही त्याच अस्मितेतून आम्ही कोण आहो व या देशात आम्हीच सर्वात प्राचीन कसे आहोत हे सिद्ध करण्याची गरज वाटून हिंदू/हिंदुत्व म्हणजे नेमके काय हे सांगण्याचे प्रयत्न सुरू झाले.

हिंदू/हिंदुत्व यांच्या व्याख्या

अशा दृष्टीने पहिला ठळक प्रयत्न म्हणून लो. टिळकांनी याबाबत केलेल्या व्याख्येकडे बोट दाखवावे लागते. त्यांची व्याख्या अशी-

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाम् अनेकता।

उपास्यानामनियम: एतत् धर्मस्य लक्षणम्।।

या व्याख्येत वेदांना प्रमाण मानणे, मोक्षाची अनेक साधने व उपास्यदेवतांची विपुलता ही हिंदूधर्माची प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. इ.स. १९२३ मध्ये स्वा. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी या विषयावर बरेच विवेचन केले आणि ‘हिंदू’ कोणास म्हणावे हे सांगितले. त्यांची व्याख्या अशी-

आसिंधुसिंधुपर्यन्त यस्य भारतभूमिका।

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृत:।।

याचा अर्थ सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या देशातील कोणीही व्यक्ती, ज्याची ही पितृभक्ती आहे आणि तो पुण्यभूमी मानतो, तो हिंदू होय. याच परंपरेत ‘भाला’कार भोपटकरांचाही उल्लेख करावा लागतो. त्यांची व्यख्या अशी-

धेनुर्यस्य महामाता वेदा धर्मस्य जीवनम्।

प्रतिमापूजनं चैव, स वै हिन्दुरिति स्मृत:।।

या व्याख्येत गो-मातेला पूज्य व वेदांचे प्रामाण्य मानण्यावर विशेष भर आहे.

१९२५ साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना झाली. नागपुरातील मा.गो. वैद्य हे आदरणीय आणि विद्वान गृहस्थ रा.स्व. संघाचे बरीच वर्षे अधिकृत प्रवक्ते होते. त्यांचे या विषयावरचे अनेक लेख व पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यातून हिंदुत्व या विषयावरची ‘संघा’ची भूमिका समजून येते. ती अशी- ‘हिंदू’ हा शब्द तुलनेने अर्वाचीन. पण या संस्कृतीचा वारसा फार प्राचीन. संघाने हिंदू शब्द संस्कृतीच्या अर्थाने स्वीकारला. हिंदू हा एक समाज, एक मानवसमूह आहे. हिंदुत्व म्हणजे सांस्कृतिक एकता. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व. हिंदू राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद एकच. ‘िंहदू राष्ट्र’ हे रा.स्व. संघाचे एक सिद्धांत वचन आहे, हे जगजाहीर आहे. हिंदू हा धर्म नाही. धर्मासाठी इंग्रजीत ‘रिलीजन’ हा शब्द आहे. पण तो योग्य नाही. ‘रिलीजन’ धर्माचे एक अंग आहे. धर्म ही संकल्पना खूप व्यापक आहे. धर्म शब्दात संस्कृतीचाही आशय अंतर्भूत आहे. हिंदू हा ‘रिलीजन’ही नाही. ‘रिलीजन’ म्हणजे संप्रदाय. ‘रिलीजन’ला एक संस्थापक असतो, एक धर्मग्रंथ असतो, कर्मकांड असते. हिंदूंच्या बाबतीत असे काहीच नसल्यामुळे तो रिलीजन अथवा संप्रदाय नाही. ख्रिस्ती, इस्लाम, फारशी यांना मात्र ते संप्रदाय मानतात. ‘हिंदुत्व’ म्हणजे ‘हिंदुइझम’ही नव्हे.

वैचारिक गोंधळ

अशाप्रकारे या विद्वानांनी हिंदू आणि हिंदुत्व याबद्दल आपले विचार प्रगट केले आहेत. यावरून असे लक्षात येते की, या संकल्पना पुरेशा स्पष्ट तर होत नाहीतच उलट सर्वसामान्यांच्या मनात असलेला गोंधळ वाढवण्यास त्या कारणीभूत ठरतात. याचे कारणच हे आहे की, ‘हिंदुत्वा’चे स्वच्छ आणि नि:संदिग्ध स्वरूप स्पष्ट नाही. त्या संस्कृतीचा उगम फार प्राचीन अगदी वेदकाळापर्यंत दाखवला जात असला तरी ‘हिंदू’ कोण आणि ‘हिंदुत्व’ म्हणजे काय हे स्पष्ट करण्याकरिता एकोणिसावे-विसावे शतक उजाडावे लागते. आणि या काळातही ज्या व्याख्या सांगितल्या जातात त्यात एकवाक्यता नसते. लोकमान्यांची व्याख्या सावरकरांना तर सावरकरांची व्याख्या भोपटकरांना आणि पुढे जाऊन रा.स्व. संघालाही मान्य नसते. आणि त्या सर्व व्याख्येतील फोलपणा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी दाखवून दिला आहे. ते लिहितात, “…भालाकार भोपटकर यांनी केलेली व्याख्या सनातन्यांचे प्रतिनिधित्व करणारी, सावरकरांची व्याख्या हिंदुत्वाच्या राजकारणासाठी केलेली व लोकमान्यांनी केलेली व्याख्या ही संपूर्णत: अप्रमाण अशी असल्याने या तीनही व्याख्या स्वीकारताच येणार नाहीत.” (‘नवभारत’ मासिक; जुलै-ऑगस्ट १९९५; पृ. ५१-५२)

सारांश, हिंदुत्वाची सुस्पष्ट, नि:संदिग्ध व्याख्या करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणारे झाले आहेत. त्यात स्पष्टता आणण्याकरिता विचारवंतांना प्रचंड बौद्धिक कसरत करावी लागते. आणि एवढे करून देखील त्यात सुस्पष्टता येत नाही. इतर सर्वसामान्यांच्या मनातील संभ्रम वाढतच जातो. म्हणूनच त्या विचारांच्या सर्वोच्च नेत्यांकडून निरनिराळ्या वेळी परस्परविरोधी विधाने ऐकावयास मिळतात. हा संभ्रम सामान्यांच्या मनात जाणीवपूर्वक की अजाणता कायम ठेवला जातो हे सांगणे कठीण. मात्र हा संभ्रम कायम ठेवण्यात अशी एक सोय असते, की यात प्रत्येक वेळी गरजेनुसार नवीन अर्थ भरता येतो आणि कोणी जर त्यात स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला तर ‘आम्हाला ते म्हणायचेच नव्हते’ अथवा ‘तुम्हाला आमचे म्हणणे समजलेच नाही’ असे म्हणता येते.

‘हिंदू’ हा शब्द धर्मवाचक

सत्य हे आहे की, हिंदू हा शब्द ‘हिंदू धर्म’ याच नावाने अनेक शतकांपासून रूढ झालेला आणि लोकांच्या मनात याच अर्थाने तो घट्ट झाला आहे. आपल्या नित्याच्या बोलण्यात अथवा वर्तमानपत्रात हिंदू हा शब्द असंख्य वेळा आलेला असतो. तेव्हा आपल्यासमोर त्या शब्दाचा कोणता अर्थ उभा राहतो? हिंदू धर्म असाच ना? ‘भारतातील हिंदूंचे प्रमाण’, ‘हिंदू असुरक्षित आहेत’, ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ वगैरे शब्दप्रयोगातील ‘हिंदू’ हा शब्द कशाचा बोध करून देतो? हिंदू धर्माचाच ना! ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या’ या वाक्यप्रयोगात तर हिंदूंना ‘धार्मिक भावना’ असतात म्हणजेच हिंदू हा धर्म आहे, हे उघडउघड मान्य केलेले असते. स्वामी विवेकानंद आणि डॉ. राधाकृष्णन हे ‘हिंदूधर्म‘ असाच शब्दप्रयोग करतात. असे असताना विनाकारण ‘हिंदू’ म्हणजे परंपरा, संस्कृती, विचारधारा, जीवनप्रणाली, उदात्त जीवनमूल्ये वगैरे शब्दांच्या जंजाळात जनसामान्यांना अडकवून मुद्दाम भ्रमजाल निर्माण करण्यात काय अर्थ आहे? हिंदू शब्द धर्म या अर्थाने एकदा स्वीकारला की मग ‘हिंदुत्व’ या शब्दाचा अर्थ आपोआपच स्पष्ट होतो. आणि तो म्हणजे हिंदू धर्माची वैशिष्ट्ये अथवा फार तर आपल्या (हिंदू) धर्माचा अभिमान असणे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद

आपल्या धर्माचा अभिमान असणे वाईट नसते. पण परधर्मीयांबद्दल द्वेष असणे वाईट. आणि ‘हिंदुत्वा’ला आज नेमका हाच अर्थ प्राप्त झाला आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्याच्या दृष्टीने आपल्याला रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाकडे वळावे लागते. कारण गेल्या शतकाच्या शेवटच्या उत्तरार्धापासून ‘हिंदुत्व’ याच मुद्याशी निगडित झाले आहे. गतेतिहासात बाबराने राममंदिर पाडून तेथे मशीद बांधली हा हिंदुत्वावरचा कलंक आहे, म्हणून तो पुसून टाकण्यासाठी मशीद पाडून त्या ठिकाणी राममंदिराची उभारणी झाली पाहिजे. त्या मशिदीचे अस्तित्व म्हणजे अपमानित काळाची आठवण आहे. राममंदिराची उभारणी झाल्याने तो आत्मसन्मान प्राप्त झाल्याचे समाधान मिळेल. त्यातील महत्त्वाचा मुद्दा हा केवळ ‘राममंदिर बांधणे’ हा नाही. तर ‘मशीद पाडून त्याच ठिकाणी राममंदिर बांधणे’ हा आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’ त्या वाक्यप्रयोगावरून याची प्रचिती येते. अशारीतीने राममंदिर उभारले म्हणजे मग गतकाळातील अपमानाचा सूड उगवल्याचे व त्याचबरोबर विजयाचे समाधान मिळते. गतकाळातील अपमानाच्या आणि पराभवाच्या खुणा हव्यातच कशाला? म्हणून रामजन्मभूमीनंतर काशी, मधुरा, शहरांची नावे बदलणे वगैरे प्रकरणे तयार आहेतच. त्या सर्व प्रकारांचे जो समर्थन करेल तो हिंदुत्ववादी आणि जो विरोध करेल तो हिंदुत्वद्रोही असे मानले जाईल.

म्हणून मग आपण हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी अयोध्येला भेट देणे आवश्यक ठरते आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे वगैरे जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष अयोध्येला भेट देण्याचा कार्यक्रम आखतात. आम्ही कसे कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी बाबरी मशीद पाडतेवेळी ‘आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही’ असे म्हणणारे ‘आम्ही मशीद पाडतेवेळी तेथे होतो आणि ती पाडल्याचा आम्हाला अभिमान आहे’ असे आज छाती ठोकून सांगतात. यावरून ‘हिंदुत्वा’ला आज नेमका काय अर्थ प्राप्त झाला आहे, याचा सहजच बोध होतो.

‘हिंदुत्वा’चा आजचा राजकीय अर्थ

हा मुद्दा आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावरून अधिक चांगल्यारीतीने स्पष्ट होतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना हिंदुत्वद्रोही ठरवण्याचे प्रयत्न जोरदार रीतीने चालू आहेत हे सर्वांनाच ठाऊक. का, तर त्यांनी आपले वडील ‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे जे तमाम हिंदूंना रस्त्यावर उतरवून, महाआरत्या करवून एका समुदायाच्या हृदयात धडकी भरवत होते. त्यांचे हिंदुत्व सोडून ‘धर्मनिरपेक्ष’ अशा काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापली आणि ‘हिंदुत्वा’स संकटात टाकले. महामहीम राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना ‘आप कबसे धर्मनिरपेक्ष हो गये’ असे विचारल्याचे सर्वांना स्मरत असेलच. म्हणजे आपला धर्माभिमान अथवा धर्मांधता सोडून धर्मनिरपेक्षता अथवा सर्वसमावेशक असे हिंदुत्व धारण केले म्हणजे ‘हिंदुत्वा’शी द्रोह केला असा त्याचा अर्थ. कारण ‘हिंदुत्वा’मध्ये फक्त हिंदूंच्याच हितांना प्राधान्य अपेक्षित असते इतर धर्मीयांच्या हितांना नसते. उद्धव ठाकरेंनी आपल्या कारकीर्दीत आणखी कोणत्या चुका केल्या? तर त्यांनी पालघरमधील निरपराध साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत, आमचे हिंदुत्व ‘शेंडी-जानव्यां’चे नाही असे म्हटले, स्वत:च्या घरासमोर ‘हनुमान चालिसा’ हे हिंदूंच्या एका देवाचे स्तोत्र म्हणण्याला परवानगी दिली नाही, करोनाकाळात हिंदूंची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही, मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, ‘रझा अकादमी’वर कारवाई केली नाही… यासारखे आणखीही काही मुद्दे असतील. पण ते आठवण्याची काही आवश्यकता नाही. महत्त्वाचा मुद्दा असा की, अशा रीतीने उद्धव ठाकरेंनी एका विशिष्ट जनसमुदायाचे ‘लाड’ अथवा ‘तुष्टीकरण’ करून महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंशी विश्वासघात केला. हा साक्षात्कार अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांना होऊन केवळ ‘हिंदुत्व’ रक्षणार्थ त्यांनी एका कट्टर आणि खरे(?) हिंदुत्व जोपासणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी करून महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना सुरक्षित केले.

यावरून हे लक्षात येते की, ‘हिंदुत्वा’ला आज प्राप्त झालेल्या अर्थात स्वत:च्या म्हणजे हिंदू धर्माचा अभिमान अथवा धर्मांधता एवढेच लक्षण पुरेसे नाही तर एका विशिष्ट समुदायाला नकार, विरोध आणि त्याचा द्वेष हीही लक्षणे समाविष्ट करावी लागतात. म्हणजेच ‘हिंदुत्वा’ची आजची व्याख्या तयार होते. ‘हिंदुत्वा’चा आजचा नक्की आणि निश्चित अर्थ हाच आहे.

‘हिंदुत्वा’चा ‘खरा’ अर्थ

‘हिंदुत्वा’ला आज हा अर्थ प्राप्त झाला असला तरी प्राचीन काळापासून सांगितला गेलेला त्याचा ‘खरा’ अर्थ मात्र तो नव्हे. कारण प्रतिपक्षाला नाकारण्याकरिता अथवा त्याला संपवण्याकरिता त्याचेच गुण आपल्याला अंगीकारावे लागतात. तो जेवढा आक्रमक आणि हिंस्र असतो त्याच्याहीपेक्षा जास्त आक्रमक आणि हिंस्र आपल्याला व्हावे लागते. दुसऱ्याची दैत्य म्हणून प्रतिमा रचणारे स्वत:चेच दैत्यीकरण करत असतात. आपली हिंदू संस्कृती अशी शिकवण देत नाही. त्या संस्कृतीला ‘विश्वव्यापिनी’ संस्कृती म्हणजे अखिल विश्वाला कवेत घेणारी संस्कृती म्हटले जाते. हिंदू लोकांचा वैदिक धर्म हा सर्व जगाचा धर्म आहे व पृथ्वीवरील सर्व लोकांनी तो येथून शिकून जावा असे म्हटले आहे. ‘सर्वेन: सुखिन: संतु। सर्वे संतु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यंतु। माकश्चिदु:खभाग्भवेत्’ अशी या संस्कृतीची मनीषा आहे. ही संस्कृती समतेचा पुरस्कार करून जितकी स्वधर्मनिष्ठ आहे तितकीच परमधर्मसहिष्णूही आहे. आपल्या संस्कृतीत सांगितली गेलेली ही तत्त्वे आत्मसात करण्यातच शांती आणि सर्वांचे कल्याण आहे. ‘हिंदुत्वा’ला आज कोणताही अर्थ प्राप्त झालेला असला तरी त्याचा ‘खरा’ अर्थ हाच आहे.