पक्ष आपल्या तत्त्वांपासून ढळू लागल्याचे अडवाणी यांना नेमके केव्हा लक्षात यायला लागले, हा प्रश्न विचारावयास हवा. प्रत्यक्षात ते आपल्याशिवाय पक्ष चालू शकतो या जाणिवेने अस्वस्थ आहेत आणि वैयक्तिक सत्ताकांक्षेने आंधळे झाले आहेत. खरे तर आपला राग त्यांनी पक्षत्यागातूनच व्यक्त करायला हवा.

भाजपचे एके काळचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी हे भलतेच मेणाच्या हृदयाचे दिसतात. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची सूत्रे त्यांच्या इच्छेविरोधात नरेंद्र मोदी यांना देण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीने घेतल्याने अडवाणी हे विव्हळ झाले आणि त्याच तिरीमिरीत सोमवारी त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांना लिहिलेल्या पत्रात अडवाणी यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सध्या सर्वच नेते पक्षापेक्षा स्वत:साठी काम करू लागल्याची टीका केली. कै. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या काळातील जनसंघापासून आजतागायत आपण पक्षासाठी काम केले, परंतु आताची परिस्थिती आपल्याला सहन होत नसल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून दूर जात असल्याबद्दलही अडवाणी यांच्या पत्रात वेदना दिसते. एकूण जे काही चालले आहे ते काही आपल्याला पाहवत नाही, तेव्हा आपण पक्षातील कार्यकारी पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तत्त्वनिष्ठ गणला जाणारा राजकारणी आपल्याला हवे ते न मिळाल्यास किती दांभिक होतो याचा हे पत्र म्हणजे नमुना ठरेल.
पक्ष आपल्या तत्त्वांपासून ढळू लागल्याचे अडवाणी या पत्रात म्हणतात. तेव्हा ही तत्त्वच्युती अडवाणी यांना नेमकी केव्हा लक्षात यायला लागली, हा प्रश्न विचारावयास हवा. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जनसंघाचा दाखला अडवाणी देतात. तेव्हा त्यांना हे विचारावयास हवे की बाबरी मशीद पाडणे हा जनसंघाचा कार्यक्रम होता काय? तसे असल्यास मुखर्जी यांनी कधी त्यावर भाष्य केले होते काय? तसे नसेल तर हा कार्यक्रम भाजपचा आहे असे मानावयास हवे. तसे मानल्यास भाजप हा मूळ जनसंघाच्या तत्त्वांपासून ढळला असे म्हणावे लागेल. ही पहिली तत्त्वच्युती झाली तेव्हा अडवाणी यांनी त्याचा निषेध केला होता काय? तसा तो करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते काय? नसल्यास त्या वेळी अडवाणी यांना तत्त्वांची जाणीव का झाली नाही? याहूनही अधिक महत्त्वाची बाब ही समान नागरी कायदा आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे ही जनसंघाची प्रमुख राजकीय तत्त्वे होती. या जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाल्यावर आणि त्यातही पुढे सत्ता मिळाल्यावर ही दोन्ही तत्त्वे भाजपने सोडून दिली. परंतु याही वेळी अडवाणी यांना पक्ष तत्त्वांपासून ढळत असल्याचे जाणवले नाही, ते का? की तत्त्वांची आठवण फक्त विरोधी पक्षांतच असताना ठेवावयाची असते, असे अडवाणी यांना वाटते? कारण उपपंतप्रधान म्हणून वावरताना कधी अडवाणी यांना ही तत्त्वे त्रास देत होती असे जाणवले नाही. २००५ साली पाकिस्तानात त्या देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणे हे अडवाणी यांच्या तत्त्वांनुसारच झाले असे म्हणावयाचे काय? तसे असेल तर जिना यांच्या निधर्मीपणाचा साक्षात्कार अडवाणी यांना नक्की कधी झाला? आणि मुळात निधर्मीपणा हा कौतुक करण्यासारखा गुण आहे, हे त्यांना जाणवले कधी? हा गुण आहे असे त्यांचे कायमच मत होते असे मान्य केल्यास ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाने या गुणाचे आचरण करावे यासाठी अडवाणी यांनी काय केले? तेव्हा आपले वागणे हे विरोधाभासाचे आहे असे त्यांना कधी वाटले नाही काय? ज्या गुणांचा गौरव करावयाचा तो गुण प्रत्यक्षात मात्र आणायचा नाही, या वागण्याचे वर्णन अडवाणी यांच्या शब्दकोशात कसे केले जाते? जिना यांचा निधर्मीपणा अडवाणी यांच्यासाठी इतका महत्त्वाचा होता तर त्याच निधर्मीपणाचे पालन आपला पट्टशिष्य नरेंद्र मोदी यांनी करावे असे अडवाणी यांना कधी वाटले नाही काय? त्यांना तसे वाटत होते असे मानल्यास मग २००२ सालातील अमानुष दंग्यांस जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या मोदी यांना अडवाणी यांनी का वाचवले? अडवाणी यांचे प्रमुख तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे मोदी यांना पदावरून काढावे या मताचे असताना अडवाणी यांनी मात्र मोदी यांची पाठराखण केली, ती का? २००९ साली सत्ता मिळवण्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा असल्यामुळे विद्याचरण शुक्ल यांच्यासारख्या फालतू राजकारण्यास भाजपमध्ये सामावून घेण्याचे पुण्यकर्म अडवाणी यांच्या आग्रहाखातर झाले, त्यामागे त्यांचा कोणता तत्त्वाग्रह होता? या सत्तेच्या काळात ममता बॅनर्जी ते जयललिता ते मायावती अशा अनेकांच्या तालावर अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजप नाचत होता. तेव्हा हे सत्तानृत्य तत्त्वासाठीच होते असे जनतेने मानावयाचे काय? भाजपतील विद्यमान नेतृत्व पक्षासाठी नव्हे तर स्वत:च्या स्वार्थासाठीच काम करते, असेही अडवाणी यांना वाटते. या पक्षाच्या संस्थापकांत ते असल्याने त्यांचे निरीक्षण खरेही असावे. परंतु याबाबतही अडवाणी यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. विद्यमान नेतृत्वास फक्त वैयक्तिक प्रेरणा आहेत, याबद्दल अडवाणी नाराजी व्यक्त करतात. अशा प्रेरणा असणे अयोग्य असेल तर एकदा तरी पंतप्रधान बनण्याच्या अडवाणी यांच्या प्रेरणेचे काय? गेली काही वर्षे अडवाणी जे वागत आहेत ते काय पक्षाच्या भल्यासाठीच की काय? मुंबई येथे पक्षाच्या कार्यकारिणीतून अडवाणी मधेच निघून गेले होते. यामागे पक्षाचे काय हित होते? पक्षाच्या विद्यमान नेतृत्वावर ते अलीकडे वारंवार टीका करतात. ज्या पक्षात राहायचे त्याच पक्षाच्या कनिष्ठ नेतृत्वावर टीका करायची, यामागे अडवाणी यांची प्रेरणा कोणती? आताही गोवा येथील कार्यकारिणीपासून ते लांब राहिले. पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असूनही कार्यकारिणीत अनुपस्थित राहून नव्या नेतृत्वास अपशकुन करण्यामागची अडवाणी यांची प्रेरणा कोणती? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देणे अडवाणी यांना आवडणार नाही. कारण आपल्याशिवाय पक्ष चालू शकतो या जाणिवेने ते अस्वस्थ आहेत आणि वैयक्तिक सत्ताकांक्षेने ते आंधळे झाले आहेत. वयपरत्वे येणारी निवृत्ती आणि समज यांनी अडवाणी यांना दगा दिला असून पक्षाची सूत्रे आपल्याकडे राहणार नाहीत या कल्पनेनेच त्यांना अस्वस्थ केले आहे. यातही पुन्हा अडवाणी यांची लबाडी अशी की या पक्षाविषयी त्यांना इतका संताप आला असेल तर त्यांनी पक्षाचाच राजीनामा द्यावयास हवा. जो पक्ष आपल्या तत्त्वाने चालत नाही असे त्यांना वाटते त्या पक्षात पदाधिकारी म्हणून राहिले काय किंवा साधे सदस्य म्हणून राहिले काय! तेव्हा आपली नाराजी अडवाणी यांनी खरे तर पक्षत्यागातूनच प्रदर्शित करायला हवी.
अर्थात एका अर्थाने अडवाणी यांचे कौतुकही करावयास हवे. ते अशासाठी की त्यांनी उच्च हिंदू परंपरेचे पालन केले. महाभारतात ययाति स्वत:स आयुष्यभर तारुण्य उपभोगता यावे म्हणून आपले वार्धक्य पुरू या पोटच्या तरुण मुलास देतो आणि त्याचे तारुण्य मिळवतो. अडवाणी यांचे वागणे ययातिची आठवण करून देणारे आहे. सत्तेची देवयानी पुढील पिढीतील मोदी वा अन्यांकडे जाऊ नये, ती आपणासच मिळावी अशी अडवाणी यांची इच्छा आहे. अशा वेळी महाभारत ही शोकांतिका आहे याची जाणीव स्वत:ची तुलना भीष्माशी करणाऱ्या अडवाणी यांना करून द्यावयास हवी. असलेच तर अडवाणी ययाति आहेत, भीष्म नक्कीच नव्हेत.