रघुनंदन भागवत
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५रोजी झालेला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला व त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतलेला बदला या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान यांचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यात तसाही कुठलाही संवाद गेली काही वर्षें राहिलेला नव्हताच. त्यात भर पडली ती वरील घटनांची. या घटनांच्या छायेतच संयुक्त अरब अमीरातीमध्ये ९ सप्टेंबर २०२५ ते २८सप्टेंबर २०२५ दरम्यान क्रिकेटची आशिया कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारत व पाकिस्तान आमने सामने येतील. त्यावरून वाद पेटला असून भारताने पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळू नयेत अशी तीव्र भावना भारतात व्यक्त होत आहे. या वादाच्या अनुषंगाने भारताने आपले पाकिस्तान संदर्भातील क्रिकेटबाबत धोरण जाहीर केले आहे.
या धोरणानुसार भारत व पाकिस्तान यांच्यात द्विपाक्षीय सामने / मालिका जगाच्या पाठीवर कुठेही होणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये (ज्यात इतरही देशांचे संघ सहभागी होतात) भारत पाकिस्तानशी सामने खेळेल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आशिया कप स्पर्धेमधील भारत -पाकिस्तान सामन्यावरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे.
१९४७ मध्ये भारत पाकिस्तान अशी फाळणी झाल्यावर १९६०पर्यंत या दोन देशांत क्रिकेट मालिका खेळल्या गेल्या. त्यानंतर १९७८ पर्यंत या मालिकांत खंड पडला. त्यानंतर १९९९पर्यंत ठराविक कालांतराने मालिका होत राहिल्या. परत पाच वर्षांच्या कालावधीनंतर २००४मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला. त्या दौऱ्यानंतर २००५, २००६, २००७या वर्षी दोन्ही देशांत मालिका झाल्या. मात्र २००७ची मालिका शेवटचीच ठरली. या कालखंडात पाक पुरस्कृत दहशतवाद सुरूच होता. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपाक्षीय कसोटी मालिका ज्या बंद झाल्या त्या आजतागायत.
कसोटी मालिका जरी स्थगित झाल्या तरी एक दिवसीय तसेच टी २० क्रिकेटच्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत व पाकिस्तान एकमेकांना भिडत होतेच आणि अजूनही तो सिलसिला सुरू आहे. अगदी १९९९ मध्ये कारगिलचे युद्ध सुरू असताना सुद्धा इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. त्यावेळी कोणीही या सामन्याबद्दल आक्षेप घेतला नव्हता.
आणखी एक किस्सा आठवतो. १९७१-७२ मध्ये शेष विश्व संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी कसोटी मालिका झाली होती. शेष विश्व संघात भारताचे बेदी, इंजिनिअर, गावसकर व पाकिस्तानचे इंतिखाब आलम एकत्र खेळत होते. त्याच वेळी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु झाले होते. पण दोन्ही देशांचे खेळाडू संघ भावनेने खेळले होते.
हा इतिहास बघता भारताने जाहीर केलेले धोरण वरील वास्तवाच्या आधारावर सुसंगत वाटते. फक्त पूर्वी असा धोरणात्मक निर्णय जाहीर केला नव्हता एवढाच काय तो फरक. तरी सुद्धा राजकीय नाइलाज किंवा पराकोटीचा देशाभिमान यातून भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात आवाज उठतोच आहे, म्हणूनच हे धोरण कसे योग्य आहे याचा तार्कीक विचार करणे आवश्यक वाटते.
अन्य खेळांबद्दलची वस्तुस्थिती
क्रिकेटच्या जोडीने भारत पाकिस्तान यांच्यात हॉकी, फुटबॉल, कबड्डी, टेनिस, स्क्वॉश, इत्यादी खेळांच्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लढती होतच आहेत. त्यात कुठलाही खंड पडलेला नाही. ॲथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांत वैयक्तिक पातळीवर भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी लढतातच की. भारतीय महिला क्रिकेट/ हॉकी संघ अंतरराष्ट्रीय स्पर्धांत पाकिस्तानी महिला संघाशी दोन हात करतो. या सामन्याना विरोध होत नाही मग फक्त पुरुषांच्या क्रिकेट सामान्यांना विरोध करणे कितपत संयुक्तिक ठरते? याचा क्रिकेट प्रेमींनी विचार करावा.
अन्य देशांबाबतचे धोरण
चीन हा भारताचा पाकिस्तानप्रमाणेच शत्रू देश आहे. पण कितीही राजकीय वैरभाव असला तरी खेळाच्या मैदानावर तो दिसत नाही. (पाकिस्तानबाबत मात्र असे म्हणता येणार नाही). टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, कबड्डी, फुटबॉल, या व इतर अनेक खेळांच्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत- चीन सामने नेहमीच होतात. या सामन्यांना कोणी नाकं मुरडत नाही, जरी डोकलाम, लडाख, गलवान खोरे येथील भारत चीन संघर्ष ताजा असला तरी.
राष्ट्राची प्रतिष्ठा
अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाची प्रतिष्ठा पणाला लागते. या स्पर्धा जिंकणे हा देशाभिमानाचा विषय ठरतो. अशा वेळी आपण जर पाकिस्तानवर बहिष्कार घातला तर त्या सामन्यांचे गुण हकनाक जातील आणि पाकिस्तान्यांना न खेळताच गुण मिळतील. या गमावलेल्या गुणांचा फटका स्पर्धेच्या अंतिम निकालात बसून, कदाचित हाता तोंडाशी आलेले विजेतेपद हुकू शकते. या बाबतीत एक उदाहरण द्यावेसे वाटते.
१९७४ मध्ये डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पोहोचला होता. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी होता दक्षिण आफ्रिकेचा संघ. त्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या ‘वर्णद्वेषी’ धोरणाच्या विरोधात भारताने हा सामना खेळण्यास नकार दिला. परिणामी विजेतेपद मिळवण्याची क्वचितच प्राप्त होणारी संधी भारताने गमावली होती. आफ्रिकेचा संघ अंतिम सामना न खेळताच डेव्हिस चषक घेऊन गेला.
खेळाडूंची सुरक्षितता- भारताने आपले धोरण आखताना खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच भारताने पाकिस्तानात आपला कुठलाही संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर जगात कुठेही पाकिस्ताबरोबर द्विपाक्षीय सामने न खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे कारण या सामन्यांत प्रेक्षकांकडून सुद्धा भारतीय खेळाडूंना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०२५ ची चॅम्पियन्स कप स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. पण भारताने पाकिस्तानात खेळण्यास ठाम नकार देऊन आपले सर्व सामने दुबईत खेळण्यास पसंती दिली. हा निर्णय नव्याने जाहीर झालेल्या धोरणाशी सुसंगतच होता.
आर्थिक भूर्दंड टाळणे
अंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर पाकिस्तानविरुद्धच्या सामान्यवार बहिष्कार टाकला तर भारताला पाकिस्तानला भरपाई म्हणून काही किंमत मोजावी लागू शकते. आपल्या शत्रू राष्ट्राला आपणच आर्थिक मदत केल्यासारखे हे होणार नाही का?
आर्थिक फायद्याचा विचार
भारत पाकिस्तान यांच्यातील कुठलाही सामना ‘हाउसफुल’ असतो. या सामन्यातून मिळणाऱ्या जाहिरातीच्या/ तिकिटविक्रीच्या उत्पन्नावर पाणी सोडणे कितपत शहाणपणाचे ठरते?
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यासंबंधी जी भूमिका घेतली आहे ती जेवढी तात्विक आहे तेवढीच व्यवहार्यही आहे, असे म्हणता येईल, म्हणूनच भारतीय नागरिकांनी टोकाचा विरोध सोडून सरकारच्या धोरणाला पाठिंबा द्यावा असे आग्रहाने आवाहन करावेसे वाटते.
raghunandan.bhagwat@gmail.com