१६४. जवळीक : २

जवळ असणं आणि जवळीक असणं, यात मोठा फरक आहे.

जवळ असणं आणि जवळीक असणं, यात मोठा फरक आहे. उमदीकर महाराज हे खेडवळ आणि अडाणी अशा अंबुरावांना फार मानतात, याचा काही ‘ज्ञानी’ शिष्यांना मत्सर वाटत होता. एकदा अंबुराव महाराज सकाळी मंदिर झाडत होते तेव्हा उमदीकर महाराज दर्शनाचे निमित्त करून आले आणि ओरडले, ‘‘ही काय मंदिर झाडायची वेळ आहे?’’ अंबुरावांनी ेकेरसुणी बाजूला ठेवली आणि हात जोडून म्हणाले, ‘‘क्षमा असावी महाराज.’’ महाराज मंदिरातून दर्शन घेऊन काही वेळानं बाहेर आले आणि हात जोडून उभ्या असलेल्या अंबुरावांना पाहून पुन्हा ओरडले, ‘‘नुसते उभे काय राहिलात? मंदिर झाडायला हवं, हे समजत नाही का?’’ अंबुराव पुन्हा म्हणाले, ‘‘क्षमा असावी महाराज..’’ आणि लगेच मंदिर झाडू लागले. तोच ते ‘ज्ञानी’ शिष्य समोर येताच महाराज त्यांनाही टाकून बोलले आणि ते त्यांच्या जिव्हारी लागून ते रडू लागले तेव्हा महाराजांनी अंबुरावांचं वेगळेपण सर्वाना उघड करून सांगितलं. त्यांच्यातला ‘मी’पणा कसा पूर्ण लोपला आहे आणि त्यामुळेच ते मला कसे आवडतात, हेही सांगितलं. जो सद्गुरू फकिर आहे त्याला शिष्याच्या अंत:करणातली भौतिकाची आसक्ती आवडेल का? जो मान-अपमानाच्या पलीकडे आहे त्याला शिष्याच्या मनातली लोकेषणा म्हणजेच लोकांकडून मान मिळावा, ही आस आवडेल का? जो पूर्ण निर्लिप्त आहे त्याला शिष्यातला ‘मी’पणा आवडेल का? असा भेद जोवर आहे तोवर जवळ असूनही जवळीक होऊ शकणार नाही आणि ज्याच्यात असा भेद नाही अर्थात ज्याचा विचार, वृत्ती, भावना, अपेक्षा, ध्येय हे सद्गुरूंनुसारच आहे असा शिष्य शरीरानं दूर असूनही त्याच्याइतकी जवळीक कुणालाच साधणार नाही! ज्याच्यात असे अनंत भेद आहेत त्याला मात्र सद्गुरूंचं सान्निध्य जाणवणार नाही. ते जाणवत नसलं तरी सद्गुरू मात्र सदोदित जवळच असतात आणि ते त्याचं अल्प धारिष्टय़ पाहात असतात! अर्थात भौतिकाची हानी अल्प का होईना सोसण्याचं धैर्य, मनाविरुद्ध घडणं अल्प का होईना स्वीकारण्याचं धैर्य माझ्यात आलं आहे का, याची तपासणी ते करीत असतात. गोरक्षनाथांच्या बरोबर स्त्रीराज्यातून निघालेल्या मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट झोळीत घेतली होती. त्या झोळीची खूप चिंता ते वाहात होते. काही कारण काढून ती झोळी गोरक्षांकडे सोपवून मच्छिंद्रनाथ थोडं दूर अंतरावर गेले. गोरक्षांनी झोळी उघडून पाहिली आणि सोन्याची वीट पाहाताच ती जंगलात फेकून दिली. ही गोरक्षनाथांचीच मच्छिंद्रांनी घेतलेली परीक्षा होती! स्त्रीराज्यातल्या निश्चिंतीचा मोह गोरक्षांना वाटला नव्हताच. कामिनी पाठोपाठ कांचनाचाही मोह त्यांना शिवला नाही. तेव्हा तिसरी परीक्षा झाली ती दृश्याच्या आसक्तीची! एका घरातून गोरक्षांनी आणलेली भिक्षा मच्छिंद्रनाथांना फार आवडली. ती आणायला गोरक्षांना त्यांनी परत पाठवलं गोरक्ष त्या घरी गेले तेव्हा घरातल्या स्त्रीने त्यांचा अपमान केला. गुरूला भिक्षा हवी असल्याचं भासवत मलाच पुन्हा पाहायला आलास ना, असं विचारलं. मग गोरक्षांना अट घातली की, डोळे काढून दिलेस तरच तुला भिक्षा देईन! गोरक्षनाथांनी तात्काळ तसं केलं आणि भिक्षा घेऊन ते परतले. या परीक्षेतही गोरक्षनाथ पार झाले तेव्हा आनंदून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या डोळ्यावरून हात फिरवला. त्यांना दिव्य दृष्टी प्रदान केली. दृश्याचा प्रभाव शिष्य झुगारून देतो तेव्हा सद्गुरू आनंदून त्याला दिव्य दृष्टी प्रदान करतात, हे सांगणारं हे रूपक! तेव्हा गोरक्षनाथांनाही जिथं अशा परीक्षांतून जावं लागलं आणि त्यानंतरच अतूट असं सद्गुरू सान्निध्य त्यांच्या अंत:करणात विलसू लागलं, तिथं आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांना ‘अल्प’ परीक्षांना तरी सामोरं जावं लागेलच ना?

-चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या