भारतीय जनता पक्षाचे नगर जिल्ह्य़ातील खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने तंबाखूजन्य उत्पादनांमुळे कर्करोग होतो असे कुठलाही भारतीय अभ्यास सांगत नसल्याचा अहवाल दिला असून, त्यातून त्यांचा देशीवाद प्रतीत होत असला तरी विज्ञानविषयक संशोधनाबाबतचे अज्ञान मात्र लख्ख दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे पेट्रोलच्या टाकीचा स्फोट होण्याची शक्यता असते. तेव्हा टाकी पूर्ण भरू नका, असा विज्ञानसल्ला देणारे संदेश सध्या मोबाइलवरून फिरत आहेत. गांधी यांचे विधान त्या पठडीतलेच, म्हणजे बिनआधाराचे आहे. छद्मविज्ञानाचाच हा एक वेगळा प्रकार म्हणावा लागेल. गांधी यांनी असा अहवाल देण्यापूर्वी इंटरनेटवर थोडे गुगलले असते, तरी त्यांना नंतर मग आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असे खुलासे देत फिरण्याची वेळ आली नसती. त्यांना हे समजले असते की, याविषयीचे पहिले भारतीय संशोधन १९७० मध्ये प्रसिद्ध झाले आहे. बॉम्बे कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या डी. जे. जस्सावाला आणि व्ही. ए. देशपांडे यांच्या त्या संशोधनात तंबाखू खाणे आणि ओढणे याच्याशी कर्करोगाचा संबंध असल्याचे स्पष्ट म्हटले होते. त्यानंतरही असे बरेच अभ्यास झालेत. त्यांच्या खोलात जाण्याचे येथे कारण नाही. मात्र तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो हे आता जगभरातील संशोधकांनी मान्य केले आहे. गांधी यांच्या म्हणण्यानुसार त्याबाबतचा अभ्यास समजा भारतात झाला नसता तरी त्याने काही फरक पडण्याचे कारण नव्हते. विज्ञान संशोधनाला अजून नकाशावरील सीमांची बंधने लागू नाहीत. भोगवादी अमेरिकेत जो पदार्थ वा विषाणू मानवी आरोग्यास घातक असतो, तोच भारतातही तसाच असतो. हे भलेही गांधी यांच्या स्वदेशी कल्पनेत आणि तंबाखू उद्योगात काम करीत असलेल्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगढमधील चार कोटी कामगारांबद्दलच्या कळवळ्यात बसत नसेल, परंतु त्याला विज्ञानाचा नाइलाज आहे. २००३च्या सिगारेट वा तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात या उत्पादनांवर कर्करोगाचा इशारा देणारी जी चित्रे छापली जातात त्यांचा आकार ४० हून ८५ टक्के असावा, अशी तरतूद आहे. चित्रांचा आकार मोठा केल्याने तंबाखूजन्य उत्पादनांच्या व्यवसायाचे अर्थकारण धोक्यात येण्याची शक्यता असून, सिगारेट-तंबाखू कारखानदारांच्या बडय़ा लॉबीचा म्हणूनच त्याला विरोध आहे. त्यांच्याप्रमाणेच हा गांधी यांच्या चिंतेचा विषय असू शकतो. त्या विषयीच्या संसदीय समितीच्या माध्यमातून त्यांनी सदरहू काळजीनेच प्रस्तुत भूमिका घेतली असावी. मात्र उद्योजक, व्यापारी किंवा या उद्योगातील कामगारांच्या कळवळ्यापोटी घेतलेल्या या भूमिकेपायी आपण देशातील लक्षावधी नागरिकांच्या स्वास्थ्याशी खेळत असल्याचे त्यांच्या लक्षात आलेले नाही. २०११मधील आकडेवारीनुसार तंबाखूजन्य आजारांवर हा देश वर्षांला एक लाख साडेचार हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यातून होणारे सामाजिक नुकसान तर मोजण्यापलीकडे आहे. तेव्हा दिलीप गांधी यांना अधिक कळवळा कुणाचा यायला हवा तर तो दरवर्षी कर्करोगाची शिकार होणाऱ्या किमान ८० हजार जणांचा. त्यांच्या या काळजीजन्य असत्याग्रहाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी परस्पर खंडन केले ते बरे झाले. विज्ञान हे विज्ञानच असते, असे ते म्हणाले. त्यातून सरकारच्या निर्णयांत तरी अद्याप छद्मविज्ञानाचा शिरकाव झाला नाही, हे दिसले. तेही मोठेच दिलासादायक आहे.