३१२. परम-आधार

हिरण्यकशिपुला हा विचार पटला. मग पुत्र प्रल्हादाची रवानगी पुन्हा एकवार आश्रमात झाली.

हिरण्यकशिपुनं प्रल्हादाला मारून टाकण्यासाठी किती उपाय केले? त्याला मदमत्त हत्तींच्या पायदळी दिलं, विषारी सापांच्या गराडय़ात ठेवलं, पर्वतशिखरावरून खाली ढकललं, मायाप्रयोगात भांबावून टाकण्याचा प्रयत्न केला, अंधारकोठडीत टाकलं, विष पाजलं, खाणं-पिणं बंद केलं, बर्फाळ पर्वतांवर-आगीत आणि समुद्र तांडवात फेकून पाहिलं.. पण प्रल्हादाला काहीच झालं नाही. इतकंच नाही तर तो तितक्याच सहजतेनं पित्याजवळ परततही होता.

हे पाहून हिरण्यकशिपुला चिंता वाटली. या मुलाला क्षणमात्र भीती वाटली नाही की यानं मदतीसाठी कुणाचाही धावादेखील केला नाही. त्यामुळे याच्यात निश्चितच मोठं सामथ्र्य असलं पाहिजे. मी याच्यावर जे जे अन्याय केले आहेत ते हा विसरणार नाही आणि माझा शत्रू होईल.. बहुधा याच्याचकडून माझा मृत्यूही होईल.. या विचारांनी त्याला ग्रासलं. त्याचा उतरलेला चेहरा पाहून गुरुपुत्रांनी त्याला समजावलं, ‘‘स्वामी! तुम्ही एकटय़ानं त्रिभुवनावर सत्ता मिळवली आहे. हा लहान मुलगा आपल्यासाठी चिंतेचा विषय का बनावा? लहान मूल बालबुद्धीनुसार जे बरळतं त्याची इतकी चिंता कशाला? माझे वडील शुक्राचार्य येतील तोवर हा घाबरून पळून जाणार नाही एवढं पाहा.. कदाचित वय वाढू लागल्यावर आणि गुरुसेवेनं बुद्धी सुधारत जाईल.’’

हिरण्यकशिपुला हा विचार पटला. मग पुत्र प्रल्हादाची रवानगी पुन्हा एकवार आश्रमात झाली. यावेळी मात्र जे घडलं ते अधिकच विपरीत! प्रल्हादानं सोसलेल्या अनन्वित हालांची वार्ता तिथं विद्याध्ययन करीत असलेल्या दैत्यपुत्रांच्या कानी गेली होतीच. तरीही प्रल्हादाच्या स्वभावातला प्रेमळपणा कायम होता, हे पाहून त्यांना त्याच्याविषयी जवळीक वाटू लागली. मग निवांत वेळ मिळाला की ही मुलं प्रल्हादाभोवती गोळा होत आणि तोही या मुलांना भक्तीप्रेमाच्या गोष्टी सांगे. ‘श्रीमद्भागवता’च्या सातव्या स्कंधातील सहावा अध्याय या बोधानं भरलेला आहे.

हा उपदेश फार सखोल आहे, पण आपण त्यातले महत्त्वाचे एक-दोन मुद्दे पाहू.

प्रल्हाद म्हणतो की, ‘‘हा मनुष्यजन्म दुर्लभ आहे. कारण या विनाशी देहात राहूनच अविनाशी अशा परमात्म्याची प्राप्ती केवळ याच जन्मात करता येते. ज्या क्षणी हे सत्य समजते त्या क्षणीच स्वत:ला साधनेत झोकून दिलं पाहिजे कारण या बहुमोल जीवनाचा कधी अंत होईल, हे सांगता येत नाही. जीवनात जे मिळणार आहे ते मिळणार आहेच. त्यामुळे जे सहज मिळणार आहे त्याच्यासाठी धडपडण्याची गरज नाही. त्याउलट  जीवन जसं आहे तसं स्वीकारीत भगवत्प्राप्तीसाठी माणसानं प्रयत्न केले पाहिजेत. ही भगवंताची प्राप्तीही फार कठीण नाही. जो सर्वत्र भरून आहे तो मिळणं कठीण का आहे? आणि एकदा तो मिळाला की मग अशी कोणती वस्तू या जगात आहे जी मिळणं कठीण राहील? मोक्षसुद्धा तुच्छ आहे, तर मग अप्राप्य असं काय उरेल? भगवंताच्या प्राप्तीसाठी ब्रह्मणत्व किंवा देवत्व प्राप्त करून घेणं, ऋषी होणं, ज्ञान कमावणं, दान-तप-यज्ञ आणि मोठमोठय़ा व्रतांचं अनुष्ठान करणं हे काही अनिवार्य नाही! केवळ निष्काम प्रेमच पुरेसं आहे.’’

आश्रमातील मुलांना प्रल्हादाच्या या ‘अज्ञाना’ची लागण झालेली पाहून गुरुजनांना भीती वाटली. त्यांनी हिरण्यकशिपुकडे धाव घेतली. आपल्या पुत्राची ही ‘कर्तबगारी’ ऐकून तो क्रोधानं बेभान झाला. त्यानं प्रल्हादाला समोर उभं केलं आणि संतप्त स्वरात विचारलं, ‘‘तिन्ही लोक माझ्या क्रोधापुढे चळाचळा कापतात. तू कोणाच्या बळावर एवढा निर्भय झाला आहेस? कोणाच्या ताकदीवर माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतो आहेस?’’ संतप्त पित्यासमोर प्रल्हाद मग त्या सर्वाना सहजप्राप्य असलेल्या परमआधाराचं वर्णन करू लागला.

चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या