सचिन नावाचा जो उन्माद गेले काही दिवस देशभर पसरला होता आणि त्याचे जे बाजारीकरण चालू होते, प्रसारमाध्यमांनीही त्याला हातभार लावला होता. परंतु हे योग्य नाही असे मनापासून ज्यांना वाटत होते, त्या सर्वाच्या भावनेला ‘भारत आणि रत्न’ या अग्रलेखाने (१८ नोव्हेंबर) अत्यंत मार्मिक शब्दांत परखडपणे वाचा फोडली आहे. सगळा समाज बुद्धी गहाण टाकून वाहावत जात असताना त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे चोख काम या अग्रलेखाने बजावले आहे.
एक खेळाडू म्हणून सचिनची महानता निर्वविाद आहे. तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या जनतेच्या भल्यासाठी आपल्या लोकप्रियतेचा सचिनने काही उपयोग केला का याचा विचार करायला हवा. २०० शतकं झाल्यानंतर सचिनने केवळ दोन जाहीर सत्कार स्वीकारले : पहिला मुंबईत मुकेश अंबानींचा आणि दुसरा नाशकात पुण्यातल्या नामांकित बिल्डरचा, ज्यांची तो जाहिरात करतो. याउलट मुंबई महापालिकेच्या सत्कारासाठी त्याला वेळ नव्हता. महाराष्ट्राच्या पर्यटनमंत्री महोदयांनी राज्याचा पर्यटन विकास करण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर व्हावे म्हणून त्याला पाठवलेल्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यदेखील या महानायकाने दाखवले नाही. या घटना पुरेशा बोलक्या आहेत.
प्रा. सी. एन. आर. राव यांना त्याच वेळी भारतरत्न पुरस्काराने गौरवल्यामुळे हा विरोधाभास अधिक तीव्र झाला आहे. देशाचे भले व्यक्तिनिष्ठेमध्ये आहे की विज्ञाननिष्ठेमध्ये आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
– प्रशांत साजणीकर, वरळी, मुंबई.

‘अरेतुरे’ की ‘अहो-जाहो’?
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची रविवारी (१७ रोजी) झालेली पत्रकार परिषद विविध वाहिन्यांवर थेट दाखविण्यात येत होती. त्यात देशभरातील विविध बातमीदार/पत्रकार त्यांना इंग्रजी, हिंदी व मराठीत प्रश्न विचारत होते. बातमीदारांचे कौशल्य इथे पावलोपावली दिसत होते. पण हिंदी पत्रकार सचिनला ‘आप’ असे संबोधत होते. मराठी पत्रकार मात्र त्याला अरे, तुरेच्या भाषेत सतत ‘तू’ असे संबोधून विचारत होते. एखादा बुजुर्ग मराठी पत्रकार असे बोलला तर समजू शकते पण सगळेच मराठी पत्रकार ‘अरे-तुरे’ करणारे! या उलट सचिन अत्यंत सौजन्याने त्यांना ‘अहो, जाहो’  या पद्धतीनेच उत्तर देत होते.
मराठी भाषेत सौजन्य कमी आहे हे मान्य, पण पत्रकारांनी सचिनला थेट संबोधताना ‘तुम्ही’ का वापरू नये? चाळिशीच्या प्रौढ सचिनच्या सौजन्याचा फायदा घेऊन त्यांना ‘अरे, तुरे’  करायचे तर पत्रकारांची राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी किंवा तत्सम तरुणांना असे संबोधण्याची हिम्मत होईल का? इतकेच काय, कालपर्यंत साहित्यिक व राजकीय पुढारी असणाऱ्या पण बलात्काराचे आरोप असणाऱ्या लक्ष्मण मानेंचेसुद्धा हे अहो, जाहोच्या भाषेत वार्ताकन होते!
आपण मराठी लोक माघारी प्रसिद्ध व्यक्तींबद्दल बोलताना त्यांच्या माघारी ‘अरे, तुरे’च्या भाषेत ती लता, ती आशा किंवा तो सचिन, तो अमिताभ, तो रफी, तो मुकेश असे म्हणतो, तो आपला प्रघात आहे;  पण समक्ष दिसले तर असे बोलतो का?  
अनिल पारगांवकर , पुणे</strong>

१००% भानावर, १००% बेभान
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, क्रिकेटच्या सामन्यामध्ये यापुढे खेळणार नाही. त्याच्या अलीकडच्या दोन-तीन वर्षांतील कामगिरीवरून गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट जाणकार नाराज होते. सचिनने आता निवृत्ती घ्यावी, असे संकेत क्रिकेटविश्वातून उमटत होते. सचिन यांनी मात्र आपण कधी निवृत्त व्हायचे ते मनोमन ठरविले होते. सचिनने निवृत्ती जाहीर केल्यापासून त्याचा सर्व ठिकाणचा वावर आणि वर्तन तो १०० टक्के भानावर आहे याची साक्ष देत होते आणि त्याचे चाहते मात्र शंभर टक्के बेभान अवस्थेचे दर्शन घडवत होते.
या पाश्र्वभूमीवर, भारतरत्न पुरस्कारासंबधी ‘लोकसत्ता’ने अग्रलेखातून परखड विचार व्यक्त केले हे यथोचित झाले.
मोहन गद्रे, कांदिवली.

‘क्रिकेटदेवां’चे बीसीसीआय संस्थान!
‘सचिन‘देव’’ या अशोक राजवाडे (लोकमानस, १६ नोव्हें) यांनी लिहिले की सचिनच्या नावे कुणी तरी देऊळ बांधायचे बाकी राहिले आहे. वाटते की ज्याप्रमाणे बडय़ा बडय़ा देवस्थानांची ‘संस्थाने’ असतात त्याप्रमाणे बीसीसीआय हे ‘संस्थान’ सचिनच्या देवालयासारखेच कार्यरत आहे. आपल्या देशात देवाधर्माची सेवा करायची स्पर्धा भक्तगण व साधुगण यांच्यात सुरू असते; तर दुसरीकडे आपल्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बीसीसीआयसारख्या संस्थानात बडवे बनण्याची स्पर्धा सुरू असते.
नावात ‘आय’ (इंडिया) आहे पण इतर देवस्थानांप्रमाणेच बीसीसीआय स्वायत्त कारभार करते. क्रीडा मंत्रालय, आयकर विभाग आदी सरकारी विभागांना बीसीसीआय संस्थानच्या कारभाराची चौकशी करू देण्यास टाळाटाळ करते. कोर्टात क्रिकेट इंडिया हा भारताचा राष्ट्रीय संघ नसून बीसीसीआयचा संघ आहे असे प्रतिज्ञापत्र करते, पण  बीसीसीआय संस्थान खेळाडू (देवांना) अर्जुन, पद्म आदी सरकारी पुरस्कार मिळण्यासाठी भोळ्या भक्तांच्या (जनतेच्या) भावनेचा दबाव आणते.
महेश परब, डेट्रॉइट.

नतद्रष्ट आक्षेप
‘भारत आणि रत्न’ या अग्रलेखातील नतद्रष्टपणाच्या लिखाणामुळे कोटय़वधी क्रिकेटप्रेमी जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल! पण त्यावर आता तरी काही इलाज नाही.
सचिनच्या कारकिर्दीबद्दल या अग्रलेखात एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवला आहे तो म्हणजे सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराचे असंख्य प्रकार त्याच्या आजूबाजूला घडत असताना हा क्रिकेटचा देव मौन बाळगून राहिला. पण भ्रष्टाचार आणि सट्टेबाजी थांबण्यासाठी लागणारी ताकद ज्यांच्या जवळ होती व आहे त्यांनी फक्त आपल्या पदाचा तोराच मिरवला व आपल्या पदाद्वारे जेवढी लूट करता येईल तेवढी केली!
समजा सचिनने या अग्रलेखातील म्हणण्याप्रमाणे, या घाणेरडय़ा प्रकरणामागे लागायचे ठरवले असते तर इतके विश्वविक्रम तो करू शकला नसता आणि भ्रष्टाचारालाही आळा घालू शकता नसता म्हणजे त्याची अवस्था ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’ अशी झाली असती.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व).

मतांच्या भुकेपायी
‘भारत आणि रत्न’ हा अग्रलेख अतिशय संयमित परंतु परखड असून अनेक सुसंकृत विचारवंतांच्या मनातील खळबळ दर्शविणारा आहे. आपले सत्ताधीश, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, त्यांचे सर्व निर्णय निव्वळ सवंग लोकप्रियतेचे आणि मतांच्या भुकेपायीच घेतले जातात. अशा निर्णयामागे दूरदृष्टी किंवा देशहिताचा अभावच दिसून येतो. सर्वोच्च पुरस्कार खिरापतीसारखे वाटायचे नसतात. सीएनआर राव यांनी मांडलेल्या भूमिकेशीही मी मन:पूर्वक सहमत आहे.
प्रमोद घाटे, ठाणे</strong>

उक्ती आणि कृती यांत फरक का?
लोकसत्तातील अग्रलेख आणि भारतरत्न सीएनआर राव यांची मते (१८ नोव्हें) दोन्हीही परखड होते. एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे लोकसत्ताच्या उक्तीत आणि कृतीत फरक आहे.  सचिनबद्दल संपादकीय मते परखड असताना प्रत्यक्षात लोकसत्तातील रकानेच्या रकाने सचिनच्या बातम्यांनीच भरले आहेत!
गेली काही वष्रे पद्मश्रीची खिरापत वाटली जात आहे, तसे भारतरत्नच्या बाबतीत होऊ नये.
– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)