लालकिल्ला ; सुंदोपसुंदीची नांदी

राजनाथ सिंहांनी पक्षाध्यक्षपद पटकावले, त्यानंतरही भाजपमध्ये सुंदोपसुंदीची शक्यता आहेच. राजनाथ यांच्याबाबत हा अनुभव नवा अजिबात नाही. संघ आणि भाजप यांचे नैसर्गिक संबंध नाकारून काम करणे फार काळ जमणार नाही..

राजनाथ सिंहांनी पक्षाध्यक्षपद पटकावले, त्यानंतरही भाजपमध्ये सुंदोपसुंदीची शक्यता आहेच. राजनाथ यांच्याबाबत हा अनुभव नवा अजिबात नाही. संघ आणि भाजप यांचे नैसर्गिक संबंध नाकारून काम करणे फार काळ जमणार नाही..
‘‘ज्या परिस्थितीत आज मी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहे, ती व्यक्तिश: माझ्यासाठी सुखद नाहीत..’’ नितीन गडकरी यांच्या जागी निवड झाल्यानंतर अध्यक्षपदाची दुसरी इनिंग सुरू करताना राजनाथ सिंह यांनी ढाळलेल्या या अश्रूंवर तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास बसला असेल, तरच नवल. आपल्या भाग्यावर मनोमन खूश असलेल्या राजनाथ सिंहांचे पुनरागमन खरे तर गडकरींना घालविणाऱ्यांसाठीच सुखद नव्हते. गडकरींना पायउतार होण्यास भाग पाडण्याचा त्यांचा आनंद त्यामुळे अल्पजीवीच ठरला. अशा स्थितीत अंतर्गत लाथाळ्यांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या भाजपबरोबरच संघातही राजनाथ सिंहांच्या या नव्या नियुक्तीचे तीव्र पडसाद उमटले तर आश्चर्य वाटायला नको.
‘‘हम सबकी इच्छा थी, गडकरीजी दूसरी बार भी अध्यक्षपदके दायित्व का निर्वहन करे,’’ असे अतिशय ‘व्यथित’ अंत:करणाने राजनाथ सिंह म्हणत होते, पण साधा चित्कारही उमटू न देता शल्यविशारदाच्या सफाईने सर्वोच्च पातळीवर गळेकापू राजकारण करताना सर्वसामान्य कार्यकर्ते आणि भोळ्या समर्थकांचा विश्वास उडून जाऊ नये म्हणून असे धडधडीत खोटे हे बोलावेच लागते. प्रत्यक्षात गडकरींच्या हातातोंडाशी आलेला दुसऱ्या टर्मचा घास त्या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी स्वतंत्र कारस्थाने रचून निष्ठुरपणे हिरावून घेतला होता. अध्यक्षपदावर सलग दुसऱ्यांदा निवड व्हावी म्हणून भाजपची घटनादुरुस्ती केल्यानंतरही गडकरी अध्यक्ष होऊ नयेत, अशीच बहुतांश नेत्यांची इच्छा होती आणि ती पूर्णही झाली. गडकरींविरुद्ध ‘श्रद्धेय’ लालकृष्ण अडवाणी, राम जेठमलानी, यशवंत सिन्हा आणि महेश जेठमलानी यांनी उघडउघड दंड थोपटले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी भाजप मुख्यालयाला चिकटलेला सरकारी बंगला स्वत:च्या नावावर घेऊन पक्षकार्यासाठी समर्पित केला आहे, पण या बंगल्याचे चरित्र ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असेच आहे. गडकरींना नागपूरला परत पाठविण्यासाठी जेटली गेल्या सहा-सात महिन्यांपासून सक्रिय झाले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाजपमधील दूत, सह-सरकार्यवाह सुरेश सोनीही गडकरींना अध्यक्षपदावरून दूर करून सरसंघचालक किंवा संघाऐवजी स्वत:चा अजेंडा राबविण्यासाठी भाजप नेत्यांना फूस लावण्यात गुंतले होते, ही बाबही आता लपून राहिलेली नाही. दुसऱ्यांदा गडकरीच अध्यक्ष होणार हे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांची संवादशैली अधिक सुसह्य व्हावी या अपेक्षेने काही नेते व कार्यकर्ते सोनींकडे तक्रारवजा सूचना करायचे तेव्हा ‘बदल दो’ असे म्हणत त्यांच्या मनातही न डोकावलेल्या विचारांना चालना देण्याचे काम सोनी करायचे, असे आता भाजप वर्तुळात बोलले जाते. अडवाणींचा गडकरींवरील वार उघड होता. तो जितका प्रभावी ठरला नाही, तेवढा जेटली आणि सोनी यांचा सुप्त अजेंडा निर्णायक ठरला. भाजप अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी तर होऊ द्या, पुढचे पुढे पाहिले जाईल, अशी गडकरींना पदत्याग करायला लावण्यामागची रणनीती होती. ती सफल झाल्यानंतर आता पुढे घडणारे राजकारणही तेवढेच चित्तवेधक ठरण्याची शक्यता आहे.
दिल्लीत नितीन गडकरी आणि नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत हे दोन मराठीजन आपापल्या सहकाऱ्यांवर नको तितके विसंबून राहिल्यामुळे भाजपमधील दगाबाजीच्या नाटय़ात पुरतेपणाने ठकविले गेले. भाजपच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संघाच्या सहमतीने निश्चित होते. कधी त्यावर भाजपच्या वर्चस्वाची मोहोर उमटते, तर कधी संघाची. अलीकडच्या काळात ही कुरघोडी चांगलीच वाढली, पण अध्यक्षपदाच्या लोण्याचा गोळा भलत्यानेच पळविला, असे आजवर झाले नव्हते. ते या वेळी घडले. भाजपमधील वेळोवेळी बदलणाऱ्या परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सोनी सरसंघचालकांना देत होते काय? संघाचे विश्वासू म्हणून भाजपचे संघटन महामंत्री रामलाल कोणत्या निष्ठेचे निर्वहन करीत होते? सरसंघचालक आणि संघाची तीव्र इच्छा असूनही गडकरींचे अध्यक्षपद जाणे हे सुरेश सोनी आणि रामलाल यांचे ‘यश’ आहे की अपयश? यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष असताना राजनाथ सिंह यांनी भाजपच्या संघटन महामंत्रीपदी रामलाल यांची नियुक्ती केली होती. सुरेश सोनी यांच्या खास मर्जीतील प्रभात झा त्या वेळी त्यांचे राजकीय सचिव होते. गडकरी अध्यक्ष झाल्यावर प्रभात झा मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. मध्य प्रदेशच्या राजकारणात विशेष स्वारस्य दाखविणाऱ्या सोनींचे झा यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्याचे स्वप्न आहे, असे म्हणतात, पण गडकरींनी प्रभात झा यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून सोनींची नाराजी ओढवून घेतली. २२ जानेवारी रोजी पूर्ती समूहाशी संबंधित कंपन्यांवर निंदकांच्या सौजन्याने प्राप्तिकर खात्याने छापे घातल्यानंतर दिल्लीतील भाजप नेत्यांपुढे गडकरींचा बचाव करण्याऐवजी संघाची पसंती म्हणून राजनाथ सिंह यांचे नाव पुढे करून ‘आपली आवड’ दामटली. हे सारे घडत असताना त्या वेळी मुंबईत असलेल्या सरसंघचालकांना त्याची कल्पनाही नव्हती असे म्हणतात.
राजनाथ सिंह पुन्हा अध्यक्ष झाल्यामुळे आज भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. ही जबाबदारी आपण पद नव्हे, दायित्व म्हणून स्वीकारतो, असे म्हणणारे राजनाथ सिंह येणाऱ्या दिवसांत कोणते ‘दायित्व’ बजावणार याची त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना पुरती (‘पूर्ती’इतकीच) कल्पना आहे. राजनाथ सिंह पुन्हा अध्यक्ष झाल्याने भाजपच्या घडय़ाळाचे काटे तीन वर्षांनी मागे गेले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पत्करावा लागलेल्या पराभवाच्या आठवणीही ताज्या झाल्या.
भाजपमध्ये पंचगिरीसाठी नेमलेल्या सोनींनी स्वत:चा ‘संघ’ (राजनाथ सिंह, प्रभात झा आणि रामलाल यांचा)स्थापन केला आणि सरसंघचालकांऐवजी स्वत:च ‘किंगमेकर’ बनले. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे सोनी, रामलाल आणि झा यांना शह देण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. सोनी आणि झा यांच्यावरून भाजप वर्तुळात छेडले गेलेले गॉसिप आणि त्यामुळे निर्माण होऊ पाहणाऱ्या ‘पर्सेप्शन’मुळे संघ आणि भाजपची प्रतिमा निश्चितच उजळणार नाही. राजनाथ सिंहांच्या नव्या टीममध्ये प्रभात झा राष्ट्रीय सरचिटणीस किंवा त्यापेक्षा मोठय़ा पदाचे मानकरी ठरले तर सर्व समीकरणे उघड होतील. त्यामुळे कावेबाजीने मिळविलेले अध्यक्षपद आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्याचे मोठेच आव्हान राजनाथ सिंह यांच्यापुढे असेल.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमार्गे दिल्लीतील भाजपचे तख्त पटकावणारे राजनाथ सिंह अध्यक्षपदासाठी पात्र नसून पक्षातील दिशाहीनतेचा फायदा उठवून त्यांनी हे पद पळविल्याची दिल्लीतील नेत्यांची भावना त्यांच्या नियुक्तीपासूनच झाली आहे.
अडवाणींचे डॉ. मुरली मनोहर जोशी आणि जेटलींशी सख्य नाही, पण जोशी आणि जेटलींचे राजनाथ सिंहांशी पटत नाही. राजनाथ सिंहांना त्यांच्या गृहराज्यात डॉ.  जोशींव्यतिरिक्त लालजी टंडन, कलराज मिश्रा, वरुण गांधी या कट्टर विरोधकांचा सामना करावा लागेल. राजनाथ सिंह यांच्याशी छत्तीसचा आकडा असलेले कल्याण सिंह यांचे तर नशीबच फुटके. राजनाथ अध्यक्ष होण्याच्या दोनच दिवसांपूर्वी त्यांचा भाजपमध्ये पुनप्र्रवेश झाला. नाइलाजाने त्यांनाही या विरोधकांमध्ये सामील व्हावे लागेल. पक्षाच्या ‘व्यापक’ हितासाठी हा संघर्ष तीव्र होईल. दुसरीकडे सोनींचा वरदहस्त लाभलेले राजनाथ सिंह रामलाल, प्रभात झा, सुधांशू त्रिवेदी, विजय गोयल, मुख्तार अब्बास नकवी, रमेश पोखरियाल नि:शंक, अर्जुन मुंडा, सुधांशू मित्तल, अनिल जैन आदींच्या माध्यमातून आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न करतील.
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसुंधरा राजे यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपद जाऊ नये म्हणून राजनाथ सिंहांवर संघाचे दडपण असेल. सोनी व झा यांचा अजेंडा राबविण्यासाठी मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्याशी पंगा घेणे राजनाथ सिंहांना परवडणार नाही. मोदींशी नरमाईने वागण्याचीच व्यावहारिकता त्यांना दाखवावी लागेल. तरीही येणाऱ्या काळात भाजपमध्ये सुंदोपसुंदीची स्थिती टळणार नाही. राजनाथ सिंह यांचे नेतृत्व नाकारण्यासाठी यथावकाश यादवी माजू शकते. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षपदाचे सहा महिने उरले असताना मे २००९ मध्येही अशीच यादवी माजली होती. तेव्हा भाजपला केमोथेरपीची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती आणि भाजपच्या ट्रीटमेंटसाठी नितीन गडकरींची निवडही केली होती, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच गडकरींचे पद गेले. तीन वर्षांच्या कार्यकाळात गडकरींनी पाया खोदून काढत भाजप मुख्यालयाची रचना अंतर्बाह्य बदलली. ११, अशोक रोडला एखाद्या आलिशान कार्पोरेट ऑफिससारखे स्वरूप दिले, पण तेथे बसणाऱ्यांची पक्षघातकी प्रवृत्ती ते बदलू शकले नाहीत. ते जमले असते तर २३ जानेवारीला भाजप मुख्यालयात सरसंघचालकांना अपेक्षित असलेलेच चित्र दिसले असते. सरसंघचालकांचा आदेश संघ परिवारात अंतिम आणि शिरसावंद्य मानला जातो. ज्या ‘पर्सेप्शन’च्या आधारे गडकरींना अध्यक्षपद सोडावे लागले, तशाच पर्सेप्शनच्या आधारे सरसंघचालकांना मराठी रोखठोकपणा दाखवून येणाऱ्या दिवसांत कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त ठरणार आहे. तेव्हाच संघ आणि भाजपमध्ये ‘नैसर्गिक’ समन्वय प्रस्थापित होऊ शकेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lalkilla prologue of alteration

ताज्या बातम्या