कोणतीही वृत्ती मनात उठू न देता सातत्यानं नाम घेतलं की भगवंत दूर नाहीच, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पण जिथे वृत्ती आवरणंदेखील आपल्याला साधत नाही, तिथे मनात वृत्ती उठूच न देणं तर किती कठीण आहे! आपल्याला ते शक्य वाटत नाही. कोणतीही वृत्ती उठू न देणं आपल्या हातात नसलं तरी नाम सतत घेण्याचा प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे! जर ती नामाची दोरी सुटू न देण्याचा प्रयत्न केला की मन अंतर्मुख होत जाईल. मग आपल्या वृत्तींकडे ते तटस्थपणे पाहू शकेल. आपल्या वृत्तींचा उगम कुठे आहे आणि त्या वृत्तींमुळे आपल्या जीवनाचा प्रवाह कोणत्या दिशेनं वाहात आहे, याची तपासणी साधेल. आपला जन्मच वासनेत आहे. त्यामुळे आपल्या वृत्तींचा उगमही वासनेतच आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘वासनेतून वृत्ती, वृत्तीतून ऊर्मी आणि ऊर्मीतून कृती, असा क्रम आहे’’ (चरित्रातील वृत्तीविषयक वचने, क्र. १२). आज आपल्या समस्त वासना या ‘मी’ आणि ‘माझे’शी जखडल्या आहेत. या ‘मी’ची वाढ भौतिकाच्याच आधारानं होत असल्याने माझ्या वासनांचा ओढा भौतिकाकडेच आहे. त्यामुळे या वासनेला अनुरूप अशीच वृत्ती माझ्यात उत्पन्न होते. माझी वृत्ती ही मला भौतिकाकडेच प्रवृत्त करीत असते. त्या वृत्तीतून, भौतिकात अखंड सुख मिळावं, ही ऊर्मी मनात उत्पन्न होते. ऊर्मी मला स्वस्थ बसू देत नाही. वासनेच्या पूर्तीसाठी कृती करायला ती भाग पाडते. तर वासनेत उगम पावलेली आणि त्या वासनेच्या पूर्तीसाठीच मला कृतीत जुंपणारी वृत्ती मनात उठू न देता नाम घ्यायचं, हे कठीण आहे. त्यामुळे निदान नामस्मरण तरी अखंड चालवण्याचा प्रयत्न करू. या प्रयत्नानं नामातलं सत्यत्व जाणवण्याआधीच दोन गोष्टीही घडतील. पहिली गोष्ट ही की, नाम हे आर्तपणे, मनापासून होत नसल्याने ते कोरडय़ा कृतीसारखं सुरू होईल. मग भौतिकाच्या ओढीनं, त्याच्या पूर्तीसाठी मनापासून होणारी कृती आणि नामस्मरणाची ‘कृती’ यांच्यात आपोआप, नकळत संघर्ष सुरू होईल. नाम घेत बसलं तरी भौतिक ओढत राहील. एकदा एवढा जप ‘करून टाकला’ की मग ते महत्त्वाचं काम करू, अशी मनाची स्थिती राहील. भौतिकातल्या महत्त्वाच्या कामांची यादी रोज नित्यनवी आणि लांबणारीच असेल. त्या कामांमध्ये नामाची ‘कृती’ आड येऊ लागेल. थोडक्यात नाम घेत असतानाही भौतिकाचंच स्मरण कायम असेल. त्यावर, या घडीला बेचव वाटणारं, कृत्रिम वाटणारं नामच मात करील. श्रीमहाराज सांगतात, ‘‘वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे’’ (चरित्रातील वृत्तीविषयक वचने, क्र. १). तेव्हा अस्थिर वृत्तीनंही नाम अखंड चालवण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू स्थिर अशा भगवंताचंच स्मरण होऊ लागेल. ते जितकं वाढेल तितकी वृत्ती स्थिर होत जाईल. अस्थिर भौतिकाशी जखडलेली वृत्ती अस्थिरच असणार. ती स्थिर भगवंतापाशी जसजशी गोळा होत जाईल तसतशी स्थिर होईल. मग नामातही जिवंतपणा येईल. नामातलं सत्यत्व, नामातला भगवंत जाणवू लागेल, नव्हे तो धावतच येईल!
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2013 रोजी प्रकाशित
२०१. वृत्ती-निवृत्ती
कोणतीही वृत्ती मनात उठू न देता सातत्यानं नाम घेतलं की भगवंत दूर नाहीच, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पण जिथे वृत्ती आवरणंदेखील आपल्याला साधत नाही,
First published on: 15-10-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement attitude