‘आदिवासी कलावंत’ ही प्रतिमा बदलून ‘डोक्रा कास्टिंग’ आणि ‘गढम्वाकाम’ या शिल्पकला-प्रकारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डॉ. जयदेव बघेल यांनी केले. ग्लासगो स्कूल ऑफ आर्ट्स (स्कॉटलंड), हेडनबर्ग विद्यापीठ (जर्मनी) या शिक्षणसंस्थांसह लॉस एंजलिस, मेलबोर्न, कॅनबेरा, सिडनी, अॅमस्टरडॅम, पॅरिस, लंडन, फ्लोरेन्स, सिंगापूर, हाँगकाँग, ओसाका आणि अर्थातच अनेक भारतीय शहरांत त्यांनी आठ दिवस ते तीन महिने अवधीच्या कार्यशाळांतून अनेकांना प्रशिक्षित केले आहे. या कार्यास मिळालेली एक दाद त्यांना महत्त्वाची वाटे.. रायपूरच्या विद्यापीठाने २००३ मध्ये त्यांना दिलेली (सन्माननीय) डॉक्टरेट!
जयदेव हे मूळ निवासी शिल्पकार कुटुंबात १९५० च्या सुमारास जन्मले. त्यांचे वडील सिरमनराम हेही प्रख्यात शिल्पकार होते. नेहरूकाळात लोककलांना जे प्रोत्साहन मिळाले, त्यातून १९६० मध्ये उत्तम लोक-कलावंतांचे एक सर्वेक्षण झाले, त्यात सिरमनराम अव्वल कलावंतांपैकी ठरले होते. मग सिरमनरामांचे एक जुने शिल्प बाझलच्या (स्वित्र्झलड) संग्रहालयातही गेले. पुढे जयदेव यांचेही एक शिल्प मेन्झ संग्रहालयाने २५०० पौंडांना खरीदले; ‘पण ते मी सरकारला ५००० रुपयांना आधीच विकले होते!’ असे जयदेव एका मुलाखतीत म्हणाले होते. असे काही अपवाद वगळता व्यवहाराला जयदेव चोख असत. वडिलांकडे ख्यातनाम शिल्पकार मीरा मुखर्जी शिकण्यासाठी येत, तर जयदेव यांनी नवजोत अल्ताफ (मुंबई) या शिल्पकर्तीसह समपातळीवर ‘कोलॅबोरेटिव्ह’ काम केले होते. नवजोत यांनी तेथील अन्य कलावंतांसह कामही केले, पण त्या अथवा संजय वाघमारेंसारख्या वैदर्भी शिल्पकार यांसाठी जयदेव हे ‘प्रवेशदार’ ठरले. छत्तीसगड राज्यात, बस्तरमधील कोंडागावनजीक जयदेव यांनी स्वत:चा स्टुडिओ आधीच सुरू केला होता. आजही तेथे २० उमेदवार आहेत. याच भागातील अन्य शैलींतील चित्रे- शिल्पे करणाऱ्यांनाही वाव मिळावा, म्हणून ‘शिल्पग्राम’ या संस्थेची स्थापना जयदेव यांच्या पुढाकाराने १९९२ मध्ये झाली. उद्घाटनास माधवराव शिंदे आले. त्यापूर्वी व त्यानंतरही, मानसन्मान भरपूर मिळाले. ऐन विशीत, १९७७ साली हस्तकला/ लोककलेच्या क्षेत्रांतील ‘राष्ट्रीय पुरस्कार’, मग १९८२ चा ‘शिखर सम्मान’ हे त्यातील प्रमुख.
या साऱ्यापेक्षा मोठे यश म्हणजे, आज महाराष्ट्रातही अनेक कलाप्रेमी घरांत पोहोचलेली बस्तरची शिल्पे! ती जयदेव यांची नाहीत.. पण एखाद्या पारंपरिक कलेचा सर्वदूर आणि मध्यमवर्गीयांपर्यंत कसा प्रसार होऊ शकतो, याचे अर्थशास्त्र जयदेव यांच्या प्रयोगांमधूनच सुकर झाले. रावदेव, धन्तेश्वरीदेवी, मौलादेवी यांच्या मूर्तीऐवजी आता सवर्णाच्या देवांच्याही मूर्ती डोक्रा/ गढम्वाकाम शैलीत बनू लागल्या. अन्य विषयांतही वैविध्य आले. जयदेव ९ नोव्हेंबरच्या पहाटे गेले, तरी हे यश उरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
डॉ. जयदेव बघेल
‘आदिवासी कलावंत’ ही प्रतिमा बदलून ‘डोक्रा कास्टिंग’ आणि ‘गढम्वाकाम’ या शिल्पकला-प्रकारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डॉ. जयदेव बघेल यांनी केले.
First published on: 12-11-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality of the day dr jaydev baghel