‘अस्वच्छता अभियान’ हे स्फुट (अन्वयार्थ, १३ ऑक्टो.) वाचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘स्वच्छ भारत’ची घोषणा खरोखरच सर्वांपर्यंत पोहोचली का, हे पाहणे गरजेचे   आहे. पांढरे कपडे घालून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंतही ती पोहोचली की नाही, याबाबत शंका आहे. हे अभियान फक्त फोटो काढण्याइतपत मर्यादित राहायला नको. खरे तर कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत’साठी धडपडायला हवे; परंतु स्थिती ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून?’ अशीच दिसते आहे.
– किरण भागवत मुंडे, परळी-वैजनाथ

संयम आवश्यकच

‘शिव-शाईचा स्वार्थवाद’ या अग्रलेखातून (१३ ऑक्टो.) शिवसेनेच्या विचारहीन व उथळ प्रवृत्तीचा खरमरीत समाचार घेण्यात आला आहे. स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी आपली प्रत्येक कृती फार विचारपूर्वक व संयमाने करणे आवश्यक असते; पण उटपटांग वृत्ती हाच शिवसेनेचा पाया असल्यामुळे त्यांच्याकडून लोकशाहीला साजेशा प्रगल्भ कृती होणे तसे अवघडच आहे.

मात्र पत्रकारितेची जबाबदारी म्हणून ‘लोकसत्ता’ अशा उथळ घटकाचे उचित रीतीने कान पिळतो, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. याच अग्रलेखातून सुधींद्र कुलकर्णी यांचे वास्तव रूप आधोरेखित करण्यात आले, हेही बरेच झाले. लोकशाहीत अशीच तटस्थ व संतुलित टीका अपेक्षित असते. ही टीका द्वेषमूलक नसून सर्वाचीच प्रगल्भ अशी राष्ट्रनिष्ठा वाढावी या भूमिकेतून असते हे संबंधितांना कळणे मात्र गरजेचे आहे.
डॉ. अनंत राऊत, पीपल्स कॉलेज, नांदेड</strong>

धर्माध शक्तींनी पाकिस्तानींनाच व्यासपीठ देण्याचे ठरवले तर?

एका गोष्टीचे नवल वाटते की परराष्ट्रमंत्री असताना उघडपणे िहदुस्थानविरुद्ध भूमिका घेणाऱ्या त्या पाकिस्तानी मंत्र्यासाठी स्वत:चे झालेले काळे तोंड जगाला दाखवण्याची कुलकर्णीना किती घाई झाली होती. इतकी की तेच काळे तोंड घेऊन माध्यमांसमोर फिरण्यात त्यांना कोणते तरी शौर्य गाजवल्याचा आनंद झाला होता, असे वाटत होते.

पाकिस्तानी क्रिकेटर, नेते, कलाकार, व्यावसायिक किती चांगले असतात, याबाबत शासनाच्या परवानगीने पोलीस बंदोबस्तात जाहीर व्याख्याने घेण्यासही अशांना काहीच वाटणार नाही. कारण जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला तोही अशाच वृत्तीचा परिपाक होता असे म्हणण्यास वाव आहे. महाराष्ट्राच्या भूमीत हा कार्यक्रम होऊ देणाऱ्या शासनाचा धिक्कारच! एक मोफत सल्ला असा, की राष्ट्राभिमान काय असतो हे जरा इस्रायलकडून तरी शिकावे. लक्षवेधी बाब म्हणजे एका व्यक्तीचा फाजील हट्ट शासनाने पुरवला खरा, पण या देशामध्ये ज्या धर्माध शक्ती वळवळ करत आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक पाकिस्तानींनाच येथे कोणतेही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा धडाका लावल्यास वा तसे सूचित केल्यास शासन काय करणार आहे?
  -जयेश राणे, भांडुप

काळे कोणत्या कल्पनांना फासले?

सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासून शिवसेनेने अनेकांची सहानुभूती गमावली आहे. कुलकर्णी हे भाजपचे विचारप्रमुख असताना, त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाकिस्तानबरोबर शांतता व्हावी म्हणून मोठे प्रयत्न केले. त्याला किती यश आले हे काळ ठरवील. परंतु वाजपेयी यांच्या काळात (१९९८-२००४) अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय निर्णय घेण्यात कुलकर्णी यांचा पुढाकार होता, हे निश्चित.

कुलकर्णी यांचे ‘म्युझिक ऑफ द स्पििनग व्हील’ हे पुस्तक काळे फासणाऱ्यांनी वाचलेले दिसत नाही. त्यात ते लिहितात, ‘गांधी म्हणजे विसाव्या शतकातील येशू ख्रिस्त आहेत. हिंदू-मुसलमान दंग्यांत ते १९४६ साली नौखाली येथे हातातील काठी टेकत, वयाच्या ७६व्या वर्षी चालले.’ गांधीजींना जी िहदू-मुसलमान एकी अपेक्षित होती, ती आजच्या काळात सुधींद्र कुलकर्णी भारत-पाकिस्तानमध्ये आणू इच्छित असतील, तर त्यांना सर्वानी पाठिंबा दिला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलकर्णी यांना जो पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

आक्षेपात गफलत

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम यांस विरोध करणाऱ्यांचा नेहमीचाच आक्षेप म्हणजे पाकिस्तानी सन्य आणि अतिरेकी सीमेवर आपल्या जवानांना मारत असताना पाक कलाकारांना आम्ही भारतात आमंत्रित का करायचे? भावनिक स्तरावर हा आक्षेप योग्यच वाटतो. पण त्यात मोठी वैचारिक गफलतही आहे. पाक सन्य वा अतिरेकी यांच्याशीही दमाने घ्या अशी कोणाचीच भूमिका नाही, तेथे ‘जशास तसे’ अशीच सर्वाची भूमिका आहे. कुलकर्णी यांनीही हेच स्पष्ट केले.

पण केवळ लष्करी बळावर समस्या सुटू शकत नाही हेच अनेकदा सिद्ध झाले आहे. ज्या सन्याच्या बळावर तथाकथित राष्ट्रवादी येता जाता पाकला धडम शिकवण्याची भाषा करतात त्याच सन्यातील  निवृत्त लेफ्ट. जन. हसनन इंडियन एक्सप्रेस मधे लिहिलेल्या लेखात म्हणतात, Soldiers are perceived to be happiest when shells & bullets fly. Yet search a soldier’s heart & it will tell you that he is happiest when peace prevails. (IE, 15/1/14). तरीही ज्यांचा लष्करी बळाचाच आग्रह आहे त्यांनी मग स्वतच्या घरातील किमान एक तरी व्यक्ती सन्यात भरती करावी. तसेच आपला जो काही आयकर देय असेल तो सर्व भरावा,म्हणजे देशाच्या संरक्षण खर्चात भरीव वाढ करता येईल.

– अनिल मुसळे, ठाणे (प.)

 भाजपचा ‘मित्रपक्ष’ सध्या राजकीय ‘चेक-मेट’च्या स्थितीत!

विकासकामांचे श्रेय शत-प्रतिशत भाजपच एकटा लाटत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या ‘अँटी-इन्कम्बन्सी’चा एकमेव मानकरी आपणच ठरत असल्याच्या भीतीतून, शिवसेना विरोधातून समतोलपणा साधण्याच्या प्रयत्नात दिसते. शिवसेनेजवळ एक तर युतीतला मित्रपक्ष होणे वा नेहमी स्वबळावर निवडणूक लढणे हाच पर्याय उरला आहे. प्रखर हिंदुत्ववादाला शिवसेनेने सध्या दिलेली दुय्यम प्राथमिकता आणि मराठी मतांचे वाढणारे ध्रुवीकरण पाहता शिवसेनेचे हे धाडस किती मदान मारेल हे कल्याण-डोंबिवली व मुंबई महानगरपालिकेच्या निकालांतून दिसेलच. परंतु सध्या सरकारमध्ये राहून राखलेला अलिप्तपणा अपमानित करणारा ठरतो आहे आणि सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षफुटीची भीती बळावते आहे. शिवसेनेची ही नुकसानकारक कोंडी काही प्रमाणात भाजपनेच स्वत:च्या फायद्यासाठी केलेली निर्मिती आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. एकूणच, सध्या शिवसेना राजकीयदृष्टय़ा ‘चेक-मेट’ होणाऱ्या स्थितीमध्ये उभी आहे.

– अजित कवटकर, अंधेरी पूर्व (मुंबई)

..नाही तर शिवसेनेचीही अवस्था मनसेसारखी होईल!

पाकिस्तानचा गुंता सोडवण्यात सरकार असमर्थ आहे असे शिवसेनेला वाटत असेल तर ते सरकारमधून बाहेर का पडत नाहीत? कीसांगताही येईना आणि सहनही होईना अशी त्यांची अवस्था झाली आहे?

एकीकडे इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात अनेकदा स्वबळावर सत्ता स्थापन करीत असताना शिवसेनेला मात्र स्थापनेपासून एकदाही स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. याचे कारण त्यांचे संकुचित राजकारण. केवळ राडेबाजी करून आपण लोकांना आपलेसे करू शकतो, असे जर शिवसेनेला आजही वाटत असेल, तर त्यांचीही अवस्था मनसेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. एकीकडे भाजप शिवसेनेची पद्धतशीरपणे मुस्कटदाबी करत असताना अशा घटनांमुळे शिवसेना स्वत:च आणखी खोलात जात आहे. तेव्हा शिवसेनेने आत्मपरीक्षण करून विकासाशी कालसुसंगत भूमिका अंगीकारावी अथवा त्याचे परिणाम त्यांना भविष्यात नक्कीच भोगावे लागतील.
  – विनोद थोरात, जुन्नर