scorecardresearch

लोकमानस : सदसद्विवेकबुद्धीचा वापर वाढवायला हवा

‘प्रतीकांची पेरणी’ या अग्रलेखाने  (२३ एप्रिल) आणि उदगीरच्या साहित्य संमेलनातील चिंतनाने भवतालच्या वास्तवाची जाणीव अधिक गडद केली.

Loksatta readers response letter

loksatta@expressindia.com

‘प्रतीकांची पेरणी’ या अग्रलेखाने  (२३ एप्रिल) आणि उदगीरच्या साहित्य संमेलनातील चिंतनाने भवतालच्या वास्तवाची जाणीव अधिक गडद केली. विज्ञानाच्या या आधुनिक युगात देशाला, विशेषत: तरुण वर्गाला, नेमके काय दिले जात आहे या विचाराने अस्वस्थता वाढवली. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची गतिहीनता, वाढती गरिबी यांसारख्या प्रश्नांऐवजी भलत्याच प्रश्नांना ‘राष्ट्रीय प्रश्नां’चा दर्जा दिल्याने देश व समाज वास्तवापासून दूर चालला आहे. पण ते वास्तव निवडणुकांआधी दिलेल्या आश्वासनांच्या व विश्वगुरूंच्या  निर्मिलेल्या प्रतिमेशी सुसंगत नाही. आणि म्हणूनच हे वास्तव निवडणुकाआधारित लोकशाही व्यवस्थेत अडचणीचे ठरते आहे. खरे तर, हे सर्व सरकारचे ढळढळीत अपयश आहे.  पण सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरलेले सरकार या मार्गाने हे अपयश लपविण्यासाठी व निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे.  उद्देश फक्त निवडणुका जिंकणे एवढाच मर्यादित नसून सत्तेच्या माध्यमातून विशिष्ट विचारसरणीच्या ‘एकसंध’ समाजाच्या निर्मितीसाठीचा हा अट्टहासदेखील आहे. म्हणूनच विज्ञाननिष्ठ व वास्तवाचे परखड भान असलेल्या समाजाच्या निर्मितीऐवजी राजकीय दृष्टीने सोयीचे ठरत असलेल्या मध्ययुगीन समाजाच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. याबरोबरच ‘राष्ट्रनिर्माणा’च्या या कार्यात आडवे येणाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी बदनामी आणि अपप्रचार या अस्त्रांचा वापर वाढला आहे. या कठीण काळात सर्वसामान्यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर वाढवायला हवा.

– हेमंत सदानंद पाटील, नाळे, नालासोपारा

या थराला पोहोचले महाराष्ट्राचे राजकारण..

गेल्या काही दिवसांपासून भोंगे, हनुमान चालीसा याच शब्दांभोवती राजकारण कसे फिरत राहील याकडे लक्ष दिले जात आहे. मुंबईतील ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसाचे पठण करणार असे प्रसारमाध्यमांतून घोषित करून राणा दाम्पत्याने महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा आटापिटा केला. त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोर ठाण मांडले. या राजकीय आखाडय़ात पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे, हे दिसतच आहे.

या धामधुमीच्या केंद्रस्थानी आहे ती हनुमान चालीसा. तिचा राजकीय गोंधळ घालण्यासाठी वापर का होतोय? तीच का वाचायची आहे? हनुमान चालीसा हा श्रद्धा, भक्तीचा विषय न राहता तो आता राजकीय विषय बनवला आहे, असे का म्हणू नये? पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना ‘मातोश्री’समोर शिवसैनिकांची गर्दी जमू देणे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना ते विसंगत वाटत नाही का? त्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्यासाठी का सांगितले नाही?  दोन दिवस शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोर ठाण मांडले. ते नोकरी वगैरे करत नाहीत का? कारण नोकरीवर असणारी व्यक्ती एक दिवस कामावर गेला नाही तरी त्याचे वेतन कापले जाते. उदरनिर्वाहापेक्षा राजकीय झुंजीत सहभागी होणे कितपत योग्य? दर शनिवारी हनुमान मंदिरात भक्त श्रद्धेने हनुमान स्तोत्र, चालीसा यांचे पठण करतात. राणा दाम्पत्याला कोणतेही हनुमान मंदिर हे शक्तिस्थळ वाटत नाही का? आमचे श्रद्धास्थान बाळासाहेबांचे ‘मातोश्री’ आहे असे केवळ तोंडदेखलेपणासाठी सांगून त्या ठिकाणी जाणे योग्य वाटणे अतार्किक नव्हे का?

शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी राणा दाम्पत्याला विरोध केला असला तरी जी राजकीय हुल्लडबाजी पाहण्यास मिळाली ती महाराष्ट्राचे राजकारण कुठल्या थराला पोचले आहे, याकडे अंगुलिनिर्देश करते. राजकीय लोक एकमेकांवर राजकीय आरोप- प्रत्यारोप करतात हे काही जुने नाही. पण एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी आता हनुमान चालीसाला पुढे करून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून गलिच्छ राजकारण करणे खटकणारे आहे.

– जयेश राणे, भांडुप (मुंबई)

सेनेत राजकीय परिपक्वतेचा अभाव

राणा दांपत्याला मातोश्रीवर येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेने जी प्रचंड मेहनत घेतली व आक्रस्ताळेपणा केला त्यामुळे राणा दांपत्याचे महत्त्व उगाचच वाढले आहे. जी चूक सेनेने कंगना राणावत, राणे व किरीट सोमय्यांच्या बाबतीत केली तीच चूक राणांच्या बाबतीत केली आहे. हिंदुत्वाची पताका खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सेनेने राणांच्या हनुमान चालीसाला विरोध करायचे कारणच काय? एका साध्या नेत्याला व साध्या घटनेला अवास्तव प्रसिद्धी देऊन राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवण्याची चूक सेना करीत आहे आणि त्याचे तिला भान नाही. वास्तविक राणांना मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आनंदाने येऊ देणे ही चाल सेना खेळली असती तर राणांच्या आंदोलनातील हवाच निघून गेली असती. सेना नेत्यांमध्ये कठीण परिस्थिती कौशल्याने हाताळण्याच्या राजकीय परिपक्वतेचा अभाव दिसतो. 

– अरविंद तापकिरे, (मुंबई)

राजकारणी हवे की निवडणूक रणनीतीकार?

सद्य:स्थितीतील देशांतर्गत राजकारणाचे अवलोकन केले असता  प्रकर्षांने जाणवते की, ‘ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि ज्या पक्षाने देशाची धुरा स्वत:च्या समर्थ खांद्यांवर ५३-५४ वर्षे वाहिली, त्या १४० वर्षीय काँग्रेसला आज पक्षाची निवडणूक रणनीती आखण्यासाठी एका पक्षबदलू अशा व्यावसायिकाच्या परामर्शाची आवश्यकता भासते आहे!’ काँग्रेसमध्ये या घटकेला आजही असे अनेक धुरंधर राजकारण आहेत की ज्यांच्या हाती पक्षाचे सुकाणू दिल्यास २०२४ मधील लोकसभा निर्वचनांमध्ये ते काँग्रेसचे भरकटलेले तारू व्यवस्थितपणे किनाऱ्याला लावू शकतील. पक्षाशी ज्याचा दुराव्यानेही संबंध नाही अशा व्यक्तीला पक्षधोरणासारख्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी करून घेण्याने प्रामाणिक कार्यकर्ते आणि नेते यांचा रोष उफाळून येऊ शकतो याची जाणीव पक्षश्रेष्ठींनी ठेवायला हवी. 

– अरुण मालणकर, कालिना, (मुंबई)

आता कुणाच्याही मागे जाऊ नका..

‘एसटीची सेवा सुरळीत, ८२ हजार ३६० कर्मचारी कामावर रुजू,’ हे वृत्त (२३ एप्रिल) वाचले. संपकरी लोकांनी संप अति ताणून धरला होता, असे खेदाने म्हणावेसे वाटते. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे ही त्यांची मागणी मान्य न होताच, त्यांना नाइलाजाने कामावर परतावे लागत आहे. मग दीर्घकाळ संप करून, कामगारांनी आपण काय मिळवले? ते स्वत:च्या मताने, विचाराने चालत होते, तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते. पण कुणीतरी त्यांच्या मनात काहीतरी भरवले आणि कर्मचारीदेखील सारासार विचार न करता, त्याच्या मागे गेले, इथेच त्यांचे चुकले. एसटी कर्मचाऱ्यांचे नशीब बलवत्तर म्हणून, न्यायालयाने आणि सरकारने, सुरुवातीला कामावर रुजू होण्यासाठी १५ एप्रिल, मग २२ एप्रिल  आणि आता शेवटची तारीख २८ एप्रिल ही मुदत दिली आहे. आता तरी त्यांनी कामावर रुजू व्हावे. तेलही गेले, तूपही गेले.. असे व्हायला नको. 

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)

अद्भुतरसच कल्पनाशक्तीला वाव देतो..

‘मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केला आहे. त्यामुळे सध्याचे बालसाहित्य शुष्क, निरस आणि माहितीपर झाले आहे. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून हे घडले आहे. अद्भुतरसाचे सेवन केलेली मुले बुद्धिमान, प्रतिभावान, विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात तर अद्भुतरसाचा संपर्क न घडलेली मुले अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी, अरसिक निपजतात,’ असे निरीक्षण ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी नोंदविले आहे ते महत्त्वाचे आहे. विचारशक्ती, तरल कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाचनसंस्कृतीची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य संमेलनातील उत्सवप्रियतेला ग्रंथालय संवर्धनाची आणि भक्कम वाचनसंस्कृतीची जोड  देणे आवश्यक  आहे. शिक्षणपद्धतीत जाणीवपूर्वक बदल करून विचारशक्ती जागृत करणे हा शिक्षणाचा प्रधान उद्देश ठेवला तरच वाचनसंस्कृती वाढू शकेल. बालपणीचा काळ म्हणजे निरीक्षणशक्ती वाढविण्याचा, तसेच जीवनमूल्ये शिकण्याचा काळ! या काळात प्रत्यक्ष कृती कोणती करावी याचा निर्णय घेण्याचे व ती कृती प्रत्यक्ष करण्याचे काम पालक, शिक्षक करत असतात. लहानपणी आई-वडील व शिक्षक यांनी मुलांना तयार उत्तरे द्यावीत व त्यांनी ती घोकंपट्टी करून पाठ करावीत अशीच पद्धत आपल्याकडे वर्षांनुवर्षे चालू आहे. त्यामुळे भावी आयुष्यात त्या मुलांना तयार (ठरावीक साच्याचे ) विचार स्वीकारण्याची सवय लागते. आजही वयात आलेला भारतीय माणूस आपले निर्णय दुसऱ्याकडून स्वीकारतो. त्या अर्थाने त्याचे ‘बालपण’ फारच लांबलेले आहे. ‘मी माझ्या विचारांनी पूर्ण जबाबदारीअंती हा निर्णय घेतला आहे त्याच्या परिणामांची मला पर्वा नाही,’ असे खणखणीतपणे सांगणाऱ्या व्यक्ती विरळाच!  आपल्याकडे गीता, ज्ञानेश्वरी २१ वेळा किंवा १०१ वेळा  पारायण करणे महत्त्वाचे मानले जाते, अर्थ समजणे महत्त्वाचे नाही! वाचनसंस्कृतीसाठी जाणत्या व प्रौढ वाचकांची गरज असते.

– डॉ. विकास इनामदार, भूगांव, पुणे

गांधीविचार : काल, आज आणि उद्याही..

‘गांधी, ग्रामस्वराज आणि राज्य व्यवस्था’ हा तारक काटे यांचा ‘लोकसत्ता’ (२१ एप्रिल) मधील लेख वाचला. गांधीविचार कायमच कालसुसंगत व अनुकरणीय आहे. त्याबद्दल शंका घेऊन त्याला कालबाह्य करण्याची फळे सर्व जग आज भोगत आहे. गांधीविचारांची कालबाह्यता त्या विचारांमुळे नसून, तुम्ही- आम्ही त्या विचारांना आपल्या आचरणात स्थान देण्याच्या नकारामुळे आहे. १९ व्या शतकात जन्मलेल्या व २० व्या शतकात सर्व जगात धर्म, नीती, अर्थकारण, समाजकारण व राजकारण हे सत्य, अिहसा, प्रेम, न्याय या तत्त्वांवर प्रत्यक्ष करून दाखवणारा हा थोर महात्मा. आज २१ व्या शतकातही त्यांच्या विचारांनीच जगाचा विनाश रोखता येईल आणि सर्व सृष्टीवासीयांना सुखी करता येईल असे अनेकांना वाटते आहे.          

– डॉ. बी.बी. घुगे, नाशिक

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion ysh 95

ताज्या बातम्या