उत्तर प्रदेशशिवाय ‘दिल्ली’ दूर !

गोव्यामध्ये ४० जागांपैकी भाजपकडे २७ आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसकडे फक्त चार आमदार शिल्लक राहिले आहेत.

महेश सरलष्कर mahesh.sarlashkar@expressindia.com

लोकसभेची निवडणूक जिंकून देशावर भाजपचे वर्चस्व अबाधित राहायचे असेल तर, उत्तर प्रदेश हे राज्य ‘ताब्यात’ असायला हवे, मग त्यासाठी हिंदुत्वाच्या यशस्वी सूत्राचा वापर ओघाने आलाच! हाच संदेश निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल वाजवताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. 

आगामी चार महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी भाजप आघाडीचे संख्याबळ ३१३ आहे. समाजवादी पक्षाकडे ४६ जागा आहेत, काँग्रेसला फक्त पाच जागा जिंकता आल्या. उत्तराखंडमध्ये ७० जागांपैकी भाजपच्या ५४ आणि पाठिंबा देणारे दोन अपक्ष मिळून ५६ जागांची ताकद आहे. काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये ११७ पैकी ७९ जागा काँग्रेसने जिंकल्या, भाजपचे फक्त दोन आमदार आहेत. आपकडे १६, तर अकाली दलाकडे १४ आमदार आहेत. मणिपूरमधील ६० जागांपैकी भाजप आघाडीकडे ३६चे संख्याबळ आहे, त्यात भाजपकडे २४ जागा आहेत. इथे काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. गोव्यामध्ये ४० जागांपैकी भाजपकडे २७ आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसकडे फक्त चार आमदार शिल्लक राहिले आहेत.

सत्ता टिकवण्याचे आव्हान

विधानसभेची निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे सत्ता टिकवण्याचा दबाव भाजपवरच असेल! उत्तराखंड आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसची थेट लढत होईल. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि गोव्यामध्ये आप आणि तृणमूल काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांनी भाजपला आव्हान दिले आहे. पंजाबमध्ये विद्यमान काँग्रेस सरकारला सत्ता टिकवण्यासाठी आम आदमी पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाशी सामना करावा लागेल. इथे भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध इतर असे रंगतदार चित्र दिसू लागले आहे. पंजाबमध्ये भाजपची ताकद नसल्याने केंद्रातील सत्ताधारी पक्षाने पंजाबला गांभीर्याने घेतलेले नाही. तिथे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा संभाव्य नवा पक्ष जेवढा काँग्रेसला त्रास देईल, तेवढी त्याला मदत करत राहणे एवढीच भाजपची भूमिका असेल. इथे पक्षांतर्गत घोळ घालून काँग्रेसने सहजसोपा सामना विनाकारण अटीतटीचा करून टाकला आहे. गोव्यात भाजपसाठी काँग्रेस हा प्रमुख विरोधक ठरला असता, पण आता या छोटय़ा राज्यांत आप आणि तृणमूल काँग्रेसने उडी मारल्याने काँग्रेसची भाजपविरोधात थेट लढण्याची संधी हातून निसटली असून ही लढाई आणखी अवघड होऊन बसली आहे. उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपशी थेट लढत असल्याने काँग्रेस थोडी आशा बाळगून आहे. आता राहिले सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. इथे सत्तेची खुंटी बळकट करायची असेल तर भाजपला हिंदुत्वाचा हुकमी एक्का खेळावा लागणार असे दिसते.

प्रचाराचे बिगूल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचा दौरा करून निवडणूक प्रचाराचे बिगूल वाजवले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्यांदा सत्ता अबाधित ठेवायची असेल तर, उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकण्याशिवाय पर्याय नाही, ही बाब अमित शहा यांनी जाहीर भाषणामध्ये स्पष्ट केली. उत्तर प्रदेश ताब्यात असेल तरच इथल्या लोकसभेच्या ८० जागांवर कब्जा करता येईल हे साधे अंकगणित शहांनी मांडले. मग उत्तर भारतातील सत्ता असलेल्या काही राज्यांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोधकांवर दबाव राखता येऊ शकतो. बिगरभाजपची सत्ता असलेली राज्ये भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू, झारखंड, छत्तीसगढ, राजस्थान, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. इथे लोकसभेच्या एकूण २७५ जागा आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला काँग्रेस आव्हान देऊ शकतो. इथे लोकसभेच्या एकूण ३५ जागा आहेत म्हणजे देशभरातील लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी (सद्य:स्थितीत) ३१० जागांवर भाजपला विरोधी पक्षांच्या उमेदवारांशी तगडा मुकाबला करावा लागेल. अशा वेळी लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणारे उत्तर प्रदेश हातातून निसटले तर भाजपसमोर मोठी कठीण परिस्थिती निर्माण होईल. हे लक्षात आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान हवे असतील, तर उत्तर प्रदेशमध्ये योगींना निवडून द्या, असे आवाहन केले.

पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा

योगी हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील हा संदेश देताना शहांनी विकास नव्हे, तर हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर विधानसभेची निवडणूक लढवली जाईल हेही स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात योगी हे हिंदुत्वाचा चेहरा असतील हे कोणी सांगण्याची गरज नाही! ‘मोदींसाठी योगी’ असे म्हणत असताना मोदी-शहांनी योगींसमोर नमते घेतले. पण त्याला केंद्रीय नेतृत्वाचा नाइलाज आहे. २०१६ मध्ये पश्चिम उत्तर प्रदेशात कैरानामध्ये मुस्लीम बाहुबलींमुळे हिंदू कुटुंबांनी पलायन केल्याचा आरोप केला गेला होता. शहा भाषणात म्हणाले की, कैरानात जे घडले त्यामुळे माझे रक्त खवळते. पण आता पलायन करायला लावणारेच पळ काढत आहेत.. २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमधील दंगलीची जखम आत्ता कुठे पुसली जाऊ लागली असताना शहांनी कैरानाचा मुद्दा उकरून काढला आहे. उत्तर प्रदेश ही काशीविश्वेश्वराची भूमी आणि राम-कृष्णांची जन्मभूमी आहे, पण मुघल राजवटीनंतर पहिल्यांदाच उत्तर प्रदेशला खरी ओळख पुन्हा मिळाली असल्याचेही शहा भाषणात म्हणाले. उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचाराचा शहांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या आगामी दौऱ्यात काय असेल याची चुणूक यामधून मिळाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत शहांचा प्रचार कसा तीव्र होत गेला हे दिल्लीकरांनी पाहिले आहे. आता उत्तर प्रदेशवासींनाही बघायला मिळू शकेल. उत्तर प्रदेशातून शहा उत्तराखंडची राजधानी देहरादूनला गेले. तिथे त्यांनी केदारनाथ मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा मांडला. मते गमावण्याच्या भीतीने काँग्रेसने केदारनाथची डागडुजी केली नाही. राष्ट्रीय महामार्गावर नमाज पठणाची मुभा काँग्रेसने दिली, असे शहा यांनी भाषणात सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपला सातत्याने मुख्यमंत्री बदलावे लागले आहेत. इथेही विकासकामांपेक्षा हिंदुत्वाचा प्रचार अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या दौऱ्यात पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले आहे. ऐन मोक्याच्या क्षणी मोदींची पोपभेट झाली असे म्हणता येईल! त्यातून गोवा आणि मणिपूरमधील ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्याचा नवा मार्ग भाजपच्या हाती लागू शकेल. 

तिरंगी सामना

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध इतर अशी लढाई लढली जात असताना काँग्रेस विरुद्ध अन्य अशी उपलढाईही होताना दिसते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसला लांब ठेवले आहे. बिहारमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसशी युती तोडून टाकली. आता गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपविरोधात लढण्यास काँग्रेस बिचकत असल्याने भाजपला मदत होते. मोदी सत्तेवर टिकून असण्याला काँग्रेस जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ‘तृणमूल’विरोधात लढला, मग काँग्रेसशी आघाडी करायची कशाला, असा आरोप ममतांनी गोव्यात काँग्रेसवर केला. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी हे दोघेही शनिवारी गोव्यात होते आणि गोवेकरांना आपल्याच पक्षाचा पर्याय कसा योग्य हे पटवून देत होते. तृणमूल काँग्रेसच्या वतीने ‘निवडणूक आखणीकार’ प्रशांत भूषण यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली. गेल्या आठवडय़ात पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी, भाजपची सत्ता चुटकीसरशी हिसकावून घेता येईल, असे भाष्य केले होते. त्यावर प्रशांत किशोर यांनी, भाजप कुठेही जाणार नाही. राहुल गांधींना वाटते तितके भाजपला हरवणे सोपे नाही. त्यांनी कल्पनारम्यातून बाहेर यावे, असे सुचवले. काँग्रेस, आप आणि तृणमूलमध्ये बिगरहिंदू मतांची विभागणी झाली तर भाजपचा फायदा होईल. शिवाय, तिथले किती ‘बाहुबली’ भाजपकडे आहेत, यावर जिंकण्या-हरण्याचा खेळ अवलंबून असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्याने सांगितले होते. त्या आधारावर गोव्यात भाजपला जिंकण्याची खात्री वाटते. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस विरुद्ध समाजवादी पक्ष अशीही लढाई आहे. गोव्यात तर आप, तृणमूल, काँग्रेस असे एकमेकांशी लढतील. हे सगळे भाजपला प्रमुख विरोधक मानून सत्ताधारी पक्षाशी दोन हात करतील. पण भाजपचे सगळे लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रित झाले आहे. उत्तर प्रदेशशिवाय दिल्लीची सत्ता नाही, हेही तितकेच खरे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Up assembly poll result impact on 2024 lok sabha election amit shah start of up poll campaign zws

Next Story
बदललेले वातावरण
ताज्या बातम्या