संत सेना महाराज यांच्याविषयी थोडी माहिती सांगा, अशी विनंती हृदयेंद्रनं बुवांना केली. संत चरित्रांची माहिती कीर्तनकाराइतकी कुणाला असणार आणि त्यांच्या इतकी रसाळपणे कोण मांडू शकणार, असं त्याला वाटलं. त्याचा मनातला भाव ओळखून बुवा सांगू लागले..
बुवा- सेना महाराज हे ज्ञानेश्वर, नामदेव यांच्याच काळातले, पण महाराष्ट्रापुढे सध्याच्या मध्य प्रदेशात राहणारे होते. ते पंढरीची वारी नेमानं करीत आणि त्यांचे सर्वच अभंगही मराठीत आहेत. एका लहानशा संस्थानात बादशहाचे न्हावी म्हणूनही ते काम करीत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्यासह पंढरीतल्या संतांविषयी त्यांच्या मनात मोठी श्रद्धा होती..
योगेंद्र – पण त्या काळी त्यांना संत म्हणून कोणी ओळखत होतं का?
बुवा- बघा.. संतांना प्रत्यक्ष ते असताना ओळखणारे लोक नेहमीच फार थोडे असतात.. ज्याला खरी आध्यात्मिक ओढ आहे त्याला ते प्रकर्षांनं ओळखू येतात..
बरं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरनाथ, सोपानदेव काय साधे होते? जणू शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेवाचेच अवतार ते! स्वत: सेना महाराजांनीच तसं वेगवेगळ्या अभंगांत स्पष्ट सांगितलंय.. ऐका हं..
‘‘शिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दातार।।’’
मग म्हणतात,
‘‘विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर।। चला जाऊ अळंकापुरा। संतजनाच्या माहेरा।।’’ आणि सोपानदेवांविषयी म्हणतात की, ‘‘ब्रह्मियाचा अवतार। तो हा सोपान निर्धार।।’’
आणखी एका अभंगात म्हणतात, ‘‘वैकुंठ वासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली।। शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई। ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाही।।’’
या सर्वाच्या रूपानं ‘जगी पूर्णब्रह्म अवतरले’ हा त्यांचा भाव होता..
ज्ञानेंद्र – मुळात अवतार कल्पना वास्तविक आहे का, हाच माझा प्रश्न आहे.. एखादा सत्पुरुष त्याच्या परीनं श्रेष्ठ आहे, मग त्याला ‘अमक्याचा अवतार’ हे लेबल कशाला?
योगेंद्र – पण तरीही आई-वडिलांचं नाव विठ्ठल आणि रुक्मिणीचं स्मरण साधणारं असावं आणि ज्ञानाच्या सोपानानं अज्ञानातून निवृत्त होत मुक्त होता येतं, या तत्त्वज्ञानाचाच प्रत्यय देणारी ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्ती, मुक्ताबाई ही त्यांच्या मुलांची नावं असावीत, हेदेखील विलक्षणच नाही का?
हृदयेंद्र- ‘जगी पूर्णब्रह्म अवतरले’ हा चरण मला फार विशेष वाटतो.. ‘गुरु: साक्षात् परब्रह्म’ या नाथपंथालाही आत्मीय असलेल्या ‘गुरु गीते’तल्या श्लोकाचंच त्यात प्रतिबिम्ब आहे..
बुवा- अगदी बरोबर.. आणि या सर्वाकडे सेना महाराज गुरू म्हणूनच पाहात होते.. भावोत्कट शब्दांत ते म्हणतात- ‘ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू। उतरील पैल पारूं ज्ञानदेव।। ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता। तोडील भवव्यथा नारायणा।। ज्ञानदेव माझे सोयरे धायरे। जिवलग निर्धारे ज्ञानदेवा।।सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान। दाविली निजखूण ज्ञानदेव।।’
हृदयेंद्र – इथेही ‘खूण’ आलीच..
बुवा- (हसतात) तीक्ष्ण बुद्धी आहे तुमची..
बरं.. ‘‘वाचे सोपान म्हणता। चुके जन्म मरण चिंता।।’’ आणि ‘‘निवृत्ति निवृत्ति। म्हणता पाप नुरेची।।’’ हा भाव होता त्यांचा..
‘‘येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर। तयाचा संसार सुफळ झालागे माये।। प्रत्यक्ष परब्रह्म येऊनि अवतारासी। तारिले जगासी नाममात्रे।। जयाचे आंगणी पिंपळ सोनियांचा। सिद्ध साधकाचा मेळा तेथे।। तयाचे स्मरणे जळती पातके। सांगत पंढरीनाथ सेना म्हणे।।’’
म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन काय साधलं पाहिजे, हा जन्म कशानं सफल होईल, याचं पक्क मार्गदर्शन आले यात.. देणारा तो देव आणि आत्मज्ञानाची जाणीव जो देतो तो ज्ञानदेव म्हणजे सद्गुरूच! या जाणिवेइतकं मोठं दान जगात नाही.. या पूर्णदाता सद्गुरूच्या बोधानुरूप जगणं हाच भवसागर तरून जाण्याचा उपाय आहे!
चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2015 रोजी प्रकाशित
१३७. ज्ञान-देव
संत सेना महाराज यांच्याविषयी थोडी माहिती सांगा, अशी विनंती हृदयेंद्रनं बुवांना केली. संत चरित्रांची माहिती कीर्तनकाराइतकी कुणाला असणार आणि त्यांच्या इतकी रसाळपणे कोण मांडू शकणार, असं त्याला वाटलं.
First published on: 14-07-2015 at 04:09 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance of god