सुसाट वेगात, शहरी अथवा कोणत्याही रस्त्यावर गाडी पळवत प्रतिस्पध्र्याना मागे टाकणारा नायक ही त्याची पडद्यावरली प्रतिमा. रुपेरी पडद्यामागे तो अखेर एक अभिनेताच होता. वेगावर स्वार होण्याचीच भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याचे आयुष्य वेगाशीच जोडले गेले होते.. इतके की, ते अकाली संपले तेही वेगामुळेच. ‘द फास्ट अॅण्ड द फ्यूरियस’ या चित्रपट मालिकेच्या प्रत्येक भागात पडद्यावरचा ब्रायन ओकॉनर म्हणजे पॉल वॉकर याच्या मृत्यूची ही कथा चटका लावणारी आहे. इतकी की, शनिवारी झालेल्या त्याच्या त्या अपघाताबद्दलचे सारेच नेहमीचे प्रश्न त्या चुटपुटीमुळे झाकोळले गेल्यासारखे झाले. अपघात झाला तेव्हा रॉजर रोडाज गाडी चालवत होता आणि वॉकर त्याच्या शेजारी बसला होता. रोडाज हा वॉकरचा जिगरी मित्र आणि व्यवसायातला त्याचा सहकारी. या दोघांचा व्यवसायदेखील शर्यतीच्या गाडय़ांशीच संबंधित होता. रोडाजने नेमक्या किती वेगावर गाडी हाणली, ती रस्त्यावरून फेकली जाऊन तिने पेट घेतला आणि तिचा चेंदामेंदाही झाला तेव्हा ती कशी उडून आदळली. दोघांचे मृतदेहसुद्धा ओळखूच येऊ नयेत इतकी भीषण परिस्थिती नेमक्या कोणत्या कारणामुळे आली- मानवी चुकीमुळे की तांत्रिक दोषामुळे, हे प्रश्न एरवी महत्त्वाचेच. पण पॉल वॉकरच्या मृत्युवार्तेपुढे ते फिके ठरले. अमिताभशी तुलना व्हावी, इतका मोठा वॉकर कधीच नव्हता. पण आपला अमिताभ एके काळी जसा सामान्य माणसाच्या हातात नसलेल्या गोष्टी पडद्यावर करून दाखवायचा. तसाच पॉल वॉकरने ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस’ या चित्रपटाच्या सहाही भागांत साकारलेला ब्रायनही, बेफामपणे जगण्याच्या तमाम आकांक्षांवर तरुणांना स्वार करायचा. कल्पनातीत वेगाने गाडी पळवूनही ब्रायन कधी माजोरडा वाटत नसे, उलट फास्ट-मालिकेतील नेहमीच्या अन्य पात्रांपेक्षा तोच अधिक शांत, संयमी आणि मुख्य म्हणजे अगदी साधासा दिसणारा. जगभरच्या उभरत्या मध्यमवर्गीय तरुणाला जे वेगाचे आकर्षण आज आहे, त्या साऱ्या तरुणांसारखाच साधा; पण गाडी हातात आल्यावर राजा. आपल्याकडच्या तरुणाईसाठी हे सारे नवीनच होते. वेगाच्या दुनियेची ही कल्पनातीत सफर अनेकांना भूरळ पाडणारी होती. याच प्रेक्षकवर्गाला असलेल्या वेगाच्या स्वप्नांवर स्वार होऊ पाहणारी कथानके आणि वाहन उद्योगातल्या तंत्रज्ञानाचे भरभक्कम पाठबळ अशा भांडवलावर ‘द फास्ट अॅण्ड द फ्यूरियस’ हा २००० सालचा चित्रपट तुफान चालला होता. मग अमेरिकी व्यावसायिकतेप्रमाणे लगोलग त्याच्या आवृत्त्या निघाल्या- टू फास्ट, टू फ्यूरियस हा दुसरा भाग, मग तिसरा, चौथा करीत सहाव्या भागापर्यंत या लोकप्रियतेने मजल मारली. प्रत्येक भागागणिक, त्या त्या भागात वापरल्या गेलेल्या गाडय़ांचीही लोकप्रियता वाढू लागली. या सर्व गाडय़ा ‘टय़ूनर कार’ किंवा भारतीय लोक इंग्रजीत ज्याला मॉडिफाइड म्हणतात, त्या प्रकारच्या- इंजिनापासून आकारापर्यंतचे अनेक बदल करवून घेतलेल्या असत. बाकी कथा सगळी एखाद्या मारधाडपट वा पाठलागपटाची असते, त्याच वकुबाची. वॉकर हा या मालिकेतील नायक ठरणारा अभिनेता, पण हॉलीवूडच्या तारामंडळाइतका उच्चभ्रू दर्जा त्याने अद्याप मिळवला नव्हता याचेही कारण हेच- पाठलागपट. फास्ट अॅण्ड फ्यूरियसचा नवा भाग आला की चर्चा असे ती वॉकरची किंवा त्याच्या भूमिकेची नव्हे.. त्याच्या गाडीचीच. पण तो गेला, तेव्हा मात्र त्याच्या ‘पोर्श- करेरा जीटी’ या गाडीपेक्षा त्याची चर्चा होते आहे. तीही विरेल. चित्रपटाचा सातवा भाग निघेल आणि हा मृत्यू म्हणजे बेफामपणाला स्वल्पविरामही नव्हता, हेच लक्षात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2013 रोजी प्रकाशित
बेफामपणाला स्वल्पविराम?
सुसाट वेगात, शहरी अथवा कोणत्याही रस्त्यावर गाडी पळवत प्रतिस्पध्र्याना मागे टाकणारा नायक ही त्याची पडद्यावरली प्रतिमा. रुपेरी पडद्यामागे तो अखेर एक अभिनेताच होता.

First published on: 03-12-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood star paul walker dies in car crash