बशीतले पोहे यंत्रवत खाल्ले जात होते आणि कान त्या स्वरांत गुंतले होते.. किशोरीताई गात होत्या..
अवघा तो शकुन। हृदयीं देवाचें चिंतन।।१।।
येथें नसता वियोग। लाभा उणें काय मग।।२।।
छंद हरिच्या नामाचा। शूचिर्भूत सदा वाचा।।३।।
तुका म्हणे हरिच्या दासा। शुभकाळ सर्व दिशा।।४।।
न्याहरी आटोपून वरच्या मजल्यावरील अभ्यासिकेत स्थिरावल्यावरही हाच अभंग ‘अंत:कर्णा’त घुमत होता! लहान मुलानं आईचं बोट घट्ट पकडावं त्या निरागस अनन्यतेनं या शब्दांचं बोट पकडत हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – हाच अभंग घेऊया का?
योगेंद्र – ऐकायला गोड आहे, पण सोपा आहे रे.. त्यात चर्चा ती काय करायची? देवाचं चिंतन करावं, त्याचं नाम घ्यावं, हरिच्या दासाला मग पदोपदी शुभशकुनच आहेत.. एवढाच तर अर्थ आहे..
कर्मेद्र – एवढाच कसा जनाब? सोप्यात सोप्या अभंगाचा कठीणात कठीण अर्थ लावण्यात तुम्ही माहीर आहात.. ती हुश्शार पोरं असतात ना? चार-पाच पुरवण्या जोडल्याशिवाय ज्यांना उत्तरपत्रिका देववतच नाही.. तसे तुम्ही आहातच.. आता पाडा किस.. (हृदयेंद्र हसत त्याच्या पाठीत गुद्दा मारतो.)
योगेंद्र – नाही, मला काय म्हणायचंय? तुकाराम महाराजांचे खरंच असे कितीतरी अभंग आहेत ज्यांचा अर्थ लावण्यातही मोठा आत्मिक आनंद आहे.. ते का नकोत? आणि आता जे तुकाराम महाराज देवाचं चिंतन हाच शुभशकुन मानतात तेच तुकाराम महाराज ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।।’ असं स्पष्ट म्हणतात, त्याची संगती कशी लावायची? जो देव नाहीच त्याचं चिंतन हा शकुन कसा?
कर्मेद्र – ग्रेट योगा तू अजूनही ‘लॉ’ची परीक्षा दे..
हृदयेंद्र – (हसतो) योगा तुझा मुद्दा वरकरणी अगदी चपखल वाटतो, पण उलट त्यामुळेच तर ‘अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन।।’चं गूढ आणि वजन वाढतं बघ! यामुळे ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।।’ या अभंगाचा आणि देवाचाही निर्णय होईल आणि मग खरा शकुनही उकलेल!
कर्मेद्र – म्हटलं ना? आता पुढचे किती दिवस देव-देव करावं लागणार आहे देवच जाणे!
योगेंद्र – पण वरवर पाहता दोन्ही अभंगातले विचार विरुद्ध वाटत नाहीत का? कदाचित दोन्ही अभंगादरम्यान काळाचा फरक पडला असेल..
हृदयेंद्र – कणमात्रही विसंगती नाही.. अरे ज्यांच्या जगण्यातच कधी विसंगती नव्हती त्यांचे अभंगही अगदी सुसंगतच असणार ना? आपण आपल्या तर्कबुद्धीनं त्यात विसंगती कल्पितो.. बरं ते जाऊ दे.. ज्ञान्या तुझ्याकडे तुकाराम महाराजांची गाथा आहे ना?
होकार भरत ज्ञानेंद्र गाथा आणतो. परिशिष्टातून वर्णानुक्रमे अभंगाचा शोध घेतो आणि अभंग गंभीर स्वरात वाचतो. अभंग असा असतो..
आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाहीं ऐसा मनीं अनुभवावा।।१।। आवडी आवडी कळिवरा कळिवरीं। वरिली अंतरीं ताळा पडे।।२।। अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी। रडे मागे तुटी हर्षयोगें।।३।। तुका म्हणे एकें कळतें दुसरें। बरियानें बरें आहाचें आहाच।। ४।।
अभंग वाचला.. एकदा नव्हे दोनदा वाचला.. तरी अर्थ कळेना! हृदयेंद्रनं मग गाथेतला अभंगाचा अर्थ वाचायला सांगितला.
ज्ञानेंद्र – ऐका हं.. खाली अर्थ असा दिलाय.. ‘देव आहे असे वाणीने बोलावे. तो सगुण साकार नाही, तो निराकार आहे असा त्याचा आपल्या मनातील अनुभव घ्यावा. मग जी देहाची देहावर आवड आहे त्यावरच्या आवडीचा, अंत:करणातील अनुभवलेल्या स्वरुपाशी मेळ घ्यावा. पुत्राशी आईची भेट पुष्कळ काळाने होते तेव्हा मुलाचे रडे नाहीसे होते व आनंदाचा त्याला योग होतो. अथवा उभयतांच्या भेटीमध्ये रडणे व हर्षही प्रकट होतात, असा त्यांच्या दर्शनाचा अपूर्व प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात एकाने दुसरे कळते म्हणजे बऱ्याने बरे व खोटय़ाने खोटे समजते.’ झाला अर्थ वाचून..
हृदयेंद्र – अर्थ वाचून तरी अभंग कळला का?
योगेंद्र – नाही, उलट आणखीनच गोंधळ वाढलाय! हृदू महाराजांचं स्मरण करून तूच सांग..
चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
६३. देव-निर्णय
बशीतले पोहे यंत्रवत खाल्ले जात होते आणि कान त्या स्वरांत गुंतले होते.. किशोरीताई गात होत्या..
First published on: 01-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God decision