संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्यानंतर नाटय़संमेलनाध्यक्षाचा हा बहुमान मिळाला असल्याबद्दल फैय्याज यांना आनंद आणि अभिमानही आहे; पण हे सांगताना त्यात कुठेही अभिनिवेश नसतो. रंगभूमीसाठी आजवर जे काही योगदान दिले, त्याची दखल घेतली गेली, हा त्यांच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. रंगभूमीवरील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने हा सन्मान मिळाल्याबद्दल त्या समाधानी, आनंदी आहेत.
सोलापूरसारख्या छोटय़ा शहरातून रंगभूमीवरील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मुंबईत येऊन पाश्र्वगायनासह मराठी संगीत रंगभूमी, गद्य नाटक, मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांत त्यांनी अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला. बेळगाव येथे पुढील वर्षी होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड एकमताने झाली आहे. २००७ मध्ये हुलकावणी दिलेले हे पद त्यांना आता मिळाले आहे.   
संगीत, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी अशा विविध प्रकारच्या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. विविध प्रकारच्या भूमिका साकारल्याने त्यांच्यावर कोणत्याही विशिष्ट भूमिकेचा शिक्का बसला नाही. ‘कटय़ार काळजात घुसली’मधील ‘झरीना’ आणि ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकातील ‘जुलेखा’, तर ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातील ‘कल्याणी’ व याच नाटकावर आधारित ‘महानंदा’ या चित्रपटातील ‘मानू’ या भूमिकांवर त्यांनी स्वत:ची नाममुद्रा उमटविली. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘संगीत संत गोरा कुंभार’, ‘तो मी नव्हेच’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘बावनखणी’, ‘भटाला दिली ओसरी’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘सूर राहू दे’, ‘होनाजी बाळा’, ‘मदनाची मंजिरी’ या नाटकांतील त्यांच्या भूमिकांपेक्षा ‘मित्र’ या नाटकातील डॉ. श्रीराम लागूंसोबतची भूमिका वेगळी होती, निराळ्या अभिनयशैलीची मागणी करणारी होती.. तीही ताकदीनेच निभावून त्यांनी अभिनयगुण सिद्ध केले. ‘पैंजण’, ‘वजीर’, दायरे’, ‘एक उनाड दिवस’ असे चित्रपट, काही मालिका यातून त्यांचा अभिनय प्रवास सुरू आहे. ‘जाणता राजा’ या महानाटय़ातील काही गाण्यांचे पाश्र्वगायन फैय्याज यांनी केले असून यातील ‘जिजाबाई’ यांचे संवाद त्यांच्याच आवाजात आहेत. त्यापूर्वी दादा कोंडके यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाटय़ाच्या साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायली. पु. ल. देशपांडे यांच्यासोबत ‘वटवट’ नाटकात त्यांनी काम केले. ‘घरकुल’ चित्रपटातील ‘कोन्यात झोपली सतार’, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, ‘निर्गुणाचा संग जो धरिला आवडी’ (संत गोरा कुंभार), ‘या बाळांनो या रे या’, ‘स्मरशिल राधा, स्मरशिल यमुना’ (वीज म्हणाली धरतीला) ही त्यांनी गायलेली गाणी प्रसिद्ध आहेत. साधे, ऋजू व्यक्तिमत्त्व आणि अजातशत्रू स्वभाव असलेल्या फैय्याज यांना विविध सन्मान आणि पुरस्कारही मिळाले आहेत.