मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन रद्द करणे भाग पडले, याचा अर्थ ते चुकीचेच होते असा आहे. कोणत्याही वरिष्ठाला आपल्या हाताखालील कोणत्याही माणसाने, आपल्याविरुद्ध कोणतीही कृती करणे अजिबात आवडत नाही. आपल्या ‘कर्तृत्वा’ने स्वनामधन्य झालेले कुलगुरू राजन वेळुकर हेही त्याला अपवाद नव्हते. आपली खुर्ची टिकवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या या कुलगुरूंनी प्रा. हातेकर यांना निलंबित करण्यापूर्वी राजकारणातील आपल्या गुरूंचा सल्ला घेतलाच असणार. त्यांचे गुरूही तेवढेच कसबी असल्याने हातेकरांच्या निलंबनामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मरून जातील, अशी त्यांची अटकळ. त्यामुळे एका झटक्यात हातेकरांचे निलंबन घडून आले. गेल्या काही दिवसांत त्याविरुद्ध उठलेले काहूर हा समाजात चांगल्या आणि सत्प्रवृत्त माणसांच्या मागे कुणी तरी उभे राहात असल्याचे द्योतक होते. प्रा. हातेकर यांच्या बाजूने सुरू झालेले हे आंदोलन आपल्यावर येणार नाही ना, याची चिंता राज्यकर्त्यांना जास्त असल्याने अखेर हे निलंबन मागे घेण्यात त्यांनी शहाणपणा दाखवला. हातेकर यांच्या या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या काळ्या गोष्टी काही प्रमाणात तरी समोर आल्या आणि विद्यापीठाविरुद्ध बोलता कामा नये, अशी जी दंडेलशाही सुरू आहे, तीही यानिमित्ताने पुढे आली. विद्यापीठात कोणत्याही पदावर काम करणाऱ्यांना वरिष्ठांच्या मर्जीत राहण्यातच धन्यता वाटत असल्याने त्यांनी हातेकर यांना साथ दिली नाही, हे त्यातील एक उघड सत्य. मात्र विद्यार्थ्यांनीच हे प्रकरण धसाला लावण्याचे ठरवले. डॉ. हातेकर यांनी जे १६ मुद्दे उपस्थित केले होते, त्याबद्दल ब्र न काढता, कुलगुरूंनी निलंबनाची कारवाई करणे, हे किती बेशरमपणाचे होते, हे शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दिसून आले. या मुद्दय़ांबाबत नेमलेल्या एक सदस्य समितीने जे सत्यशोधन केले, तेही कुलगुरूंचीच री ओढणारे आहे. असल्या संशोधनात ना सत्य असते, ना संशोधन. निष्कर्ष आधीच ठरवून केलेले हे शोधन विद्यापीठाच्याच मुळावर येण्याची शक्यता अधिक. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून कुलगुरूंना तंबी दिल्यानंतरच हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ‘पडलो, तरी नाक वर’ या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय देत कुलगुरूंनी आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठेचाही बोजवारा यानिमित्ताने उडवून घेतला आहे. मुंबई विद्यापीठात कोणतेच प्रश्न वा समस्या नाहीत, असे भासवण्याचा जो प्रयत्न विद्यापीठाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे, तो राजन वेळुकर यांचे लज्जारक्षण करणारा नाही. व्यवस्थापन परिषदेतील सर्वानी निलंबनाचे समर्थन केले आणि हातेकर यांच्या आरोपांतही तथ्य नसल्याचे मान्य केले, असे सांगणारे हे पत्रक किती फसवे आहे, हे सांगण्यासाठी या परिषदेतील कुणा ताठ कण्याच्या सदस्याने पुढे येण्याची आता खरी गरज आहे. विद्यापीठातील नेमणुका आणि त्यात राज्यकर्त्यांचे असणारे हितसंबंध यानिमित्ताने अधिक स्पष्टपणे उघड झाले, तर पुढील काळात शैक्षणिक हेतूंना हरताळ फासणारी अशी कृती करताना प्रत्येक पातळीवर किमान काळजी घेतली जाईल. प्रा. हातेकर यांच्या बाजूने उभे राहणे म्हणजे कुलगुरूंचा रोष ओढवून घेणे, असा समज बाळगणाऱ्या सर्वाना मनातल्या मनात झाले ते बरेच झाले, असे वाटत असेल! समाजासमोर आपले म्हणणे ठामपणे मांडण्याचीही हिंमत नसलेले बुळचट अध्यापक आणि अधिकारी यांच्यामुळेच तर खरे नुकसान होत आहे, हेही यामुळे स्पष्ट झाले आहे. प्रा. हातेकरांचे निलंबन आणि ते मागे घ्यावे लागण्याची कृती यामुळेही कुलगुरूंना काही शहाणपण येणार नसेल, तर भविष्यकाळ आणखीनच अंधार निर्माण करणारा असेल.