सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्ती यांची हाव अखेर माणसाला गुलाम बनवण्याकडे घेऊन जाते. सत्ताधाऱ्यांना गुलामांसारखे त्यांचा शब्द झेलणारे अनुयायी मिळतातही; पण आपणही हव्यासाचे गुलाम आहोत, हे सत्ताधाऱ्यांना वा संपत्ती वाढवत नेणाऱ्यांना कळेनासे होते..

सत्ता आणि संपत्ती यांची हाव अखेर माणसाला गुलाम बनवण्याकडे घेऊन जाते. सत्ताधाऱ्यांना गुलामांसारखे त्यांचा शब्द झेलणारे अनुयायी मिळतातही; पण आपणही हव्यासाचे गुलाम आहोत, हे सत्ताधाऱ्यांना वा संपत्ती वाढवत नेणाऱ्यांना कळेनासे होते..
सत्ता आणि संपत्ती या दोन फार मोठय़ा शक्ती आहेत. त्या दोन्हींचा मोह फार जबरदस्त असतो. त्या मिळाल्यावर त्यांचा योग्य उपयोग करणारी माणसे मानवी इतिहासात फारच क्वचित सापडतात. त्यांच्या मोहात न अडकणारी तर त्याहून विरळा. राजा हा विष्णूचा अवतार, त्यामुळे त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हा देहदंड करण्याइतका मोठा अपराध मानला गेला. समाजात संपत्तीचे महत्त्व पटवण्याची कधी गरजच भासली नाही. ‘सर्वे गुणा: कांचनम् आश्रयन्ते’ (सर्व गुण सुवर्णाच्या आधाराने राहतात) हे सूत्र समाजातल्या चापलूस मंडळीनी पक्के रुजवून टाकले.
या दोन शक्तींचा सर्वात मोठा दुरुपयोग गुलामगिरीची पद्धत निर्माण करण्यात झाला. ही पद्धत म्हणजे मानवी संस्कृतीवरच अत्यंत घृणास्पद असा डाग आहे. आपली कामे करण्यासाठी सेवक नेमले जात. त्यांना वेतनासाठी काही द्यावे लागे. पण नंतर युद्धांत पाडाव करून आणलेले लोक गुलाम म्हणून वापरले जाऊ लागले. त्यांना फक्त जिवंत राहण्यासाठी ही एवढी किंमत मोजावी लागत असे. मग या लोकांच्या वाटय़ाला वंशपरंपरेने गुलामगिरीच आली. हक्क आणि कर्तव्य यांमध्ये त्यांना हक्कांचा उच्चारही न करता फक्त कर्तव्येच बजावावी लागत. त्यांच्यावर पिढय़ान्पिढय़ा अनन्वित अत्याचारच होत राहिले. गुरांचे बाजार भरावेत तसेच मानवी गुलामांचे बाजार भरत असत. स्त्रियांवरच्या अत्याचारांना तर सीमाच नसे. नुसत्या अन्नवस्त्राच्या मोबदल्यात गुलामांना वाटेल तसे वागवले जात असे. जवळजवळ साऱ्याच संस्कृतींमधल्या वास्तुशास्त्रांतले सुंदर नमुने गुलामांच्याच श्रमावर उभे राहिले. मालकांची चैन त्यांच्यासमोरच चालत असे आणि त्याला साक्षी होत हालअपेष्टा भोगत पिढय़ान्पिढय़ा राहावे लागे. नरकवास याहून भयंकर असेल असे वाटत नाही.
रोमन इतिहासांत गुलामांनी अनेकवार बंडे केली. त्यात स्पार्टाकस ग्लॅडिएटरचे बंड अतिशय गाजले. ग्लॅडिएटर हे तलवारबहाद्दर गुलामच असत. लोकांच्या करमणुकीसाठी त्यांना आपसांत किंवा वाघसिंहांसारख्या हिंस्त्र पशूंशी लढावे लागे. स्पार्टाकसने गुलामांमध्ये स्वातंत्र्याचे वारे भरले आणि मोठा उठाव केला. त्याने एक लाखाचे सैन्य उभे केले आणि उत्तरेत असलेल्या रोमन सैन्याचा पाडाव केला. पण रोमन सैन्य शिस्तीत वाढलेले आणि युद्धतंत्रात प्रवीण असलेला पॉम्पीसारखा सेनानी. त्यामुळे गुलामांच्या सैन्याचा त्यांच्यासमोर टिकाव लागला नाही.   तरी त्यांनी दक्षिणेकडे वळून इटालीचा चिंचोळा दक्षिण भाग जिंकून घेतला. त्यांना अडवण्यासाठी रोमन कॉन्सल क्रॅससने भलीमोठी भिंत बांधून काढली. पण हाही अडथळा पार करून गुलामांचे सैन्य चालून आले. जनरल पॉम्पीने त्यांचा पाडाव करून शरण आलेल्या ३०-४० हजार गुलामांची कत्तल केली.
पॉम्पी आणि क्रॅससने तरुण सेनापती ज्युलियस सीझर याला उत्तरेच्या गॉल प्रांताचा गव्हर्नर नेमले. त्याने युद्धात पाडाव केलेले सारेच सैनिक गुलाम म्हणून रोमला न पाठवता त्यांच्यापैकी निवडक आपल्या सैन्यांत भरती करून घेण्याचे धोरण अवलंबले. नंतर पॉम्पीच्या सैन्याचा पराभव करून ज्युलियस सीझर रोमचा सर्व सत्ताधीश झाला. वरिष्ठ वर्गालाच जास्त मताधिकार असलेली लोकशाही रोममध्ये होती. सीझरचे पुत्रवत प्रेम असलेला त्याचा सेनापती ब्रुटस हा त्या लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. त्याच्याच एका पूर्वजाने रोमन बादशाही नष्ट करून लोकशाही स्थापित केली होती. या गोष्टीचा त्याला जाज्वल्य अभिमान होता. ज्युलियस सीझरचा मत्सर करणाऱ्या रोमन सिनेटरांच्या जाळ्यांत ब्रूटस सापडला. ज्युलियस सीझर बादशहा होण्याच्या प्रयत्नात आहे असे सांगून त्यांनी ब्रूटसला आपल्या कटांत सामील करून घेतले. कारण त्यांना ब्रूटसच्या लोकप्रियतेचा फायदा हवा होता. उघड युद्धांत सीझरला हरवणे शक्य नसल्याने या कटवाल्यांनी ज्युलियस सीझरचा खून केला. पण ज्युलियस सीझरच्या पराक्रमामुळे लोक त्याला देवासारखाच मानायला लागले होते. त्यामुळे सीझरचा दत्तकपुत्र ऑक्टेव्हियन आणि मित्र मार्क अ‍ॅन्टनी यांनी सैन्य उभारून कटवाल्यांचा पाडाव केला आणि ब्रुटससह सगळे ठार झाले. ऑक्टेव्हियन हा ऑगस्टस सीझर नाव धारण करून बादशहा झाला आणि आणि पुढे कित्येक वर्षे रोमच्या बादशहांनी सीझर हेच बिरूद मिरवले.
शेक्सपिअरने ज्युलियस सीझर हे अतिशय उत्कृष्ट नाटक लिहिले आहे. त्यांत ज्युलियस सीझरचा खून करून आल्यावर ब्रूटस जनतेसमोर उत्तम भाषण देतो आणि सीझरची महत्त्वाकांक्षा सम्राट होऊन रोमन नागरिकांना गुलाम करण्याची होती म्हणून मी त्याला मारले असे सर्वाना पटवून देतो. पण हे विचार नागरिकांना समजत नाहीत, हे नाटकांत फार छान दाखवले आहे. ब्रूटसचे भाषण आटोपल्यावर एक नागरिक म्हणतो, ‘आपण ब्रूटसला सीझर करूया!’
स्वातंत्र्याची आकांक्षा अधूनमधून जोर धरते आणि क्रांतीसुद्धा होते. फ्रान्समध्ये १८व्या शतकाच्या शेवटी क्रांती झाली. सीझरच्या तोडीचा योद्धा म्हणून गाजलेला नेपोलियन हा या क्रांतीचेच अपत्य. पण त्याच्या हातांत सत्ता आल्यावर त्याने लोकशाहीचा प्रयोग विचित्र रीतीने संपवला. निवडणुका घेऊन स्वत:ला बादशहा घोषित करून घेतले. युरोपातल्या इतर बादशाह्या या उपटसुंभाला राज्य करू द्यायला तयार नव्हत्या. त्यांनी एकत्र येऊन नेपोलियनला तुरुंगात टाकले आणि जुना राजा लुई याला गादीवर बसवले. नेपोलियननेही आपल्या पराक्रमाने आणि उत्तम राज्यकारभाराने जनतेची मने जिंकलेली होती. काही वर्षांनी पुन्हा उठाव करून फ्रेंचांनी नेपोलियनच्या पुतण्याला सिंहासन दिले.
आता जगभर राजसत्ता नाहीशा झाल्या आहेत किंवा मोडकळीला आल्या आहेत. लोकशाहीचे प्रयोग सुरू आहेत, पण प्रत्यक्षात लोकशाही कोठेच अस्तित्वात नाही. एकदा सत्ता हातात आली की ती स्वार्थासाठी राबवायची आणि अमाप संपत्ती गोळा करून ती परत सत्ता काबीज करायला वापरायची. परत लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हणून पाठ थोपटून घ्यायला ही मंडळी मोकळी असतात.
माणसाच्या रक्तात मुरलेल्या गुलामगिरीचाच हा एक भाग आहे. ज्यांना संधी मिळते ते इतरांना गुलाम करायला पाहतात आणि जे गुलामगिरीत खितपत पडलेले असतात ते केवळ मुक्त व्हायचीच नव्हे, तर संधी मिळाली की इतरांना गुलाम करायच्या प्रयत्नात असतात. गुलामगिरी संपूर्णपणे नष्ट करणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच’ असे म्हटले तेव्हा प्रत्येक भारतीयाचाही तो हक्क मान्य केलेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रता देवीचे सूक्त लिहिले तेव्हा तिला ‘मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे’ असे म्हटले, तेव्हा त्यांनाही इतरांना गुलाम बनवण्याची इच्छा नव्हती. या दोघांनी आणि महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांसारख्या लोकनेत्यांनीही सत्तेचीसुद्धा अपेक्षा बाळगली नाही.
तळागाळांतल्या व्यक्तींनाही समृद्धी आणि न्याय यात वाटा मिळणार नसेल तर स्वातंत्र्याला फारसा अर्थच उरत नाही. फक्त त्यांचे शोषण करणारे परकीय होते, ते आता भारतीय असतील एवढाच फरक शिल्लक राहील. तसे शोषकसुद्धा गुलामच असतात आपल्या हव्यासाचे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Power and asset