स्मृती एका आवाजाची..
ललिता देऊळकर-फडके यांचा २५ मे हा स्मृतिदिन, यंदाचा तिसरा. ‘रेडिओ सिलोन’वरील जुन्या, अजरामर चित्रपटसंगीताच्या श्रोत्यांना ‘ललिता देऊळकर’ हे नाव परिचित आहे.. १९४८ सालच्या अतिशय लोकप्रिय ‘नदिया के पार’  चित्रपटातील ‘मेरे राजा हो ले चल नदिया के पार’ हे युगुलगीत (मोहम्मद रफींसह) किंवा याच चित्रपटातील ललिताजींनी गायिलेली अन्य गाणीही (संगीत : सी. रामचंद्र) आठवत असतील.. ‘शहीद’ (१९४८) मधील ‘बचपन की याद धीरे धीरे’ हे त्यांचे गाणे तर आज यूटय़ूबवरही पाहता येते, तिथेही ते लोकप्रिय आहे! सिपहिया (१९४९, सी. रामचंद्र), विद्या (१९४८, एस. डी. बर्मन) या चित्रपटांतही त्यांची गाणी होती. ‘सुधीर फडके यांच्या पत्नी’ ही त्यांची ओळख १९४९ साली विवाहानंतर रूढ झाली. त्यानंतरही ‘मोठं मोठं डोळं माझं, कोळय़ाचं जाळं तुझं’ (जशास तसे) किंवा ‘रंगू बाजारला जाते’ या गाण्यांतून त्यांचा खडा, उपजत आणि गोड आवाज ऐकू येत राहिला होता. ‘गीतरामायणा’तील काही पदांसाठी त्यांनी आवाज दिला होता. संगीताच्या स्मृती काळ पुसू शकत नाही हे खरेच, शिवाय संगीतकार सुपुत्र श्रीधर फडके यांच्या संगीतामुळे त्या आजही आपल्यात आहेत.
– जाई विनय जोग, कोथरूड, पुणे.  

वस्तुस्थितीकडे पाहिल्यास ‘दृष्टिदोष’ दिसेल का?
‘दृष्टीतच दोष’ हे रवींद्र पोखरकर यांचे पत्र (लोकमानस, २२ मे) वाचनात आले. कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेल्या एका वृत्तवाहिनीशी पत्रलेखक व्यवसायानिमित्त संबंधित आहेत. त्यांनी ‘लोकसत्ता’ हे तटस्थपणे वार्ताकन करणारे वृत्तपत्र असूनही ‘दृष्टीतच दोष’ आहे असे म्हणणे खटकले. पोखरकरांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे कळवावासीयांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केलेल्या व कार्यान्वित झालेल्या तसेच यापुढे होणाऱ्या विकासकामांचे आम्ही कळवेकर स्वागतच करतो. पण केवळ ‘व्होट बँके’साठी अनधिकृत बांधकामे जपणाऱ्या व त्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्या आमदारांचा निश्चितच धिक्कार करतो. राष्ट्रवादीच्या व इतर सर्वच पक्षांच्या कळव्यातील घराणेशाहीबहाद्दर नगरसेवकांनी केवळ स्वत:च्या राहत्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व मोकळा केला पण कळवा गावठाण परिसराचे काय? गेली ६५ वष्रे १३ पंचवार्षकि योजनांत ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराचा शहर विकास आराखडय़ानुसार सर्वागीण विकास का होऊ शकला नाही? तत्कालीन नगरसेवक, आमदार, खासदार निधी गेला कुठे? अथवा कोठे वळविण्यात आला? कायदे धाब्यावर बसवून सरकारी कर्मचारी, पोलीस, स्थानिक नेत्यांच्या संगनमतामुळे मनुष्यनिर्मित विविध समस्या कळवा – मुंब्य्रात वाढल्या. असंख्य अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? कोणतेही कर न   भरणाऱ्या परप्रांतीय ‘व्होट बँक मेंबर्स’ना सर्वाधिक सुविधा का व कशा पुरविल्या जातात?  कळवा पूर्वेकडील परप्रांतीयांच्या अनधिकृत ‘मिनी टाऊनशिप’ला कोणी संरक्षण दिले? अनधिकृत गाळेधारकांना पर्यायी हक्काची मोफत घरे कर भरणाऱ्या कळवेकरांच्या पशातून का द्यायची? मुंब्य्रातील रस्ते ‘फेरीवाल्यांपासून मुक्त आणि प्रशस्त’ झाले पण मुंब्य्राकडे लक्ष देताना कळवा स्टेशन रोड ते शिवाजी चौकापर्यंतचा परिसर, पदपथ, रस्ते मोकळे केव्हा होणार? दुकानांपुढील अनधिकृत बांधकामे केव्हा पाडली जाणार? रस्त्यांचे रुंदीकरण, नूतनीकरण केव्हा?  मुंब्य्रातील कायापालटाबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या, कळवा स्टेशन परिसरात बॅनरबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीने कळवा-मुंब्य्राची तुलना करूच नये.
ही अशी परिस्थिती केवळ कळवा-मुंब््रयात नसून अन्य अनेक ठिकाणी आहे. त्यावर टीका सकारात्मक वृत्तीने घेण्याची मानसिकता अंगी बाणण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी चिंतन शिबिरे भरवावीत किंवा आत्मक्लेश करून घ्यावेत! आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून असणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी मतदारसंघात केवळ निवडणुका जवळ आल्यावरच सुधारणा करायला घेऊ नयेत तर हा बदल सातत्यपूर्ण असावा.
– प्राची कमलाकर गुर्जर, कळवा

जाळावरच वातानुकूलन यंत्रणा चालते!
‘खळगीमधला जाळ’  हे ‘अ‍ॅश इन द बेली- इंडियाज् अनफिनिश्ड बॅटल अगेन्स्ट हंगर’ या पुस्तकाचे अतुल देऊळगावकरांनी केलेले समीक्षण (बुकमार्क, १८ मे) मन हेलावून टाकणारे आहे. या निमित्ताने, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे निसर्गाचे तत्त्व असमानतेवरच आधारित कसे आहे, याचीही पुन्हा जाणीव झाली. मानवी भूकही या विषमतेच्या तत्त्वाला अपवाद नाही. फरक इतकाच की, आदिमानवाचा काळ हा मानवाने जंगलात पशुपक्ष्यांशी लढण्याचा होता, परंतु आता मानव मानवाशीच लढत जगतो आहे, कारण अन्य कोणाच्यातरी ताब्यात असते. एकाच्या अन्नाची-भुकेची तरतूद दुसऱ्या उपाशी वा कुपोषित राहण्यावर आधारित असते.
एक जण वाजवीपेक्षा अधिक अन्नसाठा करतो तेव्हा तो दुसऱ्याला (स्वत:च्या किंवा दुसऱ्या देशांमधील माणसांना) तेवढाच काळ उपाशी वा कुपोषित ठेवत असतो. ही विषमता प्रगतीमुळे वाढतेच. मानवाचा विकास असमानच होत आहे. या मानवी विकासात, जगण्याची सामाजिक अंगे पुढे न गेले पशुपक्षी तर कधीच मागे पडलेले आहेत. आता ते मानवी विकासाने भरडले जात असल्यामुळे प्रजातीच्या प्रजातीच नष्टही होऊ लागल्या आहेत.
साम्यवादाने बळजबरीतून आणलेली समानता जास्त काळ टिकत नाही, हे दिसलेच आहे. म्हणजे निसर्गदत्त विषमतेवर उपायही निसर्गातून शोधावा लागणार. ‘जेथे आहे तेथेच खा, इतरांना जगण्यासाठी तेथेच राहू द्या’ हे नैसर्गिक तत्त्व अनुसरून साठा करणे किंवा गरजेपेक्षा जास्त संचय करणे थांबले, तरच विकास विषमतामूलक होणार नाही.
एरवी, आज गरिबांच्या खळगीतील जाळाचा उपयोग श्रीमंतांच्या वातानुकूलन यंत्रणा चालवण्यासाठी होतोच आहे आणि त्याला सरकारही साथ देते आहे.
– म. ने. वालचाळे, खारघर, नवी मुंबई.

गरज सचिनच्या मार्गदर्शनाची
अनेक वष्रे क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्येदेखील त्याचा ‘फॉर्म’ फारसा चांगला नाही. ‘आयपीएल’मध्येदेखील तो सातत्याने प्रभावहीन ठरत आहे. त्यामुळे त्याने  टेस्ट व आयपीएलमधूनही निवृत्त व्हायची वेळ आता आलेली आहे.
अर्थात, रिटायर झाल्यावरही त्यांनी एक कोच म्हणून काम पाहणे अतिशय गरजेचे आहे. आज भारतीय क्रिकेटला सचिनसारख्या खेळाडूची नितांत गरज आहे, जो अनेक वष्रे भारतीय क्रिकेटचा झेंडा जगभर फडकवू शकेल. त्याने सध्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करून उद्या हेच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व कसे सिद्ध करतील व वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा सांघिक खेळी व विजय किती मोलाचा आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या विकासाकरिता वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या अमलात कशा आणता येतील यासाठीही त्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मैदानावर व मदानाबाहेर सामंजस्याने व कोणावरही अरेरावी, टीकाटिप्पणी न करता क्रिकेटचा आनंद सचिनने लुटला आहे, हेच आजच्या तरुण पिढीने त्याच्याकडून शिकले पाहिजे. यासाठी सचिनने आता कसोटी तसेच आयपीएलमधून बाहेर पडणे गरजेचे आहे.
– सुहास वैद्य, डोंबिवली

‘वरिष्ठ सभागृहा’च्या हेतूला पक्षपुंडांमुळे हरताळ
‘एका कल्पनेची भ्रूणहत्या’ हा अग्रलेख (२४ मे) संबंधितांची कानउघाडणी करण्याइतपत परखड आहे; पण गेंडय़ाची कातडी पांघरलेल्यांवर त्याचा काय परिणाम होणार! या संदर्भात आणखी विचार असा की घटनाकारांनी राज्यसभा आणि लोकसभा तसेच विधान परिषद व विधानसभा अशी दोन (द्विदल) सभागृहांची रचना केली आहे. त्यामागचा हेतूच आज फसलेला दिसतो.
लोकसभा वा विधानसभांत निवडलेल्या सभासदांनी बहुमताच्या उन्मादात घटनेच्या, लोकहिताविरुद्ध कायदे करू नयेत, त्या कायद्याचा सांगोपांग विचार व्हावा म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामधील पारंगत असे लोक राज्यसभेत, विधान परिषदेत असावेत, हा घटनाकारांचा उद्देश; त्यालाच या पक्षपुंडांनी हरताळ फासून आपलेच लोक- मग ते तज्ज्ञ नसले तरी ते निवडून आणतात हाही घटनेचा अपमानच होय.
– मधुकर वि. दीक्षित, दहिसर