आर्थिक प्रगतीत मागे पडलेल्या आशियाई आणि आफ्रिकी देशांत प्रचंड प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करून या देशांना आपले मिंधे बनवण्याची चीनची राक्षसी महत्त्वाकांक्षा अजिबात लपून राहिलेली नाही. चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड प्रोजेक्ट’चा भाग म्हणून पाकिस्तानात ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॅार’ या नावाखाली चाललेला पायाभूत सेवांचा विकास, हा त्याच महत्त्वाकांक्षेचा एक नमुना. पण गेल्या आठ दिवसांत तीनदा, चीनच्या पैशाने पाकिस्तानात उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांना टिपून तीन ठिकाणी हल्ले झाले आहेत. यापैकी तिसरा हल्ला खैबर-पख़्तूनख्वा या प्रांतामधल्या दासू धरणाच्या परिसरात घडला; त्यात तर पाच चिनी कामगारांना प्राण गमवावे लागले.

सिंधू नदीवरल्या दासू धरणाच्या बांधकाम स्थळाकडे जाण्यासाठी हे कामगार व अभियंते ज्या मोटारीने इस्लामाबादहून निघाले होते, ती मोटारच बॉम्बस्फोटाने उडवून देण्यात आली आणि स्वत:चा काहीही दोष नसलेले पाचही चिनी कामगार भर दुपारी किडामुंगीसारखे मरून पडले. याआधी गेल्या बुधवारी, २० मार्च रोजी ग्वादर बंदरापासून सात कि.मी.वरल्या चिनी मालगोदामाच्या प्रवेशदारावर स्फोटकांनी भरलेली मोटार धडकवण्यात आली, त्यात पाच सुरक्षा रक्षक आणि आठही हल्लेखोर यांचा मृत्यू होऊनसुद्धा, चिनी आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मात्र ‘स्फोटकांचा पूर्ण भडका रोखण्यात तात्काळ यश मिळवण्यात आले’ अशा बातम्या दिल्या होत्या!

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

हेही वाचा : मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?

पााकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दुसऱ्या हल्ल्याबद्दलही अशीच अर्धवट माहिती दिली आहे. याचे ठिकाण होते ‘पीएन्एस सिद्दीक’ हा पाकिस्तानी नौदलाचा तुरबत या शहरानजीकचा हवाई तळ. या तळावर २५ मेच्या सोमवारी रात्री कथित अतिरेक्यांनी बंदुकांच्या फैरी झाडल्या, स्फोटही घडवले. त्यात सहा अतिरेकी ठार झाल्याचे पाकिस्तानी नौदलातील माहीतगार सांगतात, पण ‘या तळावरील हल्ला अयशस्वी ठरवण्यात आम्ही यश मिळवले’ एवढेच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या ‘पीएन्एस सिद्दीक’ तळावर चिनी ड्रोन तैनात असून त्यांचा नित्य वापर टेहळणीसाठी केला जातो, हे लष्करी जाणकारांना आधीपासूनच माहीत आहे. हल्ल्यात नौदलाच्या मालमत्तांचे काही नुकसान झाले का, असल्यास किती, याची माहिती मात्र कोणीही देत नाही.

याउलट, ‘अशा हल्ल्यांमुळे चीन-पाकिस्तानच्या संबंधांत अजिबात बाधा येणार नाही’ हे पालुपद मात्र चिनी आणि पाकिस्तानी उच्चपदस्थांकडून आठ दिवसांत तीनदा आळवले गेले. प्रत्येक हल्ल्यानंतरचा हा जणू राजशिष्टाचारच ठरतो आहे, कारण याच खैबर-पख़्तूनख्वा भागात २०२१ साली स्फोटाने बसगाडी उडवून देणारा हल्ला घडला, त्यातील १३ मृतांपैकी नऊ चिनी कामगार होते, तेव्हाही मैत्रीच्या आणाभाका घेण्यापलीकडे कोणतेही विधान ना पाकिस्तान्यांनी केले होते, ना चिन्याांनी! या हल्ल्यामागे जर बलोच स्वातंत्र्यवादी गट असतील तर केवळ बंदुकीने त्यांचा बंदोबस्त होणार का, हा प्रश्न – आणि अर्थातच ‘होणार नाही’ हे त्याचे उत्तर- पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सरकारचे उच्चपदस्थ वर्षानुवर्षे टाळत आलेले आहेत.

हेही वाचा : या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

अशा स्थितीत चीनने तरी आपल्या पंखाखालच्या पाकिस्तानला, ‘वाटाघाटींनी बलुचिस्तानचा प्रश्न सोडवा’ यासारखे सल्ले द्यायला नकोत? पण तसे होत नाही. खुद्द चीनच लोकशाहीवादी नाही, हे वाटाघाटींचा पर्याय न सुचण्या/ सुचवण्यामागचे एक कारण असू शकते: पण ते काही प्रमुख कारण नव्हे. बलोच राष्ट्रवादी गटांचे संबंध पाकिस्तानी तालिबानांशी (तेहरीक- ए- तालिबान पाकिस्तान’ या संघटनेशी) असल्याचा निराधार आरोप पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांत सूचकपणे केला जाऊ लागला आहे; परंतु या पाकिस्तानी तालिबानांचे चीनमधील विगुर अतिरेक्यांच्या ‘ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट’शी संबंध असल्याचे उघड आहे. बलोच राष्ट्रवादी चळवळ दडपून टाकणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे आणि त्यात आजवर सातत्याने केवळ अपयश आल्यामुळे, तालिबान्यांना एकेकाळी पोसणाऱ्या पाकिस्तानला आता बलोच अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी चीनच्याच तोंडाकडे पाहावे लागणार, हे उघड आहे.

हेही वाचा : वंचित: ताठर की तडजोडवादी?

यादृष्टीने, चीनच्या परराष्ट्र खात्यातर्फे २७ मार्च रोजी प्रसृत करण्यात आलेले पत्रक महत्त्वाचे ठरते. ‘दहशतवादाला चीनचा नेहमीच विरोध होता व राहील आणि दहशतवादाशी लढणाऱ्या पाकिस्तानला चीनचा ठाम पाठिंबा राहील’ असे विधान या अधिकृत पत्रकाच्या चौथ्या परिच्छेदात आहे, शिवाय पत्रकाचा शेवट ‘पाकिस्तानला चीन नेहमीच साथ देईल आणि पाकिस्तानमधील चिनी कर्मचारी, प्रकल्प आणि संस्था यांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी शक्य ते सर्व काही करण्यासाठी दृढ वचनबद्ध राहील’ अशा शब्दांतला असल्यामुळे आता पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे अंकित सरकार हे ज्यांना ‘दहशतवादी’ ठरवेल त्या संघटना वा चळवळींशी लढण्याच्या कामीदेखील चीनचा पैसा वापरला जाऊ शकतो. गेल्या दशकापर्यत पाकिस्तानने त्यांच्यामते दहशतवादी असलेल्यांशी असाच ‘निवडक’ मुकाबला करण्यासाठी अमेरिकेचा आधार घेतला होता, आता त्याजागी चीन आहे आणि त्या दृष्टीने, पाकिस्तानातील चिनी हितसंबंधांवर कोणीही चढवलेल्या हल्ल्यांचा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना लाभच होणार आहे!

भारतातील राजनैतिक निरीक्षकांचे लक्ष या घडामोडींवर असेलच; पण सध्या तरी आपण त्यावर अधिकृत मतप्रदर्शन करण्याचे काहीच कारण नाही.

((समाप्त))