वाढत जाणाऱ्या वयाला थोपवता येत नाही. विम्बल्डन पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात उत्तरोत्तर रंगलेल्या मुकाबल्यादरम्यान या अपूर्णतेची जाणीव प्रकर्षांने झाली. गेल्या महिन्यात फ्रेंच खुल्या स्पर्धेत लाल मातीवर जेतेपद पटकावत ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्याची संधी जोकोव्हिचला होती. ‘लाल मातीचा बादशाह’ असणाऱ्या राफेल नदालला नमवत जोकोव्हिचने अर्धी मोहीम फत्ते केली. परंतु स्टॅनिस्लॉस वॉवरिन्काने जोकोव्हिचचे स्वप्न अधुरेच ठेवले. विम्बल्डनच्या लाडक्या ग्रास कोर्टवर विक्रमी १८वे जेतेपद पटकावण्यासाठी फेडरर सज्ज होता. युवा, तडफदार खेळाडूंना नमवत फेडररने अंतिम फेरी गाठली. मात्र जोकोव्हिचने फेडररला अपूर्णतेची जाणीव करून देत जेतेपदाला गवसणी घातली. फेडररने शेवटचे ग्रँड स्लॅम २०१२मध्ये याच विम्बल्डनवर पटकावले होते. त्यानंतर सुरू आहे एक केविलवाणा प्रवास. फेडररचे योगदान खेळापुरते सीमित नाही. महान खेळाडूंनी नव्या पिढीसाठी अनुकरणीय असावे या अलिखित अपेक्षेला साजेसे असे फेडररचे वर्तन असते. म्हणूनच एकहाती बॅकहँड, भेदक सव्र्हिस किंवा प्रतिस्पध्र्याला अचंबित करणाऱ्या लॉबच्या फटक्यापेक्षा फेडरर एक अनुभव म्हणून ‘याचि देही़, याचि डोळा’ साठवून घेण्यासाठी जगभरचे चाहते आतुर असतात. गेल्या तीन वर्षांपासून ग्रँड स्लॅम जेतेपद आणि फेडरर यांचे नाते दुरावलेच. फेडररबद्दल हळहळ व्यक्त करण्यापलीकडे चाहत्यांच्या हाती काही लागत नसूनही प्रेम कमी झालेले नाही. फेडररला मात्र अजूनही खेळायचे आहे. दर्जेदार खेळण्याची भूक आणि जेतेपदाचा हव्यास यातला फरक धूसर आहे आणि या धूसर रेषेवरूनच फेडररचा प्रवास सुरू आहे. कारण विक्रम आणि जेतेपदे यांचा मोह फेडररसारख्या दिग्गजालाही आवरता आलेला नाही. फेडरर-नदाल-जोकोव्हिच या त्रिकुटाची सद्दी आता मोडली आहे. यापैकी नदालची अवस्था जखमी वाघासारखी आहे. फेडरर नुसता खेळतोच आहे आणि जोकोव्हिचला याच टप्प्यातून जावे लागणार आहे. फेडरर ३३व्या वर्षी दर्जेदार खेळतो आहे, त्याला जेतेपद मिळावे, यासाठी जगभरातल्या चाहत्यांनी करुणा भाकली होती. मात्र अशा प्रार्थनांपेक्षा व्यावसायिक सातत्य जेतेपद मिळवून देते हे जोकोव्हिचने सिद्ध केले. विविध विक्रमांसाठी निवृत्ती लांबवणारा सचिन तेंडुलकर आणि आणखी एक ग्रँड स्लॅम जेतेपद, असे म्हणत निवृत्ती पुढे रेटणारा फेडरर हे साम्य महानतेला साजेसे नाही. चाहत्यांच्या मनात शिखरावर असतानाच सन्मानाने निवृत्ती घेतली नाही, तर पूर्णविरामातही अपूर्णता राहते. योगायोगाने फेडररच्याच वयाच्या सेरेना विल्यम्सने जेतेपदांमध्ये राखलेले सातत्य सर्वोत्तम उदाहरण आहे. सातत्य आणि एकूणच दर्जा याबाबतीत महिला टेनिस पिछाडीवर आहे, मात्र सेरेना त्याला अपवाद आहे. ग्रँडस्लॅम पसाऱ्यात भारताचे शिलेदार वर्षांनुवर्षे कायम आहेत. जेतेपदांमध्ये त्यांनी राखलेले सातत्य प्रशंसनीय आहे. स्वत:भोवती विविध वादांची राळ उडत असतानाही सानियाने खेळाप्रति जपलेली निष्ठा अपवादात्मक आहे. वैयक्तिक आयुष्यात पेस कठीण कालखंडातून जात आहे. मात्र त्याचा खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता जिंकण्याचे व्रत त्याने नेहमीप्रमाणे जपले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2015 रोजी प्रकाशित
अपूर्णतेचा पूर्णविराम
वाढत जाणाऱ्या वयाला थोपवता येत नाही. विम्बल्डन पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात उत्तरोत्तर रंगलेल्या मुकाबल्यादरम्यान या अपूर्णतेची जाणीव प्रकर्षांने झाली.

First published on: 14-07-2015 at 04:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer again misses chance to win a record 8th wimbledon title