‘खबरदार, विचार कराल तर..’ या कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिहिलेल्या अग्रलेखातील (१७ फेब्रुवारी) ‘भांडारकर संस्थेवरील हल्ल्या’चा उल्लेख अप्रस्तुत वाटला. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला विचार संपवण्यासाठी केला गेला असू शकतो; परंतु भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरील हल्ल्याबाबत मात्र असे म्हणता येत नाही. जेम्स लेननामक परकीय व्यक्तीला हाताशी धरून रस्त्यावरील अश्लील विनोदाला इतिहास म्हणून प्रचलित करण्याच्या ‘अविचारी’  प्रयत्नाचा निषेध म्हणून भांडारकर प्रकरण घडले.
 नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे हल्लेखोर पसार झाले, मात्र भांडारकर प्रकरणातील तरुण ंआपला निषेध नोंदवून तिथेच घोषणा देत थांबले  होते. तेव्हा वृत्तपत्रातील कुणालाही या तरुणांना भेटून त्यांच्या निषेध कृत्यामागची पाश्र्वभूमी का समजून घ्यावीशी वाटली नाही? आजही हे तरुण जिवंत आहेत. तेव्हा दाभोलकर, पानसरे यांच्यावरील हल्लेखोर व भांडारकर प्रकरणातील तरुण यांची तुलनाच होऊ शकत नाही.
दाभोलकर-पानसरे यांच्यावरील हल्लेखोरांनी महाराष्ट्राला निश्चितपणे ‘खबरदार.. विचार कराल तर..’ हा इशारा दिला; पण भांडारकर प्रकरणातील तरुणांनी मात्र ‘खबरदार.. अविचार कराल तर..’ असा इशारा त्यांच्या निषेध कृत्यातून दिला आहे. म्हणून हा पत्रप्रपंच.
बालाजी जाधव, औरंगाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धार्मिक शक्तींना राजाश्रय मिळतो आहे
‘खबरदार, विचार कराल तर..’ या अग्रलेखात (१७ फेब्रु.) म्हटल्याप्रमाणे, पुरोगामी विचारवंतांच्या महाराष्ट्रात वैचारिक समतोल ढासळतो आहे आणि तथाकथित प्रतिगामी-पुरोगामी संघटनांमध्ये गुंडगिरी बोकाळते आहेच; परंतु काही मुद्दे मात्र प्रकर्षांने खटकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, डॉ. दाभोलकरांच्या हत्येआधी अनेक वेळा काही धर्माध संघटनांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे इंटरनेटवरच्या त्यांच्या वेबसाइटवरून धमक्या दिल्या होत्या आणि त्याविरुद्ध अंनिसने पोलिसात तक्रारसुद्धा दखल केली होती आणि विशेष म्हणजे अंनिसला छुप्या पद्धतीने जमेल तितका त्रास द्यायचा असा विडाच धर्माध शक्तींनी आणि साधू-भोंदूंनी घेतला होता आणि आज तर तो वाढलाच आहे, हे अंनिसच्या कार्यकर्त्यांना काम करताना जाणवते आहे. काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना आजही, ‘तुमचा दाभोलकर करू’ अशा आशयाच्या धमक्या येत असतात आणि पोलीसदल याबाबत अक्षम्य दिरंगाई दाखवते.  
कॉम्रेड पानसरे हेसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये, या वयातसुद्धा सक्रिय आहेत. काही दिवस आधी त्यांनी नेहमीप्रमाणेच धर्माध प्रवृत्तींवर टीका केली होती. म्हणजे आता या राज्यात समाजसंतुलन बिघडवणाऱ्या प्रवृत्तींवर उघडपणे टीका करणेसुद्धा ‘खूनपात्र गुन्हा’ ठरतो आहे काय? आणि असे असेल, तर प्रतिगामी धर्माध शक्तीची ताकद बळावते आहे, हे कसे नाकारणार? गेल्या काही महिन्यांत साधू-भोंदूंचा वाढणारा उपद्रव, इंग्रजी-चर्चच्या शाळांवर दिल्लीमध्ये झालेले हल्ले, हे सारे देशातील सामाजिक संतुलन बिघडवणारेच आहे. म्हणून धार्मिक शक्तींना कुठे तरी राजाश्रय मिळतो आहे की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे.
राज्य सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांची सत्तेची साठमारी आणि रुसवेफुगवेच संपत नाहीत. त्यामुळे विचारस्वातंत्र्याची ऐशीतशीच झाली आहे.
अंकुश मेस्त्री, बोरिवली (मुंबई)

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response on loksatta news
First published on: 18-02-2015 at 12:06 IST