ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रिकेटची जशी परंपरा आहे, तशीच यशस्वी संघनायकांचीही आहे. अगदी गेल्या काही दशकांचा आढावा घेतल्यास अॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगचा हा वारसा मायकेल क्लार्क पुढे चालवत आहे. दीर्घ स्वरूपाच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी लघुरूपाचा म्हणजेच ट्वेन्टी-२० क्रिकेटचा क्लार्कने तीन वर्षांपूर्वीच कर्णधार असताना त्याग केला. सध्या भारताविरुद्धच्या कसोटीत क्लार्कने शतक झळकावून आपला लाडका मित्र फिलिप ह्य़ुजेसला मानवंदना दिली; परंतु ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट गेले दोन आठवडे दुष्टचक्रातून जात असताना क्लार्कने दाखवलेल्या वृत्तीचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. याच कारणास्तव क्लार्क आपली खेळी साकारण्यासाठी क्रीझकडे जात असताना क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी त्याला उभे राहून अभिवादन केले.
उसळता चेंडू लागल्यामुळे ह्य़ुजेसचा मृत्यू झाल्याने ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली होती. फिलिप ह्य़ुजेसच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला क्लार्कने धिराने सावरले. ज्याचा चेंडू ह्य़ुजेसच्या जिवावर बेतला त्या शॉन अॅबॉटच्या पाठीशीसुद्धा क्लार्क उभा राहिला. त्यामुळेच तो आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पूर्वपदावर येऊ शकले. क्लार्कचे पदार्पण २००४ मध्ये भारताविरुद्ध; परंतु भारतासाठीच तो सर्वात जास्त धोकादायक ठरला. २०११ मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद पाँटिंगकडून त्याच्याकडे चालत आले. मग त्याच्या फलंदाजीचा बहर तेजाने जाणवू लागला. २०१२ या वर्षांत क्लार्कने धावांची टाकसाळ उघडताना चार द्विशतके झळकावली होती. विसडेन, आयसीसीचे अनेक पुरस्कार त्याने काबीज केले. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेचा अॅलन बोर्डर पुरस्कार त्याने तब्बल चार वेळा जिंकला आहे. २०१३-१४ च्या अॅशेस मालिकेत क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५-० असा ‘व्हाइट वॉश’ दिला होता. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या युगात आयपीएलचा झेंडा घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या वारीत सामील झाले. क्लार्कला मुळातच हा प्रकार आवडत नसल्यामुळे त्याने आयपीएलला फारसे महत्त्व दिले नाही. काही वर्षांपूर्वी पुणे वॉरियर्स आणि सिडनी थंडर्स या संघांकडून त्याने ट्वेन्टी-२०चे प्रतिनिधित्व केले, परंतु अल्प काळात त्याने या मनोरंजक क्रिकेटपुढे पूर्णविराम दिला. गेले वर्षभर दुखापती क्लार्कचा पिच्छा पुरवीत आहेत, पण त्या कशाचीही तमा न बाळगता तो खंबीरपणे उभा आहे. मैदानावर किंवा मैदानाबाहेर संघाला कठीण परिस्थितीत सावरणाऱ्या क्लार्कची प्रतिमा सध्याच्या भावनिक कालखंडात उंचावली आहे. आता ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न त्याने जोपासले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2014 रोजी प्रकाशित
मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रिकेटची जशी परंपरा आहे, तशीच यशस्वी संघनायकांचीही आहे. अगदी गेल्या काही दशकांचा आढावा घेतल्यास अॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगचा हा वारसा मायकेल क्लार्क पुढे चालवत आहे.

First published on: 11-12-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael clarke