एक ऑगस्ट ही ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. त्यांना जाऊन आज १२२ वर्षे होत आहेत आणि उच्चशिक्षणही मराठीसारख्या देशी भाषांतून असावे काय, याबद्दल टिळकांनी मांडलेले विचार १२८ वर्षांपूर्वीचे आहेत! त्यानंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्रात नव्या विद्यापीठांचा उदय आदी अनेक घडामोडी घडून गेल्या असल्या तरी इंग्रजीकडे ओढा कायम आहे… तो असणारच, हे नेमके ओळखणारी चर्चा टिळकांच्या ‘देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें काय केलें पाहिजे ?’ या लेखात आढळते. ‘केसरी’मध्ये हा लेख ६ मार्च १८९४ रोजी प्रकाशित झाला, तो ‘केसरी मराठा संस्था प्रकाशन’ने १९३० साली काढलेल्या ‘लो. टिळकांचे केसरीतील लेख’ या ५९० पानी ग्रंथात (पृष्ठ क्र. १५५ ते १६० वर) ग्रथितही झाला आणि ‘मराठी विकिपीडिया’ समूहांनी ‘विकिस्रोत’ या उपक्रमाद्वारे या लेखासह त्या ग्रंथाचेच डिजिटलीकरण केले! त्या लेखाचा हा संपादित भाग (शुद्धलेखन मूळ उताऱ्याप्रमाणे)
देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें काय केलें पाहिजे ?




युनिव्हर्सिटीत देशी भाषाचा प्रवेश होऊन इंग्रजी, संस्कृत वगैरे प्रगल्भ भाषांच्या बरोबरीनें त्यांस स्थान मिळाल्यानें त्यांचा उत्कर्ष होऊन एका प्रकारें भाषोत्कर्षाबरोबरच देशोन्नतिही होणार आहे असा पुष्कळाचा समज आहे व तो बऱ्याच अंशीं विचारार्हही आहे, तथापि ही स्थिति साध्य होण्यास ज्या साधनाची अपेक्षा आहे तीं सर्व आपल्यापाशीं आहेत की नाहींत याचा विचार करूं लागले म्हणजे मन थोडेंसे उदासीन होतें. सगळ्या हिंदुस्थानचा विचार सोडून देऊन उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र भाषेचाच आपण विचार केला तर आजपर्यंत स्वराज्य असते तर तिची काय स्थिति झाली असती याची आपणांस सहज कल्पना करता येईल; येथील लोकांस प्राच्य विद्या शिकवाव्या किंवा पाश्चिमात्य विद्या शिकवाव्या याबद्दल सन १८३३ सालीं जो मोठा वाद झाला व ज्या वादांत मेकाॅलेसाहेबानीं एक सणसणीत व जोरदार मिनिट लिहून सर्व हिंदुस्थानच्या रहिवाशांस पाश्चिमात्य विद्यांचे इंग्रजीतूनच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन केले, त्या वादाचा निकाल केवळ इंग्रजी भाषेच्यातर्फेच स्वराज्य कायम असतें तर आम्ही केला असता असें आम्हास वाटत नाहीं.
पाश्चिमात्य ज्ञान इकडील ज्ञानापक्षी सर्व अंशी श्रेष्ठ आहे असें जरी कबूल केलें तरी ते ज्ञान देशी भाषाच्याद्वारें आम्हास देण्यास कोणची हरकत होती? ‘कोर्टात’, ‘हपिसात’, ‘रिपोर्टात’, ‘कॉलेजात’ आणि ‘रेल्वेत’ मराठीनें किंवा दुसच्या कोणच्याही देशभाषेर्ने निर्वाह करता आला नसता असें नाहीं. परंतु आमचे राज्यकर्ते परकीय पडल्यामुळे त्यांच्या राज्यव्यवस्थेच्या सौकयीकरिता हिमालयापासून तो केपकुमारीपर्यंत सर्वत्र राज्यकारभार इग्रजीत चालू केला व आम्ही ताबेदार पडल्यामुळे आम्हांस ही गोष्ट अमलात आलेली हळूहळू बरी वाटू लागली. सर्व हिंदुस्थान देशातील निरानराळ्या प्रांतांतल्या लोकांचे दळणवळण वाढण्यास व राष्ट्रीय सभेसारख्या संस्था उत्पन्न होण्यास आणि चालविण्यास मेकॉलेसाहेबाच्या मिनिटानें प्रचारांत आलेल्या इग्रजी भाषेने पुष्कळ साहाय्य झाले व होत आहे ही गोष्ट उघड आहे. पण एकाचा लाभ तर दुसऱ्याचा तोटा या न्यायानें आम्हांस जो हा फायदा मिळाला त्याचा वचपा देशी भाषांवर निघून त्या हळूहळू मागे पडत चालल्या आहेत. व सर्वत्र व्यवहार इंग्रजीत चालू लागल्यामुळे देशी भाषेत केोणी उत्तम ग्रंथ लिहीत नाहीत, व्याख्याने देत नाहींत व भाषणेही करीत नाहीत. ही स्थिति सुधारून युरोपातील भाषाप्रमाणे देशी भाषाची सुधारणा होण्यास कोणते उपाय करावे इकडे कित्येक लोकाचे लक्ष लागले आहे ही मोठया सुदैवाची गोष्ट आहे.
युनिव्हर्सिटीची व्यवस्था बहुतेक युरोपियन लोकांच्याच हातात आहे असे म्हटले तरी चालेल. … … मराठी भाषेचा गौरव करणारे सेनेटर आमच्या युनिव्हर्सिटीत फारसे सापडावयाचे नाहीत. हें आम्ही नेहमीं लक्षात ठेविले पाहिजे. कोणतीही भाषा प्रगल्भदशेस येण्यास तिचा बाजारात, न्यायभाषेत, दरबारात वगैरे सर्व ठिकाणी अप्रतिहत संचार सुरू असला पाहिजे आमच्या देशी भाषास तशी सवलत हल्लीच्या राजकीय स्थितीत मिळणे शक्य दिसत नाही. पंजाबच्या युनिव्हर्सिटींत सर्व विषय देशी भाषांत शिकवून, व आमचेकडे ज्याप्रमाणे परीक्षेस संस्कृत ठेविले आहे तशा रीतीनें इंग्रजीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांस बी. ए. ची पदवी देणारी एक शाखा आहे. पण सर्व विषय इंग्रजीत शिकून बी. ए. च्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षां असल्या प्राच्य बी. ए. चे महत्त्व कमी मानीत असल्यामुळे या शाखेंत जितके विद्यार्थी परीक्षा देतात त्यापेक्षा इंग्रजी शाखेत परीक्षा देणारांची सख्या पुष्कळ पटीने अधिक असते.
कोणत्याही भाषेत चागली ग्रंथरचना होण्यास (१) शब्द सामुग्री, (२) विनारसंग्रह आणि (३) ग्रंथाची जरूरी या तिन्ही साहित्यांची अपेक्षा असते. पैकी पहिले साधन बहुतेक अशी आमच्या देशातील जुन्या भाषाच्या अभ्यासानेंच प्राप्त होणार आहे. विचाराचा साठा बयाच अंशीं पाश्चिमात्य ग्रंथकारांकडून आपणास उसना घेतला पाहिजे. पण हे उसने विचार इकडील लोकास ग्राह्य होण्यास त्याची व जुन्या विचाराची सांगड घालून दोघासही इकडील पोषाख दिला पाहिजे. ही गोष्ट आमच्याकडील संस्कृतादि जुन्या भाषांचा ज्यास चांगला परिचय नाहीं त्याच्या हातून चांगलीशी वठेल असे आजपर्यंत घडलेल्या हकीकतीवरून आम्हास वाटत नाही. लॅटिन आणि ग्रीक या भाषाचे अध्ययन विलायतेंतल्या युनिव्हर्सिटींतून आता चालू ठेवण्याची काहीं जरूर नाहीं अशी विलायतेत हल्ली चळवळ सुरू आहे; पण ती न्याय आपणास इकडे लागू करितां येत नाहीं. लॅटिन व ग्रीक भाषाची इंग्रजीस जी मदत झाली आहे तितकी संस्कृतादि प्राच्य भाषाची आमच्या देशभाषास झाल्यावर या प्रश्नाचा आम्हास विचार करितां यईल. हल्लींच्या स्थितीत देशी भाषांची आणि त्याच्या मातुश्रीची फारकत करून देणें आम्हास सर्वोंशीं आहितकारक आहे. राज्यपद्धतीमुळे इंग्रजीचे आणि देशी भाषा प्रौढ दशेस आल्या नसल्यामुळे संस्कृतादि प्राच्यभाषांचे ज्ञान संपादन करणें आम्हास अशक्य आहे हें वरच्या विवेचनावरून वाचकाच्या लक्षांत येईल. आता संस्कृत आणि इंग्रजी यांचे ज्ञान संपादन करून महाराष्ट्रादि देशभाषांचे ज्ञान संपादन करणे किती शक्य आहे अशा दृष्टीनें जरी या प्रश्नाचा विचार केला तरी युनिव्हर्सिटीच्या हल्लींच्या अभ्यासक्रमांत पुष्कळच सुधारणा करिता येण्यासारखी आहे असे आढळून येतें.
मॅट्रिक्युलेशन परिक्षेस लागणारे विषय देशी भाषांतून विद्यार्थ्यांस समजून देऊन पुढे दोन तीन वर्षे त्यांजकडून इंग्रजी भाषेचा अभ्यास करविला तर विद्यार्थ्यांवरील परीक्षेचे ओझें बरेंच हलकें होईल असें पुष्कळ अनुभविक लोकांचे मत आहे; परंतु अशा प्रकारची व्यवस्था नसल्याचा दोष प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीकडे येत नाही. मॅट्रिक्युलेशनपर्यंत अभ्यासक्रम कसा चालवावयाचा याची व्यवस्था व नियम विद्या खात्याकडून होत असतात, सबब ते भाग सोडून देऊन वरच्या परीक्षेसंबंधानेंच आपण येथे विचार करूं.
महाराष्ट्रादि देशभाषांतून ज्या प्रकारचे ग्रंथ होणे आवश्यक आहे तशा प्रकारचे ग्रंथ केवळ देशी भाषांतील जुन्या ग्रंथाच्या अध्ययनाने निर्माण होतील असें आम्हांस वाटत नाहीं. उदाहरणार्थ, आपण मराठी भाषा घेतली तरी केवळ मोरोपंत, वामन वगैरे कवींच्या ग्रंथावाचून शिल्पशास्त्र, अर्थशास्र, रसायनशास्र इत्यादि उपयुक्त विषयावर मराठीत ग्रंथ पाहिजे आहेत असें नेटिव्ह प्रेसचे रिपोर्टर रावसाहेब साठे याचे म्हणणे आहे. असे ग्रंथ हाण्यास फारशी मदत होईल असें दिसत नाही. मराठी कवीचे ग्रंथ इंग्रजी अगर संस्कृत कवींच्या ग्रंथाप्रमाणें परिक्षेस नेमण्याच्या योग्यतेचे नाहीत असे आम्ही म्हणत नाहीं, परंतु ज्या हेतूसाठी मराठी भाषेचा युनिव्हर्सिटीत प्रवेश व्हावा असे लोकांचे म्हणणे आहे, तो हेतु सिद्धीस जाण्यास देशी भाषातील जुन्या कवीचे ग्रंथ विद्याथ्यांकडून घोकविण्यापेक्षा निरनिराळ्या शास्त्रीय विपयाचा अभ्यास व मनन देशी भाषांतून त्यांचेकडून करविल्यास जास्त उपयोग होईल हे उघड आहे. उपयुक्त विषयांवर देशी भाषांतून आधुनिक विद्वानाकडून व्हावे तितकें ग्रंथ होत नाहीत, व युनिव्हर्सिटीकडून अशा प्रकारच्या ग्रंथरचनेस जितके उतजन मिळावें तितकें मिळत नाहीं असा रावसाहेब साठे यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पुष्कळ अंशीं खरा आहे हे आम्ही वर लिहिलेंच आहे परंतु हा दोष काढून टाकण्यास अगर ही स्थिति सुधारण्यास युनिव्हर्सिटीखेरीज इतर संस्थानी व लोकांनीही प्रयत्न केला पाहिजे हें आम्हांस विसरता कामा नये.
आधुनिक विद्वानानीं उपयुक्त विषयावर ग्रंथ लिहिण्याचे मनांत आणले तर त्या सर्वोच्या छपाईचा खर्च ग्रंथांची विक्री होऊन निघेल कीं नाही याची आम्हांस थेोडीशी शंकाच वाटते. कोणत्याही भाषेत ग्रंथसंग्रह होण्यास ग्रंथाची जरूरी अथवा खप हें एक अंग आहे असें वर सांगितलेंच आहे. जो माल खपतो तो पिकतो असा जो सर्वसामान्य नियम आहे तोच ग्रंथरचनेसही लागू पडतो. परंतु असे जरी आहे तरी युनिव्हर्सिटींत निदान कांहीं विषयाचे अध्ययन देशी भाषांतून झाल्यानें त्या भाषांस थोडेंबहुत तरी खास उत्तेजन मिळेल अशी आमची समजूत आहे. इंग्रजी भाषा आजमितीस जी इतकी सुधारली आहे त्याचे कारण शेक्सपियर व मिल्टन होत असें जर कोणी म्हणेल तर तें अगदी चुकीचे आहे. इतिहास, शास्त्रे , कला, इत्यादिकांचा अभ्यास आणि सर्व जगभर पसरलेला इंग्रजांचा व्यापार आणि राज्य, त्याचे सर्व व्यवहार इंग्रजी भाषेतच होत असल्यामुळे त्या भाषेच्या अंगी सहजच प्रौढपणा व व्यापकता हे दोन गुण आले आहेत, व ते गुण तितक्या अंशानें देशी भाषेत येण्यास तसे व्यवहार देशी भाषेतून होऊं लागले पाहिजेत हें उघड आहे.
इतके व्यवहार देशी भाषांतून होऊं लागणे आज शक्य नाहीं हें वर सागितलेंच आहे, तथापि युनिव्हर्सिटीने ती गोष्ट मनात आणून काही उपयोग नाहीं. हल्लीच्या राज्यपद्धतीमुळे इंग्रजीचे जितके ज्ञान संपादन करण्यास विद्यार्थ्यांस आवश्यक आहे तितकें विद्यार्थ्यांस मिळतें की नाही हे पाहून नंतर बाकीच्या काही विषयाची परीक्षा देशी भाषातून घेण्यास युनिव्हर्सिटीस काही हरकत आहे असे आम्हास वाटत नाहीं. निरनिराळ्या विषयांवर व्हावे तसे अद्याप ग्रंथ झाले नाहींत हे खरें आहे. पण पाचपन्नास वर्षापूर्वी विलायतेंतही अशाच प्रकारची स्थिति होती, व अद्यापही पुष्कळ विषयाचे अध्ययन जर्मन व फ्रेच ग्रंथावरून करून त्याचीं उत्तरें विलायतेंतील विद्यार्थ्यांस इंग्रजी भाषेत लिहावी लागतात. मग आमच्याकडेच असा प्रकार कां होऊं देऊं नये हें आम्हास कळत नाही. निदान हिदुस्थानचा इतिहास, संस्कृत वगैरे विषयांचीं उत्तरे देशी भाषेत लिहूं देण्यास तर कोणताच प्रत्यवाय दिसत नाहीं. आतां युनिव्हर्सिटीची रचना पाहता ही गोष्ट आजच साध्य होईल असे दिसत नाहीं, तथापि जर वर सागितल्याप्रमाणे सुधारणा होणें इष्ट असेल तर त्या दिशेनें जाण्याचा एव्हांपासून थोडथोडा प्रयत्न केला पाहिजे.
पंजाबात ज्याप्रमाणें देशी भाषातून शिकून तयार झालेले बी. ए. व इंग्रजीतून शिकून तयार झालेले बी. ए. असा भेद आहे, व त्या भेदामुळे त्याची योग्यता कमी जास्ती समजतात तशा प्रकारचा भेद आमच्याकडे न होईल तर बरें. म्हणजे अर्थातच सर्व विषय देशीं भाषांतून शिकवावे अगर विद्यार्थ्यांस त्यांचीं उत्तरें देशी भाषांतून देण्यास सांगावी असा नियम करण्यास युनिव्हर्सिटीस आम्हांस सांगतां येणार नाहीं, पण त्यामुळे एक दोन अथवा दोन तीन विषयांचीं उत्तरें विद्यार्थ्यांस देशी भाषेत लिहिण्यास सांगण्यास कांहीं अडचण येते असें आम्हांस दिसत नाहीं. करितां इंग्रजी व संस्कृत या भाषाच्या ज्ञानाची यत्ता कमी न करितां एक दोन विषय देशी भाषेतून शिकविण्याची जर कॉलेजांतून सोय करितां आली तर सदर भाषास उत्तेजन देण्याचे कामीं युनिव्हर्सिटीनें आपलें कर्तव्य केलें असें होईल अशी आमची समजूत आहे. म्हणून युनिव्हर्सिटींत देशी भाषांचा प्रवेश करण्याबद्दल जी हल्ली खटपट सुरू आहे तीस होईल तितके करून अशा प्रकारचे वळण द्यावें अशी आमची सूचना आहे.
(केसरी-ता, ०६ मार्च १८९४)
मूळ लेखासाठी लिंक – https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:लो.टिळकांचेकेसरीतील_लेख.pdf