नास्तिक म्हणजे दुर्जन?

सर्व संस्कृतीसुद्धा मानवनिर्मितच आहेत व त्या धर्माधिष्ठित असण्याची काहीच गरज नाही.

गुन्हेगार, भ्रष्टाचारी व पापी माणसे, जास्त हिरिरीने ईश्वर  मानतात व त्याच्या पूजाप्रार्थना, टिळा, गंध लावून वगैरे धार्मिक दिसण्याचा प्रयत्न जास्त जोरदारपणे करतात. याउलट ‘सदाचार व सद्वर्तन’ हे आपले महत्त्वाचे ‘सामाजिक कर्तव्य आहे’ असे मानणारा माणूस, धर्म मानीत नसूनही दुर्वर्तन करणार नाही. कारण आपल्या दुर्वर्तनाचे पाप, धार्मिक कर्मकांडाने, व्रतवैकल्याने धुतले जाईल हे त्याला मान्य नसते.

स्वतंत्र विचार करू शकणारी काही थोडी माणसे त्यांच्या मनावर बालपणापासून ठसविलेल्या देवधर्मविषयक कल्पनांबाबत बुद्धी वापरून विश्लेषणाद्वारे ईश्वरचिकित्सा व धर्मचिकित्सा करतात व आपापल्या परीने सत्यशोध करून, निरीश्वरवादी बनतात आणि स्वत:ला नास्तिक म्हणवून घेण्यात त्यांना काही वावगे वाटत नाही. परंतु जनमनात धार्मिकता टिकून राहण्यात व ती वाढण्यात ज्यांचे वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले असतात असे लोक म्हणजे धर्मगुरू, गुरुबाबा, पुरोहित, मुल्ला, फादर वगैरे ईश्वरवादी किंवा स्वत:ला ईश्वरप्रतिनिधी म्हणविणारे लोक. जनतेच्या मनात जाणुनबुजून असे समीकरण निर्माण करून देतात की ‘आस्तिक लोक पुण्यवान असतात आणि नास्तिक म्हणजे निरीश्वरवादी लोक मात्र पापी असतात.’ याचे एक कारण ते असे सांगतात की आपला निर्माता व सांभाळकर्ता जो ईश्वर आहे त्याच्याप्रति या नास्तिकांना ‘कृतज्ञतेची’ भावना नाही. म्हणजे ते हे लक्षात घेत नाहीत की नास्तिक माणसाला ईश्वराचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे, ईश्वराप्रति कृतज्ञ असण्याचा किंवा त्याची पूजाप्रार्थना करण्याचा त्यांच्यादृष्टीने काही प्रश्नच येत नाही. हेच स्वघोषित प्रतिनिधी, दुसरे कारण सांगतात ते असे की, ‘नास्तिक माणूस ईश्वर मानत नसल्यामुळे तो कुठलेही नैतिक बंधन मानीत नाही व ईश्वराची भीती न उरल्यामुळे तो कुठलेही दुष्कृत्य करतो व म्हणून तो पापी आणि दुर्जन असतो. आणि त्यामुळे माणसाने व समाजाने आस्तिक आणि धर्मशील राहण्यातच समाजाचे हित आहे.’ खरे तर समाज श्रद्धाशील राहण्यात हित आहे ते धार्मिक व राजकीय पुढाऱ्यांचे आहे; समाजाचे नव्हे, पण तो मुद्दा राहो.

मुळात ‘नास्तिक माणूस सज्जन व समाजहितदक्ष नसतो’ हा काहींना बरोबर वाटणारा युक्तिवाद कसा सपशेल चुकीचा व दिशाभूल करणारा आहे ते या लेखात पाहू या. न्याय आणि नीती यांचा संबंध बहुतेक लोक जरी ईश्वर आणि धर्म यांच्याशी जोडत असले तरी तसे नसून त्या दोन्ही स्पष्टपणे वेगळ्या मानवी-सामाजिक कल्पना आहेत. मानवी मनात ईश्वर आणि धर्म या कल्पना निर्माण होण्याच्याही पूर्वी, अगदी रानावनात भटकणाऱ्या माणसाने जेव्हा टोळ्या बनविल्या तेव्हापासूनच त्याच्या काही न्याय व नीतिकल्पना होत्याच. अशा प्राथमिक न्याय-नीतिकल्पनांनाच ईश्वर कल्पना जोडून धर्म बनलेले आहेत. म्हणजे धर्मातून नीती आलेली नसून, नीतीतून धर्म आलेले आहेत. शिवाय नीती ही कालपरिस्थितीनुसार सतत बदलत राहते व ती तशी बदलली पाहिजे. याशिवाय एका धर्माची नीती ही दुसऱ्या धर्माची चक्क अनीतीसुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, हिंदू धर्मात मूर्तिपूजा पूर्णत: नैतिक आहे, तर मुसलमान धर्मात ते मोठे पाप आहे. तेव्हा कुठल्याही धर्मातील सारेच नीतिनियम हे ईश्वरीय नसून ते सर्व मानवनिर्मितच आहेत.
सर्व संस्कृतीसुद्धा मानवनिर्मितच आहेत व त्या धर्माधिष्ठित असण्याची काहीच गरज नाही. नीती व संस्कृती धर्मनिरपेक्ष असू शकतात व त्या तशाच असल्या पाहिजेत.

नीती हा सर्व धर्माचा महत्त्वाचा व अत्यावश्यक भाग आहे हे खरेच आहे. नीतीशिवाय धर्म असणे शक्य नाही हेही खरेच आहे. परंतु ईश्वर आणि धर्म न मानणाऱ्यांचीही नीती असतेच असते. एवढेच नव्हे तर ईश्वर आणि धर्म न मानणाऱ्याची नीती शुद्ध असते व धार्मिक माणसाची नीती तुलनेने हिणकस असते असेही म्हणता येईल. कारण देवधर्म न मानणारा मनुष्य सत्कर्म करतो तेव्हा तो ते सत् आहे, चांगले, नीतीयुक्त आणि समाजोपयोगी आहे म्हणून करतो. ही झाली शुद्ध नीती. या उलट धार्मिक मनुष्य सत्कर्म करतो तेव्हा तो ते पुण्यप्राप्तीसाठी करतो. मृत्यूनंतर स्वत:ला मोक्ष किंवा सद्गती मिळावी या अंतस्थ हेतूने करतो. तेव्हा स्वार्थप्राप्तीसाठी असलेली ही नीतिमत्ता तुलनेने हिणकस ठरते. उद्या जगातील सर्व धर्म नाहीसे झाले तरीसुद्धा नीतिमत्ता व मानवी संस्कृती टिकूनच राहतील व राहिल्याच पाहिजेत.
प्रत्यक्षात मात्र आज आपल्या पूर्वग्रहांमुळे, समाजजीवनात असे घडते की, आस्तिक आणि धार्मिक माणूस सुसंस्कृत आणि नीतिमान समजला जातो आणि नास्तिक माणूस दुर्जन आहे की काय अशी शंका व्यक्त होते. हा समज पूर्णत: चुकीचा आहे. मनुष्य सद्वर्तनी व सदाचारी असतो किंवा दुर्वर्तनी व दुराचारी असतो, हे त्याचे गुण, दुर्गुण त्याच्या धर्मामुळे नव्हे तर त्याच्यावर झालेल्या संस्कारांमुळे व परिस्थितीने त्याने ते ते गुण वा दुर्गुण अंगी बाणविल्यामुळे असतात. धर्मग्रंथांनी सांगितले म्हणून किंवा ईश्वराज्ञा आहे म्हणून धार्मिक मनुष्य चांगलाच वागतो, असे काही जगात दिसून येत नाही. खरे तर जगात याउलट दिसून येते. गुन्हेगार, भ्रष्टाचारी व पापी माणसे, जास्त हिरिरीने ईष्टद्धr(२२४)वर मानतात व त्याच्या पूजाप्रार्थना, टिळा, गंध लावून वगैरे धार्मिक दिसण्याचा प्रयत्न जास्त जोरदारपणे करतात. शिवाय ईश्वराची पूजाप्रार्थना केली व त्याच्याकडे क्षमायाचना केली, तर ईश्वर दयाळू असल्यामुळे, आपल्या दुराचाराला तो क्षमा करील अशा आधीच मिळालेल्या धार्मिक आश्वासनामुळे तो आपले दुराचार चालूच ठेवील ही शक्यता जास्त आहे व आपले पाप धुतले जाण्याच्या आशेने तो शिर्डीला, तिरुपतीला किंवा या वा त्या देवाकडे, गुरूकडे जास्तच जात राहील. याउलट ‘सदाचार व सद्वर्तन’ हे आपले महत्त्वाचे ‘सामाजिक कर्तव्य आहे’ असे मानणारा माणूस, धर्म मानीत नसूनही दुर्वर्तन करणार नाही. कारण आपल्या दुर्वर्तनाचे पाप, धार्मिक कर्मकांडाने, व्रतवैकल्याने धुतले जाईल हे त्याला मान्य नसते. त्यामुळे ‘आस्तिक व धार्मिक तो सज्जन आणि नास्तिक व धर्म न मानणारा तो दुर्जन’ हे समीकरण अत्यंत गैरलागू, ठोकळेबाज आणि दिशाभूल करणारे आहे. या लेखमालेत एप्रिल महिन्यात (२० एप्रिल व २७ एप्रिल रोजी) येऊन गेलेल्या समाजसुधारकांवरील लेखांमधे आपण हे पाहिले आहे की, बहुतेक सुधारक हे बुद्धिप्रामाण्यवादी, संशयवादी आणि ‘नास्तिक नसले तरी अज्ञेयवादी’ होते. आधुनिक भारताचे पहिले थोर महात्मा जोतिबा फुले यांनी निर्मिक या नावाने ईश्वर मानलेला होता व त्याअर्थी ते आस्तिक होते. (पण अर्थात त्यांचा निर्मिक धर्मातल्या देवासारखा मात्र नव्हता). सुधारकाग्रणी आगरकर हेसुद्धा नास्तिक नव्हे पण अज्ञेयवादी होते. सावरकरांच्या बाबतीत अनेक लोक त्यांना नास्तिक समजत असत. पण त्यांच्या लिखाणाचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की त्यांचा कल जरी नास्तिकतेकडे होता आणि त्यांनी धर्मग्रंथवर्णित ईश्वर जरी साफ नाकारला होता तरी ते नास्तिक नव्हे तर एक प्रकारचे अज्ञेयवादी होते. न्यायमूर्ती रानडे चक्क आस्तिक होते. इतर सर्व समाजसुधारक ज्यांनी तत्कालीन समाजाच्या चुकीच्या रूढीपरंपरा मोडण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले, ती थोर माणसे आस्तिकच किंवा नास्तिकच होती असे काहीही म्हणता येणार नाही; किंवा त्यामुळेच ती तशी होती असेही म्हणता येणार नाही.

अलीकडच्या काळातील बाबा आमटेंसारखे महान, थोर लोक जे समाजहितासाठी निरपेक्षपणे, दुर्बल, वंचितांसाठी, दुर्लक्षितांसाठी आपले
आयुष्य खर्ची घालतात, ते आस्तिक किंवा नास्तिक असतात म्हणून तसे करतात, असे म्हणता येणार नाही. आगरकरांना काही लोक ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हणत असत. तसेच मुंबई येथील ‘चालना’कार अरविंद राऊत ज्यांनी बहुश: १९५० नंतरच्या काळात महाराष्ट्रात (मुख्यत्वे मुंबई आणि उत्तर व मध्य कोकणात) पोटजाती व जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजसुधारणा व एकूणच समाजसेवेचे आदर्श कार्य सातत्याने चार ते पाच दशके केले त्यांनाही अनेक लोक ‘देव न मानणारा देवमाणूस’ असे म्हणत असत. एवढेच कशाला आजकाल डॉक्टरी पेशा जरी अनेक कारणांनी लोकांच्या टीकेचा धनी झाला असला, तरी प्रत्यक्षात याच पेशात अनेक दयाळू डॉक्टर असे भेटतात की जे गरीब, गरजवंत, आजारी लोकांकडून पैसे न घेता त्यांच्यावर मोफत उपचार करतात- मग अशा डॉक्टरांनाही संबंधित लोक देवमाणूसच मानतात की! इतरत्रही अशी परोपकारी माणसे भेटतात. अशी माणसे स्वत: ईश्वर-अस्तित्व मानीत असतील किंवा नसतीलही. आस्तिक लोकांना असे वाटत असते की, अशी सत्कृत्ये करणाऱ्या माणसांना देवच तशी प्रेरणा देतो. याउलट नास्तिकांना वाटते की, इथे कुणाला तरी मदतीची गरज आहे; देव अस्तित्वात नसल्यामुळे तो काही याच्या मदतीला येऊ शकत नाही व त्यामुळे याला होईल तेवढी मदत करणे हे ‘माझे’ कर्तव्य आहे. आज मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये, अंगांमध्ये अनेक प्रकारची सत्कृत्ये करणारी परोपकारी माणसे पुष्कळ वेळा दिसून येतात. त्यांना ती प्रेरणा ईश्वर देतो असे बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे. खरे तर तो त्यांचा पिंड असतो किंवा जडणघडण. त्याचा देवाशी काही संबंध नाही.

‘असोसिएशन ऑफ रुरल सर्जन्स ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचे उदाहरण मी येथे देतो. मेडिकल शिक्षणात सदैव प्रथम असलेले व त्या क्षेत्रातील उच्चतम पदव्या घेतलेल्या या डॉक्टरांनी हॉस्पिटल काढून व्यवसाय केला तो खूप पैसा मिळविण्यासाठी मोठय़ा शहरात न करता, तो धुळे जिल्ह्य़ातील दोंडाईचा या लहान गावात सुरू केला व दीर्घकाळ चालविला. कारण तिथे गरीब, आदिवासींना डॉक्टरी उपचारांची काहीच सोय नव्हती. तिथल्या ज्या गोरगरिबांना त्यांनी रोगमुक्त केले किंवा त्यांचे जीव वाचविले ते त्यांना देवमाणूसच नव्हे तर अगदी देव मानतात. पण डॉक्टरांच्या प्रकाशित लिखाणावरून असे दिसून येते की, ते स्वत: मात्र देवाचे अस्तित्व मानीत नाहीत. ते विचारांनी निरीश्वरवादी, नास्तिक बनलेले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Non religious beliefs

ताज्या बातम्या