स्मारके म्हणजे काय याचा विचार करायचा नाही, असलेल्या स्मारकांचे महत्त्व ओळखायचे नाही आणि मग एखादे स्मारक हातचे गेले म्हणून उमाळय़ाचे कढ काढायचे, ही रीत राजकारणातून आता लोकांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे मुंबईतील राहते घर, त्यांच्या अकाली मृत्यूनंतर ४८ वर्षांनी का होईना, लिलावात विक्रीला काढले जाण्याच्या निमित्ताने हेच दिसले. तरीही लिलाव झालाच आणि २६० कोटी रुपये या अंदाजित किमान किमतीपेक्षा किती तरी जास्त- ३७२ कोटी रुपयांची बोली लावून स्मिता कृष्णा (पूर्वाश्रमीच्या गोदरेज) यांनी तो बंगला विकत घेतला. मलबार हिलवरचा हा ‘मेहरानगीर’ नावाचा तीन मजली बंगला जतन करण्यासाठीच आपण तो विकत घेतला, असे स्मिता यांचे म्हणणे असल्याची वार्ता आहे. होमी भाभांचे बंधू आणि ‘मेहरानगीर’चे एकमेव मालक जमशेद जहांगीर भाभा यांनी हा बंगला आतील सर्वच्या सर्व सामानसुमानासकट राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्राच्या- म्हणजे एनसीपीएच्या हवाली केला होता आणि त्याच्या विक्रीतून या केंद्राचा खर्च भागावा, यासाठी लिलाव आवश्यकच असल्याच्या बातम्या किमान तीन महिन्यांपूर्वीपासून येत होत्या. प्रत्यक्ष लिलाव झाला बुधवारी, त्याआधीच्या आठवडाभरात जणू सर्वाचाच ऊर भाभाभिमानाने भरून आला होता.  काहीही करा, पण बंगल्याची विक्री रोखा, तो बंगला ताब्यात घ्या आणि त्याचे स्मारक करा, अशी गळ केंद्राला घालण्याची धावपळ राज्य सरकारने केली. त्याहीआधी जेव्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे कर्मचारी याच मागणीसाठी कंठशोष करीत होते, तेव्हा त्याची दखल राज्य सरकारने घेतली नव्हती. शिवाय, लिलावाला न्यायालयातूनच स्थगिती मिळवण्याचे प्रयत्नही ‘हे खासगी मालमत्तेवरील अतिक्रमण ठरेल’ असे न्यायालयानेच सुनावल्यामुळे फोल ठरले होते. म्हणजे लिलाव होणार हे निश्चित होते आणि अशा स्थितीत कोणत्याही सरकारने यात न पडणेच श्रेयस्कर होते. ज्या पंडोल लिलावगृहावर या लिलावाची जबाबदारी सोपवण्यात आली, त्यांना जणू खलनायक म्हणून रंगवण्याचा प्रयत्नही या उमाळेबाजीच्या भरात झाला. वस्तुत: ही लिलाव संस्था चालवणाऱ्या दादीबा आणि खुर्शीद पंडोल यांचे कलाप्रेम, स्वत: मुंबईकर असल्याने त्या दोघांना असलेली मुंबईच्या इतिहासाची आणि पारसी समाजाच्या योगदानाची जाण, याबद्दल कोणीही शंका घेऊ नये. या बंगल्यातील सोफासेट, भलेमोठे भोजनमेज, चहादाण्या आणि कपबशा, अगदी चपलांचे कपाट आणि भाभा कुटुंबातील स्त्रियांच्या उंची साडय़ा अशा सर्व वस्तू  ‘पंडोल’मार्फत एनसीपीएने विकल्या आहेत, त्यातून सुमारे दीड कोटी रुपयांची पुंजीही मिळाली आहे. म्हणजे ‘स्मारक करा’ ही मागणी समजा काही चमत्काराने पूर्ण झाली असती तरीही, होमी व जमशेद भाभा यांची राहणी कशी होती, हे त्या निवास-स्मारकातून दिसणे अशक्यच होते. तरीही ते रिकामे घर ‘वाचवायचे’, त्याचे स्मारक करायचे, ही कल्पना खुळचट म्हटली पाहिजे. बरे, ती वास्तू पाडली जाऊ नये आणि तिचे संधारण व्हावे, ही मागणी करणारे एरवी काहीही बिल्डरांच्या घशात गेले तरी गप्प राहायला मोकळेच. ज्या महाराष्ट्रात मुंबई आहे, तेथे शिवरायांच्या किल्ल्यांची वा त्यांच्या कन्येच्या स्मारकाची दुर्दशा चालू ठेवून भव्यदिव्य सागरी स्मारकाच्या वल्गना होतात, ज्या देशात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी हैदराबादची सरदार पटेल अकादमी हेच त्या पोलादी पुरुषाचे खरे स्मारक आहे, हे कुणालाच पटणार नाही; तेथे भाभांचे नाव लावणारे अणुसंशोधन केंद्र हे होमी भाभांचे स्मारक, हे कोणी ओळखावे? तेव्हा एका वैज्ञानिकाचे देव्हारे माजवण्याचा रस्ता या लिलावाने कायमचा बंद केला, हे ठीकच झाले.