जमाना तुलनात्मक अभ्यासाचा आहे!

शेतकरी नेते शरद जोशी यांचे नाव जर घेतले नाही, तर जोशींचे भक्तगण म्हणतात का घेतले नाही.

शेतकरी नेते शरद जोशी यांचे नाव जर घेतले नाही, तर जोशींचे भक्तगण म्हणतात का घेतले नाही. त्यांच्या चुका दाखवल्या, तर या भक्तगणांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि टीका करणाऱ्याचा समाचार घेतला जातो. इतके सगळे करूनही संप्रदाय वाढायचा सोडून आकुंचनच पावत आहे. त्यांचे एकेक अनुयायी त्यांना सोडून गेले वा जात तरी आहेत. सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे करून त्यांनी जी पदे मिळवली त्यामुळे थोडे तरी सोबत राहिलेत. त्यांच्याचपैकी एकाचे पत्र ‘शरद जोशींबद्दलचा आकस यादव कधी सोडणार?’ या शीर्षकाने ‘लोकसत्ता’त (लोकमानस, ७ सप्टेंबर) प्रसिद्ध झाले.
पत्रलेखकास हे माहीत नसावे की, शरद जोशींची शेती प्रश्नावरची वैचारिक मांडणी ही मायकल लिप्टन यांच्या ‘व्हाय पुअर स्टे पुअर- अ स्टडी ऑफ अर्बन बायस’ (प्रथमावृत्ती : १९७७) या पुस्तकावरून हुबेहूब उचललेली आहे. ‘राष्ट्रीय कृषिनीती’मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करावा, असे सांगणारे जोशी खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कसा काय करतात? शिवाय, ही कृषिनीती अटलबिहारी वाजपेयी नाही, तर व्ही. पी. सिंहांच्या कार्यकाळात सादर करण्यात आली होती आणि त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली. वाजपेयींच्या काळात जोशी हे सरकारच्या सल्लागार समितीवर होते आणि तेव्हाच कापसाची विक्रमी आयात झाली होती. ज्याबद्दल जोशींनी ‘ब्र’सुद्धा काढलेला नव्हता. म्हणजेच, जोशी सरकारी पद उपभोगत असताना आंध्र प्रदेशातल्या दोन हजार कापूस उत्पादकांनी आत्महत्या केली होती. कोरडवाहू कापूस उत्पादकांच्या आत्महत्यांची ती सुरुवात होती. याचे श्रेय शेतकऱ्यांच्या पुढच्या सुशिक्षित पिढय़ा जोशींनाच देतील किंवा त्यांनी ज्या भाजपला पाठिंबा दिला त्या पक्षालाही. हा इतिहास जोशींचे भक्तगण कसा काय पुसून काढू शकतात? शिवाय, वामनराव चटप यांना त्यांच्या मतदारसंघात यापूर्वीही सव्वादोन लाखांच्या आसपासच मते होती आणि त्याचे श्रेय त्यांच्या मतदारसंघातल्या ‘जातीय’ वास्तवात आहे.
आता माझी प्राथमिक अपेक्षा ही की, शरद जोशींच्या वैचारिक योगदानाचे गोडवे गाणाऱ्यांनी मायकल लिप्टन यांचा ‘व्हाय पुअर पीपल स्टे पुअर’ हा ग्रंथ वाचावा आणि शरद जोशींनी काय नवीन वैचारिक योगदान दिले ते आम्हा शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलामुलींना सांगावे. नाही तरी, जमाना तुलनात्मक अभ्यासाचा आहे आणि कुणी सदा सर्वकाळ सर्वानाच मूर्ख बनवू शकत नाही!
– वसुंधरा ठाकरे, नागपूर

.. तर कसा रुजावा वैज्ञानिक दृष्टिकोन?
‘मानव-विजय’ या सदरात शरद बेडेकरांनी १४/९ च्या सदरात लेखकाने नियती- प्रारब्ध- नशीब यावर ऊहापोह केला आहे. या सर्वाच्या मागे सामान्य माणूस का लागतो त्याचे खरे कारण आहे माणसाची दैववादी प्रवृत्ती. आपल्या जीवनात काही ही घटना घडली तिचा संबंध देव, नशीब आणि प्रारब्धाशी जोडणे. याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर आपल्या शिक्षणात दहा गाभाभूत मूल्ये सांगितली आहेत.
त्यातील महत्त्वाचे म्हणजे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ याचाच अभाव शिक्षणात दिसून येतो. दुसरे कारण आपल्या देशात जे सेलेब्रिटीज आहेत ही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याऐवजी त्यात वाढ करताना दिसतात. सचिन तेंडुलकर ज्याला आपण क्रिकेटचा देव वगरे मानतो, तो सत्य साईबाबा या बाबाकडे जातो, जो बाबा भक्ताच्या औकातीवर त्यांना जादूने (हातचलाखी) प्रसाद देतो. अमिताभ बच्चन, सलमान खान असे सेलेब्रिटी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. कशासाठी? तर तो नवसाला पावतो म्हणून. टीव्हीवर पद्धतशीरपणे अशा सेलेब्रिटीजचा वापर करून वेगवेगळ्या जाहिरातींतून दैववाद आणि अंधश्रद्धा पसरवली जाते. आपले शास्त्रज्ञच जर मंगळावर यान पाठवण्यापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे घालत असतील, तर कसा इथला समाज दैववाद, अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करील?
– नितीन कोंडिबा महानवर, बीड

पाणीबचतीसाठी नव्या विचारांचीच गरज
पाणी आणि पाणीबचतीबाबत ‘लोकसत्ता, रविवार विशेष’ (१३ सप्टें.)मधील तिन्ही लेख वाचले. खरोखरच आज गरज आहे ती अशा नव्या विचारांची. कारण सरकार पसे देण्याचे सोंग करते, पण पसे शेतकऱ्याच्या हाती पोहोचण्याच्या आधीच नको तेथे झिरपून जातात. त्यामुळे सरकार पसे देऊ शकते, पाणी नाही, या म्हणण्याला काही अर्थ नाही.
अनिकेत साठे यांचा प्रियदर्शन भटेवारा आणि यशोधन रानडे यांचे संशोधन पुस्तकी नाही, तर त्यांनी त्याची अंमलबजावणीदेखील करून दाखवली आहे. सौर ऊर्जा मोफत आणि भारतात तरी मुबलक असताना आपले राज्यकत्रे तिचा योग्य वापर का करीत नाहीत हे कोडेच आहे. डॉ. गिरधर पाटील यांचा सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील पाण्याची ब्रिटिशकालीन ‘फड’ व्यवस्था सांगणारा लेख वाचून वाटले की, परके इंग्रजसुद्धा भारतीयांचा केवढा विचार करीत होते, गावातल्या गावात पाण्याचे किती सुंदर नियोजन केले होते.
तिन्ही लेख अभ्यासपूर्ण आणि विचार करण्याला प्रवृत्त करणारे आहेत. मला माझ्या अल्पबुद्धीनुसार एक सुचवावेसे वाटते, जसे सोसायटीत प्रत्येक सदनिकेचे वीज मीटर वेगळे असते, त्याचप्रमाणे पाण्याचे मीटर सोसायटीच्या नावाने न देता प्रत्येक सदनिकेच्या नावाने द्यायला हवे, तरच लोक पाणी जपून वापरतील. दररोज शुद्ध पाणी कसे बेफिकीरपणे वाया घालवतो, हे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही कळेल आणि शहरी माणसांच्या सवयी तरी बदलतील.
– बबन सावंत, अंधेरी (मुंबई)

तुम्ही तरी काही करा!
‘भूजल संरक्षण कागदावरच’ हा लेख (१३ सप्टेंबर) वाचून, भूजल संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयासंबंधी शासन स्तरावर किती उदासीनता आहे याची पुन्हा प्रचीती आली. यापूर्वी वर्षांनुवर्षांपासून विविध सरकारांनी पाण्यासाठीची तरतूद कोटय़वधी रुपयांनी वाढवत नेली, पण कायमस्वरूपी उपाययोजना व धोरणांना नेहमीच तिलांजली द्यायची आणि त्यानंतर जलसंकटावर कर्जमाफी, वीज बिल माफी, टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या यांसारख्या त्याच त्या तात्पुरत्या मलमपट्टय़ा करीत बसायच्या आणि मग त्याचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करायची, हे आत्तापर्यंतच्या सर्व सरकारचे नित्याचेच उद्योग ठरले; परंतु ‘पार्टी विथ डिफरंस’च्या डरकाळ्या फोडणाऱ्या नवीन सरकारने तरी मागील सरकारचीच री न ओढता पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. अन्यथा स्थलांतर, बेरोजगारी, पाणीवाटपाचे वाद यांसारख्या समस्या गंभीर स्वरूप धारण करून राज्याच्या विकासातील अडसर तर ठरतीलच, शिवाय भावी पिढय़ांशी ती प्रतारणा ठरेल.
वर्षांगणिक जलसंकट भयावह स्वरूप धारण करीत असताना नवीन सरकारने तरी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) कायदा- २०१३ सारख्या कायद्यातील तरतुदींचा गांभीर्याने विचार करावा आणि ठोस पावले उचलून हा नित्याचा जीवघेणा खेळ थांबवावा, ही अपेक्षा.
– एम. डी. गोरे, जालना.

पाण्याच्या नासाडीला धर्माचा हातभार
अख्ख्या राज्यात दुष्काळाने थमान घातले असताना, चारा छावण्यांची मागणी असताना, खरिपाची पिके जवळपास हातची गेलीच असताना, सरकारही याबाबत अगतिक झालेले असताना आपण मात्र ‘धर्म धर्म’ खेळण्यात गुंग आहोत. शाही स्नानासाठी तिन्ही वेळा भरपूर पाणी! दोष फक्त सरकारला तरी का द्यायचा? बदलत्या हवामानानुसार आपल्यालाही बदलायला नको? आपणच पाणी वाचवायला हवे, हे लक्षात घ्यायला नको? आहे ते पाणी शाही स्नानात नासवण्यापेक्षा ते योग्यपणे वापरायला हवेच; कारण धर्म हा माणसांसाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही.
– पांडुरंग सूर्यकांत वऱ्हाडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Writing letters to the editor

ताज्या बातम्या