आधी ‘पेटा इंडिया’ हत्तीच्या छळाची तक्रार करणार, मग न्यायालयाने स्थापन केलेल्या हाय पॉवर्ड कमिटी समोर सुनावणी होणार, हत्ती सुरक्षित नसल्याचा अहवाल कमिटी देणार, विरोध झालाच, तर प्रकरण न्यायालयात जाणार आणि काहीही होवो हत्ती वनतारातच रवाना होणार… गेल्या काही वर्षांत देशाच्या विविध भागांतले अनेक हत्ती अशाप्रकारे हजारो किलोमीटर अंतर कापून वनतारात पोहोचवण्यात आले. अमित शहांच्या भाषेत सांगायचं तर, ‘आप क्रोनॉलॉजी समाझिये…’ आता महादेवी परत येईलही. पण पुढे काय? कारण पुदुच्चेरीतही असंच झालं होतं. त्यांची लक्ष्मी हत्तीण जनआक्रोशामुळे वनतारातून परत मंदिरात पाठवली गेली, पण पेटाने लगोलग पुन्हा न्यायालयात याचिका केली. देशभरातल्या हत्तींचा जामनगरकडे सुरू असलेला प्रवास पाहता, महादेवी परत आली म्हणून निर्धास्त होणं धोक्याचं ठरू शकतं.
आसाम, अरुणाचल, त्रिपुरापासून, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत अनेक राज्यांतून हत्ती वा हत्तीणी वनतारात आणल्या गेल्या आहेत. काही उदाहरणं पाहूया… वनतारातला हत्तींचा निवारा ‘राधा कृष्ण टेम्पल ट्रस्ट’च्या अखत्यारीत येतो. २०१८ ते २०२० दरम्यान ‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ अर्थात ‘पेटा’ आणि ‘द फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन’ने देशभर सर्कशीतल्या हत्तींच्या छळाविरोधात जोरदार अभियान राबवलं आणि तब्बल २९ हत्ती मुक्त केले. हे सर्वच्या सर्व हत्ती राधा कृष्ण टेम्पल ट्रस्टकडे पाठवण्यात आले. प्राणी हे माणसाच्या मनोरंजनाचं साधन असू शकत नाही, असं पेटाचं म्हणणं. पण याच वनतारामधला एक हत्ती अनंत अंबानींच्या लग्नात फोटो प्रॉप सारखा वापरला गेला तेव्हा मात्र पेटाने ब्र सुद्धा काढला नव्हता, तो का?
राजस्थानातल्या आमेर किल्ल्यात मालती हत्तीण होती. तिथे टुरिस्ट राइडसाठी तिचा वापर केला जात असे. पेटाने या हत्तीणीचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळल्याच्या तक्रारी केल्या. ती अन्य हत्तींना इजा करते, तिला २०१७ आणि २०१९साली पर्यटकांनी मारहाण केली होती, तिच्या बोटांची नखं वाढली आहेत, तळव्यांना भेगा पडल्या आहेत वगैरे त्यात म्हटलं होतं. प्रकरण हाय पॉवर कमिटीकडे गेलं आणि २०२४च्या एप्रिल महिन्यात मालती वनतारामध्ये रवाना झाली. मालतीच्या पाठीवर बसणं हे क्रौर्य होतं, पण या वनताराचे सर्वेसर्वा प्राणीप्रेमी अंबानीपुत्र स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून आले, तेव्हा मात्र पेटाला आपल्या तत्त्वांचा सोयीस्कर विसर पडला.
स्वाभिमानी कामगार पक्षाचे राजू शेट्टी यांनी महादेवीसंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगलीतल्या विटा गावातल्या हत्तीचा प्रश्न मांडला. हे गणेश नावाचं पिल्लू २००६मध्ये भैरवनाथ यात्रा कमिटीने केरळमधून आणलं होतं. २०२३मध्ये तो आजारी पडला म्हणून त्याला उपचारांसाठी जामनगरला नेण्यात आलं. पण तो अद्याप परतही आलेला नाही आणि त्याचं नंतर काय झालं हेदेखील स्पष्ट झालेलं नाही, असं राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. अशी पार्श्वभूमी असेल, तर विश्वास कसा बसणार?
अलीकडचीच- जानेवारी २०२५ मधली गोष्ट. पश्चिम बंगालमधल्या इस्कॉन मंदिरातल्या माहुताचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं कारण देत पेटाने विष्णुप्रिया आणि लक्ष्मीप्रिया या हत्तीणींना मुक्त करण्याची मागणी केली होती. बराच काळ बंदिस्त जागेत साखळदंडात जखडून ठेवल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्या हिंसक झाल्या असा निष्कर्ष पेटा इंडियाने काढला. त्यांना मुक्त वातावरणात पाठवण्यात यावं, अशी विनंती संस्थेने हाय पॉवर कमिटीला केली. कमिटीने नेहमीप्रमाणे ती मान्य केली. मंदिर व्यवस्थापनानेही विरोध केला नाही आणि दोन्ही हत्तीणी लगोलग वनतारात आल्या. खरंतर पश्चिम बंगालमध्ये हत्तींची संख्या मोठी आहे. तिथे मयुरझरना अभयारण्य आणि इस्टर्न डूअर्स एलिफंट रिझर्व्हसारखे हत्तींचे नैसर्गिक अधिवासही आहेत. मात्र तरीही या दोन हत्तीणींना दोन-सव्वादोन हजार किलोमीटर अंतर पार करून जामनगरला का आणलं गेलं? ही एवढी उठाठेव कशासाठी?
आता सर्कशीतल्या हत्तींसारखीच घाऊक हत्ती स्थलांतराची घटना पाहूया. अरुणाचल प्रदेशातून जानेवारी २०२२मध्ये २० हत्ती मुक्त केले गेले. त्यांचा वापर लाकूड तोडण्यासाठी आणि ओंडके वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्यात १० नर, आठ माद्या आणि दोन पिल्लांचा समावेश होता. पेटाच्या तक्रारीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईनंतर त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या हाय पॉवर्ड कमिटीने या सर्व हत्तींचा ताबा वनताराला देण्याचे आदेश दिले.
एक अपवादही आहे. भारतातली सर्वांत कृश हत्तीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातल्या लक्ष्मी हत्तीणीला पेटाने २०२१मध्ये मुक्त केलं. लक्ष्मी अतिशय कुपोषित होती आणि तिचे पाय वाकले होते. गंभीर प्रकृतीच्या या हत्तीणीला मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा असल्याचा दावा करणाऱ्या वनतारात न पाठवता उत्तर प्रदेशातल्या एलिफंट काँझर्व्हेशन अँड केअर सेंटरमध्ये ठेवलं गेलं. ते का, याचाही विचार झाला पाहिजे.
आज वनतारामध्ये ९९८ एकर जागेत २६० हून अधिक हत्ती असल्याचं त्यांच्याच अधिकृत संकेतस्थळावर म्हटलं आहे. एवढ्या हत्तींचा संग्रह करून अंबानीपुत्रांना नेमकं काय साधायचं आहे? महादेवीसारखं एखादं प्रकरण अंगाशी आलं की, आमचा यात काहीच स्वार्थ नाही, आम्ही केवळ सेवा करतोय, न्यायालयाच्या आदेशांचं पालन करतोय अशी साळसूद भूमिका या खासगी संग्रहालयाकडून घेतली जाते, पण स्वयंसेवी संस्थांपासून सर्व यंत्रणा ‘सोडवा हत्ती, पाठवा वनताराला,’ असे मिशन हाती घेतल्यासारख्या का वागत आहेत? गुजरात हा काही पूर्वीपासून हत्तींचा अधिवास नव्हता. भारतात सर्वाधिक हत्ती हे दक्षिणेत आणि ईशान्येकडच्या राज्यांत आढळतात. शिवाय वनतारा हे काही नैसर्गिक अभयारण्य नाही. जामनगर ऑइल रिफायनरीच्या परिसरात विकसित करण्यात आलेलं हे एक खासगी संग्रहालय आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या प्रदूषित परिसरात मुळात असं संग्रहालय उभारण्याची परवानगी नकारणंच उत्तम ठरलं असतं. पण आज तिथे जगभरातून अनेक प्रजातींचे प्राणी आणण्यात आले आहेत. त्यात दुर्मीळ प्राणीही आहेत.
प्राण्यांची देखभाल एवढाच उद्देश असेल, तर प्राणी बरा झाला की त्याला आपल्या मूळ जागी नाहीतर अभयारण्य वा राष्ट्रीय उद्यानात पाठवता येणं शक्य आहे. त्याच्यावर त्याच्या मूळ ठिकाणी एखादा तज्ज्ञांचा चमू पाठवून तिथल्या तिथेच उपचारही करता येऊ शकतात. वन्य प्राण्यांसाठी अभयारण्या हाच उत्तम अधिवास आहे, यात दुमत असूच शकत नाही, मात्र बालपणापासून मंदिर मठांत वाढलेले, माणसाळलेले प्राणी अभयारण्यात ठेवले, तर टिकाव धरू शकतात का याचाही विचार झाला पाहिजे. पेटा ही मूळची परदेशी संस्था आहे. त्यामुळे प्राण्यांच्या छळाविषयीच्या या संस्थेच्या धारणा भारतीय परिप्रेक्षात अनेकदा विसंगत ठरतात. त्यांच्या काही जाहिरात मोहिमाही त्यामुळे फसल्या होत्या. ‘आपण कुत्र्याचं दूध पितो का, नाही ना? मग इतर प्राण्यांचं का पितो,’ असं विचारणारी आणि एक महिला कुत्र्याच्या स्तनातून दूध पित असल्याचं चित्र असलेली होर्डिंग्ज पेटाने लावली होती. सोया मिल्क प्या, असं आवाहन त्यांनी केलं होतं. होलोकॉस्ट ऑन प्लेट या मांसाहाराची तुलना नरसंहाराशी करणाऱ्या जाहिराती केल्या होत्या. लहान बालकं धूम्रपान करत आहेत, असं दर्शवणारी चित्र तयार करून त्यावर तुम्ही तुमच्या मुलांना धूम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या वनताराच्या उद्घाटनाची दृष्यं बहुतेकांना आठवत असतील. एका खासगी प्राणीसंग्रहालयाचं पंतप्रधानांनी प्रमोशन केलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे कोणी कितीही रान उठवलं, तरीही वनतारात जाणाऱ्या वन्यप्राण्यांचा ओघ आटेल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. पेटाने आता दक्षिणेतल्या मठ आणि मंदिरांकडे मोर्चा वळवला आहे. कर्नाटकातल्या हत्तींची चाचपणी सुरू केल्याची वृत्तं येऊ लागली होती. आसाम सरकारने तामिळनाडूतल्या एका मंदिराला भाडेतत्त्वावर दिलेल्या जॉयमाला हत्तीणीचा छळ होत असल्याची आणि ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याची तक्रारही पेटाने केली आहे. हे असंच पुढे सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महादेवी परत आल्याचा आनंद साजरा करताना सावध राहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरतं, ते यामुळेच!
vijaya.jangle@expressindia.com