महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग चर्चेत आला आहे. या महामार्गाला प्रत्येक जिल्ह्यात विरोध होत आहे. शासनाने महामार्ग उभारणीचा पुनर्विचार करावा अशी आक्षेप घेणाऱ्यांची अपेक्षा आहे. त्याऐवजी काही पर्याय पुढीलप्रमाणे –

(१) नागपूर- सोलापूर- कोल्हापूर- रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग सध्या वापरात असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गास समांतरच आहे.

(२) सोलापूर – मंगळवेढा – सांगोला – मिरज हा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वांत सुसज्ज व तुलनेत सर्वांत कमी वाहतूक असलेला महामार्ग आहे.

(३) सोलापूर – मिरज या नवीन महामार्गावर नवीन हॉटेल उभारणी सुरू असून त्याबरोबरच इंधन कंपन्याही नवीन पेट्रोल पंप उभारत आहेत. शक्तिपीठ महामार्गामुळे वाहतुकी रोडावेल व महामार्ग उभारणीसाठी केलेल्या गुंतवणुकीवरही परिणाम होईल.

(४) समजा भविष्यात या महामार्गावरील रहदारी वाढू लागली तरीही सोलापूर – मिरज महामार्गाच्या विस्तारात फारशी अडचण येणार नाही, कारण हा महामार्ग उभारतानाच विस्तारित उड्डाणपूल बांधलेले आहेत.

(५) लातूर – तुळजापूर – सोलापूर या महामार्गावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.

(६) आताच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेंभुर्णी – बार्शी – लातूर या महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी दिली. हा महामार्गाही लवकरच वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे तो विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र जोडणारा दुवा ठरेल.

(७) शक्तिपीठ महामार्गाऐवजी कुर्डुवाडी – शेटफळ – पंढरपूर – सांगोला या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे चौपदरी करण्यात यावे.

(८) सोलापूर – मोहोळ – पंढरपूर हा नविनच सुसज्ज पालखी महामार्ग उभारण्यात आला आहे.

(९) पंढरपूर शहरासाठी भविष्याचा विचार करता पूर्ण बाह्यवळण रिंग रोडची उभारणी करावी जेणेकरून अवजड वाहतूक शहरात न येता पूर्णपणे बाहेरून जाईल.

(१०) सद्यःस्थितीत कोल्हापूरहून पणजी – गोव्याला जाण्यासाठी तीन-चार रस्ते उपलब्ध असून त्यांचे नुतनीकरण करण्यात यावे तसेच संकेश्वर – बांदा हा महामार्गही आहे.

(११) पावसाळ्यात फोंडाघाट काही दिवस बंद होता कारण घाट रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणारी मोरी खचली होती. नवीन रस्त्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी अस्तित्वातील घाट महामार्ग यांची डागडुजी करणे आणि आवश्यक तिथे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे.

(१२) गेली १०-१५ वर्ष चर्चेत असलेल्या व विविध कारणांमुळे लालफितीत अडकलेला कोल्हापूर – गारगोटी – शिवडाव घाटरस्ता तयार केला तर गोव्यास जाण्यासाठी आणखी एक पर्यायी रस्ता मिळेल.

(१३) कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कॉरीडोरमध्ये हत्ती, ब्लॅक पँथर, वनगवे आणि आता वाघांचेही अस्तित्व आढळले आहे. नवीन महामार्गामुळे वन्य जीव कॉरीडोरमध्ये समस्या निर्माण होतील.

पर्यीवरणाला असलेले धोके

महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाचा अपवाद वगळता कुठेही राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांसाठी कॉरीडोर उभारलेले नाहीत म्हणून वन्यजीवांसाठी राष्ट्रीय महामार्ग धोकादायक ठरू लागले आहेत. महाराष्ट्रात दररोज रात्री अंदाजे किमान १०० छोटे- मोठे वन्य प्राणी राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मृत्युमुखी पडतात. यात (साप , मुंगुस, रानमांजर, तरस , वनगायी, मोर सरपटणारे आणि खुरे असणारे प्राणी अधिक प्रमाणात आढळतात. महामार्गावर मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची नोंद घेणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. महामार्गाची बांधणी करताना त्या त्या प्रदेशातील वन्यजीवांच्या अधिवासाचा विचार करणे आवश्यक असून महामार्ग उभारताना सरसकट सिमेंट वापरून बांधकाम करणे धोकादायक ठरत आहे कारण सिमेंटचा रस्ता ओलांडताना खुरे वन्य प्राणी घाईघाईने घसरून पडतात व गोंधळून जाऊन अपघातात जीवाला मुकतात.

मध्यंतरी सोलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर वनगायींचा अख्खा कळपच उड्डाणपूलावरून खाली पडून मृत्युमुखी पडला होता. त्याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांना सिमेंटचा रस्ता ओलांडताना त्रास होतो. शक्तिपीठ महामार्गाचा विचार करता तो पूर्णपणे पठारी प्रदेशातून जात असला तरी सोलापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांत हरिण, काळवीट, लांडगा, कोल्हा या प्राण्यांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. मोठे महामार्ग उभारले की वन्यजीवांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण होतो.

नविन रेल्वेमार्गांची गरज

महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वांत जास्त १८००० किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहेत. राज्याला आता खरी गरज आहे ती नवीन रेल्वेमार्गाची. राज्य निर्मितीनंतर कोकण रेल्वे वगळता मोठ्या प्रमाणावर नवीन रेल्वेमार्गांची निर्मिती कमी झाली आहे. नवीन रेल्वे मार्गनिर्मितीसाठी सर्व पक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे मागणी व पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल , लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकांवर देशातील इतर राज्यांतुन दररोज २८- ते ३० रेल्वेगाड्या येतात पण त्याचा महाराष्ट्राला फारसा फायदा होत नाही.

महाराष्ट्रात नविन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण करून त्यांची उभारणी करणे गरजेचे आहे अमरावती – पंढरपूर , औरंगाबाद – कोल्हापूर, सोलापूर – धुळे, तुळजापूर – पंढरपूर – सातारा – रत्नागिरी, कोल्हापूर – वैभववाडी अशा नवीन रेल्वेमार्गांची उभारणी करणे गरजेचे आहे तसेच कोल्हापूर – सोलापूर – नागपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे. उत्तर भारतात रेल्वे मार्गाचे जाळे वाढल्याने तेथील साखर ईशान्य भारतातील बाजारपेठेत कमी खर्चात पोहोचु लागली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना नवीन बाजारपेठ शोधावी लागत आहे. महाराष्ट्रात रेल्वे सेवा तुलनेत कमी उपलब्ध असल्याने राज्यातील शेतीमाल उत्पादने, साखर उद्योग यावर दूरगामी परीणाम होत आहेत. नवीन रेल्वेमार्गांची उभारणी करणे गरजेचे आहे.

जिल्हा मार्ग दुरुस्ती

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा मार्ग हे ग्रामीण महाराष्ट्राच्या वाहतूक धमन्या आहेत. जिल्ह्यातील संपर्कासाठी जिल्हा मार्ग महत्त्वाचे आहेत याच मार्गांवरून ग्रामीण भागातील ऊस वाहतूक, दुध, फळे, भाजीपाला वाहतूक केली जाते. दररोज ग्रामीण भागांतील लोकांना तालुका – जिल्ह्याला जाण्यासाठी याच जिल्हा मार्गांचा वापर करावा लागतो. दररोज एसटी बसमधून कितीतरी विद्यार्थी शाळा – महाविद्यालयांत जाण्यासाठी याच मार्गांवरून प्रवास करतात पण आज महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा मार्गांची अवस्था अंत्यंत बिकट असून जिल्हा मार्गांची अक्षरशः चाळण झाली आहे. नवीन महामार्ग उभारण्यापेक्षा तोच पैसा या जिल्हा मार्गांच्या दुरुस्तीसाठी वापरला तर ग्रामीण महाराष्ट्राला खूप मोठी उभारी मिळेल. खास जिल्हा मार्गासाठी एखादी नवीन योजना तयार करून दुरुस्ती करण्यात यावी. जिल्हा मार्ग दुरुस्ती झाली तर वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील व त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि अपघातही कमी होतील.

उदाहरणार्थ मोहोळ – वैराग – धाराशिव हा आंतरजिल्हा मार्ग आहे पण यातील मोहोळ – वैराग हा जिल्हा मार्ग वाहतुक वर्दळीचा असुनही गेली कित्येक वर्षे त्याची दुरवस्थाच झालेली आहे. तो जर डागडुजी करून सुसज्ज केला तर पंढरपूरला जाण्यासाठी मराठवाड्यातील वारकऱ्यांना हा जवळचा मार्ग उपलब्ध होईल. असे अनेक जवळचे जिल्हा मार्ग महाराष्ट्रात असून फक्त त्यांच्या दुरवस्थेमुळे कित्येक किमी अधिक प्रवास करावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kapase3355@gmail.com