पाश्चात्त्य सभ्यतेला सतानी म्हणून त्याज्य ठरविणारे कोणीही, या आयत्या आधुनिकतेचा एकही फायदा घ्यायला चुकत नाहीत. मानवी प्रगती पूर्वसुरींच्या खांद्यावर उभे राहायला मिळणे या अ‍ॅडव्हान्टेजनेच होत असते. प्रगतीमध्ये वडीलकीचा मान पाश्चात्त्यांनी मिळवला याचे आपण किती वैषम्य वाटून घेणार? वर्णव्यवस्थेमुळे विद्वान, कारागीर व व्यापारी हे कधीच एकत्र आले नाहीत हा आणि इतर अनेक दोष पाश्चात्त्यांवर कसे थोपता येतील?
कोणतीही गोष्ट, ‘कुठून’ आली वा ‘कुणाला’ सुचली, या आधारे ती त्याज्य वा ग्राह्य़ ठरविणे हा मोठाच वैचारिक प्रमाद आहे. त्या गोष्टीचे आता इथे आणि आपल्याला औचित्य काय? याचाच निखळ विचार झाला पाहिजे. कोणाचे पूर्वज थोर? आणि कोणाचे पूर्वज चोर? हे ठरवत बसण्यापेक्षा, आता आपण पूर्वज-पूर्वज खेळण्याइतके लहान राहिलेलो नाही, प्रौढ झालो आहोत हे अगोदर गंभीरपणे आत्मसात केले पाहिजे. आपल्याला जवळच्या कोणाही/कशाहीबाबत ममत्व वाटणे साहजिक आहे. ‘अरे तुम्ही तर आमचे गाववालेच निघालात!’ हे बरे वाटते. गावाच्या जागी कोणतीही भौगोलिक-ऐतिहासिक वगरे गोष्ट असू शकते. पण जर हा ‘आपला’ काही तरी फसवी योजना गळ्यात मारू पाहील तर भीडभाड नको आणि कोणी ‘परका’ काही मोलाचे सांगत असेल तर कान बंद व्हायला नकोत. ममत्व हे हितबुद्धीच्या व सत्यनिष्ठेच्या आड येता कामा नये.
लसीबरोबर अश्वगंधा परिणामकारक ठरतेय हे उत्तमच आहे. तिच्यातला कोणता मोलेक्यूल इम्यून सिस्टीममध्ये कुठे व काय करतो ही जिज्ञासा टिकली पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक व आयुर्वेद परंपरेचाही अभिमान वाटणार हेही स्वाभाविक आहे. पण विशेष आनंद याचा आहे की हे संशोधन जागतिक विज्ञानाच्या कसोटीत बसून शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेच्या नियमांनुसार त्याला पेटंटही मिळाले आहे.
ज्ञानावर स्वामित्व-अधिकार मिळणे (पेटंट) व काही मुदतीपर्यंत उत्पादनाचाही एकाधिकार मिळणे ही गोष्ट ‘जागतिकीकरण-विरोधकांनी’ िनदनीय ठरविली होती. संशोधनावर खर्चही येतो व हा खर्च वसूल झाला नाही तर संशोधन चालणार कशाच्या जिवावर? ज्यांना त्यातूनही ज्ञान ही क्रयवस्तू नसावी व ती सर्वाना द्यावी असे वाटत व परवडत असेल त्यांना, ते ज्ञान खुले करण्यापासून, पेटंट पद्धती रोखत नाही. इतकेच नव्हे तर पेटंटची मुदत संपल्यावर ते ज्ञान अखिल मानवजातीचे होतेच. पण ज्ञान आपल्यापुरतेच ठेवायचे, स्वत:ही उत्पादन करायचे नाही आणि इतरांनाही करू द्यायचे नाही अशा निष्काम-कृपणतेवर मात्र पेटंट पद्धतीमुळे बंदी घातली जाते. पेटंट घेऊन न वापरण्याचा हक्क नसतो व ते न घेतल्यास इतरांना ते चोरायची मुभा राहते! म्हणजेच पेटंट पद्धती ही एका अर्थी ‘ज्ञान उघड करण्याची सक्ती’च आहे! अनेक उत्पादने अचानक स्वस्त होतात ती मुदत संपल्यामुळेच. संशोधकाचे श्रेय आणि अखिल मानवजातीचे हित असे दोन्ही पाहणारी ती विवेकपूर्ण पद्धती (पूर्णत: दोषरहित नसेलही) आहे. याउलट आपल्याकडे ज्ञान गुप्त ठेवण्याची पद्धती होती. कित्येक ज्ञाने गुप्त ठेवून ठेवून लुप्त झाली व कोणालाच उपयोगी आली नाहीत. ज्ञाने लुप्त झाली? की ती नव्हतीच हेच खरे गुपित होते? पण पेटंट पद्धतीमुळे असला गोलमाल आता चालणार नाही.
‘गतवैभवा’तील तंत्रे कोणती?    
राइट बंधूंच्याही अगोदर ‘.. बापूजी तळपदे’ यांनी मुंबईच्या चौपाटीवर विमान उडवण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या केला होता म्हणे. हा दावा डॉ. प्र. न. जोशी यांच्या विज्ञानकथा नामक पुस्तकात आहे. दुसरीकडे रसेश्वरदर्शन म्हणून एक दर्शनही आहे. त्यातील मोक्षप्राप्तीचा मार्ग चक्क ‘रसायनाचे सेवन करून’ असा आहे. मौज अशी की, तळपदे यांचे विमान उडवण्याचे इंधन आणि मोक्षदायक औषध ही दोन्ही, पारा आणि अभ्रक यांच्याच संयोगाने बनतात! आधुनिक रसायनशास्त्रानुसार या जोडीत कोणतीच आंतरक्रिया होत नाही. ना इंधन बनते ना मेंदू-रासायनिक संयुग! नेहमीप्रमाणेच दोन्ही दाव्यांचे डॉक्युमेन्टेशन कुठेच मिळत नाही.
डॉक्युमेन्टेशन म्हणताच ‘तक्षशीला आणि नालंदा यवनांनी जाळल्या’ हे एकच उत्तर मिळते. पण एक तर डॉक्युमेन्टेशन ही एक सार्वत्रिक सवय असते. दुसरे म्हणजे यवनांना मुळात पोहोचूच न देणे याबाबत आपण नालायक का ठरलो? ज्या युगात युद्धसज्जता हाच पात्रतेचा निकष होता त्या युगात मोक्षाचेच चिंतन कसे पुरेल? भारताचे तथाकथित गतवैभव कोणाला मिथक म्हणून स्फूर्तिदायक वाटेलही, पण तेवढय़ा भौतिक उपलब्धी झाल्या होत्या, असा गंभीरपणे दावा करणे कठीणच आहे. ह्य़ुएन एत संग असो किंवा वर्णनकार आणखी कोणी असो. उत्पादनक्रियेचे वर्णन त्यातून गायब असते. रत्नजडित सुवर्णालंकार, समजा भरपूर होते. पण उदा. रथाच्या चाकांना बेअिरग कसले? पाणीपुरवठा कसा? अस्त्रांना ऊर्जा कोणती? एक डिझाइन मिळत नाही. शेकडो वष्रे न गंजलेला लोखंडी स्तंभ आहे. पण त्याचे सॅम्पल घेऊन त्यांची मेटलर्जी हुडकण्याची बुद्धी व्हायला २००५ साल उजाडले. बालसुब्रमण्यम यांनी दिलेला ‘खुलासा’ स्तंभ बनवितेवेळी ‘ज्ञात’ होता की अनमानधपक्याने जमून गेले, हे मात्र कळायला मार्ग नाही. ते काहीही असो, सोन्याच्या धुराच्या वारसदारांना चुलीचा धूर स्वयंपाकघरात कोंडू नये यासाठी साधे धुराडे बसवावेसे का वाटत नाही, हा खरा प्रश्न आहे.
ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी मौखिक परंपराच अवलंबिली गेली. ज्ञान घराण्यातच राखणे, अपात्र व अनधिकारी व्यक्तीला ज्ञान न मिळू देणे, या हट्टांपायीसुद्धा लिखित नोंद न ठेवण्याचीच परंपरा राहिली. भारतीयांना लिखित नोंद ठेवण्याविषयीचे जणू वावडेच आहे. अगदी आजही उद्योगांत, शेतीत वा कोणत्याही व्यवहारात काय अडचण आली किंवा काय हुकले व कसा मार्ग काढला हे काटेकोरपणे लिहिले जात नाही. यातून त्या त्या व्यक्तीला प्रासंगिक स्वरूपाचे भान येते, पण हे भान सार्वजनिक स्वरूपाच्या ज्ञानात रूपांतरित होत नाही.
वर्णव्यवस्थेमुळे आणि जातिव्यवस्थेमुळे जी असह्य़ दु:खे भोगावी लागली ती मुखर झाली आहेत. पण या व्यवस्थांमुळे जे सार्वत्रिक तोटे झाले, ते त्यामानाने दुर्लक्षित राहिले. बलुतेदारीने कारागिरांतील स्पर्धाच रोखली. तसेच विद्वान, कारागीर व व्यापारी हे कधीच एकत्र आले नाहीत. त्यामुळे वैचारिकताही कमी पडली. उदाहरणार्थ- घट (मडके) निर्माण होण्यामागची कारणे कोणती यावर जी ‘शास्त्रचर्चा’ आहे तिच्यातून ‘पाणी’ हा घटक आरपार गायब आहे. पंचेंद्रिये येतात पण भूक, तहान, तोल या सर्व गोष्टी ऐंद्रिय-प्रत्यक्षात गणल्याच गेल्या नाहीत. तसेच ‘बल’ (फोर्स) आपल्याला यत्नेन्द्रीय-प्रत्यक्षा (मोटर फीडबॅक)मधून साक्षात कळते. पण शास्त्रांत कधी बल हा ‘पदार्थ’ गणलाच गेला नाही. शास्त्रकारांना भुकेले राहण्याचा वा श्रम करण्याचा प्रसंगच येत नसल्यामुळे तर असे झाले नसेल? चातुर्वण्र्यामुळे, पंडितही आहे आणि कारागीरही आहे असा, लिओनाडरे दा विंची (चित्रकार, धर्मविद्रोही, अनेक यंत्रांच्या कल्पना आकृत्यांसकट काढून ठेवणारा) सदृश कोणी होऊ शकला नाही. औद्योगिक क्रांती झाली नाही.
अभ्युदयात पाश्चात्त्यांचे योगदान
आज आपण वापरत असलेली बहुतेक सर्व तंत्रे, (कॉपी मारून किंवा किरकोळ बदल करून वा विकत घेऊन) पाश्चात्त्यच आहेत. पाश्चात्त्य सभ्यतेला सतानी म्हणून त्याज्य ठरविणारे कोणीही या तंत्रांचा एकही फायदा घ्यायला चुकत नाहीत. लुई पाश्चरने स्वत:च्या जिवाशी खेळून व वेडय़ात काढले जाऊनही जर लसीकरण शोधले नसते तर आपल्यापकी  बहुतेक जण जन्मलेही नसते! विद्युत-ऊर्जा-क्रांतीचा जनक मायकेल फॅरडे रद्दीच्या दुकानात काम करणारा ‘अशिक्षित’ पोऱ्या होता. पोटभर जेवण म्हणजे काय हे त्याला ‘फॅरडे’ होईस्तवर माहीत नव्हते. यात कसली साम्राज्यशाही?
पण पाश्चात्त्यांचे योगदान हे तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. व्यक्तिनिरपेक्ष आणि न्यायदातानिरपेक्ष असे लिखित कायदे आणि न्यायव्यवस्था त्यांचीच आहे. पद्धतशीर ब्युरोक्रसी म्हणजे निवड, बढती, अधिकार-जबाबदाऱ्या, लेखी कामकाज, नियमबद्धता या सर्वानी युक्त अशी यंत्रणाही प्रथम चर्चने विकसित केली होती. लोकशाही आणि तिच्या संस्थांचे प्रयोग युरोप-अमेरिकेने केले. पण ‘पूर्व’गौरवात रमणारे, संसदेला ‘वेश्या व वांझ’, चातुर्वण्र्याला श्रमविभागणी व गावगाडय़ाला खरी लोकशाही समजतात!  त्यांच्याकडे बॅन झालेली फौण्डरी, ‘आपल्यावर थोपली’ असे बोलले जाते. पण वस्तुस्थिती अशी आहे की आयत्या मिळालेल्या फौण्डरीच्या कित्येकपट आरोग्यविघातक फौण्डरी  ‘त्यांनी’ बरीच वष्रे सोसली व तीत चिकाटीने सुधारणा केल्या. फौण्डरीची आजची सौम्य आरोग्यविघातकता ही दारिद्रय़ातून येणाऱ्या विघातकतेपुढे काहीच नाही.  धाकटय़ाला बरेच काही आयते मिळते व मिळावेदेखील. कारण मानवी प्रगती ही मोठय़ाने सोसले अन् धाकटय़ाला लाभले, याच मार्गाने होत असते. वडीलकीचा मान न कमावल्याचे वैषम्य किती वाटून घेणार?
तरीही ज्यांना पश्चिमद्वेष्टे राहायचेच असेल तर त्यांनी पश्चिमेचा किंचितसुद्धा फायदा न घेता जगूनच दाखवावे. अशांसाठी राखीव अभयारण्य सहजच मंजूर करता येईल.
लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com