गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुतिन यांची शारीरिक क्षमता, त्यांचं ज्युदो विजेते असणं, उघडय़ा छातीनं थंडगार पाण्यात पोहणं बघताना भारावून ‘नेता असावा तर असा..’ असं वाटून घेणाऱ्यांचं आजघडीला देखील पुतिन करत आहेत ते योग्यच आहे, असंच म्हणणं आहे.

आठेक दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचे नेते भेटले. त्यातला एक मराठी होता, एक दक्षिणी आणि तिसरा उत्तरेकडचा. साहजिकच शेवटच्या दोघांचं मराठी वाचन असण्याची काही शक्यताच नाही. पण त्यातल्या मराठी नेत्याचं वाचन चांगलं म्हणता येईल असं होतं. वर्तमानपत्रांच्या बरोबरीनं पुस्तकंही वाचली जातात त्यांच्याकडून. राजकीय वर्तुळात असूनही ‘फॉरवर्ड’पेक्षा वेगळं काही कोणी वाचतंय या वास्तवानंच गहिवरून येतं अलीकडे.

तर गप्पांचा विषय ओघाओघानं वळला तो पुतिन आणि त्यांचं युक्रेन युद्ध या विषयाकडे. या विषयावर या आपल्या मराठी गडय़ानं ‘लोकसत्ता’ चांगला वाचलेला होता. ‘पुतिन’ हे पुस्तक त्याच्याकडे होतं. त्यावरची त्यांची मतंही बरीच मिळती-जुळती होती. अर्थातच खासगीतली. त्यांच्या पक्षात जोपर्यंत व्यक्त होत नाहीत तोपर्यंत वाटेल त्या विषयावर वाटेल ती मतं बाळगायची मुभा आणि स्वातंत्र्य होतं. गंमत अशी की त्याची ही मतं समपक्षीयांना माहीत असायची काही शक्यता नव्हती. तशी ती माहिती झाली असती तर ती खासगी राहिलीच नसती म्हणा आणि मग सदरहू इसम नेताही राहिला नसता कदाचित. परस्परांच्या खासगी मतांबाबत अशी गुप्तता राखण्याचा असा अलिखित करार असला की बरं असतं. माणसं मोकळेपणानं बोलतात-वागतात. तसंच त्या वेळी सुरू होतं. या मराठी नेत्यानं आपल्या पक्षबांधवांना सांगायला सुरुवात केली.. ‘लोकसत्ता’त पुतिन आणि युक्रेन युद्धावर काय काय आलंय ते वगैरे. इथे जरा पंचाईत झाली. म्हणजे त्या पाहुण्यांना वाटलं हा ‘आपल्या’तला आहे बहुधा. त्यांनी त्याची काही खातरजमा करण्याचे कष्ट घेतले नाहीत. सरळ सुरुवात केली बोलायला ‘‘..काय मस्त केलं की नाही पुतिन यांनी.. काय धडा शिकवलाय युक्रेनला.. असं पाहिजे! उगाच याला काय वाटेल तो काय म्हणेल वगैरे चर्चाच नाही. सरळ युद्ध सुरू केलं! त्या विद्वानांच्या नादाला वगैरे लागण्यात काही अर्थ नसतो. पुतिन यांच्यासारखं असायला हवं. रशियनांना किती अभिमान वाटत असेल आपल्या या नेत्याचा! देशाला महासत्ता बनवायचं असेल तर नेता असाच हवा..’’ वगैरे वगैरे.

एकंदर ही मंडळी पुतिन यांच्या व्यक्तिमत्त्वानं, त्यांच्या राजकीय शैलीनं भारावलेली होती. खरं तर ‘त्या’ सर्वाचं भारलेपण जाणवण्याइतकं स्पष्ट आहे. दृश्यभानतेवर भाळून जाणारा एक मोठा वर्ग असतो प्रत्येक समाजात. त्याला मागचा-पुढचा काही विचार करायचा नसतो. मूल्य वगैरे काही खिजगणतीत नसतात अशांच्या. विजयी होणं फक्त इतकंच काय ते जगण्याचं उद्दिष्ट. अशांचंच प्रतिनिधित्व करणारी ही मंडळी पुतिन यांची शारीरिक क्षमता, त्यांचं ज्युदो विजेते असणं, उघडय़ा छातीनं थंडगार पाण्यात पोहणं.. इत्यादींनी भारली गेलेली होती. ‘नेता असावा तर असा.. एकदम फिट वाटलं पाहिजे त्याच्याकडे पाहून’, ही सरासरी भावना. ती ऐकल्यावर २००१ सालातली अशा तगडय़ाबांड, खणखणीत दिसणाऱ्या/वागणाऱ्या पाकिस्तानचे प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांची आग्रा भेट आठवली. त्या वेळेस त्यांच्याशी अनेकांनी पाय ओढत चालणाऱ्या, कवळी वापरणाऱ्या, धोतरातील पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना केली होती. अगदी चॅनेलीय चर्चातसुद्धा ती झाल्याचं आठवतंय. त्याही वेळी जनरल मुशर्रफ यांच्या लष्करी दर्शनाला भुलून वाजपेयी यांच्या लोभस लोकशाहीवादी लवचीकतेला लुळेपणा मानणाऱ्यांचा मोठा वर्ग होता. त्यांची पुढची पिढी आज पुतिन पुरस्कारात मग्न आहे. हा झाला एक भाग.

दरम्यान युक्रेनचं युद्ध वाढलं. त्यावर पाच-सहा संपादकीयं लिहिली गेली. मुलाखती झाल्या. एकंदर त्यामुळे पुतिन प्रकरण काय आहे हे विस्तृतपणे मांडता आलं. कोणत्याही विषयाला अनेक मुद्दे असतात. अनेक कोनांनी त्याकडे पाहता येतं, हे तत्त्व एकदा मान्य केलं की कोणत्याही विषयाचं संपूर्ण आकलन कोणा एकास होणार नाही, हे उघड आहे. आपल्याला जे कळलंय, भावलंय त्याकडे आपल्या मूल्याधारित नजरेतनं पाहात पाहातच कोणतीही व्यक्ती लिखाण करत असते. तेव्हा या साऱ्यातून पुतिन समग्र कळायला हवा असा अट्टहास करण्यात अर्थ नसतो. माध्यमांनी तर तसं करू नये. कारण त्यांना तत्कालिकतेची एक चौकट असते. तर हे पुतिन पुराण वगैरे वाचत असलेल्या एका कट्टर साम्यवादी नेत्याचा फोन आला. आवाजात सात्त्विक संताप. खरं तर कोणत्याही साम्यवाद्याचं ते लक्षणच. सतत संतापलेले. तशाच त्या सुरात त्यांनी विचारायला सुरुवात केली, हे काय चालवलंयस तू छापाचे प्रश्न. माझ्या उत्तराची वाट न बघताच ते पुढे म्हणायला लागले ‘‘..किती एकांगी मांडणी करतोयस तू पुतिन यांची. त्यांची भूमिका लक्षातच घेत नाहीयेस. पुतिन यांच्यावर अशी वेळ का आली याचा तुला विचारच करायचा नाहीये. कारण तूही भांडवलशाही व्यवस्थेचं फलित आणि फायदेकरी आहेस. तिकडे त्या भांडवलशाहींची मेरूमणी अमेरिका ‘नाटो’मार्फत रशियाच्या गळय़ाला नख लावायला कशी निघाली आहे याबद्दल तुला काही बोलावंसं वाटत नाही! पण पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला त्याबद्दल मात्र तुला त्यांना लाखोली वाहायची आहे. लक्षात ठेव तुझ्यासारख्या या अशा बुझ्र्वा (हा शब्द इतक्या दिवसांनंतरही जिवंत आहे या जाणिवेनेच मी हरखून गेलो) विरोधकांना पुतिन भीक घालणार नाहीत. युक्रेनला ते पराभूत करतीलच..’’ असं बरंच काही काही.

या डाव्या विद्वानाचं आणि त्यांच्या कंपूचं खरं म्हणजे ‘युनियन ऑफ सोविएत सोशलिस्ट रिपब्लिक’.. म्हणजे पूर्वाश्रमीची यूएसएसआर, फुटली याचंच खरं तर दु:ख अजूनही कमी झालेलं नाही. यातल्या अनेकांना मिखाईल गोर्बाचोव हे ‘अमेरिकेचे हस्तक’ होते, असंच वाटतं. अजूनही. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करायला हव्यात यावर या सर्वाचं एकमत असतं. ही चुकांची दुरुस्ती म्हणजे तीच ती. रशियाला पुन्हा महासत्ता बनवणं! आता महासत्ता व्हायचं म्हणजे जुने हिशेब चुकते करायचे आणि जे जे फुटून निघाले त्यांना पुन्हा आपल्यात ओढून घ्यायचं. या डाव्या कंपूच्या मते ‘‘पुतिन योग्य तेच करतायत. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवायचं असेल तर पुतिन यांच्यासारखाच नेता हवा. थेट युद्धच! त्याखेरीज अमेरिकेला धडा शिकवता येणारच नाही’’. हे दोन्ही प्रसंग हे एवढय़ातच घडलेले. अनेकांना त्यात विरोधाभास वाटेल. पण आपल्या देशातल्या देशातसुद्धा अनेक मुद्दे असे आहेत की ज्यावर डावे आणि उजवे हे दोघेही एकाच बाजूला आहेत. उदाहरणार्थ कामगार कायद्यातल्या सुधारणा. किंवा सरकारी मालकीच्या कंपन्यांचं खासगीकरण वा त्यातली निर्गुतवणूक. शिवाय किराणा उद्योगात परकीय भांडवलाच्या प्रवेशाला विरोध किंवा जनुकीय-सुधारित वाणांच्या लागवडीस परवानगी नाकारणं वगैरे. आता या दोन्हीकडच्यांनाही वाटतंय पुतिन जे काही करतायत ते योग्यच आहे आणि युक्रेनला असा धडा शिकवण्यात काहीही गैर नाही. या दोघांचीही खात्री आहे महासत्ता व्हायचं असेल रशियाला तर असाच नेता हवा. किंवा खरं तर ज्या कोणा देशाला महासत्तापदाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचंय त्यांनी अशाच नेत्याहाती देश सोपवायला हवा. या दोन प्रसंगांचा अर्थ लावायच्या प्रयत्नात असताना एकदम तिसरा समोर आला.

न्यू यॉर्क पोस्ट या त्या नावच्या शहरातनं प्रसिद्ध होत असलेल्या दैनिकानं विस्तृतपणे तो छापलाय. तो आहे इंद्रा नुयी यांच्याबद्दलचा. त्या किती यशस्वी आहेत हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. पेप्सीको कंपनीच्या माजी प्रमुख. भारतातनं परदेशात जाऊन मोठय़ा झालेल्या. म्हणजे साध्यासुध्या मोठय़ा नाहीत. मोठय़ाच मोठय़ा. त्यांनी किमान दोन प्रसंगांत उद्गार काढल्याचं ‘पोस्ट’नं छापलंय: ‘‘पुतिन हे महान नेते आहेत’’. पहिल्यांदा २०११ साली. नंतर २०१४ साली. म्हणजे पुतिन यांनी क्रिमियाचा लचका तोडल्यानंतर. युक्रेनियनांच्या समोर नुयीबाईंनी पुतिनगौरवगान गायलं. काय वाटलं असेल युक्रेनियनांना! आपल्या कंपनीचे रशियन सत्ताधीशांशी किती उत्तम संबंध आहेत हेही ऐकवलं गेलं. आणि हे सर्व का? कारण रशियात पेप्सीची प्रचंड गुंतवणूक आहे. इतकी की पेप्सीची अमेरिकेखालोखालची बाजारपेठ म्हणजे रशिया. गेल्या आठवडय़ातल्या घटनांनंतर पेप्सीला आपला रशियन हात जरा आखडता घ्यावा लागला. धाडकन समभाग आपटले पेप्सीचे या निर्णयामुळे! पेप्सी ही कंपनी या पेयपानाच्या क्षेत्रातली महासत्ता आहे.

हे महासत्ता होता येणं, त्यासाठी सतत जिंकणं.. हेच महत्त्वाचं! मूल्यांची चर्चा वगैरे ठीक. एकदा का विजय मिळाला की मूल्यं मॅनेज करता येतातच की!!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anyatha vladimir putin aim to make russia superpower zws
First published on: 12-03-2022 at 01:07 IST